समुद्रतटीय संघ : (भूविज्ञान). समुद्रकिनाऱ्याचा जो भाग ⇨ भरती-ओहोटीच्या पाण्याने व्यापला जातो, त्याला अंतरावेलीय किंवा समुद्रतटीय क्षेत्रविभाग म्हणतात आणि या भागात आढळणाऱ्या खडकांच्या गटाला व त्यांतील जीवसृष्टीला एकत्रितपणे समुद्रतटीय संघ म्हणतात. ⇨ पुळण या संघात येते. या संघाची व्याप्ती समुद्रकिनाऱ्याच्या चढउतारावर अवलंबून असते. ती काही सेंमी.पासून अनेक किमी.पर्यंत असू शकते. समुद्रकिनाऱ्यालगत उभे, खडकाळ डोंगर असल्यास तेथे या संघाचा व्याप अगदी अल्प असतो उलट भरती-ओहोटीच्या पाण्याच्या उंचीतील फरक जेथे १० ते १२ मी. पर्यंत असतो व समुद्रकिनारा सपाट असतो, तेथे समुद्रतटीय संघाची व्याप्ती काही किमी.पर्यंत असू शकते. उदा., कच्छच्या आखाताचा भाग.

शास्त्रीय निरीक्षणांसाठी भरती-ओहोटीच्या पाण्याच्या व्याप्तीनुसार या संघाचे पुढील सात वेगवेगळे भाग कल्पिले आहेत : उच्च्तम समुद्रतटीय प्रदेश वा क्षेत्रविभाग, उच्च्तम समुद्रतटीय (अनुतटी) रेखा, उच्च् समुद्रतटीय प्रदेश, मध्य समुद्रतटीय प्रदेश, नीच समुद्रतटीय प्रदेश, नीच समुद्रतटीय रेखा आणि नीचतम समुद्रतटीय प्रदेश. या विविध भागांत समुद्राचे पाणी, त्याचा खारटपणा (लवणता), तेथील लाटांची उंची, सागरी प्रवाह, पाण्यातील घन कण व जीव यांचे प्रमाण, पाण्याचा गढूळपणा वा पारदर्शकता व परिणामी समुद्रतळापर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशकिरणांचे होणारे अलगीकरण वेगवेगळे असते. समुद्रतटीय भागातील समुद्रतळाची जमीन चिखलाची, वालुकामय, खडकाळ अथवा प्रवाळाची बनलेली असते. या जमिनीनुसार तेथील जीवसृष्टीची (प्राणी व वनस्पती यांची) वाढ व प्रकार अवलंबून असतात. तेथील जीव विविध रंगांचे, आकारांचे व प्रकारांचे असतात. ही जैविक संपदा व समुद्रतटीय संघाचे गुणधर्म यांवरून तेथील एकूण उत्पादकतेची कल्पना येते आणि यामुळे हा संघ महत्त्वाचा मानतात.

पहा : पुळण भरती-ओहोटी.

उंटवाले, अ. ग.