शुगर पाइन : (लॅ. पायनस लँबेर्टिआना कुल-पायनेसी). उघड्या बियांच्या (प्रकटबीज) वनस्पतींच्या गटातील सूचिपर्णी वृक्ष. पाइन वृक्षांच्या प्रकारातही त्याचा समावेश करतात. त्याचा प्रसार अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावर ऑरेगन ते मेक्सिकोपर्यंत आढळतो. त्याचा पर्णसंभार शोभिवंत व गर्द रंगाचा असतो. त्याची उंची ७५ मी. व घेर २–२·५ मी. असतो. वृक्षाचा माथा सामान्यतः सपाट व पसरट असून अरुंद पिरॅमिडसारखा दिसतो. फांद्या पसरट, तपकिरी, लवदार व काहीशा लोंबत्या असतात. सालीवर खवलेदार कंगोरे असतात. हिवाळी कळ्या लांबट असतात. पाने बळकट, तीक्ष्ण टोकदार, ७–१० सेंमी. लांब, गर्द निळसर हिरवी असून त्यांच्या खालील बाजूवर पांढऱ्या रेषा असतात. शंकू लोंबते, २५–५० सेंमी. लांब व १०–१५ सेंमी. व्यासाचे असतात. ते दंडगोलाकृती, थोडे वाकडे, फिकट तपकिरी व चकचकीत असतात. बिया १·५ सेंमी. लांब, गर्द तपकिरी किंवा काळ्या व खाद्य असतात. या वृक्षातून स्फटिकासारखा द्रव स्रवतो. त्याच्या अतिसेवनाने जुलाब होतात. लाकूड फिकट लालसर तपकिरी, हलके व मऊ असून विविध प्रकारच्या लाकडी कामांसाठी ते वापरतात.

परांडेकर, शं. आ.