शिक्षा : वेदमंत्रांचे उच्चारण शुद्ध, अचूक होण्याच्या दृष्टीने ध्वनिशास्त्राचा अभ्यास करून वैदिकांनी रचलेल्या शास्त्राला ‘शिक्षा’ म्हणतात. सहा वेदांगांपैकी शिक्षा हे पहिले वेदांग होय [⟶ वेद व वेदांगे]. यज्ञाचे इष्ट फल साध्य होण्यासाठी ऋत्विजांना मंत्रोच्चार शुद्ध व बिनचूक करणे, आवश्यक असल्यामुळे अशा शास्त्राची आवश्यकता होती. वेदमंत्रांतील अक्षरांच्या शुद्ध उच्चारांबरोबरच उदात्त (उच्च स्वर), अनुदात्त (नीच स्वर) आणि स्वरित (उच्च व नीच ह्या दोहोंच्या मधला स्वर) हे स्वरांचे प्रकार, छंदांचे प्रकार, पठनाच्या विविध पद्धती व व्याकरण ह्यांसंबंधीचे शिक्षा-ग्रंथ वैदिकांनी निर्माण केले. मूळचे शिक्षा-ग्रंथ सूत्रबद्ध असावेत तसेच वेदांच्या वेगवेगळ्या शाखांसाठी ते वेगवेगळे असावेत, असा तर्क आहे. प्राचीन शिक्षा-ग्रंथ उपलब्ध नाहीत. तथापि ध्वनिशास्त्राविषयी मान्यताप्राप्त अशा सर्वसामान्य निष्कर्षांचा आपापल्या वैदिक शाखेनुसार विचार करणारे शास्त्रग्रंथ – ⇨प्रातिशाख्ये – मिळतात.
‘शिक्षा’ या विषयात, म्हणजे वेदमंत्रपठनात, काय शिकले पाहिजे, ह्याचे क्रमवार वर्णन तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीमध्ये आले आहे. वर्ण (अक्षर), स्वर, मात्रा (स्वरोच्चार करावयास लागणारा वेळ) –ऱ्हस्व, दीर्घ व प्लुत असे मात्रेचे तीन प्रकार, बल (उच्चाराची शक्ती), साम (पठनाची सुस्वरता वा समता) आणि संतान (अखंड पठन) ह्या सहा गोष्टी महत्त्वाच्या म्हणून तेथे सांगितल्या आहेत.
सध्या प्रचारात असलेल्या शिक्षा-ग्रंथांत पाणिनीय शिक्षा, याज्ञवल्क्य शिक्षा, वासिष्ठी शिक्षा शिक्षाअशा काही–ग्रंथांचा अंतर्भाव होतो. हे ग्रंथ बरेच अलीकडचे आहेत. त्यांतील पाणिनीय शिक्षा हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. ह्याच्या कर्त्यासंबंधीची माहिती मिळत नाही. पाणिनीच्या मतांना अनुसरुन रचलेल्या ह्या ग्रंथात ६० श्लोक आहेत. वर्णोच्चाराचे नियम व माहिती ह्यात दिलेली आहे.
शेंडे, ना. ज.