शूल : वारंवार तीव्रतेने जाणवणाऱ्या कोणत्याही वेदनेला सामान्यत: शूल असे म्हणतात. परंतु वैद्यकीय व्यवहारात ही संज्ञा स्नायुयुक्त आवरण असलेल्या पोकळ इंद्रियात स्नायूंच्या तीव्र आकुंचनामुळे निर्माण होणाऱ्या वेदनेसाठी वापरली जाते. अशा इंद्रियातून वाहणाऱ्या पदार्थाच्या मार्गात अंशत: किंवा पूर्णत: अडथळा निर्माण झाल्यामुळे हे तीव्र आकुंचन घडून येत असते. त्यामुळे तंत्रिकांच्या टोकांवर अस्वाभाविक असा दाब पडून किंवा नजीकच्या इतर भागातील तंत्रिका ताणल्या जाऊन वेदनाजनक आवेगांची निर्मिती होते. याशिवाय रक्तवाहिन्यांवर दाब पडून इंद्रियाच्या काही भागांत अल्परक्तता व त्यामुळे उद्भवणारी वेदनाजनक पदार्थांची निर्मितीही शूलास कारणीभूत असावी असे दिसते. कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना केवळ श्लेष्मल पटलाचा तीव्र शोथ झाल्यामुळेही पचनमार्गातील बृहदांत्रासारख्या इंद्रियांत शूल निर्माण होऊ शकतो.
जठराचा शेवटचा भाग, लहान आतडे, मोठे आतडे, आंत्रपुच्छ, पित्तमार्ग, मूत्रमार्ग आणि गर्भाशय यांमध्ये शूल जाणवण्याचे प्रमाण अधिक असते. अपचन, आहाराचा अतिरेक, अन्नातून होणारे जंतुसंक्रामण, कृमी, शिसे किंवा जस्त अथवा पारा यांची विषबाधा ही अन्नमार्गातील शूलामागची प्रमुख कारणे असतात. पित्त व मूत्रमार्गात जंतुसंक्रामणाबरोबरच ⇨ अश्मरी (खडे) हे महत्त्वाचे कारण असू शकते. त्याचप्रमाणे या मार्गांतील जन्मजात दोष किंवा अडथळे हेही शूलाचे कारण असू शकते. गर्भाशयातील शूल ऋतुकाळी, गर्भपाताच्या वेळी आणि प्रसूतीनंतरच्या काळात उद्भवू शकतो. नवजात अर्भकामध्येही आंत्रशूल होऊ शकतो. जठरांत्र संधीमधील दोषामुळे जर शूल उद्भवत असेल तर वरचेवर दूध उलटून पडते. उतारवयात इतर कारणांबरोबरच वारंवार शूल होण्यामागे उदरातील एखाद्या इंद्रियाचा कर्करोग किंवा साधे अर्बुद हेही कारण असू शकते. [→ आंत्रशूल पोटशूळ].
शूलाच्या इतर कारणांमध्ये रक्तवाहिन्यांचे तीव्र संकोचन, लाळेच्या ग्रंथीमधील लाळवाहिनीचा शोथ व संकोच, अंडाशयातून अंडमोचनाच्या वेळी होणारी वेदना, अंडवाहिनीमध्ये बीजारोपण झाल्यामुळे होणाऱ्या वेदना आणि अंतस्त्यांच्या अप्राकृत रचनेमुळे निर्माण होणारी अस्वस्थता यांचा उल्लेख करता येईल.
अंतस्त्यांमधील वेदनेची जाणीव व्यक्तीला एखाद्या विशिष्ट इंद्रियाचा संदर्भ जोडून व्यक्त करता येत नाही. हातपाय, स्नायू, त्वचा किंवा शरीराची दृश्य ज्ञानेंद्रिये–नाक, कान, डोळा, जीभ–यांच्याबाबतीत मेंदूला जशी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव असते, तशी अंतस्त्य इंद्रिये आणि त्यांच्यापासून येणाऱ्या संवेदनांची प्रत्यक्ष स्थानविशिष्ट जाणीव आढळत नाही. त्यामुळे वेदनेची जागा ढोबळपणेच दाखविता येते.
