शून्यवाद : बौद्ध तत्त्वज्ञानाच्या विकासक्रमात जे विविध संप्रदाय उत्पन्न झाले, त्यांपैकी माध्यमिक संप्रदायाचा मध्यवर्ती सिद्धांत म्हणून शून्यवादाचा उल्लेख केला जातो. माध्यमिक संप्रदायाचा संस्थापक व प्रमुख आचार्य नागार्जुन (इ.स. दुसरे शतक) याने आपल्या ग्रंथांतून शून्यतेचे विवेचन केले आहे. यालाच इतर दार्शनिक शून्यवाद किंवा शून्यता-सिद्धांत संबोधतात. ‘इतर दार्शनिक’ असे म्हणण्याचे कारण, शून्यवाद नावाचा वाद किंवा सिद्धांत आपण मांडत आहोत, हे स्वतः नागार्जुनाला मान्य नव्हते. कोणत्याही सिद्धांत-प्रतिपादनात वस्तूंचा एखादा स्व-भाव निश्चित करून तो सिद्ध करीत असल्याचा दावा केलेला असतो. ‘सर्व पदार्थ शून्य आहेत’ असा दावा करून तो अनुमानाने सिद्ध करण्याचा प्रयत्न जर माध्यमिकांनी केला, तर माध्यमिकांचा शून्यवाद हाही एक प्रकारचा स्व-भाववादी सिद्धांत होऊन बसेल व स्व-भाववादात असलेले सर्व दोष शून्यवादालाही लागू पडतील (विग्रहव्यावर्तनी, कारिका २९).
शून्यतेचे हे सिद्धांतातील किंवा वादातीत स्वरूप समजून न घेतल्याने इतर दार्शनिकांनी शून्यवाद हा इतर सिद्धांतांसारखाच एक वाद कल्पून त्यावर टीका केली आहे. त्या टीकेचा एक भाग म्हणजे शून्यवाद हा एक प्रकारचा असतवाद (निहिलिझम) किंवा अभाववाद आहे असे मानणे. वस्तुतः अस्तित्व हा वस्तुत्व-भाव मानणे शाश्वतवादाकडे नेते, तर नास्तित्व हा स्व-भाव मानणे उच्छेदवादाला जन्म देते, असे नागार्जुनाचे म्हणणे आहे. शून्यतेत मात्र अस्तित्व व नास्तित्व या दोन्ही स्व-भाववादी कोटी नाकारून वस्तूंची निःस्व-भावता प्रकट केली जाते. (मध्यमकशास्त्र १५.१०).
शून्यतेचे तीन स्तर : नागार्जुनाने शून्यतेचा विचार तीन स्तरांवर मांडलेला दिसतो. त्यांपैकी एकाला वस्तुस्व-भाव-शून्यता, दुसऱ्याला प्रमाणशून्यता आणि तिसऱ्याला दृष्टिशून्यता अशी नावे देता येतील. अर्थात हे तीनही स्तर एकमेकांपासून अलग नसून एकमेकांत गुंतलेले व परस्परपूरक आहेत.
(१) वसुस्व-भाव-शून्यता : कोणत्याही वस्तूचे अस्तित्व आणि नास्तित्व या दोन कोटी (व त्यांच्या एकत्रित विधिनिषेधातून मिळणाऱ्या अन्य दोन कोटी) सिद्ध होत नाहीत, हे तर नागार्जुनाने मध्यमकशास्त्रात सांगितलेच पण या कोटींबरोबर येणाऱ्या इतरही अनेक वस्तुवर्णनपर कोटींचे त्याने परीक्षणपूर्वक खंडन केले. [कंसातील नावे मध्यमकशास्त्रातील प्रकरणांची -] वस्तूंची उत्पत्ती व नाश (‘संभवविभव परीक्षा’), कार्यकारणभाव (‘प्रत्ययपरीक्षा’, ‘सामग्रीपरीक्षा’), वस्तूंची गती-स्थिती (‘गतागतपरीक्षा’), त्यांचे काळातील अस्तित्व (‘कालपरीक्षा’), चतुर्महाभूतात्मक वर्गीकरण (‘धातुपरीक्षा’), आत्म्याचे अस्तित्व व आत्म्याचा विषयांशी ज्ञानात्मक व अन्य प्रकारचा संबंध (‘आत्मपरीक्षा’, ‘स्कन्धपरीक्षा’, ‘चक्षुरादीन्द्रियपरीक्षा’, ‘रागरक्तपरीक्षा’) यांसारख्या वस्तूंच्या विविध रूपांची व आविष्कारांची शून्यता नागार्जुनांनी सांगितली आहे. वस्तूंचे खरे स्वरूप व त्यांचे परस्परसंबंध संकल्पनांच्या व भाषेच्या चौकटीत पकडता येत नाहीत, हा या शून्यतेचा अभिप्रेतार्थ आहे.
