तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा : जगातील प्रत्येक धर्मानुसार पृथ्वीवरील विशिष्ट स्थाने पवित्र मानली जातात. या पवित्र स्थानांनाच तीर्थक्षेत्रे असे म्हटले जाते. प्रत्येक धर्माने आपापल्या अनुयायांना या तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याची म्हणजेच त्यांची यात्रा करण्याची शिफारस अथवा आज्ञा केलेली आहे.

जे तारते ते तीर्थ आणि ज्याच्या योगाने तरून जाता येते तेही तीर्थ होय. तीर्थ हे यात्रेकरूला पापांतून व दुःखांतून तारते. ऋग्वेदात रस्ता, नदीतील उतार आणि पवित्र स्थान या अर्थी तीर्थ हा शब्द आलेला आहे. घाट, यज्ञ, ब्राह्मण, अग्नी, शास्त्र, धर्मकृत्य असेही या शब्दाचे अर्थ कोशांत सापडतात. या सर्वच गोष्टी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तरून जाण्यास मदत करतात. राजाच्या मंत्री वगैरे अठरा अधिकाऱ्यांनाही तीर्थ म्हटले आहे परंतु ‘तीर्थ’ हा शब्द ‘पवित्र स्थान’ या अर्थीच प्रामुख्याने रूढ झाला आहे.

ज्याप्रमाणे शरीराचे विशिष्ट अवयव हे इतर अवयवांपेक्षा अधिक पवित्र मानले जातात, त्याप्रमाणे पृथ्वीवरील विशिष्ट स्थाने इतरांपेक्षा अधिक पवित्र मानली जातात. कित्येकदा त्या स्थानांचे काही नैसर्गिक वैशिष्ट्य असते. विशेषतः हिंदूंच्या मते निसर्गामध्ये देवताशक्ती वावरत असतात. त्यामुळेच पर्वत, नद्या, सागर, सरोवरे, वने, वृक्ष इ. स्थानांना हिंदू धर्मात तीर्थाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाण्यामध्ये पवित्र करण्याचा गुणधर्म असल्यामुळे स्नानाने पाप व रोग नाहीसे होतात, या समजुतीने जलतीर्थांना महत्त्व येते. देव, देवांचे अवतार अथवा प्रेषित यांच्या वास्तव्यामुळे व चमत्कारांमुळे पुनीत झालेली स्थाने तीर्थक्षेत्रे बनतात. त्यांच्या तपश्चर्येची स्थाने, विशेषतः त्यांचे जन्म, ज्ञानप्राप्ती आणि मृत्यू या घटनांशी निगडित असलेली स्थाने, तीर्थक्षेत्रे बनतात. जैन धर्मात तीर्थंकर या शब्दाचा तीर्थ ‘बनविणारे’ असाच अर्थ केला जातो. अशा स्थानी उपास्य देवतांच्या मूर्तीची स्थापना केली जाते. मंदिरे, समाधी, स्तूप, कबरी, दर्गे इ. पवित्र वास्तू तयार होतात. या स्थानी एक पवित्र शक्ती अथवा ‘माना’ यांचे वास्तव्य मानले जाते. विशिष्ट देवता अथवा एखाद्या व्यक्तीचा आत्मा तेथे सूक्ष्म रूपाने वावरतो आणि तेथे जाणाऱ्यास त्याचे दर्शन घडते अशी समजूत तयार होते.

यात्रेकरूच्या मनात रोगमुक्तीपासून ते मोक्षप्राप्तीपर्यंतचे अनेक हेतू असतात. दुःखातून व संकटातून सुटका करून घेणे, एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस बोलणे, मनःशांती मिळविणे, पापमुक्त होणे, पुण्य प्राप्त करणे, महान व्यक्तींच्या समाध्यांना भेटी देणे इ. प्रयोजनांनी तीर्थयात्रा केल्या जातात.

हिंदू, बौद्ध व जैन या भिन्नधर्मी लोकांना सारखीच पूज्य असणारी अनेक तीर्थे आहेत. काही स्थाने (उदा., हाजीमलंग) हिंदू व मुसलमान या दोघांनाही पवित्र वाटतात. जेरूसलेमसारखी तीर्थे मुसलमान, ज्यू आणि ख्रिस्ती या सर्वांना पवित्र वाटतात., कारण या प्रत्येक धर्माच्या इतिहासातील घटना, देवता, प्रेषित, ऋषी, साधुसंत यांचा संबंध तेथे असतो.

भारतात भिन्न भिन्न पंथोपपंथ असताना आणि परस्परांशी शत्रुत्व करणाऱ्या राजांची राज्ये असतानाही भारतीय समाजात सांस्कृतिक एकात्मता टिकली, याचे एक प्रमुख कारण म्हणजे तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा. तीर्थक्षेत्री अस्पृश्यता मानली जात नसल्यामुळे भारतीय समाजात एकात्मता निर्माण होण्यास मदत झाली. जगन्नाथपुरीला ब्राह्मण पुजारी हा शूद्राने शिजवलेल्या भाताचा महाप्रसाद घेतो, तर पंढरपूरला ब्राह्मण वारकरीही शूद्र वारकऱ्याच्या पाया पडतो. स्त्रीशूद्रांसारख्या परंपरेने हीन मानल्या गेलेल्या लोकांनाही तीर्थयात्रेमुळे मुक्तीची द्वारे उघडली गेली.


जगभर पसरलेल्या मुस्लिम समाजात एकात्मता निर्माण करण्याचे काम हाजच्या यात्रेमुळे साधले आहे. मुस्लिमांच्या वर्चस्वातून ख्रिश्चनांची पवित्र भूमी सोडवण्यासाठी ख्रिश्चनांनी एकत्र येऊन मुसलमानांबरोबर धर्मयुद्धे पुकारली होती. यूरोपमधील देशांना एकमेकांच्या जवळ आणण्याचे काम ख्रिस्ती तीर्थांनी केले आहे.

हिंदूंच्या तीर्थयात्रा : हिंदू धर्मात आणि संस्कृतीत तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हे महत्त्व त्यांच्या तीर्थविवेचनात अनेक दृष्टिकोनांतून मांडलेले आहे. त्यांपैकी प्रमुख दृष्टिकोन पुढीलप्रमाणे आहेत :

तीर्थयात्रेचा अधिकारी : तीर्थयात्रेचा अधिकार देताना विशाल दृष्टिकोन स्वीकारलेला दिसतो. चारी आश्रमांतील लोक, ब्राह्मणादी उच्च वर्णीय लोक, स्त्रिया, शूद्र, संकरातून जन्मलेले, वर्णबाह्य, चांडाळ, म्लेंछ, रोगग्रस्त, पापी या सर्वांना हा अधिकार आहे. यज्ञ, तीन ऋणे, कुटुंबियांची उपजीविका इ. बाबतींतील कर्तव्ये पूर्ण केली नसतील तर हा अधिकार नाही, असेही मत आढळते. आईवडिलांच्या मृत्यूनंतर एक वर्षपर्यंत व पत्नी गरोदर असेल तर त्यावेळी यात्रेला जाऊ नये, असे म्हटलेले आहे.

यात्राविधी : तीर्थयात्रेला निघण्याची तयारी करताना विशिष्ट दिवशी एक वेळच भोजन घ्यावे. दुसऱ्या दिवशी मुंडन करून उपवास करावा. उपवासानंतर दुसऱ्या दिवशी नित्यकर्मे करून ‘मी अमुक अमुक तीर्थक्षेत्रांना जाणार आहे’ असा संकल्प करावा. नंतर गणेश, ग्रह व इष्ट देवतांची पाच अथवा सोळा उपचारांनी पूजा करावी. मग पार्वणश्राद्ध करावे. त्यानंतर कमीत कमी तीन ब्राह्मणांचा किंवा पुरोहितांचा सत्कार करून त्यांना काही धन द्यावे. मग यात्रेकरूचा वेष परिधान करून गावाला किंवा निदान स्वतःच्या घराला प्रदक्षिणा घालावी. तीर्थाच्या ठिकाणी स्नान करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. माणसाची पापे त्याच्या केसात रहात असल्यामुळे पुरुष व विधवांचे तीर्थक्षेत्री मुंडन केले जाते आणि सुवासिनींच्या दोन बटा कापल्या जातात. पितरांचे तर्पण, पिंडदान व श्राद्ध यांना तीर्थांत अत्यंत महत्त्व असते. त्यामुळे पितरांचा उद्धार होतो असे मानले जाते. तीर्थाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पाप न करता इंद्रियनिग्रह करून रहावे, देवपूजा व देवदर्शन करावे इ. यात्राविधी सांगितला आहे.

तीर्थयात्रेचे फल : तीर्थयात्रेमुळे विविध यज्ञांइतके वा अधिक फल मिळते सर्व जन्मांतील पापे नष्ट होतात अनेक पिढ्यांचा उद्धार होतो इ. कल्पना आहेत. यात्रेमुळे पाप्यांचे पाप संपते व पुण्यवंतांचे पुण्य वाढते. पायी यात्रा करण्यामुळे अधिक पुण्य लाभते. संयमी, अहंकारहीन, अल्पसंतुष्ट, सत्यवचनी आणि व्रतनिष्ठ अशा व्यक्तीला समग्र पुण्यफल मिळते परंतु वाहनामुळे निम्मे, छत्र व पादुका यांमुळे निम्मे, व्यापाराने तीन चतुर्थांश आणि प्रतिग्रहामुळे सर्व पुण्य नष्ट होते. एखाद्याने आई, वडील, भाऊ, मित्र व गुरू यांना नजरेसमोर ठेवून तीर्थस्नान केले, तर त्या त्या व्यक्तीला एक बारांश पुण्य लाभते. धर्मशाळा, पाणपोई, अन्नछत्रे इ. मार्गांनी यात्रेकरूंची सोय करणाराला एक चतुर्थांश पुण्य लाभते.

तीर्थांचे प्रकार : तीर्थांचे वेगवेगळे प्रकार करण्यात आले आहेत. काशी वगैरे स्थावर किंवा भौम तीर्थे मानली जातात. ब्राह्मण, संत, भक्त, गुरू, माता, पिता, पती आणि पत्नी यांनाही तीर्थे मानली असून त्यांना जंगम तीर्थे म्हणतात. मातापित्यांना तीर्थरूप म्हणण्याची पद्धत मराठीत रूढ आहेच. गायीच्या शरीरात ३३ कोटी देव असल्यामुळे ती सर्वतीर्थमयी मानली जाते. काया हेही तीर्थ मानले जाते.

सत्य, क्षमा, इंद्रियनिग्रह, सर्वभूतदया, आर्जव, दान, दम, संतोष, ब्रह्मचर्य, प्रियवादिता, ज्ञान, धृती आणि तप ही मानस तीर्थे होत. ईश्वरनाम हेही तीर्थ असून मनःशुद्धी हे ‘तीर्थांचे तीर्थ’ मानले जाते.

दैव, असुर, आर्ष व मानुष ही तीर्थे अनुक्रमे कृत, त्रेता, द्वापर व कलियुगासाठी सांगितलेली आहेत. प्रभास, पुष्कर, काशी इ. दैव म्हणजे देवांनी निर्माण केलेली तीर्थे होत. असूर म्हणजे गयेप्रमाणे असुरांशी निगडित असलेली, आर्ष म्हणजे ऋषींनी आणि मानुष म्हणजे राजादिकांनी निर्माण केलेली तीर्थे होत. धर्मतीर्थ (धर्मशिक्षणाचे केंद्र), अर्थतीर्थ (पवित्र ठिकाणी असलेले व्यापार–धंद्याचे केंद्र), कामतीर्थ (कलोपासनेचे केंद्र) आणि मोक्षतीर्थ (अध्यात्मविद्येचे केंद्र) असेही तीर्थांचे प्रकार आहेत. तीर्थांचे जसे प्रकार असतात तसेच तीर्थयात्रांचेही सात्त्विक, राजस आणि तामस असे प्रकार करण्यात आले आहेत.

तीर्थविवेचनात संख्येचे महत्त्व :  प्रयाग, काशी आणि गया यांच्या यात्रेला त्रिस्थळी यात्रा म्हणतात. चार धामे प्रख्यात आहेत. पंचनाथ, पंचप्रयाग, पंचबद्री, पंचकेदार, पंचकाशी इ. संज्ञांमध्ये पाच आकड्याचे महत्त्व आहे. सप्तगंगा, सप्तपुण्यनद्या, सप्तपुरी इ. सात गोष्टींचे समूह पवित्र आहेत. अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. १० भास्करक्षेत्रे, १२ ज्योतिर्लिंगे, १४ प्रयाग, ५१ शक्तिपीठे, ५१ सिद्धक्षेत्रे, ८४ गंगा, १०८ शैव आणि १०८ वैष्णव दिव्यदेश, देवीची १०८ स्थाने इ. क्षेत्रसमुच्चय प्रसिद्ध आहेत.


