सरोवर : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खोलगट भागातील जमिनीने वेढलेला किंवा बंदिस्त जलाशय म्हणजे सरोवर. लॅकॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ खळगा किंवा तलाव, यावरून लेक (सरोवर) हा शब्द आला आहे. तलाव हे तुलनेने छोटे व उथळ असतात परंतु आकाराच्या दृष्टीने सरोवर व तलाव यांच्यात वेगळेपणा दाखविणारे निश्चित प्रमाण किंवा मोजमाप नाही. सामान्यपणे सरोवर ही संज्ञा नैसर्गिक जलाशयाला वापरली जाते. सरोवराचे स्थान, त्याच्या निर्मितीची कारणे, आकार व पाण्याचे स्वरूप इत्यादींमध्ये विविधता आढळते. जगातील काही मोठे अंतर्गत समुद्र म्हणजे सरोवरेच आहेत. उदा., मृत समुद्र, गॅलीली समुद्र, कॅस्पियन समुद्र, अरल समुद्र इत्यादी. अनेक मानवनिर्मित जलाशयांनाही सरोवर ही संज्ञा वापरली जाते. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील हूव्हर धरणाचा जलाशय म्हणजे मीड सरोवर. काही वेळा किनाऱ्यावरील जलाशयांच्या बाबतींतही सरोवर ही संज्ञा वापरली जाते. उदा., भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील ओरिसा राज्यातील चिल्का सरोवर, व्हेनेझुएलातील माराकायव्हो व लुइझिॲना राज्यातील पाँटचारट्रेन सरोवर. कधीकधी नदीच्या अधिक रूंद पात्राच्या बाबतीतही सरोवर ही संज्ञा वापरली जाते. उदा., मिनेसोटा व विस्कॉन्सिन यांदरम्यानचे मिसिसिपी नदीतील पेपीन सरोवर. जगातील सर्वच भागांत सरोवरे आढळत असली, तरी बहुतांश सरोवरे भरपूर पावसाच्या प्रदेशात आढळतात. काही सरोवरे अगदी उंच प्रदेशात तर काही समुद्रसपाटीपेक्षाही बरीच खोल भागात आढळतात. दक्षिण अमेरिकेतील तितिकाका हे जगातील सर्वाधिक उंचीवरील (सस.पासून ३,८०२ मी.) सरोवर आहे. रशियातील बैकल हे पाण्याच्या साठयाबाबत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे व जगातील सर्वांत जास्त खोली असणारे सरोवर आहे. मृत समुद्र सस.पासून ४०० मी. खोलीवर आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वांत मोठे सरोवर एअर सस.पासून १६ मी. खोलीवर आहे. उथळ व खाऱ्या पाण्याचे हे सरोवर ऑस्ट्रेलियाच्या शुष्क प्रदेशात आहे. केवळ अधूनमधून येणाऱ्या वादळी पावसातच ते भरते. शुष्क प्रदेशातील सरोवरे पाऊस संपल्यानंतर बाष्पीभवनामुळे काही काळ कोरडी पडतात. सरोवरांच्या ओल्या व कोरडया ऋतूतील आकारमानात भिन्नता आढळते. आफ्रिकेतील सहारा वाळवंटाला जवळ असलेल्या चॅड सरोवराच्या बाबतीत अशी फार मोठी तफावत आढळते.

सामान्यपणे सरोवरे ही गोडया पाण्याची असतात असे मानले जात असले तरी अनेक सरोवरे, विशेषत: शुष्क प्रदेशातील, जास्त बाष्पीभवन क्रियेमुळे खाऱ्या पाण्याची बनलेली आहेत. कॅस्पियन समुद्र, मृत समुद्र व ग्रेट सॉल्ट लेक ही जगातील खाऱ्या पाण्याच्या सरोवरांपैकी आहेत. संयुक्त संस्थाने व कॅनडा यांदरम्यानची पंचमहासरोवरे ही जगातील मोठी गोड्या पाण्याची सरोवरे आहेत. सुपीरिअर हे जगातील सर्वांत मोठे गोडया पाण्याचे सरोवर आहे, तर कॅस्पियन समुद्र हे जगातील सर्वांत मोठे सरोवर आहे. अनेक सरोवरे अधिक उंचीवर व पर्वतीय प्रदेशातही निर्माण झालेली आढळतात.