उर आणि उदर यांमधील इंद्रियांपासून येणारे आवेग दोन मार्गांनी पोचतात. त्यांपैकी स्पष्ट अंतस्त्यीय मार्ग अनुसरणारे वेदना आवेग स्वायत्त तंत्रिका तंत्रामधील (अनुकंपी व परानुकंपी दोन्ही भागांतील) संवेदनावाहक तंतूंमधून पाठविले जातात. अंतस्त्य ज्या मूळ त्वक्खंडापासून विकसित झाले आहे त्याच त्वक्खंडापासून निर्माण झालेल्या, परंतु दूर असलेल्या त्वचा व कंकालीय स्नायूच्या ठिकाणी या आवेगांमुळे होणाऱ्या वेदनेची जाणीव होते. उदा., आंत्रपुच्छाची वेदना नाभीजवळील भागात, हृदयातील वेदना डाव्या किंवा उजव्या बाहूच्या आतल्या (करंगळीच्या बाजूच्या) कडेने खालपर्यंत तर मूत्रवाहिनीमधील वेदना वृषण आणि जांघेच्या आतील भाग यांमध्ये जाणवते. दुसरा आवेग मार्ग भित्तीय या नावाने ओळखला जातो. अंतस्त्याच्या भोवतालच्या आच्छादनातून किंवा अगदी जवळ असलेल्या उदर पोकळीच्या आतील अस्तरामधून परिहृद् पटलातून किंवा भित्तीय परिफुफ्फुसातून निघणारे वेदना-आवेग थेट कायिक तंत्रिका तंत्राच्या मेरुतंत्रिकांत प्रवेश करता. आणि मेरुरज्जूतून मेंदूकडे पाचतात. या आवेगांची गती जलद असते आणि अंतस्त्याच्या समीपच्या भागातच वेदना आहे अशी तीव्र जाणीव ते करून देतात. उदा., आंत्रपुच्छाची वेदना उदराच्या उजव्या खालच्या भागात व हृदयविकाराची वेदना छातीत डाव्या बाजूला तिसऱ्या ते पाचव्या बरगडीखाली कळ येऊन जाणवते. सुरुवातीस तीव्रपणे व मर्यादित स्थळी जाणवणाऱ्या या वेदनांचे रूपांतर अंतस्त्यीय मार्गामुळे दीर्घकाळ टिकणाऱ्या, पसरत जाणाऱ्या आणि कमी तीव्रतेच्या वेदनेत होते.
शूलामधील वेदनेची जाणीव व्यक्तीला होत असताना त्याच्या नकळत काही प्रतिक्षेपी बदलही घडून येत असतात. मेरुरज्जूमधील या प्रतिक्षेपांचे स्वरूप कायिक व स्वायत्त अशा दोन्ही तंत्रिका तंत्रामधून प्रकट होते. वेदनाग्रस्त इंद्रियाजवळचे स्नायुखंड दीर्घकाळ आकुंचन पावून तो भाग ताठरतो, तेथील त्वचेची संवेदनाक्षमता वाढते. व्यक्तीला अस्वस्थता जाणवून कोणत्याही एका स्थितीत तो जास्त काळ बसू किंवा निजू शकत नाही आणि कोणत्याही कामात एकाग्रचित्त होणे किंवा झोपी जाणे या गोष्टी अशक्य होतात. रक्तदाब आणि रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण यात वाढ होते.
दीर्घकाळ वेदना टिकल्यास तापमानही वाढते व रक्तदाब कमी होऊ शकतो. शूल कोणत्याही इंद्रियात असला तरी हातपाय थरथरणे, छातीत धडधडणे, घाम येणे, चक्कर येणे, भूक कमी होणे, वारंवार शौचाला किंवा लघवीला जावेसे वाटणे आणि मळमळ व उलट्या होणे यांसारखी सर्वसाधारण लक्षणे आढळू शकतात.
शूलाच्या कारणाचे निदान निश्चित करण्यासाठी त्याच्या प्रारंभ स्थळाचे नेमके वर्णन सोबत होत असलेली स्नायूंची ताठरता आहार-उत्सर्जनासारख्या दैनंदिन क्रियांशी संबंध आरामदायी क्रिया इ. माहितीचा उपयोग होतो परंतु अनेकदा ही माहिती संदिग्ध असते. त्यामुळे संपूर्ण वैद्यकीय तपासणी व इतर तपासण्या उदा., मूत्र, मल, रक्त यांचे परीक्षण, साधेक्ष-किरण चित्रण, क्ष-किरणाचे अपार्य द्रव्ये देऊन केलेले विशेष चित्रण वगैरेंसारखी तंत्रे निदाननिश्चितीसाठी वापरावी लागतात.