ज्योतिषशास्त्रीय योगांचे महत्त्व : विशिष्ट नक्षत्रे व ग्रह यांचा जेव्हा योग होतो, तेव्हा काही क्षेत्रांतून कुंभमेळा, माघमेळा यांसारखे मेळे भरतात. त्यावेळी त्या त्या ठिकाणच्या जलाशयातून गंगा गुप्त रूपाने राहते, अशी समजूत आहे. ग्रहणाच्या वेळेचे तीर्थस्नानही पुण्यकारक मानले जाते.

जन्मपत्रिकेत अष्टमस्थानी शुभग्रह असतील व त्यांच्यावर शनीची दृष्टी असेल, तर त्या व्यक्तीला अनेक तीर्थांची प्राप्ती होते जन्मपत्रिकेत विशिष्ट ग्रह असतील तर तीर्थक्षेत्री मृत्यू, गंगास्नान अथवा मोक्ष यांसारखे काही फल प्राप्त होते, अशा समजुती आहेत.

तीर्थविषयीचे वाङ्‌मय : सूत्र व स्मृतिवाङ्‌मयात तीर्थांना फार महत्त्वाचे स्थान नाही, परंतु महाभारत आणि पुराणे यांतून पुष्कळ तीर्थविवेचन आहे. धर्मनिबंधांतूनही तीर्थविवेचनासाठी स्वतंत्र विभाग आहेत. ज्या तीर्थाचे वर्णन चालू असेल, त्याला इतर सर्व तीर्थांपेक्षा प्राधान्य देणे आणि वर्णनात अतिशयोक्ती करणे, या दोन प्रवृत्ती या वाङ्‌मयात ठळकपणे आढळतात.

तीर्थविषयक कथा : ‘काशी खंड’,प्रयागमाहात्म्य’, गयामहात्म्य’, गंगा, गोदावरी इ. नद्यांची माहात्म्ये, अशा पुराणांमध्ये समाविष्ट असलेल्या किंवा पुराणांचा भाग म्हणून सांगितलेल्या पोथ्या मिळतात. शंकर, विष्णू, देवी, गणपती इ. देवतांचे माहात्म्य सांगणाऱ्या कथाही आहेत.

तीर्थांचा इतिहास : काही अनादितीर्थे आहेत. ती केव्हापासून पवित्र मानली गेली हे सांगता येत नाही. काळाच्या ओघात काही तीर्थे नव्याने निर्माण होतात, तर काहींचे माहात्म्य कमी होत जाते. काही पूर्णपणे लुप्त, तर काही अर्धलुप्त होतात. काहींची नावे उरतात, परंतु त्यांच्या स्थानांची ओळख पटत नाही.

तीर्थयात्रेची अपरिहार्यता : अनेक पुत्र असावेत, म्हणजे एखादा तरी गयेला जाऊन श्राद्ध करील अशी समजूत आहे. ज्याने कधीच तीर्थयात्रा केली नाही तो दरिद्री होतो, असे मानले जाते. परंतु याउलटही विचार आढळतात. जेथे संयमी व्यक्ती असते तेथे कुरुक्षेत्र, प्रयाग व पुष्कर ही क्षेत्रे असतात जेथे अग्निहोत्र व श्राद्ध केले जाते, जेथे वेद व पुराणांचा अभ्यास चालतो, जेथे भगवंताची लीला गायिली जाते, जेथे देऊळ, गायीचा गोठा, सोमपी, अश्वत्थ वृक्ष, आचार्य अथवा पतिव्रता गृहिणी असते ते तीर्थ, असेही मानले आहे. महापुरुष हे तर परमतीर्थ कारण तेच तीर्थांना तीर्थ बनवतात.

तीर्थविषयक काही समजुती :  काशीला जाणाऱ्या व्यक्तीने काशीयात्रा केल्यावर दगडाने आपले पाय मोडून घ्यावेत म्हणजे ती दुसऱ्या क्षेत्रात जाणार नाही, अशी समजूत आहे. आत्महत्या करणे हे पाप असले, तरी तीर्थांच्या ठिकाणी आत्महत्या करण्याने मोक्ष मिळतो, तीर्थक्षेत्री जाऊन मृत्यू स्वीकारावा, तीर्थयात्रेला निघताना सुईने गाल आणि जीभ छेदावी, देवाने प्रार्थना ऐकावी म्हणून जीभ कापून टाकावी, तीर्थाचे नाव माहीत नसेल तर त्याला विष्णुतीर्थ म्हणावे, तीर्थांवर कुणाची वैयक्तिक मालकी नसते, यांसारख्या काही समजुती आहेत.

यात्रेकरूंचे विशेष हक्क : एखादी व्यक्ती दीर्घकाळपर्यंत तीर्थयात्रेला गेलेली असली, तरी तिचा संपत्तीवरचा हक्क नाहीसा होत नसे. विधवेला पतीचे श्राद्ध करण्यासाठी गयेला जावयाचे असेल किंवा यात्रेसाठी पंढरपूरला जायचे असेल, तर तिला पतीच्या संपत्तीतील काही वाटा मिळत असे. यात्रेकरूकडून कर अथवा नावेचे भाडे घेऊ नये असा नियम होता. अर्थात तो अनेक वेळा मोडला जात असे.

काही प्रसिद्ध तीर्थयात्रा : परशुराम आणि दाशरथी राम यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या होत्या. बलराम, पांडव यांच्या तीर्थयात्रा आणि इतिहासकाळातील शंकराचार्य, वल्लभाचार्य, चैतन्य, रामदास इत्यादींच्या तीर्थयात्रा प्रसिद्ध आहेत.

हिंदूंची महत्त्वाची तीर्थक्षेत्रे : त्रिस्थळी यात्रा : प्रयाग, काशी व गया या तीन तीर्थांच्या अत्यंत पुण्यकारक यात्रेला हिंदू लोक त्रिस्थळी यात्रा असे म्हणतात. प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती (लुप्त) यांचा त्रिवेणी संगम होतो. या संगमातील स्नानाचे महत्त्वऋग्वेदातही सांगितले आहे. पुराणांनी प्रयागला तीर्थराज म्हटले आहे. येथे सालंकृत कपिलेचे दान करणे पुण्यकारक मानले जाते. येथील संगमावर किंवा अक्षयवटाजवळ आत्महत्या केली तर मोक्ष मिळतो, असे पुराणे वमहाभारत यांचे मत आहे. अक्षयवट हा येथील अनेक उपतीर्थांपैकी प्रमुख होय. प्रयागमध्ये पुरुषांचे व विधवांचे मुंडन केले जाते. सुवासिनी स्त्रियांचेही मुंडन करावे असे काही सनातन्यांचे मत त्रिस्थळीसेतूने उदधृत केले आहे. माघ महिन्यात त्रिवेणी संगमावर स्नान करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.


काशी हे हिंदूंना सर्वांत पूज्य वाटणारे क्षेत्र. हे गेली तीन हजार वर्षे पवित्र मानले जात आहे. काशी ही सप्त मोक्षदायक पुऱ्यांपैकी पहिली असून येथील विश्वेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. काशीला वाराणसी, बनारस, अविमुक्त, रुद्रावास, आनंदकानन, महाश्मशान अशी इतर नावे आहेत. येथे येणारा मृत्यू मोक्षकारक असल्याच्या समजुतीमुळे अनेक लोक अंत्यकाळी येथे येऊन देहत्याग करतात. विश्वेश्वर किंवा विश्वनाथ ही येथील सर्वांत महत्त्वाची देवता होय. दशाश्वमेध, लोलार्क, भैरव, धुंडिराज वा ढुंढिराज, केशव, बिंदुमाधव आणि मणिकर्णिका यांचे दर्शन येथे आवश्यक असते. काशीची पंचक्रोशी हे पवित्र तीर्थ आहे. यात्रेकरू तेथे जाऊन आल्यावर स्नान करून साक्षिविनायकाच्या दर्शनाला जातात.

गया येथे गय नावाच्या असुराने ब्रह्मदेवाच्या यज्ञासाठी आपले शरीर दिले म्हणून या तीर्थाला ‘गया’ हे नाव प्राप्त झाले. येथे आदिगदाधर हा देव आहे. पितृश्राद्धासाठी हे क्षेत्र अत्यंत प्रसिद्ध आहे. गयेची यात्रा ७ दिवस चालते. गयेत प्रवेश केल्यावर पूर्वेला असलेल्या फल्गू नदीमध्ये स्नान करून सात दिवसपर्यंत वेगवेगळ्या तीर्थांना भेटी देऊन श्राद्ध करावयाचे असते. प्रेतशिळेजवळचे श्राद्ध पहिले व अक्षयवटाजवळचे शेवटचे असले पाहिजे. येथील श्राद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मुंडन केले जात नाही. फल्गू नदी, विष्णुपद आणि अक्षयवट या तीन स्थळांना भेटी देणे अत्यावश्यक असते. येथे विष्णूच्या पावलावर विष्णुपदमंदिर बांधलेले आहे. येथील बोधिवृक्ष बौद्धांचा असला, तरी हिंदूही त्याला पवित्र मानतात. यात्रेकरूने गयेत गयावल ब्राह्मणखेरीज इतर कोणत्याही ब्राह्मणाला मान द्यावयाचा नसतो.

चार धामांची यात्रा :  भारताच्या चार टोकांची चार धामे पुढीलप्रमाणे : बद्रीनाथ–हे धाम हिमालयात आहे. अलकनंदा नदीच्या तीरावरील मंदिरात शाळिग्राम शिळेची नारायणाची मूर्ती आहे. हाच बद्रीनाथ. यात्रेकरू सप्तकुंडात स्नान करून बद्रीनाथाच्या दर्शनाला जातात. अलकनंदेच्या तीरावर ब्रह्मकपाल नावाचा एक प्रशस्त खडक असून त्या ठिकाणी श्राद्ध केले जाते. येथील पाच पवित्र तीर्थे, पाच पवित्र शिला आणि इतर अनेक स्थाने महत्त्वाची आहेत. हिवाळ्यात बर्फ पडत असल्यामुळे तेथील मूर्ती जोशीमठात आणतात व वैशाखात ती पुन्हा परत नेतात. तेव्हापासून बद्रीनाथाची यात्रा सुरू होते. या क्षेत्रात नरनारायणांनी प्रखर तपश्चर्या केली होती असे मानतात.

द्वारका–हे धाम पश्चिमेस समुद्रकिनारी गोमतीवर आहे. ही भगवान कृष्णाची नगरी. सात मोक्षदायक पुऱ्यांमध्ये द्वारकेची गणना केली जाते. रणछोडजींचे मंदिर हे येथील मुख्य स्थान होय. जरासंध व कालयवन यांच्या भीतीने रण सोडून कृष्ण येथे आला म्हणून या ठिकाणास हे नाव प्राप्त झाले. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारकेच्या प्रदक्षिणेला प्रारंभ होतो आणि शेवटही तेथेच होतो. या मंदिराच्या पूर्वेला शारदामठ आहे जवळच वल्लभाचार्यांची बैठक आहे. या द्वारकेला गोमतीद्वारका असे म्हणतात, तर तेथून जवळच कच्छच्या खाडीत बेटद्वारका आहे. तेथे रणछोडजीचे मंदिर, कृष्णाचा महाल इ. स्थाने आहेत.

जगन्नाथपुरी–पूर्वेस ओरिसातील समुद्रकिनाऱ्यावर जगन्नाथपुरीचे पुरुषोत्तमतीर्थ हे धाम आहे. येथील मंदिरात कृष्ण, बलराम व सुभद्रा यांच्या मूर्ती आहेत. जगन्नाथमंदिरात जातिभेद मानला जात नाही. येथून भाताचा महाप्रसाद वाळवून गावोगाव नेला जातो. येथे पोर्णिमेच्या दिवशी समुद्रस्नान करणे विशेष पुण्यकारक मानले जाते. येथील महत्त्वाच्या २४ उत्सवांपैकी आषाढ शु. द्वितीयेला चालू होणारा रथयात्रेचा उत्सव महत्त्वाचा असतो. इंद्रद्युम्न कुंडाच्या काठी एका मंडपात आठ दिवसपर्यंत गुंडीचायात्रा चालते [→ जगन्नाथाचा रथ ].

रामेश्वर–दक्षिणेत समुद्रकिनाऱ्यावर असलेले हे धाम बारा ज्योतिर्लिंगांमध्येही गणले जाते. रामाच्या स्मृतीशी निगडित असलेली अनेक तीर्थे येथे आहेत. गंगोत्री अथवा हरद्वारहून आणलेल्या जलाचा रामेश्वरावर अभिषेक केला जातो. येथून जवळच असलेल्या सेतूला ‘धनुष्कोटी’ वा ‘धनुष्यकोडी’ असे म्हणतात. येथे श्राद्ध, पिंडदान, सुवर्ण धनुष्याचे दान इ. केले जाते. येथे वाळूचे लिंग करून त्याची पूजा करतात. यात्रेकरू येथून वाळूचे सेतुमाधवलिंग आपल्याबरोबर नेऊन ते प्रयागतीर्थात गंगेला अर्पण करतात. काशी–रामेश्वराची यात्रा ही हिंदूंची सर्वांत महत्त्वाची यात्रा मानली जाते.