सरोवरांच्या निर्मितीची कारणे अनेक आहेत. जगातील आजची बहुतांश सरोवरे एके काळी हिमनदयांनी आच्छादलेल्या प्रदेशांत असून ती हिमनदयांच्या कार्यातून निर्माण झालेली आहेत. प्रवाही हिमनदयांच्या खननकार्यामुळे द्रोणींच्या वलशिळा खरवडल्या गेल्याने झालेल्या खोलगट भागांत सरोवरे निर्माण झाली. हिमोढांच्या संचयनामुळे पूर्वीच अस्तित्वात असलेल्या नदयांच्या प्रवाहमार्गात बांध निर्माण होतात. हिमनदया वितळू लागल्या की त्यांचे पाणी हिमोढाच्या वरच्या भागातील दरीत साचून सरोवरांची निर्मिती होते. पर्वतीय प्रदेशातून वाहत असताना हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे पर्वत उतारावरील अर्धवर्तुळाकार किंवा एखादया आरामखुर्चीच्या आकाराचे खोलगट भाग निर्माण होतात. यांना सर्क म्हणतात. अशा सर्कमध्ये सरोवराची निर्मिती झालेली आढळते. हिमनदयांनी आपल्या बरोबर वाहून आणलेल्या गाळाच्या निक्षेपांमध्ये बर्फाचे गट गाडले जातात. जेव्हा त्यातील बर्फ वितळते तेव्हा गाळाचा ढीग खचून तेथे खड्डा तयार होतो. याला हिमगर्त असे म्हणतात. अशा हिमगर्तात पाणी साचून सरोवराची निर्मिती होते. आशिया, यूरोप व उत्तर अमेरिका खंडांच्या उत्तरेकडील भागांत आढळणारी अनेक सरोवरे हिमनदीच्या कार्यामुळे निर्माण झालेली आहेत. उदा., पंचमहासरोवरे, कॅनडातील ग्रेट बेअर व ग्रेट स्लेव्ह सरोवरे इत्यादी. एकटया कॅनडात जगाच्या जवळजवळ निम्मी सरोवरे असून त्यांतील बहुतांश प्लईस्टोसीन कालखंडातील हिमनदयांच्या कार्यामुळे निर्माण झालेलीआहेत. फिनलंडमधील अनेक सरोवरे याच प्रकारे तयार झाली आहेत.

चुनखडीच्या प्रदेशांत काही सरोवरे निर्माण झाल्याचे आढळते. पावसाच्या अम्लीय पाण्यात चुनखडी विरघळल्यामुळे अंतर्गत भागात गुहा व त्यांत चित्रविचित्र भूआकार निर्माण होतात. जेव्हा या गुहांचे छत खाली कोसळते तेव्हा तेथील भूपृष्ठावर खळगा पडतो. अशा खळग्यात पाणी साचून सरोवर तयार होते. यूगोस्लाव्हिया व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील फ्लॅरिडा राज्यात अशी सरोवरे आढळतात.

नदीच्या खालच्या टप्प्यातील मंद उताराच्या पूरमैदानात नदयांना नागमोडी वळणे प्राप्त होतात. अशा नागमोडी वळणाच्या भागातच पुराच्या वेळी नदीने आपले पात्र बदलल्याने तिच्या मूळ पात्रात सरोवर निर्माण होते. अशा सरोवरांना धनुष्कोडी किंवा कुंडल कासार सरोवर असे म्हणतात. जगात अनेक ठिकाणी नदीच्या खालच्या टप्प्यात अशी सरोवरे निर्माण झालेली आहेत. उदा., मिसिसिपी नदीतील सॉल्टन समुद्र (?). काही नदयांच्या प्रवाहमार्गात असणाऱ्या रूंद भागात सरोवरे तयार होतात. उदा., आयर्लंडमधील शॅनन नदीमार्गातील लॉक डर्ग सरोवर.

