वाल्मिकि : आदिकवी रामायणाचा कर्ता. ह्याच्याविषयी अनेक दंतकथा आहेत. त्यांपैकी सर्वांत अधिक प्रचलित दंतकथा अशीः  हा सुमति नावाच्या एका ब्राह्मणाचा पुत्र. ह्याचे आईबाप त्याला एका किराताजवळ ठेवून तपश्चर्येला निघून गेल्यावर तो ब्राह्मण्य विसरून लूटमारीचा धंदा करू लागला. त्याचे नाव ‘वाल्या’ पडले व सर्व लोक त्याला ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. ह्या ‘वाल्या’ ने एकदा काही ऋषींना घेरले परंतु त्या ऋषींनी त्याला उपदेश केला त्याच्या जीवावर चैन करणारे त्याचे कुटुंबीय त्याच्या पापात वाटेकरी होतात काय, असे विचारून येण्यास सांगितले. कोणीही जेव्हा तयार होईना, तेव्हा त्यास उपरती झाली. बसल्या जागी त्याने ऋषींनी दिलेल्या राममंत्राचा जप सुरू केला. त्याच्या अंगाभोवती वारूळ (वल्मीक) निर्माण झाले. त्यामुळे त्यास ‘वाल्मीकि’ असे नाव मिळाले असेही म्हणतात. दुसऱ्या एका कथेनुसार, कणुनामक एक ब्राह्मण अनेक वर्षे तप करीत होता. पुढे पत्नीची आठवण होऊन त्याचे वीर्यस्खलन झाले. ते एका वनचरीने गिळले तिला पुत्र झाला. महर्षींच्या प्रसादाने त्याला ब्राह्मण्य लाभून तो ‘वाल्मीकि’ ह्या नावाने प्रसिद्धी पावला.

वाल्मीकीला तपस्वी, मुनिपुंगव, द्विज अशी विशेषणे रामायणामध्ये योजलेली आढळतात. रामायणाच्या उत्तरकांडात वाल्मीकीने आपली उत्पत्ती सांगितली असे दाखविले आहे. ती अशीः ‘प्रचेतसोऽहं दशमः पुत्रो राघवनंदन’। (उत्तरकांड, ९६.१८). म्हणजे आपण प्रचेतसाचा दहावा पुत्र आहोत, असे त्याने म्हटल्याचे दाखविले आहे. अर्थात, उत्तरकांड म्हणजे मूळच्या काव्यात नंतर घातलेली भर आहे, असे संशोधकांचे मत आहे. प्रचेता म्हणजे वरुण. त्याला भृगू व वाल्मीकी असे दोन पुत्र होते असे भागवतात म्हटले आहे. तथापि वाल्मीकी हा ब्राह्मण होता, असे सामान्यतः मानले जाते. तो शिवभक्तही होता.

रामायणात (बालकांड, २) तमसा तीरावरील वाल्मीकीच्या आश्रमाचे वर्णन आहे. वाल्मीकीच्या शिष्यशाखा मोठी होती भरद्वाज हा त्याचा प्रमुख शिष्य. रामाने सीतेचा त्याग केल्यावर तिचा व तिच्या पुत्रांचा वाल्मिकीने सांभाळ केला, कुश व लव यांना शिक्षण दिले, रामायण पढविले, रामाच्या अश्वमेध यज्ञाला तो सशिष्य उपस्थित होता इ. तपशील महाभारतातही आढळतात. एका ऋषीबरोबर वादविवाद केल्याने वाल्मीकीला ब्रह्महत्येचा दोष लागला व महादेवाच्या उपासनेने तो पापमुक्त झाला, असाही निर्देश महाभारतात आढळतो (महाभारत, अनु. १८).

वाल्मीकी अनेक दिसतात : त्यांतील एक ‘व्यास’ म्हणून आहे. विसर्गसंधीची चर्चा करणारा एक आचार्य म्हणूनही वाल्मीकीचे नाव आढळते (तैत्तिरीय प्रातिशाख्य, ५ – ३६ ९.४ १८.६).

रामायणनिर्मितीची महत्त्वाची कथा क्रौंचवधाची होय. एकदा तमसा नदीच्या तीरावर मैथुनासक्त असलेल्या क्रौंच पक्षाच्या एका जोडीतील नराला एक व्याध बाणाने मारीत असल्याचे वाल्मीकीने पाहिले. क्रौंचीच्या करूण विलापाने त्याचे हृदय हेलावले व त्याच्या मुखातून ‘मा निषाद…….’ ही शापवाणी बाहेर पडली. अनुष्टुभातील ह्या अकल्पित काव्यरचनेने वाल्मीकी स्वतःच भारावला. पुढे ब्रह्मदेव त्याच्यापाशी आले व आशीर्वाद देऊन त्यांनी त्याला रामायण रचण्याचा आदेश दिला (बालकांड, २). त्याच्या काव्यस्फूर्तीची ही रचना इतर ग्रंथामध्येही निर्देशिली आहे (कालिदास-रघुवंश भवभूती-उत्तर रामचरित योगवासिष्ठ १-२ आनंदवर्धन – ध्वन्यालोक). परंतु ही कथा कवी आणि काव्य यांच्या गौरवातूनच प्रसृत झाली असावी.

वाल्मीकीच्या रामायणाने अलंकृत, अभिजात महाकाव्याचा आदर्श निर्मिला.  वाल्मीकीच्या  काव्यप्रतिभेने संस्कृत साहित्य बहरले. आधुनिकांनाही स्फूर्ती  मिळाली. ‘आदिकवी’ ह्या गौरवातच वाल्मीकीची थोरवी सिद्ध होते.

वाल्मीकीच्या नावावर वाल्मीकिसूत्र, वाल्मीकिशिक्षा, वाल्मीकिह्रदय, गंगाष्टक इ. रचना आढळतात तथापि रामायणाचा कर्ता निराळा तो रामाचा समकालीन किंवा थोडा मागाहूनचा असावा.

भट, गो. के.