मोक्षादायिनी सप्तपुऱ्या : काशी, कांची, मायापुरी (हरद्वार), अयोध्या, द्वारावती (द्वारका), मथुरा आणि अवंतिका (उज्जैन वा उज्जयिनी) या सात क्षेत्रांना हिंदू मोक्षदायक सप्तपुऱ्या मानतात. यांपैकी काशी व द्वारका यांची चर्चा येऊन गेली आहे.

कांची –दक्षिणेतील हे विख्यात वैष्णव क्षेत्र, शैव क्षेत्र व शाक्त क्षेत्रही आहे. येथील विष्णूचे वैकुंठ पेरूमल मंदिर आणि शिवाचे कैलासनाथ मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. मायापुरी (हरद्वार)–हिमालयातील मायापुरी, हरद्वार, कनखल, ज्वालापूर आणि भीमगोडा या पाच तीर्थांना मिळून हरद्वार म्हणतात. येथे अनेक तीर्थे असून कनखल आणि जवळच असलेले हृषीकेश ही अत्यंत महत्त्वाची आहेत. अयोध्या–शरयूच्या तीरावरील ही रामाची राजधानी. दोन वेगवेगळ्या मार्गांनी होणाऱ्या अयोध्येच्या दोन प्रदक्षिणा असतात. पहिल्या व चौथ्या तीर्थंकरांचे जन्मस्थान असल्यामुळे हे जैनांचेही पवित्र क्षेत्र आहे. मथुरा–कृष्णपूजा व भागवत धर्म यांचे मथुरा हे केंद्र आहे. मथुरेच्या परिसरात १२ वने आणि २४ उपवने यांचा निर्देश आढळतो. वृंदावन हे त्या सर्वांत प्रमुख. जवळच गोवर्धन पर्वत आणि गोकुळ ही पवित्र स्थाने आहेत. अवंतिका–येथे महाकालेश्वर असल्यामुळे हे बारा ज्योतिर्लिंगांत गणले जाते. हे एक शक्तिपीठही आहे.


बारा ज्योतिर्लिंगे : शिवलिंगे अनंत असली, तरी त्यांपैकी बारा सर्वप्रधान मानली जातात व त्यांनाच ज्योतिर्लिंगे म्हटले जाते. या ज्योतिर्लिंगांपैकी काशीतील विश्वेश्वर, उज्जयिनीतील महाकालेश्वर आणि सेतुबंधातील रामेश्वर यांची चर्चा येऊन गेली आहे. इतर स्थाने पुढीलप्रमाणे : सोमनाथ–सौराष्ट्रातील प्रभासक्षेत्री हे ज्योतिर्लिंग आहे. मल्लिकार्जुन–आंध्रातील सर्वांत महत्त्वाचे असे हे क्षेत्र श्रीशैलम् पर्वतावर आहे. लिंगचक्रवर्ती या नावाने त्याची पूजा केली जाते. ओंकार व अमलेश्वर–ओंकार हे मध्य प्रदेशातील निमाड जिल्ह्यात नर्मदेच्या दुभंगलेल्या पात्रात बेटासारखे वसलेले आहे. याच क्षेत्रात असलेले अमलेश्वरही द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी आहे असे काहीजण मानतात. केदारनाथ–हे हिमालयातील महत्त्वाचे शिवक्षेत्र. या क्षेत्रात एकूण पंचकेदार आहेत. भीमाशंकर–पुण्यापासून जवळच भीमेच्या उगमस्थानी हे ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वर–नासिकपासून जवळच गोदावरीच्या उगमस्थानी हे क्षेत्र आहे. वैद्यनाथ वा वैजनाथ–परभणीजवळ परळी येथे वैजनाथ वा वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. तसेच संथाळ परगण्यातही याचे स्थान सांगितले आहे. नागनाथ वा नागेश–मराठवाड्यातील औंढा येथे नागनाथाचे स्थान मानले जाते. त्याखेरीज गोमती द्वारकेकडून बेटद्वारकेकडे जाताना नागेशाचे स्थान लागते असे काहीजण मानतात. तर अलमोड्याजवळचा जागेश्वर म्हणजे हे ज्योतिर्लिंग असेही काहीजण मानतात. घृष्णेश्वर–औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळजवळ शिवालयात हे ज्योतिर्लिंग आहे [→ ज्योतिर्लिंग].

इतर शैव क्षेत्रे : शिवाच्या अष्टमूर्तींची मंदिरे पुढीलप्रमाणे आहेत : सूर्य म्हणजे शिवच, असे मानले जाते त्यामुळे ओरिसातील कोणार्कच्या सूर्यमंदिरासारखी सूर्यमंदिरे म्हणजे शिवमंदिरेच होत. सौराष्ट्रातील सोमनाथ आणि बंगालमधील चंद्रनाथ ही शिवाची चंद्ररूपे होत. नेपाळमधील पशुपतिनाथ महादेव हे यजमानमूर्तीचे तीर्थ आहे. शिवकांची येथे एकाम्रेश्वर हे क्षितिलिंग, श्रीरंगनाथापासून जवळच जंबुकेश्वर हे अप्–लिंग, अरुणाचल येथे तेजोलिंग, काळहस्तीश्वर (जि. उत्तर अर्काट) येथे वायुलिंग व चिदंबरम् येथे आकाशलिंग आहे. यांखेरीज महत्त्वाची काही शैव क्षेत्रे पुढीलप्रमाणे : हिमालयात कैलास, काश्मीरमध्ये अमरनाथ, उत्तर प्रदेशात गढमुक्तेश्वर (जि. मीरत) व उत्तरकाशी, नेपाळमध्ये मुक्तिनाथ, गुजरातमध्ये हाटकेश्वर व अश्विनी कुमारेश्वर, महाराष्ट्रात शिखरशिंगणापूर व महाबळेश्वर, जोतिबा (कोल्हापूर), दक्षिणेत मायावरम, गोकर्ण महाबळेश्वर, मध्यार्जुनक्षेत्र, तिरुवारूर, तंजावर, तिरुनेलवेली, तेनकाशी इ. शैव क्षेत्रे प्रमुख आहेत. महाराष्ट्रात जेजुरी (पुणे) आणि पाली (सातारा) येथील खंडोबा ही शिवाचीच रूपे आहेत.

काही प्रमुख वैष्णव क्षेत्रे :  संभल (मुरादाबाद) येथे भववान कल्कीचा अवतार होणार असे मानले जाते. नेपाळमध्ये वाराहक्षेत्र वा कोकामुख हे कोसी नदीच्या काठावरचे प्रसिद्ध क्षेत्र आहे. गुजरातमध्ये डाकोर येथे रणछोडजीचे मंदिर आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपतीचा बालाजी अत्यंत प्रसिद्ध आहे. येथे रोज पाच हजारांवर यात्रेकरू दर्शनासाठी येतात. म्हैसूरजवळील श्रीरंगपट्टम् येथे नारायणाची मूर्ती आहे. मेलूकोटे अथवा यादवगिरी हे दक्षिणेतील चार प्रमुख वैष्णव क्षेत्रांपैकी एक आहे. सिंहाचलम् येथे वाराह–लक्ष्मीनृसिंहाचे मंदिर आहे. पनानृसिंह (जि. विजयवाडा) येथेही लक्ष्मीनृसिंहाचे मंदिर आहे. मद्रासजवळच्या तिरुवळ्ळुर येथे वरदराजाचे अत्यंत विशाल मंदिर आहे. विष्णुकांची येथे विष्णूची १८ मंदिरे आहेत. श्रीरंगम् हे भूतलावरील वैकुंठधाम मानले जाते. त्रिवेंद्रम येथे पद्मनाभाचे, जनार्दन येथे जनार्दनाचे आणि श्रीविल्लिपुत्तूर येथे श्रीरंगनाथाचे मंदिर आहे.

इतर काही क्षेत्रे : उत्तरेस वैष्णवीदेवी, देवप्रयाग, विंध्याचल, देवी पाटण इ. क्षेत्रे महत्त्वाची आहेत. पंजाबातील पृथूदक (जि. अंबाला) हे अत्यंत महत्त्वाचे असून श्राद्ध करण्यासाठी हजारो यात्रेकरू येथे येतात. कुरुक्षेत्र हे अत्यंत पवित्र क्षेत्र आहे. चित्रकूट हे रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र आहे. पूर्वेस सीतामढी व जनकपूर (जि. मुझफरपूर) ही स्थाने सीतेशी निगडित आहेत. गयेजवळचे बराबर हेही प्रसिद्ध तीर्थ आहे. मध्य प्रदेशात शबरीनारायण आणि महाराष्ट्रात रामटेक (जि. नागपूर), परशुरामक्षेत्र (जि. रत्नागिरी), वाई इ. प्रसिद्ध आहेत. पश्चिम भारतात लोहागर्ल, एकलिंगजी, सिद्धपूर (मातृश्राद्धासाठी प्रसिद्ध), शामळजी, अंबाजी इ. प्रसिद्ध क्षेत्रे आहेत. दक्षिण भारतात शियाळी, मन्नारगुडी, कुंभकोणम्, नंजनगुड, बेलूर, हंपी, हरिहर इ. क्षेत्रे प्रसिद्ध आहेत.

पवित्र नद्या, सागर, सरोवरे आणि संगम : हिंदूंनी प्रत्येक नदी हे पवित्र तीर्थच मानले आहे. तरीही काही स्थानांना इतरांपेक्षा अधिक माहात्म्य प्राप्त झालेले आहे. सात पुण्यनद्या पुढीलप्रमाणे : गंगा–ही हिंदूंची सर्वांत पवित्र नदी. शिवाय कनखल, हरद्वार, प्रयाग आणि काशी ही महत्त्वाची तीर्थे तिच्या काठी आहेत. हिमालयात गंगोत्री येथे तिचा उगम होतो आणि ती जेथे समुद्राला मिळते तेथे गंगासागर हे क्षेत्र बनले आहे. गंगा म्हणजे कलियुगातील सर्वश्रेष्ठ तीर्थ. गंगेत अस्थींचे विसर्जन करणे, हा एक महत्त्वाचा विधी आहे. संक्रांती, ग्रहण इ. प्रसंगी गंगेतील स्नान हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. यमुना – भरत, वैवस्वत मनू आणि कृष्ण यांच्या चरित्राशी संबंधित म्हणून ही पवित्र. वृंदावन, मथुरा ही तीर्थे हिच्याच काठी आहेत. हिमालयात जम्नोत्री येथे तिचा उगम होतो. अनेक कवी, संत आणि कृष्णभक्त यांना ही पूज्य वाटते. गोदावरी–हिच्या उगमाजवळ त्र्यबकेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. नासिक आणि पंचवटी ही क्षेत्रे हिच्याच काठी आहेत. दर बारा वर्षांनी नासिक येथे प्रचंड ⇨ कुंभमेळा  भरतो. गोदावरी जेथे समुद्राला मिळते तेथे राजमहेंद्री हे प्रसिद्ध तीर्थ आहे. सरस्वती–प्रयाग येथील त्रिवेणी–संगमात गुप्त रूपाने असलेली ही नदी सात पुण्यनद्यांपैकी एक आहे. कावेरी–गंगेबद्दल उत्तर भारतीयांत जो भक्तिभाव आहे तोच दक्षिणेत कावेरीबद्दल आहे. बलरामाने कावेरीची यात्रा केली होती. नर्मदा–अमरकंटक या शिवस्थानापासून हिचा उगम होतो. नर्मदेवरील तीर्थात आत्महत्या करावी, नर्मदेची प्रदक्षिणा करावी इ. समजुती आहेत. सिंधू–जिच्या नावावरून हिंदू हा शब्द तयार झाला ती ही पवित्र नदी होय.

सरोवरे : तिबेटमधील मानस सरोवर, राजस्थानातील पुष्कर सरोवर, सिद्धपुरातील बिंदुसर सरोवर, कच्छमधील नारायण सरोवर व कर्नाटकातील पंपा सरोवर ही सरोवरे पवित्र मानली जातात. ब्रह्मदेवाची जी अत्यल्पतीर्थे आहेत त्यांपैकी पुष्कर हे एक होय.


शक्तिपीठे व देवीची इतर स्थाने : देशाच्या सर्व भागांत देवीची पूजा होते. देवीची एकूण १०८ स्थाने सांगितली जातात. देवीची ५१ शक्तिपीठे ही कल्पना तर अत्यंत प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील देवीची ‘औट’ म्हणजे साडेतीन स्थानेही विख्यात आहेत.

