नील: (शनी, नीलमणी). खनिज रत्न. ⇨ कुरुविंदाच्या या निळ्या प्रकाराला नील (सफायर) म्हणतात. बहुधा लोह, टिटॅनियम किंवा कोबाल्ट यामुळे याला रंग आलेला असतो. जांभळट छटा असलेला मध्यम ते गडद निळा प्रकार सर्वांत मूल्यवान आहे. हे खनिज द्विवर्णिक आहे म्हणजे ते निरनिराळ्या दिशांनी पाहिले असता निरनिराळ्या रंगछटा दिसतात. याचा रंग अनियमित असतो आणि कधीकधी त्यावर पांढरे वा पिवळे ठिपकेही असतात. काळजीपूर्वक तापवून व थंड करून याचा रंग कायमचा बदलता येतो. याच्या पारदर्शक खड्यांना पैलू पाडतात, तर दुधी काचेसारखे पारभासी खडे विशिष्ट प्रकारे घुमटासारखे कापतात. यात कधीकधी रूटाइलाचे सुईसारखे सूक्ष्म स्फटिक व लांबट पोकळ्या समाविष्ट झालेल्या असतात. त्यामुळे याच्या खड्यात सहा आरे असलेली पांढरी तारकाकृती दिसते व खडा फिरविला असता तीही फिरते. अशा तारकांकित प्रकारासाठी नील विशेष प्रसिद्ध आहे. हिऱ्याखालोखाल हे खनिज कठीण असले, तरी त्यावर पौर्वात्य देशांत कोरीवकाम केले जाते.

सायेनाइट, पेग्मटाइट व अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) अग्निज खडकांत, तसेच रूपांतरित कार्बोनेट खडकांत आणि सुभाजांतही (एक प्रकारच्या ठिसूळ खडकांतही) हे खनिज माणिक, गार्नेट, स्पिनेल, पुष्कराज, तोरमल्ली (टुर्मलीन), झिर्‌कॉन इत्यादींबरोबर आढळते. मात्र याचे बहुतेक व्यापारी उत्पादन जलोढीय प्लेसरांमधूनच [→ खाणकाम] होते. हे श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश, ऑस्ट्रेलिया, चीन, टांझानिया, द. आफ्रिका इ. प्रदेशांत सापडते. भारतात हे लडाख, काश्मीर, वायव्य हिमालय इ. भागांत आढळत असे. मात्र आता तेथील साठे संपले आहेत. इ. स. पू. ८०० पासून याचा रत्न म्हणून उपयोग होत असून धारवे (फिरते दंड योग्य स्थितीत राहावेत म्हणून त्यांना देण्यात येणारे आधार बेअरिंग), तारा ओढण्याच्या मुद्रा (डाय) इत्यादींमध्येही याचा वापर होतो. ब्रिटिश व इराणी राजमुकुटांत तसेच अमेरिकेतील म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन इ. ठिकाणी जगातील काही प्रसिद्ध नील आहेत. ऑगस्ट व्हेर्नुली यांनी १९०२ साली नील कृत्रिम रीतीने तयार केले व १९४७ साली तारकांकित प्रकारही बनविण्यात आला. धारवे, दागिने, विविध मापक उपकरणे, ग्रामोफोनच्या सुयांची टोके, अपघर्षक (खरवडून व घासून पृष्ठभाग गुळगुळीत करणारे पदार्थ) वगैरेंसाठी कृत्रिम नील वापरले जाते.

पाश्चिमात्य देशांत नील हे सप्टेंबर महिन्याचे रत्न मानले जाते. भारतात याचे महानील (गडद निळा), इंद्रनील (इंद्रधनुष्याप्रमाणे दुर्मिळ), जलनील इ. प्रकार मानले जातात. शनी ही या रत्नाची अधिष्ठात्री देवता असल्याने शनीची पीडा होऊ नये म्हणून या खड्याची अंगठी घालावी, अशी समजूत आढळते.

पहा : कुरुविंद माणिक रत्ने.

ठाकूर, अ. ना.