शून्य : गणितामध्ये शून्य ही संकल्पना एक संख्या म्हणून आणि एखाद्या चलाचे मूल्य म्हणून अशा दोन प्रकारे वापरण्यात येते. संख्या दर्शविण्याकरिता प्रथमपासून प्रतीकात्मक चिन्हे वापरात आलेली असावीत परंतु संख्या एकसारख्या वाढत असल्याकारणाने त्या दर्शविण्याकरिता चिन्हांची संख्या वाढत जाऊ लागली व त्यामुळे मोठमोठ्या संख्या दर्शविणे कठीण जाऊ लागले. मध्ययुगात रोमन लोक २,११२ ही संख्या MMCXII अशी लिहीत असत किंवा ६३९ ही संख्या VIXXXIX अशी लिहीत असत. लिहिण्याची ही अडचण अंकाला दिलेल्या स्थानमूल्यामुळे व शून्याच्या शोधामुळे दूर झाली. द्विमान, त्रिमान, पंचमान, दशमान किंवा विंशतिमान इत्यादी कोणत्याही मानात संख्या दर्शविणे शून्याच्या शोधामुळे सुलभ झाले आहे. [→ अंक संख्या].
शून्याच्या प्रतीकात्मक चिन्हाचा सर्वांत जुना संदर्भ ग्वाल्हेरजवळील एका मंदिरामधील भिंतीवर आढळतो. हा लेख इ. स. ८७० मधील असावा. तो ब्राह्मी लिपीमध्ये आहे. त्यामध्ये मंदिराकरिता दिलेल्या दानाची यादी आहे. त्यात फुलबागेकरिता २७० हात लांब व १८७ हात रुंद अशी जागा नोंदलेली आहे. २७० या संख्येपैकी ० हे छोट्या टिंबाने (.) दर्शविले आहे. त्यातच पुढे माळी देवाला ५० फुलांचे गुच्छ नियमितपणे अर्पण करणार असल्याचे वचन आहे. संस्कृतमध्ये शून्याचा अर्थ रिक्त असा आहे. नवव्या शतकात अरबांचा शून्याशी परिचय झाल्यावर त्यांनी शून्याचे अरबी भाषेतील भाषांतर असिफर या शब्दाने केले. तोच शब्द पुढे कसा बदलत गेला हे पुढील आकृतीवरून दिसून येईल.
चीनमध्ये तेराव्या शतकात प्रथमच शून्याचा वापर लेखनामध्ये केलेला आढळतो. ‘गुबार’ या पश्चिम अरबी अंकलेखन पद्धतीत अंक लिखाणात शून्याची गरज भासत नव्हती. अंकाच्या डोक्यावर टिंबे देऊन त्याचे स्थान दर्शविण्यात येत होते. जसे
दशम स्थानामरिता एक टिंब, शतकाकरिता दोन टिंबे वगैरे.
शून्याचा प्रवेश पाश्चिमात्य देशांमध्ये झाला, तेव्हा त्याने त्या लोकांना गोंधळात टाकले. तत्पूर्वी ते लोक ⇨ गोटीचौकटीचा वापर करीत होते. शून्य म्हणजे काहीच नाही असे असेल, तर ते काहीच असू नये परंतु ते काही वेळा काहीच नसते, तर काही वेळा ते काही तरी असते. जसे ३ + ० = ३, ३ – ० = ३ येथे शून्य म्हणजे काहीच नाही परंतु ३० = ३ x १० येथे शून्य म्हणजे काही तरी आहे. यामुळे पाश्चिमात्य लोक गोंधळात पडले. त्या वेळच्या एका फ्रेंच लेखकाने ‘शून्य म्हणजे काही नाही, एक गोंधळ करणारे व अडचणी उत्पन्न करणारे चिन्ह आहे’, असे म्हटले आहे. त्या वेळची पाश्चिमात्यांमधील शून्याबद्दलची प्रतिक्रिया दोन प्रकारची होती. एक म्हणजे शून्य ही सैतानाने उत्पन्न केलेली गोष्ट. दुसरी शून्य ही एक टिंगल करण्याची गोष्ट. पंधराव्या शतकातील एका सुशिक्षित फ्रेंच माणसाने पुढीलप्रमाणे लिहिले आहे : ‘ज्याप्रमाणे गाढवाला सिंह बनावयाचे होते किंवा माकडाला राणी व्हावयाचे होते, तद्वत शून्याने अंकाचा आव आणला’.
ही नवीन प्रकारची अशी संख्या आहे की, तीमध्ये योग (बेरीज) किंवा वियोग (वजाबाकी) क्रियेने काही फरक पडत नाही. आधुनिक गणितात
हे अर्थहीन चिन्ह मानतात, म्हणजेच शून्याने भागता येत नाही असे मानतात. क ही शून्याव्यतिरिक्त कोणतीही संख्या असेल, तर
असते. मुळात चिन्ह म्हणून आलेले ० नंतर एक नैसर्गिक संख्या व सम संख्या म्हणून गणले जाऊ लागले परंतु रुलेट सारख्या जुगारी खेळात ‘०’ ही विषम व ‘००’ ही सम संख्या धरतात.