शिलाप्रदेश : ठराविक गुणवैशिष्ट्यांचे सजातीय अग्निज खडक जेथे असतात, त्या विस्तृत क्षेत्राला शिलाप्रदेश म्हणतात. याला अग्निजप्रदेश किंवा शिलारसप्रदेश असेही म्हणतात. हे अग्निज खडक मर्यादित कालावधीत तयार झालेले असतात आणि त्यांच्या वैशिष्ट्यसूचक रासायनिक, खनिजवैज्ञानिक किंवा शिलावैज्ञानिक गुणधर्मांमुळे ते त्या क्षेत्रातील इतर खडकांपासून वेगळे ओळखता येतात. शिलाप्रदेशातील खडक तत्त्वतः एकाच मूळ शिलारसापासून तयार झालेले असतात. रोम व नेपल्स या शहरांभोवती आढळणारा विपुल पोटॅशियमयुक्त खडकाचा परिसर शिलाप्रदेशाचे नमुनेदार उदाहरण आहे. सोडियम व टिटॅनियम यांसारख्या इतर मूलद्रव्यांचे कमी-जास्त प्रमाण हे शिलाप्रदेशांचे गुणवैशिष्ट्य आहे.

चार्नोकाइट पट्टिताश्म समूह हा भारतातील शिलाप्रदेशाचे उत्तम उदाहरण आहे. हा पूर्णस्फटिकी, भरडकणी, गडद रंगाच्या व हायपर्स्थीन असलेल्या ग्रॅनाइटासारख्या पातालिक अग्निज खडकांचा समूह आहे. तमिळनाडूत विशेषतः पूर्व व पश्चिम घाटांतील निलगिरी, पलनी, सेव्हरॉय वगैरे टेकड्यांमध्ये या समूहातील खडक आढळतात. या समूहातील खडकांच्या वैशिष्ट्यपूर्ण शिलावैज्ञानिक गुणधर्मांमुळे व खनिज संघटनामुळे द्वीपकल्पातील इतर खडकांपासून ते सहजपणे वेगळे ओळखू येतात. हायपर्स्थीन ग्रॅनाइट, पायरोक्सिनाइट, नोराइट, हायपेराइट हे या समूहातील खडक असून उत्पत्तीच्या दृष्टीने त्यांच्यात सुस्पष्ट परस्परसंबंध असल्याचे लक्षात येते. [→ चार्नोकाइट माला].

खडकांच्या अशा ठरावीक माला ठरावीक प्रकारच्या भूवैज्ञानिक परिस्थितीशी निगडित असल्याचे दिसते. खडकांतील विभंगाची वा अधोगमनाची क्रिया होऊन ताण व उभ्या दिशेतील खडकांची हालचाल यांचा परिणाम झालेल्या प्रदेशांमध्ये सर्वसाधारणपणे अधिक अल्कली प्रकारचे खडक आढळतात तर संपीडन (दाबले जाण्याची) क़िंवा संकोचन क्रिया झालेल्या प्रदेशांत (उदा., घडीच्या पर्वतरांगांचा प्रदेश) कॅल्शियम अधिक असणारे अग्निज खडक आढळतात. काही महत्त्वाच्या शिलाप्रदेशसूचक खडकांच्या समूहांची उदाहरणे पुढे दिली आहेत.

