अवक्षेपण : ‘अवक्षेपण’ ही संज्ञा अनेक अर्थांनी वापरली जाते. उदा., (१) वातावरणात असलेल्या बाष्पाचे संद्रवण होऊन (बाष्प द्रवरूप होऊन) पावसाचा, हिमाचा किंवा बर्फाचा वर्षाव होणाऱ्या प्रक्रियेला वातावरणविज्ञानात अवक्षेपण किंवा वर्षण म्हणतात [ → वर्षण]. (२) अतितृप्त विद्रावांचे (ठराविक तापमानास विरघळणाऱ्या पदार्थाच्या म्हणजे विद्रुताच्या कमाल प्रमाणापेक्षा अधिक विद्रुत पदार्थ धारण करणाऱ्या विद्रावांचे) बाष्पीभवन होण्याने किंवा त्यांचे तापमान कमी होण्याने त्यांच्यात विरघळलेले घटक घन स्वरूपात वेळगे होण्याच्या प्रक्रियेलाही ‘अवक्षेपण’ म्हणतात. (३) काही मिश्रधातूंमध्ये मंद, अंतर्गत रासायनिक विक्रिया होऊन एक नवीनच घन अवस्था असलेला पदार्थ सावकाश तयार होतो, त्यालाही धातुविज्ञानात ‘अवक्षेपण’ म्हणतात. (४) काही विद्राव एकमेकांत मिसळले म्हणजे त्यांच्यात विरघळलेल्या घटकांची रासायनिक विक्रिया होऊन घन अविद्राव्य पदार्थ विद्रावातून वेगळा होतो. उदा., सिल्व्हर नायट्रेटाच्या विद्रावात सोडियम क्लोराइडाचा विद्राव मिसळल्यावर घन सिल्व्हर क्लोराइड वेगळे होते म्हणजे अवक्षेपित होते. रसायन-शास्त्रात सामान्यतः अशा विक्रियेला ‘अवक्षेपण’ म्हणतात.

पदार्थातील रासायनिक घटकांचे परिणाम ठरविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या भारात्मक विश्लेषण पद्धतीत (वस्तूमधील घटकांचे वजनानुसार प्रमाण ठरविण्याच्या पद्धतीत) मूळ पदार्थांचे विद्राव करून त्यांच्यातील इष्ट घटकांचे अवक्षेपण करून त्यांचा भार मोजला जातो.

पदार्थातील अशुद्धी काढून टाकून शुद्ध पदार्थ मिळविण्यासाठी अवक्षेपण-विक्रियेचा उपयोग औद्योगिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात होतो. साबण तयार करताना साधे मीठ घालून विद्रावातील साबण अवक्षेपणाने निराळा करतात. रेयॉनासारख्या कृत्रिम तंतूंचे औद्योगिक उत्पादन अवक्षेपणानेच केले जाते.

कारेकर, न. वि.