संशोषण : (रसायनशास्त्र). अवक्षेपाच्या (साख्याच्या) कणाच्या अंतर्भागात बाह्य (विजातीय) पदार्थ यांत्रिक रीतीने सापळ्यात अडकल्या-प्रमाणे पकडला जाण्याच्या क्रियेला संशोषण म्हणतात. पाण्याचे रेणू व विदयमान प्रत्येक प्रकारचा आयन (विद्युत् भारित अणू , रेणू किंवा अणुगट) असणारा थोडा विद्राव वाढ होत असलेल्या कणांनी वेढला जातो परंतु संशोषणामध्ये अवक्षेप निर्माण होताना ज्या आयनांचे ⇨ अधिशोषण (पृष्ठशोषण) होते, ते आयन संशोषणाशी सर्वाधिक संबंधित असू शकतात. अगदी सर्वांत भरड अवक्षेपातील प्रत्येक घटक आयन त्याच्या निर्मितीच्या एका अवस्थेत विद्रावाच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचे अधिशोषण होण्याची शक्यता असते व नंतर संशोषण होते. याचा कणांच्या अंतिम परिमाणांशी जवळजवळ काही संबंध नसतो. संशोषित आयन पुष्कळदा स्फटिक-रचनेत अगदी चपखलपणे बसत नाहीत. यामुळे स्फटिकरचनेत अनुपेक्षणीय ताण निर्माण होतो. मात्र निसटून (निघून) जाण्यासाठी हे आयन अवक्षेपाच्या पृष्ठभागी असावे लागतात. अवक्षेप व विद्राव यांच्यातील गतिक समतोलामुळे त्यांना पृष्ठभागी येण्याची संधी मिळते. आयन सतत पृष्ठभागाच्या एका क्षेत्रात विरघळत असतात व दुसऱ्या भागात परत निक्षेपित होत (साचत) असतात. यामुळे आधी अवक्षेपाचा अंतर्भाग असलेला भाग (आयन) पृष्ठभागी येऊन उघडा पडतो व तेथील कोणत्याही संशोषित आयनांना विद्रावात परत जाण्याची संधी मिळते. शेषद्रवात (संस्करणाच्या कृतीतून गेलेल्या विद्रावात) असतानाच अवक्षेपाच्या होणाऱ्या या परिष्करणाला (शुद्धीकरणाला) ‘ ओस्टवाल्ड परिपक्वन ’ म्हणतात. अशा रीतीने भारात्मक विश्लेषणातील अवक्षेपामध्ये अशुद्धी असण्याचे संशोषण हे एक कारण असते.

ओस्टवाल्ड परिपक्वनाची त्वरा वाढत्या तापमानाने वाढते (कारण यामुळे आयनाची अवक्षेपाचा पृष्ठभाग सोडण्याची व विद्रावात प्रविष्ट होण्याची त्वरा वाढते). ओस्टवाल्ड परिपक्वनाची त्वरा अवक्षेपातील कणांच्या आकारमानांवरही अवलंबून असते. अगदी लहान कणांतील कोणताही बिंदू त्याच्या पृष्ठभागापासून फार दूर नसतो. यामुळे संशोषित आयनांना निसटून जाण्याची संधी वारंवार मिळते. मोठया स्फटिकाच्या मध्याशी संशोषित झालेला आयन अवक्षेपाच्या अनेक थरांनी झाकलेला असतो. त्यामुळे तो पृष्ठभागी येण्यासाठी दीर्घकाळ लागतो (अधिक अचूकपणे सांगायचे झाल्यास पृष्ठभाग त्याच्यापर्यंत पोहोचायला दीर्घकाळ लागतो). अशा प्रकारे जिलेटिनी (श्लेषी) अवक्षेपाला मोठे विशिष्ट पृष्ठफळ (दर ग्रॅममागे असलेले पृष्ठफळ) असते. परिणामी त्यातील संशोषण व अधिशोषण यांच्यामुळे गंभीर संदूषण होण्याच्या प्रवृत्तीमुळे मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता नसते. उलट भरड स्फटिकी अवक्षेपात अनेक संशोषित आयन असण्याचीप्रवृत्ती आढळते परंतु त्यात अशुद्धीच्या रूपात थोडेच अधिशोषित आयन असतात.

