ग्रीन्यार विक्रिया : अल्किल-मॅग्नेशियम हॅलाइडे या वर्गाच्या संयुगांना ग्रीन्यार विक्रियाकारके म्हणतात. ती तयार करून कार्बनी व अकार्बनी संयुगांशी त्यांच्या विक्रिया घडविणे याला ग्रीन्यार विक्रिया म्हणतात. या विक्रियाशील संयुगांचा शोध व्हीक्तॉर ग्रीन्यार यांनी १९o१ मध्ये लावला म्हणून ती त्यांच्या नावाने ओळखली जातात. यांच्या उपयोगाने विविध संयुगे सुलभतेने बनविता येतात म्हणून औद्योगिक उत्पादनातही ती वापरली जातात. यांच्या संरचना निर्विवादपणे सिद्ध झालेल्या नाहीत. ग्रीन्यार यांनी या विक्रियाकारकांकरिता R·MgX हे सूत्र सुचविले होते (R–अल्किल गट व X–हॅलोजनाचा अणू). परंतु त्यानंतर काही पुराव्यांवरून त्यामध्ये पुढीलप्रमाणे समतोल (डावीकडून उजवीकडे होणारी विक्रिया व उजवीकडून डावीकडे होणारी विक्रिया यांचा वेग सारखा होणे) असावा असे दाखविण्यात आले.

2 R·MgX ⇌ R2Mg + MgX2

इ.स. १९६o मध्ये त्याचे सूत्र R2Mg·MgX2 असे आहे असेही प्रतिपादन करण्यात आले. रंडल यांनी १९६४ मध्ये विक्रियेतून स्फटिकरूप फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड वेगळे केले आणि त्याचे सूत्र C6H5·MgBr·2 (C2H5)2· O आहे असे क्ष-किरण विवर्तन पद्धतीने (अपारदर्शक पदार्थाच्या कडेवरून जाताना किरणाच्या दिशेत बदल होणे या गुणधर्माचा उपयोग करण्याच्या पद्धतीने) सिद्ध केले. तथापि विद्रावामध्ये विक्रिया होताना ते याच रूपात असते यावर एकमत झाले नाही. R2Mg व R·MgX या दोन्ही सूत्रांपासून तीच संयुगे निर्माण होतात म्हणून अखेरीस ग्रीन्यार यांनी प्रथम सुचविल्याप्रमाणे R·MgX हेच सूत्र विक्रियांच्या स्पष्टीकरणाने वापरावे असे आता मान्य झाले आहे. या संयुगात R हा ॲलिफॅटिक (कार्बन अणूंची वलयी संरचना नसलेले), ॲरोमॅटिक (कार्बन अणूंचे वलय असलेले) किंवा विषमवलयी (एक वा अधिक वलये असलेले पण काही वलयांत भिन्न मूलद्रव्ये असलेले) गट व X हा क्लोरीन, ब्रोमीन अथवा आयोडीन यांचा अणू असतो.

ग्रीन्यार विक्रियाकारक तयार करण्यासाठी सामान्यतः निर्जल डायएथिल ईथर घेऊन त्यात मॅग्नेशियम धातूचे बारीक तुकडे किंवा पूड मिसळतात आणि त्यावर इष्ट हॅलाइडाचा विद्राव हळूहळू सोडतात. लवकरच विक्रिया सुरू होते व क्रमाने तिचा जोम वाढतो, तो अनियंत्रित होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. विक्रिया सुरू झाली नाही, तर मिश्रण किंचित तापवितात किंवा त्यामध्ये अल्प प्रमाणात आयोडीन मिसळतात. ईथराऐवजी काही ठिकाणी टेट्राहायड्रोफ्यूरान हा विद्रावकही वापरला जातो. पुढीलप्रमाणे विक्रिया होऊन ग्रीन्यार विक्रियाकारक बनतो. उदा., C2H5Br वापरल्यास

C2H5Br

+

Mg

C2H5MgBr

एथिल ब्रोमाइड

 

मॅग्नेशिअम

 

एथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड

(एक ग्रीन्यार विक्रियाकारक)

इष्ट त्या संयुगाची त्याच्याशी विक्रिया घडविण्यासाठी वरील विक्रियेतून विक्रियाकारक वेगळा काढावा लागत नाही, तर ते संयुग अथवा विद्राव, विक्रियाकारकाच्या विद्रावाशी मिसळल्याने कार्यभाग साधतो. विक्रिया पूर्ण व्हावी म्हणून अखेरीस मिश्रण तापवितात आणि नंतर आवश्यक त्या प्रक्रियांनी इष्ट संयुग वेगळे करतात.