दक्षाच्या यज्ञात अपमानित झालेल्या सतीने प्राणत्याग केल्यावर शोकग्रस्त शंकर सतीचे शव खांद्यावर घेऊन नृत्य करीत त्रैलोक्यात हिंडू लागला. हे पाहून विष्णूने आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे करून ते देशाच्या वेगवेगळ्या भागांतून टाकले. सतीच्या शरीराचे तुकडे आणि तिचे अलंकार ५१ ठिकाणी पडले. त्यांतील प्रत्येक ठिकाणी एक एक शक्ती आणि एक एक भैरव आहेत. त्या त्या स्थानाला शक्तिपीठ म्हटले जाऊ लागले. काही प्रमुख शक्तिपीठे पुढीलप्रमाणे : कामाख्या–आसाम राज्यात गौहातीजवळ नीलाचल पर्वतावर सतीची योनी गळून पडली. येथील मंदिरात कामाख्या देवीची मूर्ती नसून एका दगडावर योनीची आकृती खोदलेली आहे. कामाक्षी–दक्षिण भारतात शिवकांची येथे सतीच्या अस्थींचा सांगाडा गळून पडला. येथील कामाक्षीचे मंदिर प्रसिद्ध आहे. कन्याकुमारी–सतीच्या देहाचा पृष्ठभाग येथे गळून पडला. भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या या स्थानी सागरांचा संगम आहे. काली–कलकत्त्यात सतीच्या उजव्या पायाची बोटे गळून पडली. येथील कालीघाटावर कालीचे प्रसिद्ध मंदिर आहे. महालक्ष्मी–करवीर म्हणजेच कोल्हापूर येथे सतीचे तीन नेत्र गळून पडले. सध्या हिला अंबाबाई म्हणतात. दक्षिण काशी व महाराष्ट्रातील औट पीठांपैकी अर्धे पीठ या रूपानेही हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. यांशिवाय काशी, वृंदावन, श्रीशैलम्, पंचवटी, प्रभास, उज्जयिनी, पुष्कर, मानस सरोवर, प्रयाग, जगन्नाथपुरी, अमरकंटक, पशुपतिनाथ आणि कुरुक्षेत्र ही प्रसिद्ध क्षेत्रे शक्तिपीठे म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रात मातापूरची (माहूर) रेणुका, तुळजापुरची भवानी, आंबेजोगाईची योगेश्वरी व कोल्हापूरची महालक्ष्मी (अर्धे पीठ) ही देवीची साडेतीन पीठे मानली जातात. माहूर (जि. नांदेड) येथे परशुरामाची माता रेणुका ही जगदंबेशी एकरूप मानली जाते. येथे मातृतीर्थ असून ज्यांना गुजरातेतील मातृगयेला जाणे जमत नाही ते येथे मातृश्राद्ध करतात. तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथील भवानी ही शिवाजी महाराजांची व रामदास स्वामींची कुलदेवता होय. आंबेजोगाई (जि. बीड) येथील योगेश्वरी ही अनेक घराण्यांची कुलदेवता आहे. [→ शक्तिपीठ].

देवीची इतर काही स्थाने : मदुरा हे दक्षिणेतील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. येथे मीनाक्षीचे भव्य मंदिर आहे. येथे शंकराने मीनाक्षीचे पाणिग्रहण केले होते. म्हैसूर येथील चामुंडादेवीचे म्हणजेच महिषासुरमर्दिनीचे मंदिर प्रसिद्ध आहे. गोव्यातील शांतादुर्गा आणि सौंदत्ती (धारवाड) येथील रेणुका म्हणजेच यल्लम्मा यांची क्षेत्रेही प्रसिद्ध आहेत.

गणपतिक्षेत्रे : भारतातील अनेक गणपतिक्षेत्रांपैकी बहुतेक ठिकाणी एखाद्या देवतेने अथवा भक्ताने गणेशाची आराधना केली अथवा गणेशाने एखाद्या असुराचा वध केला, अशा कथा सांगितल्या जातात. या क्षेत्रांपैकी महाराष्ट्रातील ⇨ अष्टविनायक पुढीलप्रमाणे आहेत : मोरगाव (जि. पुणे) येथील मोरेश्वर हे गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ आहे. पाली (जि. कुलाबा) येथील बल्लाळेश्वर, महड (जि. कुलाबा) येथील विनायक वा वरदविनायक, थेऊर (जि. पुणे) येथील चिंतामणी, लेण्याद्री (जि. पुणे) येथील गिरिजात्मक, ओझर (जि. पुणे) येथील विघ्नेश्वर, रांजणगाव (जि. पुणे) येथील श्रीगणपती व सिद्धटेक (जि. नगर) येथील सिद्धिविनायक हे अष्टविनायक प्रसिद्ध आहेत.

इतर काही गणपतिक्षेत्रे पुढील प्रमाणे : प्रयाग येथील ओंकार गणपती आणि काशी येथील ढुंढिराज वा धुंडीराज गणपती, कळंब (जि. यवतमाळ) येथील चिंतामणीक्षेत्र आणि अदोष येथील शमी विघ्नेश, नर्मदेच्या काठी पारिनेर हे मंगलमूर्ती क्षेत्र आणि गोदावरीच्या काठी गंगामसले (जि. परभणी) हे भालचंद्रगणेश क्षेत्र, गोदावरीच्या काठी राक्षसभुवन (जि. औरंगाबाद) येथील विज्ञानगणेश क्षेत्र, तेलंगणात विजयपूर येथील गणेश, वेरूळ येथील लक्षविनायक, पाचोऱ्याजवळील पद्मालय येथील सहस्रार्जुनाचा उपास्य गणेश, जालन्याजवळील नामलगाव येथील गणपती, राजूर (जि. औरंगाबाद) येथील गणपती, कावेरी तटावर कुंभकोणम् येथील श्वेत–विघ्नेश्वर तीर्थ, मुरुड (जि. कुलाबा) येथील गणेश, गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) हे मंगलमूर्तींचे महास्थान इ. गणपतीची क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. यांखेरीज टिटवाळा (जि. कुलाबा) आणि कर्नाटक राज्यात इडगुंजी, कुरूडमळे, शिर्शी व शिराळी या क्षेत्रांत महागणपतीची स्थाने आहेत.

वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे : पंढरपूर हे या संप्रदायाचे सर्वांत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र होय. भीमेच्या (चंद्रभागेच्या) तीरावरील या तीर्थाला दक्षिण काशी असे म्हणतात. विठोबाचे मंदिर हे येथील प्रमुख स्थान. त्याच्या मागे रखुमाईचे मंदिर आहे. ज्याच्यासाठी विठ्ठल येथे आला त्या पुंडलिकाचे मंदिर भीमेच्या पात्रात आहे. पंढरपुरात आल्यावर यात्रेकरू चंद्रभागेचे स्नान, क्षेत्रप्रदक्षिणा, विठ्ठलाचे दर्शन व हरिकीर्तन असा चार प्रकारचा यात्राविधी करतात. नेहमी जाणारे आणि केव्हातरी जाणारे असे यात्रेकरूंचे दोन विभाग आहेत. पहिल्या विभागात वारकरी येतात. वारकऱ्यांचेही दरमहा जाणारे व आषाढी–कार्तिकी एकादशीला जाणारे असे दोन प्रकार पडतात. तुलसीची माळ, एकादशीला उपवास, भगवी पताका, मांसाहार न करणे इ. नियम वारकरी पाळतात. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन प्रांतांतून दरवर्षी लाखो यात्रेकरू येथे येतात.

इंद्रायणी नदीच्या काठी आळंदी येथे ज्ञानेश्वरांची समाधी आहे. इंद्रायणीच्याच काठी देहू येथे तुकारामाच्या निर्याणदिनानिमित्त फाल्गुन वद्य द्वितीयेला मोठी यात्रा भरते. गोदावरीच्या काठी असलेल्या एकनाथांच्या पैठणला पूर्वी दक्षिण काशी म्हणत असत. दामाजीपंत, चोखामेळा, कान्होपात्रा, माध्व आचार्य जयतीर्थ इत्यादींच्या वास्तव्यामुळे मंगळवेढे (सोलापूर) प्रसिद्ध आहे. यांखेरीज निळोबांचे पिंपळनेर, निवृत्तिनाथांचे त्र्यंबकेश्वर, सोपानकाकांचे समाधिस्थान सासवड, मुक्ताबाईचे एदलाबाद, सावता माळ्याचे अरण, गोरा कुंभाराचे तेर, कूर्मदासाचे लऊळ, ज्ञानेश्वरी लिहिली गेली ते नेवासे इ. प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे असून तेथे यात्रा भरतात.


नाथ संप्रदायाची तीर्थक्षेत्रे :  नेपाळपासून रामेश्वरपर्यंत ⇨ नाथसंप्रदायाची अनेक पवित्र स्थाने व मठमंदिरे आहेत. गोरखपूर हे त्यांतील सर्वांत महत्त्वाचे स्थान होय. गोरखनाथाने ज्या ठिकाणी समाधीचा अभ्यास केला. त्या ठिकाणी गोरखनाथाचे मंदिर व मठ आहे. पाकिस्तानातील पूर्णनाथकूप (जि. सियालकोट) येथे गोरखनाथाने पूर्णनाथाला ज्ञान दिले होते. पंजाबमधील श्रीगोरखटिल्ला येथे भतृहरिनाथ आणि चौरंगीनाथ यांनी घोर तपश्चर्या केली होती. बलुचिस्तानातील देवी हिंगलाज हे महत्त्वाचे तीर्थ मानले जाते. श्री गोरख डिब्बी (जि. होशियारपूर) व कपुरथळा इ. स्थानेही पवित्र मानली जातात. नेपाळात काठमांडू येथे मत्स्येंद्रनाथाचे मंदिर आहे. गिरनार पर्वतावर गोरखनाथाने जेथे तप केले तेथे त्याची धुनी व पादुका आहेत. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकमठ असून कुंभमेळ्याच्या वेळी नाथ पंथाच्या बाराही शाखांचे जोगी येथे जमतात. महाराष्ट्रात पांडुधुनी (जि. मुंबई), पैठण, गंभीरमठ (जि. पुणे), बत्तीस शिराळे (जि. सांगली), वृद्धेश्वर (जि. नगर), आळंदीजवळ अडबंगनाथमंदिर व सासवडजवळ दिवेघाट इ. स्थानेही प्रसिद्ध आहेत. प्रयाग, अयोध्या, त्र्यंबकेश्वर, द्वारका, हरिद्वार, बद्रीनाथ इ. स्थानांची इतर हिंदूंप्रमाणेच नाथपंथी योगीही यात्रा करतात तसेच शिव, भैरव आणि शक्ती यांच्या मंदिरांतही ते दर्शनासाठी जातात.

दत्त संप्रदायाची तीर्थक्षेत्रे : दत्रात्रेय अथवा त्याचे अवतार मानले जाणारे भक्त यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली स्थाने ही या संप्रदायाची तीर्थे होत. पुराणांनी दत्ताचे शयनस्थान म्हणून वर्णिलेल्या माहूर गावी चांगदेव राऊळ यांना साक्षात्कार झाला होता असे म्हणतात. गिरनार पर्वताच्या (सौराष्ट्र) शिखरावर दत्तोपासनेचे एक प्राचीन केंद्र आहे. दत्ताचा अवतार म्हणून मानलेल्या नरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान कारंजे (जि. अकोला) येथे श्रीगुरूंच्या पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. कृष्णाकाठावरील औदुंबर (जि. सांगली) येथे एकदा नरसिंह सरस्वतींनी चातुर्मासात मुक्काम केल्यामुळे हे स्थान मान्यता पावले आहे. कृष्णा व पंचगंगा यांच्या संगमावर नरसोबाची वाडी (जि. कोल्हापूर) येथे नरसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले होते. येथे कृष्णेच्या घाटावर दत्ताच्या ‘मनोहर पादुकां’चे मंदिर आहे. भीमा व अमरजा यांच्या संगमावर गाणगापूर (जि. गुलबर्गा) येथे नरसिंह सरस्वती तेवीस वर्षे राहिले होते. येथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ म्हणतात. येथे दत्त जयंती व नरसिंह सरस्वतींची पुण्यतिथी हे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

याशिवाय नेपाळातील भटगाव, दक्षिणेतील बाबा बुढण, पांचाळेश्वर, प्रवराकाठचे जोर्वे, चित्रकूटाजवळील अनसूया पहाड व त्यावरील दत्त जन्मस्थान, ब्रह्मावर्त येथील ध्रुवस्थान, माणिकप्रभूंचे माणिकनगर, अक्कलकोटकर स्वामींचे अक्कलकोट, वासुदेवानंद सरस्वतींचे गरुडेश्वर तसेच हुमणाबाद व माणगाव (जि. रत्नागिरी) ही स्थानेही प्रसिद्ध आहेत [→ दत्त संप्रदाय].