ऑलिव्हीन बेसाल्टट्रॅकाइट खडकांचा समूह : या समूहातील खडक जगाच्या विस्तृत भागांत आणि सर्वसाधारणपणे विभंगक्रिया व खडकांची उभ्या दिशेतील लक्षणीय हालचाल झालेल्या प्रदेशांत आढळतात. मध्य पॅसिफिक महासागरातील ताहिती, हवाई, सामोआ मध्य अटलांटिक पर्वतरांगेतील ऍसेंशन, सेंट हेलीना (न्यूझीलंड), ऑस्लो (नॉर्वे), मिडलँड व्हॅली (स्कॉटलंड), पूर्व आफ्रिकेतील खचदऱ्यांचा पट्टा वगैरे भागांत या समूहाचे खडक आढळतात. या समूहातील खडक खनिजवैज्ञानिक व शिलावैज्ञानिक दृष्टींनी सापेक्षतः साधे आहेत. ऑलिव्हीन बेसाल्टयुक्त मूळ शिलारसापासून स्फटिकीभवन होऊन व जड खनिजे खाली बसून बेसाल्ट, अँडेसाइट, ट्रॅकाइट या क्रमाने या समूहातील खडक तयार झाले. यांपैकी अँडेसाइट व ट्रॅकाइट विपुलपणे आढळत नाहीत. कधीकधी ट्रॅकाइटानंतर बनणारे क्वॉर्टझ ट्रॅकाइट किंवा सोडा रायोलाइट, इतरत्र टेफ्राइट ते फोनोलाइट या क्रमाने खडक तयार झालेले आढळतात. ज्वालामुखीच्या द्रवरूप साठ्यात घनतेनुसार ऑलिव्हीन व पायरॉक्सीन ही खनिजे अधिक खालच्या पातळ्यांत साचून थर होऊन ओशिॲनाइट, अँकॅरानाइट न लिंबुर्गाइट हे वैशिष्ट्यपूर्ण खडक तयार होतात.

पठारी बेसाल्ट : हजारो चौ. किमी. क्षेत्रावर जवळजवळ क्षितिजसमांतर पातळीत पसरलेल्या लाव्हा प्रवाहांच्या अतिशय जाड थराला पठारी किंवा पूर लाव्हा म्हणतात. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक येथे सु. ५ लाख १८ हजार चौ. किमी. क्षेत्रावर पसरलेला ⇨ दक्षिण ट्रॅप हे पठारी बेसाल्टाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अमेरिकेतील ऑरेगन व वॉशिंग्टन राज्यांत पसरलेला कोलंबिया-स्नेक रिव्हा बेसाल्ट व लेक सुपीरियर येथील कीविनॉ लाव्हा ही पठारी बेसाल्टाची इतर उदाहरणे आहेत. खोलवरचा बेसाल्टी शिलारस भेगांमधून बाहेर पडून व पसरत जाऊन असे पठारी थर बनत असावेत. बेसाल्ट हा यातील प्रमुख खडक असून रायोलाइट, ट्रॅकाइट व अँडेसाइट हे खडक प्रमाणात असतात.

जगात अनेक प्रदेशांत हजारो चौ. किमी. क्षेत्रांत बेसाल्टी द्रव्य घुसून बनलेल्या ⇨ भित्ती व ⇨ शिलापट्ट यांच्या रूपातील अनेक राशी निर्माण झालेल्या आढळतात. उदा., दक्षिण आफ्रिकेत कारू संघाच्या गाळाच्या खडकांत आढळणारे डायाबेस खडकांचे जवळजवळ आडवे असलेले थर आणि न्यू जर्सीमधील सपाट पॅलिसेड शिलापट्ट.

बेसाल्टअँडिसाइटरायोलाइट खडकांचा समूह :  यात अँडेसाइट व रायोलाइट हे प्रमुख खडक असून बेfसाल्ट, डेसाइट, लॅटाइट व क्वॉर्टझ लॅटाइट हे यातील कमी प्रमाणात आढळणारे खडक आहेत. लाव्हा व घट्ट झालेली ज्वालामुखी राख या दोन्ही रूपांत हे खडक आढळतात. खंडांवर आढळणारा हा समूह हे घडीच्या पर्वतरांगा असलेल्या प्रदेशाचे लाक्षणिक वैशिष्ट्य असते. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांच्या पश्चिम सीमांवर विस्तृतपणे आढळणारा पॅसिफिक महासागराभोवतीच्या ज्वालामुखींचा पट्टा हे या समूहाचे उदाहरण आहे. हा समूह मुख्यतः बेसाल्टी शिलारसापासून बनला असावा.