सरोवरांची निर्मिती इतरही अनेक कारणांनी होते. भूसांरचनिक क्रियेमुळे भूकवचात वेगवेगळ्या प्रकारे सरोवरांची द्रोणी निर्माण होते. भूकवचातील प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खळग्यात किंवा खचदरीत पाणी साचून सरोवर तयार होते. उदा., रशियातील बैकल सरोवर. अशाच प्रकारची सरोवरे आफ्रिकेतील ग्रेट रिफ व्हॅलीमध्ये आढळतात. उदा., रूडॉल्फ, टांगानिका व न्यासा ही सरोवरे. भूकवच मंदगतीने खाली वाकत गेले तर तेथे सांरचनिक द्रोणी तयार होते. त्यामुळे वाहणारे प्रवाह अडले जाऊन तेथे सरोवर तयार होते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी टेनेसी राज्यात मिसिसिपी नदीजवळ आढळणारे रीलफुट सरोवर १८११-१२ मध्ये झालेल्या भूकंपामुळे निर्माण झाले आहे. ज्वालामुखी क्रियेमुळेही सरोवरांच्या द्रोणी निर्माण होतात. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा वाहत गेलेल्या लाव्ह्यामुळे प्रवाहमार्गात अडथळा निर्माण होऊन वरच्या भागात पाणी साचून सरोवर तयार होते. काही सरोवरे मृत ज्वालामुखींच्या मुखाशी असलेल्या खड्डयत पाणी साचून तयार होतात. उदा., इंडो-नेशियातील सुमात्रा बेटावरील टोबा सरोवर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ऑरेगन राज्यातील केटर सरोवर. जगातील काही सरोवरे उल्कापातामुळे निर्माण झालेली आहेत. उदा., महाराष्ट्र राज्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर. आफ्रिकेतील घाना या देशातील बोसूमवी सरोवर. जगातील काही सरोवरे प्रागैतिहास काळातील समुद्र व महासागरांचे अवशेष आहेत. उदा., कॅस्पियन समुद्र.


 समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर समुद्रात तयार झालेले वाळूचे दांडे यांच्या दरम्यान खाऱ्या पाण्याची सरोवरे निर्माण झालेली आढळतात. यांना खारकच्छ असे म्हणतात. प्रवाळभिंतींमुळेही खारकच्छ निर्माण होते. भारताच्या नैऋर्त्य व आग्नेय किनाऱ्यांवर अशी अनेक खारकच्छे आढळतात. केरळमध्ये यांना ‘कायल’ असे म्हणतात. त्यांचा जलवाहतुकीसाठी उपयोग केला जातो. केरळमधील वेंबनाड व ओरिसातील चिल्का ही सरोवरे या प्रकारात मोडतात. नदीवर बांधलेल्या धरणामुळेही कृत्रिम सरोवरांची निर्मिती होते, त्याना जलाशय म्हणतात.

सरोवरांचे आकार अगदी लहान जलाशयांपासून ते कॅस्पियन समुद्रासारख्या मोठया सरोवरापर्यंत असतात. काळाच्या ओघात सरोवरांच्या आकारातही बदल होत गेलेले दिसतात. कदाचित सध्या अस्तित्वात असलेली सरोवरे भविष्यात आढळणारही नाहीत. सरोवरांच्या द्रोणी भागात गाळाचे संचयन झाल्याने, पाणीपुरवठा करणाऱ्या नदयांनी पात्र बदलल्यामुळे किंवा हवामान कोरडे बनल्यामुळे सरोवरे कोरडी पडतात. अधिक पाणी मिळविण्यासाठी जेव्हा सरोवरांचे बहिर्गामी प्रवाह अधिक खोल केले जातात तेव्हाही सरोवरांचे अस्तित्व नष्ट होते.