सुभ्रमण्यक्षेत्रे : द. भारतात सुब्रह्मण्याची अनेक मंदिरे आहेत. त्यांपैकी तिरुप्परंकुन्रम् , तिरुचेंडूर, पळणी, अलगरमलई, स्वामिमलई आणि तिरुत्तणी ही सहा प्रमुख होत. पळणी हे देवस्थान अत्यंत जागृत मानले जाते. तेथील देव बालसुब्रह्मण्य या रूपात असून तो नवसाला पावतो अशी समजूत आहे.

महानुभावांची तीर्थक्षेत्रे : वस्तुतः पंथाचे संस्थापक चक्रधर यांनी क्षेत्र अथवा यात्रा यांना जाऊ नये, अशी आज्ञा दिली होती परंतु चक्रधरस्वामी यांनी ज्या देवालयांत, मठांत अथवा ओवरीत मुक्काम केला ती सर्व स्थाने सांप्रदायिकांनी पूज्य मानली. ही सर्व स्थाने ‘ओटे’ या स्वरूपात आहेत. महाराष्ट्रात असे अनेक ओटे आहेत. यांशिवाय चांगदेव राऊळांचे जन्मस्थान फलटण, त्यांचे वास्तव्यस्थान माहूर आणि गोविंदप्रभूंचे वास्तव्यस्थान ऋद्धिपुर ही स्थाने पवित्र मानली जातात. पैठण, वेरूळ, गोदावरी तीरावर डोंबेगाव आणि बेलापूर ही स्थाने चक्रधरस्वामींच्या सहवासामुळे पवित्र मानली जातात. आपेगाव, बीड, त्र्यंबक, जोगेश्वरी, मढ, पिंपरी, अरणगाव, भिंगार, रामदास इ. ठिकाणी ओटे आहेत.

चैतन्य संप्रदायाची तीर्थक्षेत्रे : नवद्वीप (जि. नडिया) येथे चैतन्य महाप्रभूंच्या जीवनातील अनेक घटना घडल्या म्हणून चैतन्यसंप्रदायी लोकांना हे स्थान पवित्र वाटते. त्यांच्या स्मृतीशी निगडित अशी धामेश्वर, सोनार गौरांग, शचीमाता–विष्णुप्रिया मंदिर इ. स्थाने येथे आहेत. वृंदावन हेही संप्रदायाचे एक मुख्य केंद्र होते. जगन्नाथपुरी येथे संप्रदायाचे अनेक मठ असून तेथे चैतन्य प्रभूंची पूजा होते.

समर्थ संप्रदायाची स्थाने : समर्थ रामदासांनी भारतात अनेक मठ स्थापन केले. सर्वांत मुख्य मठ चाफळचा मानला जातो. समर्थांची जन्मभूमी जांब, कर्मभूमी चाफळ व समाधिभूमि सज्जनगड ही स्थाने पवित्र मानली जातात. याशिवाय त्यांनी सातारा–सांगली जिल्ह्यात चाफळ वगैरे ज्या अकरा स्थानी मारुतींची स्थापना केली, ती स्थानेही महत्त्वाची मानली जातात.

भिन्न भिन्न आचार्यांचे मठ : आद्य शंकराचार्यांनी चार दिशांना स्थापिलेली चार पीठे वा मठ प्रसिद्ध आहेत. बद्रीनाथाजवळ ज्योतिर्मठ, जगन्नाथपुरीला गोवर्धनमठ, द्वारकेला शारदामठ आणि शृंगेरी येथे शृंगेरीमठ हे ते मठ होत. पूर्वी कांची येथे असलेले आणि नंतर कुंभकोणम् येथे नेलेले कामकोटिपीठ हेही त्यांनीच स्थापन केले, असे म्हणतात. यांखेरीज त्यांनी स्थापन केलेली अनेक उपपीठे आहेत.


रामानुजाचार्यांनी एकूण ७४ पीठांची स्थापना केली. अहोबिल क्षेत्रातील अहोबिलमठ, म्हैसूर येथील परकालमठ, तोताद्री येथील तोताद्रिमठ व गोवर्धन येथील गोवर्धनपीठ ही त्यांपैकी काही होत. भूतपुरी ही त्यांची जन्मभूमी असून तेथे त्यांचे विशाल मंदिर आहे.

वैष्णवांना अत्यंत पवित्र असलेले नाथद्वारा (जि. उदयपूर) हे वल्लभ संप्रदायाचे मुख्य केंद्र आहे. वल्लभाचार्यांची इतर सात उपपीठेही होती. यांशिवाय त्यांनी जेथे जेथेभागवताची पारायणे केली, तेथे तेथे त्यांची ‘बैठक’ स्थापन झाली. भारतात अशा ८४ बैठका असून त्यांची संख्या वज्रमंडलात सर्वांत अधिक आहे.

मध्वाचार्यांनी आपले जन्मस्थान उडुपी (उडिपी) या नगराच्या आसपास फलिमारूपीठ, अदमारू, श्रीकृष्णपूर, श्रीपुत्रिका, शीरूर, सोदे, काणियूर आणि पेजावर ही आठ पीठे स्थापन केली. यांखेरीज त्यांनी अनेक उपमठ स्थापन केले.

निंबार्काचार्य आणि त्यांचे शिष्य यांच्या चरित्रांशी संबंधित असलेली अनेक पवित्र स्थाने वृंदावनात आहेत. त्यांचे परशुरामपुरी हे सरस्वतीच्या काठावर असलेले एक विख्यात पीठ आहे. याखेरीज राजस्थानात आणि कुरुक्षेत्राजवळ संप्रदायाची तीर्थे आहेत.

विष्णुस्वामी संप्रदायाची तीर्थे व्रजमंडलात आहेत. स्वामिनारायण संप्रदायाची अहमदाबाद वगैरे तीर्थे गुजरातमध्ये आहेत. दादू संप्रदायाचे संस्थापक दादू यांनी ज्या पहाडावर तप केले तो कल्याणपुरगिरी (पर्वतसर), जेथे मतप्रचारास प्रारंभ केला ते सांभर, जेथे दीर्घकाळ वास्तव्य केले ते आमेर, त्यांचे निर्वाणस्थान नरेना आणि समाधिस्थान भैराणा ही या संप्रदायाची तीर्थे बनली.

वीरशैवांची क्षेत्रे : बसवेश्वरांनी आपल्या धर्मोपदेशात तीर्थयात्रेला फारसे स्थान दिले नव्हते परंतु त्यांनी जेथे लोकांना उपदेश करण्यास सुरुवात केली त्या बसवकल्याण गावात त्यांचे एक मंदिर बांधले गेले. तेथे दरवर्षी बसवजयंतीपासून पुढे चार दिवस मोठी यात्रा भरते. तेथे आणखी एक मंदिर असून त्यात अल्लमप्रभूची बैठक आहे. उळवी (जि. कारवार) येथे चेन्नबसवांची समाधी आहे.

कबीर पंथी क्षेत्रे : मगहर (जि. गोरखपूर) येथे कबीराने देह ठेवला. कबीरपुत्र कमालचीही येथे समाधी आहे. त्यामुळे हे तीर्थक्षेत्र बनले. गुजरातेत भडोच शहरापासून जवळच एक पुरातन वटवृक्ष आहे. त्याचा संबंध कबीराशी जोडला जातो. मार्गशीर्षात येथे यात्रा भरते.

हिंदूंची विदेशातील तीर्थे : भारत हीच हिंदूंची तीर्थभूमी आहे. सध्याचे पाकिस्तान, बांगला देश, नेपाळ आणि तिबेट येथील तीर्थे ही भारताबाहेरची मानली जात नव्हती. त्यामुळे भारताबाहेर हिंदूंचे अतिप्राचीन व प्रसिद्ध असे तीर्थ नाही म्हटले तरी चालेल. तरीही काही स्थानांचा निर्देश करता येणे शक्य आहे. मॉरेशियसमध्ये ‘परी–तलाव’ नावाचे तीर्थ असून त्याच्या काठावर शंकराचे मंदिर आहे. येथे शिवरात्रीला ४०–५० हजार यात्रेकरू जमतात. मकरसंक्रांतीलाही येथे यात्रा भरते. इराणमध्ये अनेक मंदिरे व शिखांचे गुरुद्वारा आहेत. जावा, कंबोडिया व बालीमध्ये अनेक शिवमंदिरे आहेत. जावामध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या मूर्ती आढळतात. अनाममधील ‘भी–सोन’ चे भद्रेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.

बौद्धांची तीर्थक्षेत्रे : बौद्धांच्या मठातील जीवनपद्धतीत प्रारंभी तीर्थयात्रा विहित मानली जात नव्हती. स्वतः गौतम बुद्धाने तीर्थयात्रेला बंदीही घातली नव्हती अथवा यात्रा करण्याची आज्ञाही दिली नव्हती. परंतु त्याच्या परिनिर्वाणानंतर त्याच्या शरीराच्या अवशेषांवर स्तूप बांधले गेले आणि त्याचे अनुयायी व मित्र तेथे भेटी देऊ लागले. शिवाय बौद्ध भिक्षूंनी एका ठिकाणी राहू नये असा त्यांना आदेश होता. त्यामुळे त्यांनी पवित्र बौद्ध स्थानांना भेटी देण्यास सुरुवात केली असावी. पवित्र स्थानांना भेटी देण्याच्या हिंदू प्रथेचे हे अनुकरण असावे. गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंधित अशा स्थानांना आधी मान्यता मिळाली असावी. अशी स्थाने चार असून ती पुढीलप्रमाणे : कपिलवस्तू–कपिलवस्तूमधील लुंबिनी हे बुद्धाचे जन्मस्थान. कुशिनगर–कपिलवस्तूच्या पूर्वेला कुशिनगर येथे बुद्धाचे परिनिर्वाण झाले. बुद्धगया–गयेच्या दक्षिणेला नऊ-दहा किमी. वर असलेल्या या स्थानी एका पिंपळवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धाला बोधी प्राप्त झाला. म्हणूनच त्या वृक्षाला बोधिवृक्ष म्हटले जाते. सध्या त्याच वृक्षापासून परंपरेने बनलेले अनेक वृक्ष येथे आहेत. येथे अशोकाने एक विशाल बुद्धमंदिर आणि अनेक स्तूप बांधले. सारनाथ–बुद्धाने प्रथम बनारसच्या उत्तरेला पाच–सहा किमी. वर सारनाथ येथे धर्माचा उपदेश करून धर्मचक्र प्रवर्तित केले. येथे अनेक स्तूप, मंदिरे, शिल्पबद्ध शिला, अशोकस्तंभ आणि बुद्धमूर्ती आहेत.


बुद्धाच्या निर्वाणानंतर त्याच्या शरीराचे अवशेष आठ ठिकाणी विभागले गेले आणि त्यांच्यावर आठ ठिकाणी स्तूप उभारण्यात आले. याखेरीज ज्या घटात अस्थी ठेवलेल्या होत्या त्या घटावर एक आणि बुद्धाच्या चितेतील अंगारांवर एक असे एकूण दहा स्तूप उभारले गेले, कुशिनगर, पावागड, वैशाली, कपिलवस्तू, रामग्राम, अल्लकल्प, राजगृह आणि बेटद्वीप यांठिकाणी आठ स्तूप उभारले गेले. पिप्पलीयवनात अंगारस्तूप व बहुधा कुशिनगरच्या जवळच घटस्तूप उभारला. याशिवाय कौशांबी येथील स्तूपात बुद्धाचे केस व नखे आहेत असे मानले जाते. सांची येथेही एक स्तूप आहे. पेशावर येथे सम्राट कनिष्काने उभारलेला एक स्तूप सापडला असून त्यात बुद्धाच्या अस्थी सापडल्या असे म्हणतात. श्रावस्ती येथे बुद्धाच्या पहिल्या चंदनमूर्तीची स्थापना केली होती. अयोध्येत बुद्धाने अनेक वर्षे उपदेश केला होता. नालंदा हे बौद्ध विद्यापीठाचे स्थान म्हणून विख्यात होते.

इ. स. पू. तिसऱ्या शतकात अशोकाने बौद्धांच्या अनेक तीर्थांची यात्रा केली, इ.स. पाचव्या शतकात फाहियान या चिनी यात्रेकरूने भारत व श्रीलंका येथील अनेक बौद्ध तीर्थांची यात्रा केली. ६२९–६४५ या काळात ह्युएनत्संग या चिनी यात्रेकरूने भारतातील बौद्ध तीर्थांची केलेली यात्रा इतिहासप्रसिद्ध आहे.

