फिशर, एर्न्स्ट ओटो : (१० नोव्हेंबर १९१८ – ) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी कार्बनी-धातू संयुगांविषयी महत्त्वाचे संशोधन केले आहे. अशाच प्रकारचे संशोधन ⇨ जिऑफ्री विल्किन्सन यांनीही स्वतंत्रपणे केले असून या संशोधन कार्याबद्दलच या दोघांना १९७३ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. दोघांच्या या संशोधनामुळे संक्रमणी [२१ ते ३०, ३९ ते ४८, ५७ ते ८० व ८९ ते १०३ असे अणुक्रमांक असलेल्या व ज्यांच्या उपकक्षेत अपेक्षेपेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात → आवर्त सारणी] धातूंपासून बनणाऱ्या कार्बनी-धातू संयुगांच्या क्षेत्रात फार महत्त्वाची भर पडली आणि संक्रमणी धातुरसायनशास्त्र ही रसायनशास्त्राची एक नवीन शाखाच निर्माण झाली.

फिशर यांचा जन्म व शिक्षण जर्मनीतील म्यूनिक येथे झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते सैन्यामध्ये होते. तसेच काही काळ ते युद्धकैदी होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात अनेकदा खंड पडला. १९५२ मध्ये त्यांनी म्यूनिक तांत्रिक विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी मिळविली. तेथेच १९५४ मध्ये ते व्याख्याते झाले व १९५७ पासून प्राध्यापक आहेत त्याचप्रमाणे १९५९ पासून ते म्यूनिक येथील अकार्बनी रसायनशास्त्र संस्थेचे संचालकही आहेत.

ज्यांच्यात दोन समांतर कार्बनी वलयांमध्ये धातूचा अणू सममितपणे (प्रमाणबद्ध रीतीने) अंतःप्रवेशित झालेला (मध्यभागी बसविला गेलेला) असतो, अशा संयुगांना अंतःप्रविष्ट (सँडविच) संयुगे म्हणतात. दोन बेंझीन वलयांमध्ये क्रोमियमाचा अणू अंतःप्रविष्ट असलेले डायबेंझीन क्रोमियम किंवा बिस्‌बेंझीन क्रोमियम हे संयुग फिशर यांनी बनविले. १९५१ साली बनविण्यात आलेल्या फेरोसीन या संयुगामध्ये दोन सायक्लोपेंटाडाइन वलायांमध्ये लोहाचा अणू अंतःप्रविष्ट आहे, हे त्यांनी क्ष-किरणाच्या साहाय्याने स्फटिकाचे निरीक्षण करून सिद्ध केले. तसेच फेरोसिनासारखी अनेक संयुगे तयार केली. पेट्रोलमध्ये प्रत्याघाती [अनिष्ट विस्फोटामुळे एंजिनाच्या सर्व भागांवर पडणाऱ्या ताणांसारखे दुष्परिणाम टाळण्यासाठी मिसळण्यात येणारा → अंतर्ज्वलन-एंजिन] पदार्थ म्हणून टेट्रा-एथिल-लेड हे शिसेयुक्त संयुग वापरतात. याच्याऐवजी शिशापेक्षा वेगळी धातू असलेली संयुगे वापरून प्रदूषणाचे प्रमाण कमी करता येण्याची शक्यता आहे. अंतःप्रविष्ट संयुगे उत्प्रेरक (प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता तिचा वेग बदलणारा पदार्थ) म्हणूनही उपयोगी पडतात. त्यांच्या योगाने मोटारगाडीच्या एंजिनातून बाहेर पडणारी प्रदूषणकारक द्रव्ये पूर्णपणे जाळून टाकणेही शक्य होईल.

गटिंगेन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे रसायनशास्त्राचे पारितोषिक (१९५७), आल्फ्रेट-स्टॉक स्मृतिपदक (१९५९), म्यूनिक येथील बव्हेरियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासदत्व, निरनिराळ्या विद्यापीठांच्या डॉक्टरेट व डी. एस्‌सी. या सन्माननीय पदव्या तसेच अभ्यागत व सन्माननीय प्राध्यापकपदे, अमेरिकन केमिकल सोसायटीचे फेलो (१९७७), ऑस्ट्रियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९७६) व ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, गटिंगेन (१९७७) यांचे सदस्यत्व, तसेच अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेसचे सन्माननीय परदेशी सदस्यत्व (१९७७) इ. बहुमान त्यांना मिळाले आहेत.

त्यांनी विविध शास्त्रीय नियतकालिकांमधून अनेक संशोधनात्मक लेख लिहिले आहेत आणि ॲडव्हान्स्ड इनऑर्‌गॅनिक केमिस्ट्री : ए काँप्रिहेन्सिव्ह टेक्स्ट तसेच मेटल काँप्‍लेक्स (खंड १) या पुस्तकांचे ते एक लेखक आहेत.

ठाकूर, अ. ना. फाळके, धै. शं.