समस्यापूर्ति, काव्यातील : संस्कृत काव्यपरंपरेतील मनोविनोदनाचा एक रंजक रचनाप्रकार. संस्कृत भाषेचे अध्ययन प्राचीनकाळी सर्वत्र होत होते, तेव्हा चार जाणकार मंडळी एकत्र जमली की, संस्कृत काव्याच्या आधारे कूटे, प्रहेलिका, अर्थगोपन, समस्यापूर्ती अशा अनेक प्रकारे स्वत:चे मनोरंजन करीत. त्यांत त्यांच्या बुद्धीलाही चालना मिळे. समस्यापूर्ती हा त्यांतला एक बुद्धीला चालना देणारा विशेष प्रकार होय. कवित्वशक्तीच्या परीक्षणासाठी वा केवळ मनोरंजनासाठी कवींपुढे आव्हान उभे करून खेळला जाणारा एक खेळ. त्यासाठी एखादया श्र्लोकाचा अंश उच्चरला जातो आणि उरलेला श्र्लोकांश कवीने कौशल्याने पूर्ण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. अनेकदा समस्या निरर्थक वा विचित्रार्थक असते. उदा., ‘ ठाठंठठंठठंठठंठंठ ’ ह्या निरर्थक समस्येची पूर्ती अशी केली आहे : ‘ रामाभिषेक मदविहवलाया हस्ताच्च्युतो हेमघटस्तरूण्या:। सोपानमासाद्य करोति शब्दं….॥ ’
कधी कधी श्र्लोकांशातून असंभवनीय अर्थ व्यक्त केलेला असतो. कवीने समस्यापूर्ती करताना त्याची संभवनीयता दाखवून दयायची असते. उदा.,
ओतुना भक्षित: शिव:। ( बोक्याने शिवाला खाल्ले )।
बोक्याने शिवाला खाणे, हे असंभवनीय आहे तथापि कवीने समस्यापूर्ती करताना ही बाब संभवनीय करून दाखवली आहे. ती अशी :
नवनीतमयं लिङ् गं पूजार्थ केनचित् कृतम् ।
पूजकस्य प्रमोदेन ओतुना भक्षित: शिव:॥
( कोण्या एका भक्ताने पूजेसाठी लोण्याचे शिवलिंग तयार केले पण त्याच्या काही चुकीमुळे बोक्याने ते खाऊन टाकले ).
बुद्धीला चालना देणारा, चातुर्याचे दर्शन घडविणारा, हा समस्यापूर्तीचा खेळ अनेक कवी व रसिक एकत्र येऊन खेळत असत आणि राजदरबारीही हा खेळ खेळला जात असे.
केळकर, गोविंदशास्त्री