इतर देशांतील बौद्ध तीर्थक्षेत्रे : श्रीलंकेतील कँडी येथे असलेल्या बुद्धाच्या दाताचे मंदिर प्रसिद्ध आहे. ॲडॅम्सचे शिखर येथील खडकावर असलेला पावलाचा ठसा म्हणजे आपापल्या देवतांच्या पादुका आहेत असे हिंदू, मुसलमान, जैन आणि ख्रिश्चनही म्हणतात परंतु येथे बौद्ध यात्रेकरूंची संख्या जास्त असते. अनुराधपुर येथे सु. २,२०० वर्षांइतका जुना बोधिवृक्ष असून अशोकाने पाठवलेल्या मूळ बोधिवृक्षाच्या फांदीपासून तो बनला आहे असे मानतात. ब्रह्मदेशात रंगून येथे असलेला श्वे देगान हा पॅगोडा सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. येथे बुद्धाच्या अनेक प्रतिमा असून या पॅगोडात गौतमाचे आठ केस जपून ठेवले आहेत, अशी श्रद्धा आहे. ब्रह्मदेशात अनेक ठिकाणी पॅगोडा असले तरी पेगू व प्रोम येथील पॅगोडा अत्यंत प्रसिद्ध आहेत. मंडाले येथेही अनेक पॅगोडा आहेत. चीनमधील बौद्ध धर्मावर व यात्राविधीवरही ताओ मताचा खूप प्रभाव पडलेला आहे. येथील चार पर्वतांवरील मंदिरे ही प्रसिद्ध तीर्थे होती. त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पश्चिमेला ‘माउंट ओमी’ वर असलेले बोधिसत्त्व समंतभद्राचे मंदिर. येथील मंदिरात बोधिसत्त्व मंजुश्रीची पूजा केली जाते. पुतोशन येथे हजारो यात्रेकरू येत असत. यांगत्सी हे चौथे स्थान मात्र बरेचसे दुर्लक्षित होते. मंगोल सीमेवर असल्यामुळे चिनी यात्रेकरूंप्रमाणे मंगोल यात्रेकरूही या स्थानांना भेटी देतात. चीनमध्ये इतर अनेक तीर्थक्षेत्रे होती आणि भिक्षू वैयक्तिक अथवा संघिक रीत्या त्यांची यात्रा करीत असत. सिक्यांग प्रांतातील मठ अत्यंत प्रसिद्ध होते. आता तीर्थयात्रांचे महत्त्व बरेचसे कमी झाले आहे. तिबेटची राजधानी ल्हासा हे अत्यंत महत्त्वाचे स्थान असून असंख्य यात्रेकरू येथे जमत. हे दलाई लामाचे स्थान. पंचेन लाभाचे स्थान असलेले ताशी लुंपो हेही अत्यंत महत्त्वाचे यात्राकेंद्र मानले जाते. कारण ताशी किंवा पंचेन लामा हा बोधिसत्त्व अमिताभ याचा अवतार मानला जातो. तिबेटात बौद्धांचे तीन हजारांहून अधिक मठ होते व त्यांच्या महत्त्वानुसार कमी–अधिक प्रमाणात त्यांची यात्रा केली जात असे. लामाचे वास्तव्य असलेले उर्ग हे उत्तर मंगोलियातील स्थान मंगोल लोकांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आहे. मंगोलियात इतरही अनेक स्थाने आहेत. सयाममध्ये उत्सवप्रसंगी अनेक लोक मठामंदिरांतून जमत असत.

जपानमधील तीर्थयात्रा इ.स. सु. आठव्या शतकात सुरू झाल्या. या काळात बौद्ध धर्मप्रचारकांनी काही पर्वतशिखरे पूजास्थाने म्हणून पवित्र ठरविली. दहाव्या शतकातील एका सम्राटाने पत्नीच्या मृत्यूनंतर भिक्षूचा वेष धारण करून मध्य प्रांतातील क्कॅनॉन (अवलोकितेश्वर) या देवतेच्या ३३ मंदिरांना भेट दिल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. दहाव्या व अकराव्या शतकांत जपानी सरदारांनी बौद्ध आणि शिंतो मंदिरांची अनेकदा यात्रा केली होती. पंधराव्या शतकापासून क्कॅनॉनच्या ३३ मंदिरांची तीर्थयात्रा अत्यंत लोकप्रिय झाली. पंधराव्या व सोळाव्या शतकांत युद्धे चालू असतानाही तीर्थयात्रा मोठ्या प्रमाणात चालू होत्या. या काळात व नंतर शांतता नांदू लागल्यावर तीर्थयात्रांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. बहुतेक तीर्थक्षेत्रे ही बौद्ध मंदिरे होती आणि ती विशिष्ट देवतांशी अथवा बौद्ध भिक्षूंच्या जीवनातील घटनांशी निगडित होती. यांपैकी काही तीर्थयात्रांचे स्वरूप दीक्षा देण्याचे असे. यावेळी तरुणांना धर्मविषयक रहस्ये शिकवली जात. या प्रकारच्या बहुतेक यात्रा म्हणजे गिर्यारोहणयात्राच असत. ज्या पर्वतांना भेटी दिल्या जात त्यांपैकी प्रसिद्ध म्हणजे यामातोमधील किम्पु–सेन, शिनानोमधील ओंटाके, फूजी इ. होत. सूर्यदेवतेच्या मंदिरालाही प्रत्येक वसंत ऋतूत तरुण–तरुणींचे समूह भेटी देत.

या धार्मिक तीर्थयात्रांखेरीज अभिजात काव्यात वर्णिलेल्या निसर्गस्थानांना आणि अद्‌भूतकथांतून वर्णिलेल्या स्थानांच्याही यात्रा केल्या जात. शत्रूचा सूड घेण्यासाठी यात्रेकरूचा वेष धारण करून तीर्थयात्रा करणे हा प्रकारही होता. याखेरीज राजकीय अथवा सैनिकी हेरही यात्रेकरूंचा वेष धारण करून तीर्थयात्रा करीत.

जैनांची तीर्थक्षेत्रे : जैन धर्मात तीर्थंकरांचे मोठे माहात्म्य आहे. ते तीर्थांची स्थापना करतात म्हणूनच त्यांना तीर्थंकर म्हटले जाते. स्वतः तीर्थांचे प्रवर्तक असूनही ते तीर्थाला नमस्कार असो असे म्हणून आपल्या प्रवचनाच्या आरंभी तीर्थांविषयी आदरभाव व्यक्त करतात. ज्या ज्या ठिकाणी तीर्थंकरांचा जन्म झाला, त्यांनी दीक्षा घेतली, तपश्चर्या केली, पूर्ण ज्ञान प्राप्त केले किंवा मोक्ष प्राप्त केला, ती स्थाने जैनांनी तीर्थक्षेत्रे म्हणून पूज्य मानली आहेत. त्याचप्रमाणे तीर्थंकरांखेरीज इतर ऋषि–महर्षींनी जेथे तपश्चर्या केली असेल ती स्थानेही तीर्थे मानली आहेत. जैनांच्या तीर्थांची संख्या मोठी असून ती सर्व भारतात पसरलेली आहेत. दिगंबर व श्वेतांबर या दोघांनाही २४ तीर्थंकर पूज्य असल्यामुळे त्यांच्याशी संबंधित तीर्थे दोघांनाही पूज्य वाटतात. इतर काही स्थाने दोघांनाही मान्य आहेत. काही स्थाने मात्र फक्त दिगंबरांना वा श्वेतांबरांनाच मान्य आहेत, काही तीर्थांच्या बाबतीत दोघांमध्ये विवादही झालेले आहेत.


हिंदूंप्रमाणेच जैनही जंगम आणि स्थावर असे तीर्थांचे दोन प्रकार मानतात परंतु त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकार म्हणजे सिद्ध क्षेत्र व अतिशय क्षेत्र. जेथे तीर्थंकरांना अथवा इतर महात्म्यांना निर्वाण वा सिद्धपद प्राप्त झाले ते सिद्धक्षेत्र. मूर्ती किंवा देवता यांच्या अतिशयामुळे जे बनले आहे किंवा अनेक मंदिरे असल्यामुळे जेथे असंख्य यात्रेकरू जाऊ लागले ते अतिशय क्षेत्र.

जैनांची काही प्रमुख तीर्थे : सम्मेद (त) शिखर किंवा पार्श्वनाथ पर्वत हे बिहारमधील अत्यंत प्रसिद्ध असे जैनतीर्थ आहे. येथे वीस तीर्थंकरांना व इतर अनेक साधूंना मोक्ष प्राप्त झाला. येथील वेगवेगळ्या शिखरांवर मोक्षास गेलेल्या तीर्थंकरांच्या पावलांचे ठसे असून हजारो यात्रेकरू त्यांच्या दर्शनासाठी येतात. बिहारमध्ये नालंदाजवळ असलेल्या पावापूर या गावात भगवान महावीरांचे निर्वाण झाले होते. बिहारमधील राजगृह येथे एका पर्वतशिखरावर महावीराने प्रथम धर्मोपदेशास प्रारंभ केला. सौराष्ट्रात जुनागढजवळील गिरनार पर्वतावर बावीसावे तीर्थंकर नेमिनाथ यांनी तपश्चर्या करून निर्वाणाची प्राप्ती करून घेतली होती. राजस्थानातील अबू या ठिकाणी विमलशाह आणि वस्तुपाल तेजपाल यांनी बांधलेली ऋषभदेव आणि नेमिनाथ यांची मंदिरे विश्वविख्यात आहेत. काठेवाडात पालिताणापासून जवळच असलेल्या सिद्धाचल पर्वतावर शत्रुंजय हे सिद्धक्षेत्र आहे. येथून १५ कोटी मुनी मोक्षाला गेले असे मानले जाते. ऋषभदेवाने येथे तप केले होते. श्वेतांबरांचे हे सर्वांत महत्त्वाचे तीर्थ होय. श्रवणबेळगोळ येथील विंध्यगिरीवर गोमटेश्वर बाहुबलीची सु. १८ मी. उंचीची विशालकाय मूर्ती आहे. कैलासावरून ऋषभदेवांचे निर्वाण झाले. मेहसाणाजवळील तारंगाजी या ठिकाणी अनेक जैनमंदिरे आहेत. हे एक सिद्ध क्षेत्रही आहे.

याखेरीज भारतात जैनांची शेकडो लहानमोठी पवित्र तीर्थे आहेत. भुवनेश्वरापासून जवळच खंडगिरी–उदयगिरी हे एक प्रसिद्ध क्षेत्र आहे. चंपापूर (जि. भागलपूर) येथे वासुपूज्य स्वामींचा जन्म आणि निर्वाण झाले होते. अयोध्येत पाच तीर्थंकरांचा, श्रावस्ती म्हणजे हल्लीचे उत्तर प्रदेशातील सहेत–महेत येथे संभवनाथांचा, कौशांबी (अलाहाबाद) येथे पद्मप्रभाचा, वाराणसी येथे पार्श्वनाथ आणि सुपार्श्वनाथ यांचा, सारनाथ येथे श्रेयांसनाथांचा आणि हस्तिनापूर येथे अन्य तीन तीर्थंकरांचा जन्म झाला होता. मथुरा हे देखील जैनांचे एक महत्त्वाचे तीर्थ होय. माँगी–तुंगी (जि. नाशिक), गजपंथा (जि. नासिक), कुंथलगिरी (बार्शी), मूदबिद्री (द. कॅनरा), महावीरजी (जयपूर), खजुराहो (बुंदेलखंड) इ. क्षेत्रेही प्रसिद्ध आहेत.

शिखांची तीर्थक्षेत्रे : शीखगुरूंच्या चरित्राशी संबंधित असलेली स्थाने शिखांनी पवित्र मानली आहेत. भारतात आणि पाकिस्तानातही त्यांची तीर्थक्षेत्रे आहेत. अमृतसर, आनंदपूर, पाटणा आणि नांदेड येथील चार तख्ते (सिंहासने) ही अत्यंत पवित्र मानली जातात. शिखांच्या पवित्र क्षेत्रांत जे उपासनामंदिर असते त्याला ⇨ गुरुद्वारा असे म्हणतात.

अमृतसर (अकाल तख्त)–शीख धर्माचे माहेरघर म्हटले जाणारे हे शहर म्हणजे शिखांची धार्मिक राजधानी होय. येथील ⇨ सुवर्णमंदिर व तलाव यांच्या वर्तुळात शीख धर्म केंद्रीभूत झाला आहे. तलावाचे नाव ‘अमृतसर’ असून ते तिसरे गुरू अमरदासजी यांच्या नावावरून मिळाले असावे असे मानले जाते. सुवर्णमंदिराला ‘दरबारसाहेब’ असेही म्हणतात. मंदिरात शीख धर्मग्रंथग्रंथसाहिब याची स्थापना केलेली आहे. सहावे गुरू हरगोविंदजी यांच्या मुलाच्या स्मरणार्थ बांधलेला बाबा अटल नावाचा मनोरा येथे आहे. सुवर्णमंदिराच्या समोर शीख धर्माच्या सत्तेचे निदर्शक स्थान अकाल तख्त हे आहे. अमृतसरला यात्रेसाठी निघालेल्या परंतु शत्रूंनी पकडलेल्या शिखांपैकी एकानेही प्राणरक्षणार्थ धर्मश्रद्धा सोडून दिली नाही, असे इतिहास सांगतो.