निदाननिश्चिती झाल्यानंतर शूलाच्या तीव्र वेदनेपासून त्वरित आराम मिळण्यासाठी आकुंचन पावलेल्या अरेखित स्नायूंना शिथिल करणारी कोलीनरोधी औषधे (उदा., ॲट्रोपीन व तत्सम औषधे) आणि असह्य वेदनांसाठी त्यांच्या जोडीस मॉर्फीन, पेथिडीन किंवा अन्य मादक वेदनाशामके यांचा वापर केला जातो. त्यानंतर शूल उद्भवण्यामागच्या कारणांवरील सुयोग्य व नेमके उपचार सुरू केले जातात. उदा., मूत्रोत्सर्जक किंवा पित्तमार्गातील अश्मरी किंवा इतर अडथळे दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा दुर्बिणीतून केलेल्या उपचारांचा अवलंब करता येतो. शूलाच्या निर्मितीमागे रक्तवाहिन्यांचे आकुंचन किंवा रक्ताचे वाहिनी क्लथन यांचा सहभाग असल्यास (उदा., हृदयविकाराशी संबंधित शूल) रक्तक्लथन प्रतिबंधक औषधे आणि वाहिनी विस्फारक नायट्राइड वर्गातील द्रव्ये वापरून उपचार केले जातात.
वारंवार उद्भवणाऱ्या शूलासाठी कोलीनरोधी औषधे, शांतके व शामके अशी उपाययोजना केली जाते. जंतुजन्य संक्रामणांसाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो. त्याशिवाय आहार, व्यायाम व विश्रांती यांसंबंधी योग्य ते बदल सुचवून शूलाची पुनरुत्पत्ती टाळण्याचा प्रयत्न केला जातो. शूलाच्या उत्पत्तीमागे मानसिक ताण हे एक तात्कालिक कारण असू शकते. त्याकडेही लक्ष देणे आवश्यक असते.
श्रोत्री, दि. शं.
आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा : खिळा ठोकल्याप्रमाणे होणाऱ्या वेदना म्हणजे शूल होय. वातजशूल, पित्तजशूल, कफजशूल, पार्श्वशूल, कुक्षीशूल, हृदयशूल, बस्तिशूल असे शूलाचे विविध प्रकार आहेत.
गुल्मात होणारे शूल : गुल्मात जेव्हा शूल होतात, तेव्हा दोषांप्रमाणे त्यांचे वर्गीकरण व चिकित्सा करतात. (अ) वातजशूल यामध्ये मूत्र व मल ह्यांचा अवरोध, अंग कठीण होणे व कष्टसाध्य श्वास ही चिन्हे आढळतात. वातजशूलात हिरडा, सैंधव, पादेलोण, बीडलोण, जवखार, चिरफळ, पुष्करमूळ, ओवा ह्यांचे चूर्ण गरम आंबट कांजीबरोबर घेतात. वातनाशक आहार योग्य ठरतो. (आ) पित्तजशूल : ह्यांत तहान, दाह, भ्रम ही चिन्हे दिसतात. अन्नपचन होताना हा शूल वाढतो. ह्या शूलावर भुई कोहळा, त्रिफळा, शतावरी, शिंगाडा, गूळ, साखर, शिवणफळ, ज्येष्ठमध, फालसा व चंदन ह्यांचे चूर्ण गरम दुधाबरोबर घेतात. (इ) कफजशूल : यामध्ये अरुची, ओकारी, जेवणानंतर शूल वाढणे, अंग जड होणे ही चिन्हे आढळतात. ह्यावर वेखंड अतिविष, देवदारू, हिरडा, मिरी, इंद्रजव, पिंपळमूळ, सुंठ, जवखार, चित्रक ह्यांचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतात.
गुल्मावाचून होणारे शूल : (अ) वातजशूल : यात मूत्र व वात ही कष्टाने होतात. कष्टाने श्वास घ्यावा लागतो. अवयव जखडले जातात व आहार न घेतल्यास शूल अधिक वाढतो. यात कुळिथाचे कढण, डाळिंबांचा आंबट रस, लावा पक्ष्याचा मांसरस, सैंधव मिरी घालून प्यायला देतात. स्निग्ध कालवणाबरोबर भोजन घेणे योग्य. (आ) पित्तजशूल : यात थंड पाणी व औषधांनी ओकारी करवून थंड झालेले अन्नपाणी घेणे योग्य, तसेच मधुर द्रव्यांचे रेचक आणि फालसा, मनुका, खजूर, कमळे ह्यांचा रस उपयुक्त ठरतो. (इ) कफजशूल : यात पिंपळीच्या पाण्याबरोबर गेळफळ देऊन वांती करतात. उष्ण पेये व अन्न यांचे सेवन पथ्यकारक ठरते.