(२) प्रमाणशून्यता : विग्रहव्यावर्तनीत नागार्जुनांनी नैयायिकांच्या प्रमाणमीमांसेचे परीक्षण करण्याच्या निमित्ताने एकूणच वस्तूंचे (प्रमेयांचे) यथार्थज्ञान करून देण्यात प्रमाणे कशी असमर्थ ठरतात आणि प्रमाण व प्रमेय ही परस्परसापेक्ष असल्याने एकूण ज्ञानव्यवहाराचेच प्रामाण्य कसे असिद्ध ठरते, हे दाखविले आहे. त्यामुळे वस्तूंचे क्षेत्र जसे निःस्व-भाव ठरते, तसे ज्ञानाचे क्षेत्रही निःस्व-भाव ठरते, असे नागार्जुन दाखवितात.
(३) दृष्टिशून्यता : गौतम बुद्धांनी विविध मतवाद्यांच्या दार्शनिक आग्रहांचे खंडन केले होते. चुकीच्या दृष्टिकोनात अडकून पडल्याने वस्तूंच्या नेमक्या स्वरूपाचे आकलन होत नाही व तृष्णा व दुःख यांनी माणूस बांधला जातो. शून्यवाद्यांनी बुद्धाच्या या प्रतिपादनाची नव्याने मांडणी केली. वस्तूंच्या एखाद्या स्व-भावाला चिकटून राहणे, ही ‘दृष्टी’ होय. अशा सर्व दृष्टींची किंवा दृष्टिवादांची शून्यता बुद्धाने सांगितल्याचे नागार्जुनाने म्हटले आहे पण सर्व पदार्थ स्व-भाव-शून्य आहेत. हाच पुन्हा एक दृष्टिवाद म्हणता येईल का, अशी एक समस्या यातून उत्पन्न होते. दृष्टिशून्यता ही एक दृष्टी नसून तिचा स्तर वरचा म्हणजे दृष्टींपलीकडील प्रज्ञेचा आहे, हे या समस्येचे एक उत्तर. शून्यता हाच एक दृष्टिवाद म्हणून स्वीकारणारे लोक असाध्य (असाध्य वैचारिक रोगाचे बळी) होत, असे नागार्जुन म्हणतो. (मध्यमकशास्त्र १३.८).
पदार्थांविषयी शून्यवादी दृष्टिकोन विकसित करणे व तो प्रमाणांनी सिद्ध करणे, यांवर नागार्जुनाचा भर नसून पदार्थांची शून्यता प्रज्ञेने जाणून घेण्यावर आहे. शून्यतेच्या साक्षात्काराची परिणती स्वमताग्रही वादपटुत्वात नव्हे, तर सर्व विचार, सर्व भाषिक प्रवृत्ती शांत होण्यात व्हावी, हे नागार्जुनाला अभिप्रेत आहे. काही विशिष्ट प्रश्नांवर बुद्धाने पाळलेल्या मौनाचाही नागार्जुनाने याच दृष्टिकोनातून व्यापक अर्थ लावला आहे.
पहा : नागार्जुन-१ बौद्ध दर्शन.
संदर्भ : Vaidya P. L. Ed. Madhyamakasastra of Nagarjuna, Darbhanga, 1960.
गोखले, प्र. प्र.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..