आनंदपूर (श्रीकेशगढसाहेब तख्त)–हिमालयाच्या तळवटीतील हे धर्मस्थान अमृतसरच्या खालोखाल महत्त्वाचे मानले जाते. नववे गुरू तेगबहादुर यांनी हे नगर वसवले. औरंगजेबाने जेव्हा त्यांचा शिरच्छेद केला तेव्हा एका अस्पृश्य जातीच्या शिखाने त्यांचे पूज्य मस्तक येथे आणले. पंचप्याऱ्यांचा नाट्यपूर्ण प्रसंगही येथेच घडला. गुरू गोविंदसिंगांनी आयुष्याची पंचवीस वर्षे येथे व्यतीत केली. या सर्व घटनांमुळे शिखांना हे स्थान पवित्र वाटते.

पाटणा (पटणासाहेब तख्त)–पाटणा शहरात १६६६ साली गुरू गोविंदसिंग यांचा जन्म झाला. या ठिकाणी पटणा तख्त हरिमंदिर बांधलेले आहे. सद्‌गुरू नानकदेव आणि नववे गुरू तेगबहादुर यांचे येथे काही काळ वास्तव्य होते. त्यांच्या स्मृतीशी निगडित ‘गुरूका बाग’ म्हणून एक बाग अजूनही तेथे आहे. गुरू गोविंदसिंगांनी जेथे पंडित शिवदत्तांचे शंकासमाधान केले तो ‘गोविंद घाट गुरूद्वारा’ अजून अस्तित्वात आहे. पाटणाच्या राजवाड्यात जेथे बालगुरू आपल्या सवंगड्यांसह खेळत, त्या जागी ‘गुरूद्वारा मैनीसंगत’ उभारलेला आहे. येथील हरिमंदिरात ग्रंथसाहिबाची जी प्रत आहे तिला बडेसाहिब म्हणतात व तिच्यावर गुरू गोविंदसिंग यांची सही आहे. हरिमंदिरात गुरू तेगबहादुर आणि गुरू गोविंदसिंग यांच्या अनेक वस्तूही ठेवण्यात आल्या आहेत.

नांदेड (हुजूरसाहेब तख्त)–दहावे गुरू गोविंदसिंग येथे परमज्योतीत विलीन झाले. या ठिकाणी आता गुरुद्वारा संगतसाहेब, गुरुद्वारा मालटेकडी, गुरुद्वारा नगीनाघाट, बंदाघाट, लंगरसाहेब, मातासाहेब कौर, शिकारघाट, हीराघाट, इ. स्थाने महत्त्वाची आहेत.


इतर पवित्र स्थाने : अमृतसरपासून जवळच तरण–तारण हे एक पवित्र क्षेत्र आहे. पाचवे गुरू अजुर्नदेव यांनी हे वसवलेले आहे. येथील तलावाच्या पाण्यात कुष्ठरोगनाशक गुण असल्याच्या समजुतीमुळे पंजाबच्या बाहेरूनही रोगी येथे स्नानासाठी येतात. नानकानासाहेब (लाहोर) या गावी गुरू नानकांचा जन्म झाला होता. येथे अनेक पवित्र मंदिरे आहेत. कर्तारपूर येथे गुरू नानकांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ रावी नदीच्या काठी मंदिर बांधलेले आहे. डेराबाबानानक शहरी दरबार साहेब नामक सुंदर मंदिर असून सर्व भारतातून शीख तेथे यात्रेसाठी येतात. हरिगोविंदपूरची (जि. गुरदासपूर) पायाभरणी सहावे गुरू हरगोविंदजी यांनी केली असल्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. पाकिस्तानात एमिनाबाद (जि. गुजराणवाला) आणि बाबेदी बेर (सियालकोट) या शहरी गुरू नानकांची स्मारके आहेत. बाबेदी बेर येथे त्यांच्या एका रजपूत शिष्याने बांधलेली दरबार बावलीसाहेब नावाची विहीर आहे. पाकिस्तानातच पंजासाहेब हे एक पवित्र स्थान आहे. तेथील एका दगडावर गुरू नानकांच्या हाताच्या पंजाची निशाणी उमटलेली आहे. लाहोरमध्ये अनेक शीख धर्मस्थाने असून त्यांपैकी शहीदगंज हे एक महत्त्वाचे आहे.

इस्लामी तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा : हाजयात्रा–मुस्लिमांची सर्वांत महत्त्वाची तीर्थयात्रा म्हणजे हज वा हाजयात्रा होय. ती इस्लामच्या पाच आधारस्तंभांपैकी एक असल्यामुळे आयुष्यात एकदा तरी हाजयात्रा करणे हे प्रत्येक मुस्लिम स्त्री–पुरुषाचे धार्मिक कर्तव्य मानले जाते. मुसलमानांचे सर्वांत पवित्र स्थान असलेल्या मक्केची यात्रा म्हणजेच हाजयात्रा होय. ही जिल्हेज महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात असते. मक्का ही अरबस्तानची राजधानी आहे. मुहंमद पैगंबराचे जन्मस्थान व काबा ही वास्तू यांमुळे मक्केला माहात्म्य प्राप्त झाले. मक्केइतके स्वर्गाला जवळ असलेले दुसरे स्थान नाही, असे मानले जाते.

मक्केतील पवित्र स्थाने : मशीद–मुस्लिम जगातील तीन पवित्र मशिदींपैकी सर्वांत जुनी व सर्वांत अधिक पवित्र मशीद ‘अल्–मस्जिद अल्–हराम’ ही मक्केत आहे. येथील प्रार्थना विशेष पुण्यकारक मानली जाते. काबा–हे मुसलमानांचे प्रमुख धार्मिक आकर्षण आहे. ⇨ काबा हे पृथ्वीवरचे पहिले पवित्र स्थान आहे, केवळ पृथ्वीचाच नव्हे तर समग्र विश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे काबा मानले जाते. इस्लामपूर्व काळापासून काबा पवित्र मानला जात होता. जवळच वाळवंटात असलेल्या झमझम या विहिरीमुळे कदाचित काबाला पावित्र्य प्राप्त झाले असावे. झमझम–या विहिरीला इस्माईलची विहीर असेही म्हणतात. ती देवदूताने तयार केली अशी समजूत आहे. यात्रेकरू हिचे पाणी आरोग्यदायक म्हणून पितात आणि आजाऱ्यांसाठी घरी नेतात. मृत्यूनंतर आपल्याला ज्या कपड्यात पुरावे अशी यात्रेकरूंची इच्छा असते ते कपडे यात्रेकरू मक्का सोडण्यापूर्वी झमझमच्या पाण्यात बुडवून घेतात. प्रत्येकाने हाजयात्रा करणे आवश्यक असले, तरी खर्च करण्याची ऐपत नसेल, परत येईपर्यंत घरातील व्यक्तींच्या उपजीविकेची सोय करता येत नसेल आणि युद्ध किंवा साथींचे रोग यांमुळे मक्केला जाणे धोक्याचे असेल, तर याबाबतीत सवलत दिली जाते. स्त्रियांनी पती अथवा कुणीतरी नातेवाईक बरोबर असल्याशिवाय हाजला जाऊ नये, असे सांगितलेले आहे.

हल्ली निरनिराळ्या देशांतून जहाजे जेद्दा बंदरात येतात आणि तेथून यात्रेकरू मक्केस जातात. जमिनीवरून येणारे यात्रेकरू एखाद्या काफिल्याबरोबर येतात. आधुनिक काळातील दोन प्रसिद्ध काफिले म्हणजे दमास्कसहून येणारा सिरियाचा काफिला आणि कैरोहून येणारा ईजिप्तचा काफिला. प्रत्येक काफिल्यात एक उंट असतो त्याला ‘महमल’ म्हणतात. हाजच्या आधी काही काळ बहुतेक यात्रेकरू मक्केत येतात. काहीजण तर रमजानचा महिनाही येथेच व्यतीत करतात. अनेकजण मक्केतच मृत्यू यावा म्हणून यात्रेनंतर तेथेच कायमचे वास्तव्य करतात. यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे नववा दिवस शुक्रवारी येत असेल, तर विशेष गर्दी होते. दुसऱ्या महायुद्धापूर्वी येथे सरासरी सत्तर हजार यात्रेकरू येत असत.

बहुतेक यात्रेकरू पवित्र मक्केत उम्रहचे विधी करून हाजयात्रेला प्रारंभ करतात. उम्रह म्हणजे मक्केतील पवित्र स्थानांची छोटी यात्रा. हाजयात्रेच्या वेळी ‘इहराम’ची पवित्र स्थिती धारण करणे, काबाभोवती ‘तवाफ’ म्हणजे प्रदक्षिणा घालणे, ‘सफा’ आणि ‘मर्वा’ या पवित्र स्थानांमध्ये पळत जाणे, आरफातच्या मैदानात ‘वकूब’ करणे म्हणजे नुसते थांबणे, ‘इफाध’ म्हणजे अरफातपासून मुझ्दलिफ या स्थानापर्यंत पळत जाणे, मुन्ना येथे दिमारावर खडे फेकणे, मुन्ना येथेच प्राण्यांची हत्या करणे इ. धार्मिक विधी करावयाचे असतात. [→ हाजची यात्रा].

इतर यात्रा : वेगवेगळ्या देशांतून साधूंच्या ज्या कबरी आहेत त्यांच्या यात्रा करण्याविषयी धर्मग्रंथांनी स्पष्टपणे आज्ञा दिलेली नाही. अशा यात्रांना मुस्लीम ‘झियार’ असे म्हणतात. अशी काही स्थाने पुढीलप्रमाणे :

मदीना–मक्केहून पळून गेल्यानंतर मुहंमद अरबस्तानातील या शहरात राहिले होते. मृत्यूच्या वेळी ते येथेच होते. त्यांची कबर आणि ‘प्रेषिताची मशीद’ ही दोन स्थाने पवित्र मानली जातात. असंख्य यात्रेकरू या स्थानांना भेट देतात. हाजपूर्वी वा हाजनंतर मदीनेची यात्रा केली जाते. मक्केप्रमाणे मदीनेची यात्रा अनिवार्य नाही. मुहंमदांच्या चरित्राशी निगडित असलेली अनेक स्थाने येथे आहेत. शिवाय अलीचे मुलगे हसन आणि हुसेन, हुसेनची बायकामुले इ. व्यक्तींचे वास्तव्य येथे होते. प्रेषिताचा धाकटा मुलगा इब्राहीम, प्रेषिताच्या स्त्रिया, त्याचे अनेक साथीदार, अबू बकर व उमर हे खलीफा इत्यादींचे दफन मदीनेतच झाले.


जेरूसलेम–मुस्लिमांच्या पवित्र मशिदींपैकी तिसरी मशीद ‘अल्-मस्जिद अल्-अक्सा’ ही जेरूसलेममध्ये आहे. त्याखेरीज डोम ऑफ द रॉक, हॅरम ऑफ हीब्रन येथील अब्राहम, इसाक आणि जेकब यांच्या कबरी ही स्थाने महत्त्वाची आहेत. हैफा येथील एलिजाची गुहा हे स्थानही प्रसिद्ध आहे.

करबला–इराकमध्ये बगदादपासून नव्वद किमी. वर असलेले मुसलमानांचे हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. येथे प्रेषिताचा नातू इमाम हुसेन याची हत्या करण्यात आली होती. त्याची कबर हे शिया पंथी मुसलमानांचे पवित्र स्थान बनले. येथे ज्यांचे दफन होते त्यांना स्वर्गात प्रवेश मिळतो, या समजुतीमुळे अनेक वृद्ध व आजारी मुसलमान या पवित्र स्थानी मृत्यूच्या अपेक्षेने येतात. अल्–नजफ किंवा मशद अली हे इराकमधील आणखी एक तीर्थक्षेत्र. येथे इमाम अलीचे दफन केले अशी परंपरा आहे. मशाड–हे पर्शियामधील शियांचे सर्वांत पवित्र तीर्थस्थान. येथे आठवा इमाम अली अल्–रिजा बिन मूसा याची कबर आहे. येथे दफन व्हावे अशी अनेक मुसलमानांची इच्छा असते. म्हणून पर्शिया, भारत, अफगाणिस्तान, तुर्कस्तान इ. देशांतून दफन करण्यासाठी दरवर्षी हजारो प्रेते येथे आणली जातात.

