टेलर, ब्रुक : (१८ ऑगस्ट १६८५–२९ डिसेंबर १७३१). इंग्लिश गणितज्ञ. कलनशास्त्रातील महत्त्वाच्या शोधांबद्दल प्रसिद्ध. त्यांचा जन्म एडमंटन (मिडलसेक्स) येथे झाला. त्यांचे शिक्षण केंब्रिज येथील सेंट जॉन कॉलेजमध्ये झाले.

टेलर यांनी १७०८ साली देऊन केंद्रासंबंधीचा [⟶ लंबक] प्रश्न समाधानकारकपणे सोडविला. हा शोध १७१४ पर्यंत प्रसिद्ध केला गेला नाही व या शोधाच्या श्रेयाबद्दल स्विस गणितज्ञ योहान बेर्नुली यांच्याबरोबर टेलर यांचा वाद निर्माण झाला. टेलर यांच्या Methodus incrementorum directa inversa (१७१५) या ग्रंथामुळे गणितात एक नवीनच शाखा निर्माण झाली. ही शाखा आता ⇨सांत अंतर कलन या नावाने ओळखली जाते. कंप पावणाऱ्या दोरीच्या गतीचे यांत्रिक तत्त्वांमध्ये रूपांतर करण्यासाठी या नवीन शाखेचा त्यांनीच प्रथम उपयोग केला. ‘टेलर प्रमेय’ या नावाने कलनशास्त्रात ओळखले जाणारे महत्त्वाचे प्रमेय [⟶ अवकलन व समाकलन] याच ग्रंथात त्यांनी मांडलेले होते. या प्रमेयाचे महत्त्व १७७२ पर्यंत मान्य झाले नाही. त्या वेळी जे. एल्. लाग्रांझ या फ्रेंच गणितज्ञांना या प्रमेयाचे महत्त्व कळून आले व त्यांनी अवकलनशास्त्राचे मूलभूत तत्त्व म्हणून या प्रमेयाची गणना केली. १७१५ मध्ये त्यांनी लिनियर परस्पेक्टिव्ह या आपल्या ग्रंथात यथादर्शनाची (नैसर्गिक वस्तूतील अवकाशीय संबंध डोळ्यांना जसे दिसतात तसे प्रतलावर किवां वक्र पृष्ठावर चित्रित करण्याच्या तंत्राची) मूलभूत तत्त्वे मांडली होती. या व न्यू प्रिन्सिपल्स ऑफ लिनियर परस्पेक्टिव्ह या त्यांच्या दुसऱ्या ग्रंथात विलोपन बिंदूच्या (मागे जाणाऱ्या समांतर रेषांचा संच यथादर्शनात ज्या बिंदूत मिळाल्यासारखा भासतो त्या बिंदूच्या) तत्त्वाचे पहिलेच व्यापक विवरण केलेले आढळते. तथापि त्यांच्या लिखाणातील संक्षिप्तता आणि असंदिग्धता या दोषांमुळे त्यांचे हे कार्य बराच काळपर्यंत मान्यता पावू शकले नाही. लॉगरिथमी श्रेणी विषयीचे त्यांचे कार्य फिलॉसॉफिकल ट्रँझॅक्शन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते. 

लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १७१२ मध्ये त्यांची निवड झाली. ते या संस्थेचे १७१४–१८ या काळात सचिवही होते. कलनशास्त्राच्या शोधाविषयी न्यूटन व लायप्निट्स यांच्यात निर्माण झालेल्या वादासंबंधी निर्णय घेण्यासाठी १७१२ साली नेमलेल्या समितीचे टेलर हे एक सदस्य होते. ते लंडन येथे मृत्यू पावले.

काळीकर, मो. वि.