कोशी, ऑग्युस्तीन ल्वी : (२१ ऑगस्ट १७८९–२३ मे १८५७). फ्रेंच गणितज्ञ. अनुप्रयुक्त (व्यावहारिक) गणितात अतिशय उपयुक्त ठरलेल्या सदसत् चलांच्या फलन सिद्धांताचे संस्थापक [→ फलन]. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला. ते एकोल पॉलिटेक्निकमधून १८०७ मध्ये पदवीधर झाले. नंतर त्यांनी एकोल द पाँत एत शोसे या संस्थेत तीन वर्षे शिक्षण घेतले व पुढील तीन वर्षे अभियंता म्हणून काम केले. १८१३ नंतर त्यांनी गणिताचे अध्यापन व संशोधन कार्य केले. पॅरिस येथे १८३० पर्यंत त्यांनी तीन प्राध्यापकपदांवर कार्य केले, परंतु त्यावेळी झालेल्या क्रांतीत चार्लस राजाबरोबर त्यांनी देश सोडला. १८३८ मध्ये ते फ्रान्सला परत आले व एकोल पॉलिटेक्निकमध्ये पुन्हा शिकविण्यास प्रारंभ केला, परंतु त्यांनी सरकारशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याचे नाकारले. १८४८ साली सॉरबोन विद्यापीठात ज्योतिषशास्त्राच्या अध्यासनावर त्यांची निवड झाली व तेथेच मृत्युपावेतो त्यांनी कार्य केले.

कोशी यांनी १८१६–३० या काळात गणितासंबंधी अनेक संशोधनपर निबंध व ग्रंथ प्रसिद्ध केले. त्यांपैकी Cours d’ analyse de l’ Ecole Polytechnique (१८२१) Re’sume’des lecons surle calcul infinitesimal (१८२३) व Lecons sur les applications du calcul infinitesimal’a la geometrie (१८२६–२८) या तीन ग्रंथांद्वारे त्यांनी कलनशास्त्राची भक्कम पायावर उभारणी केली. सीमा व सांतत्य या संकल्पनांद्वारे कलनशास्त्राची मूलतत्त्वे स्पष्ट केली [→ कलन]. टेलर प्रमेय तर्कशुद्धपणे सिद्ध करून कोशी यांनी त्यांच्या नावाने ओळखले जाणारे टेलर विस्तारातील शेष पद प्रस्थापित केले [→ अवकलन व समाकलन]. Sur L’application du calcul de residus (१८२७) या ग्रंथाद्वारे त्यांनी सदसत् चलांच्या फलन सिद्धांताचा पाया घातला. या ग्रंथात त्यांनी सदसत् संख्यांच्या सीमा असलेले समाकल व त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारे समाकल प्रमेय यांचे विवरण केलेले आहे. संख्या सिद्धांत, गट सिद्धांत, निर्धारक, संभाव्यता, चलन-कलनशास्त्र, भूमिती इ. गणित शाखांमध्येही त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. Memoire sur la theorie des ondes (१८११) या त्यांच्या प्रकाशकीविषयक ग्रंथामुळे प्रकाशाचा तरंग सिद्धांत प्रस्थापित होण्यास मोठी मदत झाली. ग्रहांची गती, द्रायुगतिकी (वायू व द्रव यांच्या गतीसंबंधीचे शास्त्र) आणि स्थितिस्थापकता या विषयांतही त्यांनी मूलभूत महत्त्वाचे कार्य केले. त्यांचे सर्व संशोधनकार्य एकत्रितपणे २७ खंडांत प्रसिद्ध झाले आहे.

फ्रान्सच्या ॲकॅडमी डेस सायन्सेस या संस्थेचे सभासद म्हणून १८१६ च्या सुमारास व इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून १८५२ मध्ये कोशी यांची निवड झाली होती. ते सो येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.