अल्–कूफा येथील मशीद चार पवित्रतम मशिदींपैकी एक असल्याचे अलीने म्हटले होते. कुबा येथील मशीदही महत्त्वाची मानली जाते. सामारा येथील अल्–मुतवक्किल याने आपल्या देशात एक काबा, मुन्ना व अरफा निर्माण करून आपल्या अमीरांना येथेच हाजयात्रा करण्यास सांगितले होते.

भारतातील इस्लामी तीर्थे : भारतीय मुसलमान अजमीरला दुसरी मक्का मानतात. भारतातील इस्लामचा पहिला प्रचारक ⇨ ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती याचा तेथील दर्गा प्रसिद्ध आहे. तेथे रज्जब महिन्यात मोठा उरूस भरतो. दिल्ली येथील निजामुद्दीन अवलियाचा दर्गा, मलंगगड (जि. ठाणे) येथील बाबा हाजी मलंग नामक मुसलमान साधूची कबर, गोरखपूर व बहिराइच येथील गाजीमियाची स्थळे, मकनपूर येथील शाहमदार याचे ठिकाण इ. स्थळे पवित्र मानली जातात.

ख्रिस्ती तीर्थयात्रा : मध्यमयुगीन ख्रिस्ती लोकांच्या जीवनात तीर्थयात्रांना बरेच महत्त्वाचे स्थान होते. येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी संबंधित अशी पॅलेस्टाइनमधील स्थाने आणि संत व हुतात्मे यांची स्मृतिस्थाने ही ख्रिस्ती लोकांची तीर्थक्षेत्रे बनली.

पॅलेस्टाइन – मानवजातीचा त्राता म्हणून आलेला येशू ज्या प्रदेशात वावरला त्या प्रदेशाला भेटी देण्याची इच्छा लोकांत स्वाभाविकपणेच प्रबळ झाली. विशेषतः तिसऱ्या शतकापासून तीर्थयात्रांना महत्त्व प्राप्त झाले. अनेक व्यक्तींच्या तीर्थयात्रा इतिहासात प्रसिद्ध आहेत. सम्राज्ञी हेलेना हिने जेरूसलेमला भेट दिली आणि तथाकथित खरा क्रूस शोधून काढला तेव्हा यात्रेकरूंची गर्दी तेथे जमू लागली. पाचव्या शतकापासून हजारो यात्रेकरू कष्टप्रद प्रवास करून यात्रा करू लागले. यूरोपमधल्या सर्व राष्ट्रांतून लोक जेरूसलेमला येत. धर्मयुद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांतून येणाऱ्यांची संख्या अधिक असे. इ.स. १००० पासून रशियन यात्रेकरू येऊ लागले. जेरूसलेममध्ये ख्रिस्ती लोकांची अनेक प्रार्थना मंदिरे आहेत. त्यांखेरीज माउंट ऑलिव्ह्‌जवरील गेत्सेमनीचे उद्यान, बेथलीएममधील चर्च ऑफ द नेटिव्हिटी आणि नॅझारेथमधील चर्च ऑफ द ॲनन्सियशन इ. स्थाने पवित्र आहेत.

इटली – जेरूसलेमच्या खालोखाल इटलीमधील रोमला यात्रेकरूंची गर्दी जमत असे. पोपची सत्ता निर्माण झाली आणि रोम हे ख्रिश्चनांचे तीर्थक्षेत्र बनले. रोमला सेंट पीटर व सेंट पॉल यांच्या समाधिस्थानांमुळे विशेष माहात्म्य प्राप्त झाले. हुतात्म्यांची प्रेते जेथे पुरली होती, ती स्थानेही त्यांच्या अस्थींमुळे पवित्र बनली आणि हजारो यात्रेकरू तेथे जमू लागले. प्रवासातील अडचणी, साथीचे रोग इ. कारणांनी जेरूसलेमला जाणे अवघड होऊ लागले, तेव्हा लोक रोमकडे वळू लागले. १३०० मधील पोपच्या महोत्सवाला २० हजार यात्रेकरू जमले होते. सेंट फ्रान्सिस आणि सेंट क्लेअर यांच्याशी संबद्ध असल्यामुळे असीसी हे शहर महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले. सिएना हे सेंट कॅथराइनशी निगडित म्हणून प्रसिद्ध होते.

इंग्लंड – इंग्लंडमध्ये अनेक पवित्र स्थाने आहेत. त्यांपैकी सर्वांत प्राचीन म्हणजे ग्लॅस्टनबरी. ते केल्टिन परंपरेतील असल्यामुळे बहुधा येशूच्याही आधीपासून प्रसिद्ध होते. सेंट जोसेफ, सेंट पॅट्रिक, किंग आर्थर इ. महात्म्यांच्या सहवासामुळे या स्थानाला माहात्म्य प्राप्त झाले. तेथील मठाधिपतींनी अवशेषांचे एक मोठे भांडार तेथे जमा केले होते. त्यांपैकी काही म्हणजे खरा क्रूस, पवित्र थडगे, सेंट पॉल वगैरेंच्या अस्थी इ. होत. कँटरबरी येथील सेंट टॉमस अ बेकेट याचे स्मृतिस्थान अत्यंत पवित्र मानले जाते. येथे १४७० च्या महोत्सवाला एक लाख यात्रेकरू जमले होते. या खालोखाल महत्त्वाचे म्हणजे वॉल्सिंगम मधील ‘अवर लेडी’ चे पवित्र स्थान. तिच्या दुधाचे काही थेंब असलेले कुपी येथे असल्यामुळे हे यात्रेकरूंचे आकर्षण बनले. सत्ताधारी लोक ज्या संतांचा राजद्रोही म्हणून धिक्कार करीत, त्यांची पूजा करणे आणि त्यांच्या समाधिस्थानांना भेटी देणे हे इंग्लिश तीर्थयात्रेचे एक वैशिष्ट्य होय.


वेल्स – येथील मुख्य पवित्र स्थान म्हणजे सेंट विनिफ्रेडची विहीर होय.

स्कॉटलंड – येथील सर्वांत प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणजे व्हिटहॉर्न. सेंट निनियनने सेंट मार्टिनच्या स्मृत्यर्थ तेथील प्रार्थनामंदिर बांधले होते. सेंट अँड्रयूज येथील ‘सेंट मेरी ऑफ द रॉक’ चे पवित्र स्थान हे दुसरे एक प्रसिद्ध क्षेत्र होय.

आयर्लंड – सेंट पॅट्रिकची पर्गेटरी (मृत्यूनंतरचे पापक्षालनस्थान) डाऊन पॅट्रिक, मीथमधील सेंट जॉनची विहीर आणि कॅनफिल्ड ही येथील तीर्थक्षेत्रे होत.

फ्रान्स – फ्रान्समध्ये मध्ययुगात प्रसिद्ध असलेले स्थान म्हणजे शार्त्र. आधुनिक काळातील फ्रेंच मंदिरांपैकी मुख्य म्हणजे लुर्द्‍‌झ, ला सालेत आणि लिसा ही होत.

स्वित्झर्लंड – येथील सर्वांत महत्त्वाचे तीर्थ म्हणजे आयंझीडेल्न हे होय. ते दहाव्या शतकापासूनच तीर्थक्षेत्र बनले असून हल्ली दरवर्षी दीड लाखाहून अधिक यात्रेकरू तेथे जमतात.

स्पेन – स्पेनमधील सर्वांत महत्त्वाचे स्थान म्हणजे सेंट जेम्सचे मंदिर अथवा सांत्यागो दे काम्पोस्टेला हे होय. मध्ययुगात जेरूसलेम आणि रोमखेरीज इतर सर्व स्थानांपेक्षा हे प्रसिद्ध होते.

जर्मनी – जर्मनीमधील मुख्य स्थान म्हणजे आखेन. या ठिकाणी जे अनेक पवित्र अवशेष आहेत, त्यांपैकी महत्त्वाचे पुढीलप्रमाणे : बेथलीएमच्या तबेल्यात कुमारीच्या अंगावर असलेला पांढरा झगा, बालख्रिस्ताला ज्यांत लपेटलेले होते ते कपडे आणि देहान्त शिक्षेनंतर जॉन बॅप्टिस्टचे शरीर ज्यात गुंडाळले ते कापड. १८८१ साली येथे दीड लाख यात्रेकरू जमले होते. मध्ययुगातील दुसरे तीर्थ म्हणजे ट्रिअर. क्रूसावर चढविण्यापूर्वी येशूने अंगावर घातलेला कोट या ठिकाणी होता.

धर्मसुधारणाचळवळीनंतर तीर्थयात्रांचे महत्त्व कमी झाले असले, तरी मध्ययुगात तीर्थयात्रांमुळे यूरोपमधील राष्ट्रे केवळ धार्मिक बाबतीतच नव्हे तर व्यापार, साहित्य आणि कला या बाबतींतही अधिक जवळ आली हे सत्य आहे.

भारतात दक्षिणेतील वैलंगानी, मद्रासजवळचे मैलापूर व गोव्यातील बाँ जेझूस कॅथीड्रल ही ख्रिस्ती लोकांची तीर्थक्षेत्रे आहेत. मैलापूर येथे सेंट टॉमसची समाधी व बाँ जेझूसमध्ये सेंट फ्रान्सिस झेव्हिअर यांचे शव आहे.

ज्यू अथवा यहुदी तीर्थक्षेत्रे : ज्यू लोकांच्या तीर्थयात्रांचे मूळ प्राचीन सेमिटिक जीवनात आढळते. प्राचीन काळातील लोक देवता सर्वव्यापी असतात असे न मानता त्या विशिष्ट ठिकाणीच राहतात असे मानत. त्यामुळे विशिष्ट धार्मिक विधी करण्यासाठी हे लोक ठराविक ठिकाणीच जमत. यातूनच तीर्थयात्रा निर्माण झाल्या. ज्यूंची तीर्थे पुढीलप्रमाणे आहेत :

जेरूसलेम वा पॅलेस्टाइन – इझ्राएलमध्ये असलेल्या या शहराला ज्यू लोकांची धार्मिक राजधानी मानले जाते. येथे त्यांची अनेक पवित्र स्थाने आहेत. येथील मंदिराची पश्चिमेकडची भिंत, मौट झायनवरील डेव्हिडची कबर, सायमन द जस्ट याची कबर, अब्राहम, इसाक व जेकब यांच्या हीब्रन येथील कबरी, मैमान वा माइमॉनिडीझ याची टायबीरियस येथील कबर आणि मॅरोन येथील गूढवाद्यांच्या कबरी ही येथील पवित्र स्थाने होत.


इतर – ईजिप्तमध्ये कैरोजवळ दुमूह येथे एक प्रसिद्ध सिनॅगॉग (ज्यू उपासनामंदिर) होते. कित्येकदा एकाच व्यक्तीची कबर ज्यू आणि मुसलमान दोघेही पवित्र मानतात. ज्यूंना पवित्र वाटणाऱ्या अनेक कबरी कुर्दीस्तान, मेसोपोटेमिया, पर्शिया, अल्जीरिया, मोरोक्को, पोलंड, गॅलिशिया, व्हालिन्य इ. ठिकाणी आहेत.

पारशी तीर्थे­­ : इराणमधून भारतात आल्यावर पारशी लोकांनी प्रथम दीव बेटावर संजाण येथे अग्निमंदिर बांधले व एक अग्निस्तंभ उभारला. पारशांच्या अग्निमंदिरांचे आतश बेहेराम, आतशखाना, अग्यारी इ. प्रकार आहेत. यांपैकी अग्यारी हे कनिष्ठ प्रतीचे असले, तरी ते प्रत्येक पारशी वस्तीत असते. आतश बेहेराम हे या सर्वांत श्रेष्ठ असते. भारतात एकूण आठ आतश बेहेराम आहेत. त्यांतील पहिला उदवाडा येथे बांधला गेला. नंतर नवसारी येथे एक, मुंबई येथे चार व सुरतेला दोन आतश बेहेराम बांधले गेले. परंतु या स्थानांना खऱ्या अर्थाने पारशांची तीर्थक्षेत्रे म्हणता येत नाही. त्यांच्यात क्षेत्रे नाहीतच म्हटले तरी चालेल. उदवाडा हेच त्यांचे यात्रेचे एकमेव ठिकाण म्हणता येईल. येथील अग्नी एक हजार वर्षांपेक्षाही जुना आहे.

संदर्भ : 1. Gibs, H. A. R. Kramers, J. H. Ed. Shorter Encyclopaedia of Islam, Leiden, 1961.

   2. Hastings, James, Ed. Encyclopaedia of Religion and Ethics, Vol. 10, New York, 1959.

   3. Kane, P. V. History of Dharmasastra, Vol. IV, Poona, 1973.

   ४. पोद्दार, हनुमानप्रसाद, संपा. कल्याण : तीर्थांक, वर्ष ३१, अंक-१, गोरखपूर, जानेवारी, १९५७.

साळुंखे, आ. ह.