शुकरोग : (सिटॅकोसिस). माणसाला होणारा एक पक्षिजन्य सांसर्गिक रोग. तो मुख्यत्वे पोपट, पॅराकीट, कबुतरे, काकाकुवा, लव्हबर्ड यांसारख्या पिंजऱ्यामध्ये पाळलेल्या सिट्टॅसिफॉर्मिस गणातील पक्ष्यांपासून माणसाला होतो. इतर पाळीव पक्ष्यांच्या संसर्गामुळेही तो होणे शक्य असते. १९२९-३० मध्ये या रोगाची एक मोठी साथ युरोप, आशिया आणि अमेरिका खंडांत पसरली होती.
आकाराने सूक्ष्मजंतू आणि विषाणू (व्हायरस) यांच्या दरम्यान असणारे क्लॅमिडिया नावाच्या गटातील सूक्ष्मजीव या रोगास कारणीभूत असतात. मोठे व्हायरस या नावाने ते ओळखले जातात. त्यांचा व्यास सु. ०·३ ते १·० मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०-४ सेंमी.) असतो. रोगी पक्ष्याच्या पिसांमधील धूळ किंवा वाळलेल्या विष्ठेचे सूक्ष्म कण श्वसनावाटे शरीरात गेल्यामुळे रोगांचा संसर्ग होतो आणि सु. एक ते दोन आठवड्यांचा परिपाक काळ संपल्यावर लक्षणे दिसू लागतात.
सुरुवातीस डोके दुखणे, मळमळणे, उलटी होणे, स्नायू व सांध्यांमध्ये वेदना यांसारखी लक्षणे आढळतात. नंतर थंडी वाजून ताप येतो. श्वसनमार्गाचा दाह होऊन खोकला येतो. इन्फ्ल्यूएंझा वा न्यूमोनिया यासारखी वाटणारी ही लक्षणे सात-आठ दिवसांत ओसरू लागून एक ते दोन आठवड्यांत रोगी पूर्ववत बरा होतो. जास्त गंभीर स्वरूपाच्या संक्रमणात ताप ४०० से.हून अधिक वाढतो व श्वासनलिकादाह फुफ्फुसापर्यंत पोचतो. ⇨ प्रतिजैव पदार्थांचा (अँटिबायॉटिक्सचा) वापर न केल्यास फुफ्फुसशोथ तीव्र होऊन रोगी दगावण्याची शक्यता असते.
उलटी प्रतिबंधक, वेदनाशामक व तापनिवारक औषधे यांसारखी लक्षणानुसारी औषधयोजना व प्रतिजैव पदार्थांचा उपयोग करून या रोगावर उपचार केले जातात. टेट्रासायक्लीन, क्लोरँफेनिकॉल यांसारखे प्रभावी प्रतिजैव पदार्थ वापरात आल्यापासून शुकरोगांची गंभीरता कमी झाली आहे.
पक्ष्यांचे पिंजरे स्वच्छ ठेवणे व आजारी पक्ष्यांची वेळीच दखल घेऊन उपचार करणे यांसारख्या मार्गांनी हा रोग टाळणे शक्य आहे.
श्रोत्री, दि. शं.