सरोद

सरोद : एक लोकप्रिय भारतीय तंतुवादय. सारंगी, सतार व वीणा या तिन्ही वादयांचे गुण या वादयात एकवटलेले दिसून येतात. ‘सराबत’, ‘शारदी वीणा’ ही या वादयाची अन्य पर्यायी नावे होत. ‘स्वरोदय’ वा ‘स्वरावर्त’ हे या वादयाचे प्राचीन मूळ नाव असावे, असे एक मत आहे. रबाब या इस्लामी वादयाशी त्याचे बरेचसे साधर्म्य आढळून येते. रबाबप्रमाणेच या वादयाला कटिमध्य असतो. हे वादय तयार करताना मोठा लाकडाचा ठोकळा पोखरून त्यातून बूड, मान व दांडा हे वादयाचे भाग बनवतात. त्याची लांबी साधारणपणे साडे ३ ते ४ फुट (१·०६ ते १·२० मी.) असते. वादयाचा खालचा बुडाचा भाग काहीसा गोलाकार, सु. १ फुट (०·३० मी.) व्यासाचा व चामड्याने मढविलेला असतो. हा गोल भाग पुढे निमुळता होत जाऊन पुढच्या गळ्याला जोडलेला असतो. या वादयात मुख्य वादन-तारा चार व चिकारीच्या दोन अशा सहा धातूच्या तारा असून, त्या खालच्या भागात बसविलेल्या घोडीवरून घेऊन, वरच्या टोकाला दोन्ही बाजूंना असणाऱ्या तीन-तीन खुंटयांना बांधलेल्या असतात. वरच्या निमुळत्या पोकळ लाकडी भागावर पितळेचा वा चांदीचा वा स्टेनलेस स्टीलचा पातळ व गुळगुळीत पत्रा बसविलेला असतो. त्यामुळे बोटांची खाली-वर हालचाल सुलभतेने करता येते. अनुध्वनीसाठी ११ ते १२ तरफा लावतात. उजव्या हातातील जव्याने (हस्तिदंती वा लाकडी बदामाकृती किंवा त्रिकोणी तुकडा) तार छेडून डाव्या हाताच्या बोटांनी दाबून स्वर वाजविले जातात.

सरोदच्या कर्नाटकी प्रकारात वरच्या पत्र्यावर सात पडदे असतात. खालच्या बाजूला असलेल्या कातडयाच्या गोल भागात वरच्या काठाला लागून दोन मोठी भोके असतात, त्यामुळे आवाज खुलण्याला मदत होते. सरोद हे स्वतंत्र वादनासाठीच प्रसिद्ध आहे. साथसंगतीसाठी त्याचा वापर केला जात नाही. या वादयावर आलाप, जोड, झाला, मींड इ. प्रकार उत्कृष्टपणे वाजविता येतात. मंद्र सप्तकात सरोदचा आवाज भरदार व गंभीर असतो. मधुर, धीरगंभीर, कंपनयुक्त पण कमी आसेचे स्वर हे सरोदचे वैशिष्टय होय. आडवे व तिरपे धरून हे वादय वाजवितात. उत्तर भारत व बंगाल येथे ते विशेषत्वाने प्रचलित आहे. खाँसाहेब असदुल्लखान यांनी या वादयाचा प्रचार-प्रसार सु. १५० वर्षांपूर्वी केला. ⇨ अल्लउद्दीनखाँ, अहमद अलीखाँ, हाफीजखाँ, अमजद अलीखाँ, अली अकबरखाँ, शरणराणी माथुर, झरीन दारूवाला-शर्मा इ. प्रसिद्ध सरोदवादक होत.

संदर्भ : तारळेकर, ग. ह. भारतीय वादयांचा इतिहास, पुणे, १९७३.

गोंधळेकर, ज. द.