अल्पसिकत व अत्यल्पसिकत खडकांचा समूह : यात सिलिकेचे प्रमाण अल्प व अत्यल्प असणारे खडक असतात. याचे बशीच्या आकाराचे मोठे पट्ट किंवा शंकूच्या आकाराच्या राशी असतात. सामान्यपणे कमी खोलीवर शिलारस घुसून हे पट्ट व राशी बनलेल्या असतात. यातील खडकांचे प्रकार सपाट किंवा काहीशा खोलगट थरांच्या रूपात पसरलेले असून त्यांच्या राशींची जाडी हजारो मी. पर्यंत असू शकते. राशीच्या तळाकडे जाताना अधिकाधिक घनतेचे खडक आढळतात परंतु परस्परविरोधी प्रकारच्या खडकांच्या एकाआड एक असलेल्या पातळ थरांमुळे राशी पट्टेरी दिसते. राशीच्या तळाशी पेरिडोटाइट व पायरॉक्सिनाइट हे खडक विपुल असून वरील भागांत नोराइट, गॅब्रो, ॲनॉर्थोसाइट व डायोराइट यांसारखे खडक आणि माथ्याशी ग्रॅनाइटासारखे खडक आढळतात. मूळचा बेसाल्टी व अल्पसिकत शिलारस सर्वसाधारणपणे खालून वर असा घनरूप होत जाऊन अशा राशी बनल्या असाव्यात. अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील डुलुथ लोपोलिथ, तसेच माँटॅना राज्यातील स्टिलवॉटर आणि दक्षिण आफ्रिकेतील बुशव्हेल्ड या जटिल राशी ही या समूहाची उदाहरणे आहेत.

ग्रॅनोडायोराइटग्रॅनाइट खडकांचा समूह : खंडांवर विस्तृतपणे आढळणाऱ्या भरडकणी पातालिक खडकांचा हा समूह आहे. याच्या पहिल्या प्रकारात वलयभित्ती, खोड (स्टॉक) यांसारख्या लहान राशी येतात. त्या विस्तृतपणे विखुरलेल्या असून सापेक्षतः कमी खोलीवर बनलेल्या असतात. ग्रॅनाइट व ग्रॅनोडायोराइट हे या प्रकारातील प्रमुख खडक असून डायोराइट, गॅब्रो व सायेनाइट हे खडक अल्प प्रमाणात असतात. अशा बहुतेक राशी बहुतकरून ग्रॅनाइट किंवा ग्रॅनोडायोराइट शिलारसाच्या स्फटिकीभवनाने बनलेल्या असतात. या समूहाच्या दुसऱ्या प्रकारात खोल भागात आढळणाऱ्या ⇨ बॅथोलिथासारख्या प्रचंड राशी येतात. त्यांच्याभोवती रूपांतरित खडक असतात. अशा राशी घडीच्या पर्वतनिर्मितीच्या पट्ट्यांतच आढळतात. उदा., सिएरा नेवाडा बॅथोलिथ (कॅलिफोर्निया), कोस्ट रेंज बॅथोलिथ (ब्रिटिश कोलंबिया). ग्रॅनाइट व ग्रॅनोडायोराइट हे या प्रकारातील प्रमुख खडक असून डायोराइट, गॅब्रो व सायेनाइट हे खडक फक्त विशिष्ट प्रदेशांत आढळतात. अशा काही मोठ्या राशी ग्रॅनाइटी शिलारसापासून बनलेल्या असून इतर राशी ⇨ भूद्रोणीतील गाळाचे रूपांतरण होऊन अथवा ग्रॅनाइटीभवनाद्वारे बनलेल्या असतात.