पार्श्वशूल : छातीच्या फासळ्यांमध्ये उत्पन्न होणारा शूल कफवातजन्य असतो. कुशीच्या बाजूच्या फासळ्यांमध्ये वात कफाला अडवतो, तेव्हा पोट फुगते, गुरगुर व सुया टोचल्याप्रमाणे टोचणी होते. कष्टाने श्वास घ्यावा लागतो. झोप येत नाही, अन्न नकोसे वाटते. यात चिरफळ, पुष्करमूळ, हिंग, पादेलोण, बीडलोण, सैंधव व हिरडा ह्यांचे चूर्ण जवाच्या काढ्याबरोबर घेतात.
कुक्षीशूल : पोटामध्ये अग्नीला नष्ट करून वायू प्रकुपित झाल्यास खाल्लेले अन्न पचत नाही, पोटात गुबारा धरतो, आमयुक्त मळ होतो, मधूनमधून जोराने शूल उठतो. कोणत्याच शरीरस्थितीत चैन पडत नाही. हा शूल वात व आम ह्यांपासून सुरू होतो. ह्यावर ओकारी व यथाशक्ती लंघन हे उपाय आहेत, तसेच सुंठ, ओवा, हिंग, पादेलोण, बीडलोण यांचे चूर्ण पाण्याबरोबर देतात. आम नाहीसा झाल्यानंतर तपासणीपूर्वक विरेचनही देतात तसेच निरुह, अनुवासन, बस्ती देऊन दोष काढून टाकता येतात.
हृदयशूल : कफपित्तदोषांनी वाताची गती अडवल्यामुळे तो रसधातूसह हृदयामध्ये शूल उत्पन्न करतो. त्यामुळे श्वास घेता येत नाही. यावर वातहृदयरोगाचे उपचार करतात.
बस्तिशूल : पुरिष वात यांचा अवरोध केल्याने जेव्हा वायू बस्तीमध्ये प्रकुपित होतो, तेव्हा बस्ती, जांघ, नाभी या भागांत तो शूल उत्पन्न करतो. यात मल, वात, मूत्र ही कोंडली जातात. मूत्रशूलामध्ये लघवीला होत नाही.
विट्शूल : रूक्ष आहार घेणाऱ्याचा वायू मलावरोध करतो, पाचकाग्नी मंद करतो, पोटातील सर्व स्रोतसे अवरुद्ध करून उजव्या किंवा डाव्या कुशीत जाऊन शूल उत्पन्न करतो. गुड्गुड् असा आवाजही तो उत्पन्न करतो, यात तीव्र तहान लागते आणि भ्रम व मूर्च्छा उत्पन्न होतात.
हृदयशूल, बस्तिशूल आणि विट्शूल यांवर लवणभास्कर, हिंगाष्टक, विशमुष्ठ्यादीवटी, बीडलोण, पादेलोण इ. औषधे गरम तुपातून प्यावयास देतात व तेलाची बस्ती तसेच स्निग्ध रेचके दिली जातात.
अन्नदोषसमूद्भव शूल : अग्नी मंद असताना खूप जेवण केल्याने अन्न पोटामध्ये स्थिर होते. पचन, अनुलोमन इ. वाताच्या क्रिया होत नाहीत, हे अपक्व अन्न तीव्र शूल उत्पन्न करते. ह्याला विलंबिका असेही म्हणतात. पोट फुगते, घशाशी जळजळ होते, घशात अन्न येते, कंप उत्पन्न होतो, विचारशक्ती नष्ट होते व मूर्च्छाही येते. ओकारी व रेचही होतात. यावर ओकारीचे औषध देऊन सर्व अन्न काढून टाकतात. संपूर्ण लंघन करतात. पाचक औषधे, हिंगाष्टक, भास्करलवण, सज्जीखार, जवखार इ. क्षार, चूर्ण, लशुनादी गुटिका देण्यात येतात.
पटवर्धन, शुभदा अ.
पहा : वेदना, वेदनाशामके शांतके शामके.
संदर्भ : 1. Oglivie, C. Evans, C. C. (Eds). Chaberlain’s Sigs and Sypam in Clinical Medicine, Bristol, 1987. २. जोशी वेणीमाधव शास्त्री, आयुर्वेदीय महाकोश अर्थात आयुर्वेदीय शब्दकोश, मुंबई १९६८.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..