प्रकार : ग्रीन्यार विक्रियांचे मुख्यतः दोन प्रकार पडतात..

(१) अन्योन्य प्रतिष्ठापन : (अणू, रेणू वा अणुगटांची अदलाबदल होणे). (अ) ज्यामध्ये विक्रियाशील हायड्रोजन अणू असतात (उदा., पाणी, अल्कोहॉले, अम्ले आणि प्राथमिक व द्वितीयक अमाइने) अशा संयुगांच्या विक्रियेने ग्रीन्यार विक्रियाकारकापासून हायड्रोकार्बने मिळतात.

(आ) कित्येक धातू आणि अधातू यांच्या हॅलाइडांची विक्रिया होऊन अनुरूप अल्किल अनुजात (एका संयुगापासून मिळणारी दुसरी संयुगे) किवा अल्किल हॅलोजने अनुजात मिळतात. अल्किल फॉस्फाइने, अल्किल आर्साइने, अल्किल सिलेने व कथिल, शिसे, पारा, थॅलियम इत्यादींचे असे अनुजात बनविण्यात आले आहेत. मोटारगाड्यांकरिता वापरावयाच्या पेट्रोलमध्ये मिसळतात ते टेट्राएथिल लेड (C2H5)4Pb पूर्वी C2H5MgBr व PbCl2 या संयुगांच्या विक्रियेने बनवीत असत. मर्क्युरिक क्लोराइड व एथिल मॅग्‍नेशियम ब्रोमाइड यांपासून डायएथिल मर्क्युरी हे संयुग मिळते.

(२) समावेशन : समावेशनाने (इतर अणू, रेणू किंवा अणुगट यांचा समावेश केल्याने) प्रथम मिळणाऱ्या संयुगाचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे करणे) केल्याने पुढीलप्रमाणे नानाविध संयुगे मिळतात.

(अ) फॉर्माल्डिहाइडांपासून विक्रियेने प्राथमिक अल्कोहॉले बनतात.

(आ) इतर आल्डिहाइडांपासून द्वितीय अल्कोहॉले मिळतात.

(इ) कीटोनांच्या विक्रियेने तृतीयक अल्कोहॉले तयार होतात [→ अल्कोहॉल].

(ई) एस्टरांबरोबर विक्रिया होऊन प्रथम कीटोने बनतात. परंतु त्यावर पुन्हा ग्रीन्यार विक्रियाकारकाची क्रिया होते व अखेरीस तृतीयक अल्कोहॉले निर्माण होतात. एस्टर फॉर्मिक अम्लाचे असेल, तर शेवटी द्वितीयक अल्कोहॉले मिळतात.

(उ) कार्बन डाय-ऑक्साइडाच्या विक्रियेने कार्‌बॉक्सिलिक अम्ले मिळतात.

(ऊ) सल्फर डाय-ऑक्साइडाच्या योगाने सल्फिनिक अम्ले बनतात.

उदा.,

C6H5MgBr

+

SO2

C6H5·SO2·MgBr

H20   ⟶

C6H5SO2H

+ MgBrOH

फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड

 

मॅग्नेशिअम

 

एथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड

 

फिनिल सल्फिनिक अम्ल

 

संदर्भ : 1. Fieser, L. F. Fieser, M. Organic Chemistry, New Delhi, 1962. 

  2. Kipping, F. S. Kipping, F. B. Organic Chemistry, London, 1961.   

  3. Schmidt, J. Organic Chemistry, London, 1961.

मिठारी, भू. चिं.