 ल्यूसाइट बेसाल्टपोटॅश ट्रॅकिबेसाल्ट खडकांचा समूह : पोटॅश विपुल व सिलिकॉन अल्प प्रमाणात असणारे या समूहाचे खडक ज्वालामुखीजन्य किंवा भूपृष्ठालगत निर्माण झालेले असतात. हा समूह खंडांवरच आढळतो. ल्यूसाइटयुक्त अल्पसिकत व अत्यल्पसिकत लाव्हा अनेक ठिकाणी आढळतो. यामुळे हा समूह मर्यादितपणे पण दूरवरच्या विविध प्रदेशांत आढळतो. उदा., रोम-नेपल्स (इटली), युगांडा, पूर्व आफ्रिका, पश्चिम किंबर्ली (द. आफ्रिका), पश्चिम ऑस्ट्रेलिया, ल्यूसाइट हिल्स (वायोमिंग, अमेरिका). ल्यूसाइल्ट बेसाल्ट, ल्यूसाइट बेसॅनाइट, पोटॅश ट्रॅकिबेसाल्ट व मेलिलाइट बेसाल्ट हे या समूहातील खडक आहेत. विभंगक्रिया व खडकांची उभ्या दिशेतील लक्षणीय हालचाल झालेल्या प्रदेशांत हा समूह आढळतो.

स्पिलाइटकॅरॅटोफायर खडकांचा समूह : या समूहाच्या खडकांच्या राशींत ज्वालामुखी (लाव्हा) प्रवाह व घट्ट झालेली ज्वालामुखी राख व अल्प प्रमाणात अंतर्वेशी (आता घुसलेल्या) राशी असतात. भूद्रोणीमधील गाळांबरोबर या राशींचा अगदी निकटचा संबंध असतो. या समूहातील खडकांत सोडा विपुल व पोटॅश अल्प प्रमाणात असते. मुख्यतः बेसाल्टी (स्पिलाइट) व थोडे सोडा ट्रॅकाइट (कॅरॅटोफायर) हे या समूहातील खडक आहेत. यातील पुष्कळ खडक रूपांतरणाने बदललेले दिसतात तर काही बेसाल्ट-अँडेसाइट-रायोलाइट समूहाशी निगडित असतात.

अत्यल्पसिकत खडक :  असंख्य अंतर्वेशी राशींत असणाऱ्या या मुख्यतः पेरिडोटाइट व सर्पेंटाइनयुक्त खडकाचा वर वर्णन आलेल्या स्पिलाइट समूहाशी निकटचा संबंध असतो. या दोन समूहांचा मिळून ओफिओलाइट समूह बनतो आणि घडीच्या पर्वताची निर्मिती होत असणाऱ्या प्रदेशात ओफिओलाइट हा शिलारसविषयक सर्वांत आधीचा आविष्कार मानतात.

नेफेलीन सायेनाइट खडकांचा समूह : यातील नेफेलीन सायेनाइट व त्याच्याशी संबंधित असे विपुल अल्कलीयुक्त खडक विस्तृतपणे विखुरलेले पण विरळाच आढळतात. हे खडक खंडांवर आणि सामान्यपणे विभंगक्रिया व अधोगमनक्रिया झालेल्या क्षेत्रांत आढळतात.

ॲनॉर्थोसाइट : सुमारे ६० कोटी वर्षांच्या आधीच्या कॅंब्रियनपूर्व काळातील वेदिकांमध्ये (बाकासारख्या लांबट व जवळजवळ सपाट अशा प्रचंड राशींमध्ये) ॲनॉर्थोसाइट खडकाच्या राक्षसी आकारमान असलेल्या राशी आढळतात आणि हा खडक हायपर्स्थीन ग्रॅनाइट व नोराइट या खडकांशी संबंधित असल्याचे दिसते. हा अँडेसाइन किंवा लॅब्रॅडोराइट या प्लॅजिओक्लेज खनिजाचा बनलेला असतो. म्हणून हा गॅब्रोशी संबंधित असलेल्या ॲनॉर्थोसाइटाहून वेगळा असतो. 

पहा: अग्निज खडक.

संदर्भ : 1. Philpotts, A. Principles of Igneous and Metamorphic Petrology, 1990.

           2. Raymond, L. A. Petrology : The Study of Igneous, Sedimentary and Metamorphic Rocks, 1994.

           3. Wilson, M. Igneous Pertrogenesis, New York, 1988.

ठाकूर, अ. ना.