बेरियम सल्फेटाच्या अवक्षेपणात घडणारे संशोषण हे याचे नमुनेदार उदाहरण आहे. भारात्मक विश्लेषणात या सल्फेटाचे निर्धारण करण्यासाठी पुष्कळदा हे अवक्षेपण करतात. सामान्यपणे नमुन्याच्या विरल नायट्रिक अम्लातील विद्रावात बेरियम क्लोराइडाचा विद्राव टाकून हे अवक्षेपण करतात. विक्रियक घालताना विद्रावात बेरियमापेक्षा सल्फेटाचे आयन जास्त असतील आणि वाढणाऱ्या स्फटिकाच्या पृष्ठभागांवर सल्फेट आयन अधिशोषित होतील. विद्रावात फेरिक आयनांची संहती (प्रमाण) लक्षणीय असताना (उदा., पोलादांचे किंवा अनेक खनिजांचे विश्लेषण) अवक्षेपाच्या पृष्ठभागालगत फेरिक आयनांचा प्रति-आयन ढग (विद्युत् विच्छेदयात एका धन आयनांभोवती ऋण आयनांचे किंचित प्राबल्य असण्याची स्थिती व याउलट स्थिती) असेल आणि विक्रियकाचा ताजा अंश टाकल्याने कणांचे आकारमान अचानकपणे वाढल्यास हे फेरिक आयन सहजगत्या सापळ्यात अडकतील. अखेरीस मुळात असलेल्या सर्व सल्फेटाचे रूपांतर अवक्षेपात होईल. मात्र काही बेरियम सल्फेटाऐवजी फेरिक सल्फेटाच्या रूपात असेल. अंतिम अवक्षेपातील फेरिक आयनांची प्रत्येक जोडी तीन सल्फेट आयन दर्शविते व हे आयन फेरिक सल्फेटाच्या रेणूंच्या (४०० अणुभार एकके) रूपात असतात. ते बेरियम सल्फेटाच्या तीन रेणूंच्या (७०८ अणुभार एकके) ऐवजी आलेले असतात. म्हणून संशोषित फेरिक आयनांमुळे अवक्षेप खूप हलका होतो. अर्थात इतर संशोषित अशुद्धीमुळे तो खूप जड होतो. अवक्षेपणाच्या अखेरीस जादा प्रमाणात असणारे बेरियम आयन स्फटिकांच्या पृष्ठभागांवर अधिशोषित होतील आणि नायट्रेट आयनांचा प्रति-आयन ढग तयार होईल (बेरियम क्लोराइडापेक्षा बेरियम नायट्रेट कमी विरघळणारे असते). अधिशोषित बेरियम नायट्रेटामुळे झालेल्या संदूषणामुळे वजनात झालेली वाढ संशोषित फेरिक सल्फेटामुळे वजनात झालेल्या घटीच्या विरूद्ध कार्य करेल. संशोषण व अधिशोषण यांच्या व्याप्तींमधील परस्परसंबंधांवर हे अवलंबून असेल (पर्यायाने हे पुढील बाबींवर अवलंबून असेल : अवक्षेपण होताना असलेली फेरिक आयनांची संहती व अंतिम विद्रावातील जादा बेरियम आयनांची संहती, तसेच अवक्षेपणाची त्वरा, ओस्टवाल्ड परिपक्वनासाठी लागणारा कालावधी वगैरे). अखेरीस अवक्षेप अतिशय हलका वा अतिशय जड असू शकेल अथवा सुदैवी त्रूटिपूर्तीमुळे (त्रूटींच्या भरपाईमुळे) अवक्षेपाचे वजन अगदी रास्तपणे नेमके असेल.

ठाकूर, अ. ना.