पाण्याच्या गुणधर्मानुसार गोडया पाण्याची सरोवरे व खाऱ्या पाण्याची सरोवरे असे सरोवराचे दोन प्रकार पडतात. गोड्या पाण्याच्या सरोवराला नदया, झरे व वृष्टीपासून होणारा पाण्याचा पुरवठा त्यातील बाष्पीभवनाने कमी होणाऱ्या किंवा बहिर्गामी पाण्यापेक्षा जास्त किंवा बरोबरीने असतो. अशा पाण्यात विद्राव्य क्षाराचे प्रमाण तुलनेने कमी असते. खाऱ्या पाण्याच्या सरोवरातील लवणता अधिक असते. अशी सरोवरे प्रामुख्याने कोरडया प्रदेशात आढळतात. अतिरिक्त बाष्पीभवनामुळे अशा सरोवरांचे आकार हळूहळू कमी होत जातात. अशी सरोवरे म्हणजे एकाकी सागरभाग असतात (उदा., कॅस्पियन समुद्र) किंवा पूर्वीच्या गोडया पाण्याचे ते अवशेष असतात. ग्रेट सॉल्ट लेक हे सरोवर म्हणजे हजारो वर्षांपूर्वी हिमनदीच्या कार्यामुळे निर्माण झालेल्या बोनीव्हील या प्रचंड आकाराच्या गोड्या पाण्याच्या सरोवराचा उर्वरित भाग आहे. खाऱ्या पाण्याची सरोवरे कोरडी पडतात तेव्हा त्यांचे तळ कडक चिखलाचे व क्षारयुक्त बनतात.

वृष्टी हा सरोवरांना पाणीपुरवठा करणारा प्राथमिक स्रोत आहे. नदया आणि पर्वतीय प्रदेशातून वाहत येणारे ओढे-नाले यांमार्फत वृष्टीचे पाणी प्रत्यक्षपणे सरोवरांना येऊन मिळते. काही सरोवरांना असा बाहेरून पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यांना भूमिगत झरे किंवा प्रवाहांव्दारे पाणीपुरवठा होतो. काही सरोवरांच्या बाबतींत त्यांना मिळणारे (आत येणारे) प्रवाह असतात परंतु सरोवरातून बाहेर वाहणारे प्रवाह नसतात. जेव्हा एखादया द्रोणीमध्ये सरोवराची निर्मिती होते आणि त्या सरोवराला नदया मिळतात त्याला प्लाया असे म्हणतात. दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये असे अनेक प्लाया आहेत. तेथे एअर, फ्रोम व टॉरेन्स ही सरोवरे आहेत.

ज्वालामुखीचा उद्रेक व भूकंप यांमुळे सभोवतालच्या भूपृष्ठरचनेत बदल झाल्यामुळे काही सरोवरे नाहीशी होतात. जर एखादे सरोवर दुसऱ्या जलाशयाकडे वाहू लागले तर मूळ सरोवर नाहीसे होते. चुनखडीच्या प्रदेशातील खळग्यात निर्माण झालेली सरोवरे भूमिगत पाण्यामुळे भरतात. परंतु अशा प्रदेशात दीर्घकाळ अवर्षणाची स्थिती राहिली तर ती सरोवरे कोरडी पडतात. तेथे केवळ डबकी शिल्ल्क राहतात. चुनखडी प्रदेशातील सरोवरातून भूमिगत भुयारांकडे पाणी पाझरत असेल तरी ही सरोवरे कोरडी पडतात. पृथ्वीवरील अनेक सखल प्रदेशांत नाहीशा झालेल्या सरोवरांच्या द्रोणी आढळतात. पूर्वीच्या या कोरडया पडलेल्या सरोवरांचे तळ अतिशय सुपीक मृदेचे असतात.

सरोवरांची स्वत:ची अशी जीवसृष्टी अतिशय मर्यादित असते. सरोवराच्या अंतर्गत भागात सर्व प्रकारच्या व आकाराच्या पाणवनस्पती आढळतात. त्यांपैकी काही वनस्पती सरोवराच्या तळाशी असतात, तर काही मोकळेपणाने तरंगत असतात. ह्या वनस्पतींमुळे बग्ज (कीटक), गोगलगाय, मासे इ. जलवासी प्राण्यांना खादय उपलब्ध होते. सरोवरे म्हणजे बदक, राजहंस, फ्लेमिंगो, बगळा, करकोचा व इतर अनेक पक्ष्यांची आवडती संचारस्थळे असतात. जमिनीवरील प्राणी सरोवरातून पिण्याचे पाणी, तसेच मासे, पक्षी व वनस्पतींच्या स्वरूपात आपले अन्न मिळवितात.

जगातील सर्वांत मोठी १० सरोवरे 

        अ.क्र 

सरोवरांचे नाव 

स्थान 

क्षेत्रफळ चौ. किमी. 

लांबी किमी. 

कमाल रूंदी किमी 

कमाल खोली मीटर 

   १ 

कॅस्पियन समुद्र 

कझाकस्थान-तुर्कमेणिस्थान-इराण- आझररबैजान-रशिया 

३,७२,००० 

१२०१ 

४८३ 

९९५ 

   २ 

सुपीरिअर 

कॅनडा-संयुक्तसंस्थाने 

८२,१०३ 

५६३ 

२५७ 

४०६ 

   ३ 

व्हिक्टोरिया 

केन्या-टांझानिया-युगांडा 

६९,४८४ 

४१८ 

२४१ 

८२ 

   ४ 

अरल 

कझाकस्थान-उझबेकिस्थान 

६८,६८० 

४२८ 

२९३ 

६७ 

   ५ 

ह्यूरन 

कॅनडा-संयुक्त संस्थाने 

५९,६०० 

३३२ 

२९५ 

२२९ 

   ६ 

मिशिगन 

संयुक्त संस्थाने 

५७,५५७ 

४९४ 

१९० 

२८१ 

   ७ 

टांगानिका 

बुरूंडी-टांझानिया-झांबिया-झाईरे 

३२,८९३ 

६७६ 

४८ 

१४३५ 

   ८ 

बैकल 

रशिया 

३१,५०० 

६३६ 

८० 

१७४२ 

   ९ 

ग्रेट बेअर 

कॅनडा 

३१,३२८ 

३४० 

१७७ 

३९६ 

   १०. 

न्यासा 

टांझानिया-मोझँबीक-मालावी 

२८,७४९ 

५६३ 

८० 

७०१

पृथ्वीवरील वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण नैसर्गिक साधनसंपत्तीपैकी सरोवर ही एक संपत्ती आहे. मानवाला जलसिंचन, जलविद्युतशक्ती निर्मिती, जलवाहतूक लगतच्या वसाहती व कारखान्यांना पाणीपुरवठा, मासेमारी, मनोरंजन व त्या अनुषंगाने पर्यटन व्यवसाय इत्यादींसाठी सरोवरांचा उपयोग होतो. लगतच्या हवामानावरही सरोवरांचा परिणाम जाणवतो. मोठया सरोवरांच्या अस्तित्वाचा परिणाम सभोवतालच्या जीवसृष्टीवर होत असतो. लगतच्या विस्तृत प्रदेशातील हवामानावरही त्यांचा परिणाम होतो. उन्हाळ्यात सरोवराच्या सभोवतालच्या हवामानात गारवा राहतो. याउलट हिवाळ्यात सभोवतालच्या प्रदेशाचे हवामान उबदार राहते. शरद ऋतूच्या काळात सरोवरांवरून वाहत येणाऱ्या उबदार वाऱ्यांमुळे काही पिके घेता येणे शक्य होते. उत्तर अमेरिकेतील पंचमहासरोवरांचा परिणाम लगतच्या हवामानावर झालेला आढळून येतो. संयुक्त संस्थाने व कॅनडा यांच्या दरम्यान असलेल्या आँटॅरिओ सरोवरावरून वाहणाऱ्या उबदार वाऱ्यांमुळे दक्षिण आँटॅरिओ प्रांतातील पिकांच्या वाढीचा काळ लांबला जातो. पिकांच्या वाढीच्या दृष्टीने सौम्य हवामान व पीक तयार होण्यापूर्वी आवश्यक उबदार हवामानाची स्थिती मिळाल्यामुळे त्या भागात मका व अनेक प्रकारच्या फळांचे उत्पादन घेणे शक्य होते. येथील मिशिगन सरोवराचाही त्यांच्या पूर्व किनाऱ्यावरील शेतीवर अनुकूल परिणाम झाला आहे.

भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील श्रीनगर येथील सरोवरांचा पर्यटन व्यवसायासाठी मोठया प्रमाणात उपयोग करून घेण्यात आला आहे.

चौधरी, वसंत