शिर्डी : महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ. लोकसंख्या २७,५३० (२००१). हे अहमदनगर-कोपरगाव मार्गावर अहमदनगरच्या उत्तरेस सु. ८५ किमी. वर असून दौंड-मनमाड लोहमार्गावरील कोपरगाव रेल्वे स्थानकापासून सु. १८ किमी. वर आहे.
साईबाबा वयाच्या सोळाव्या वर्षी, एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर १८७२ मध्ये येथे आले. त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाजवळच्या खंडोबा मंदिरात नित्य दर्शनास जाणाऱ्या, म्हाळसापती नावाच्या सुवर्णकाराने त्यांना उत्स्फूर्तपणे ‘साईबाबा’ नावाने संबोधिले. तसेच आपल्या मित्रांबरोबर त्यांची ओळख करून दिली व त्यांची राहण्याची व्यवस्था एका मशिदीत केली. या वास्तव्यात त्यांचे संभाषण, वर्तन, प्रवचन, त्यांचा पेहराव (कफनी व डोक्याला पांढरा रुमाल) इत्यादींचा फार मोठा प्रभाव तेथील लोकांवर पडला. पुढे ते संत साईबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या मृत्यूनंतर (१९१८) त्यांची उपासनापद्धती भक्तांनी तशीच पुढे चालू ठेवली व त्यातूनच श्री साईबाबा संस्थानाची स्थापना शिर्डी येथे झाली.
साईबाबांचे वास्तव्य असलेल्या मशिदीचे पुढे नूतनीकरण करण्यात आले व ती वास्तू पुढे ‘द्वारकामाई’ नावाने ओळखली जाऊ लागली. येथील संगमरवरी नंदी, साईबाबांची मूर्ती, भव्य सभामंडप, पादुका, बाबांची धुनी इत्यादींचे पर्यटकांना व भक्तांना मोठे आकर्षण असते. सकाळ-संध्याकाळची पूजा, शेजारती, अभिषेक, आरती (विशेषतः गुरवारचेस कार्यक्रम), नैवेद्य, महाप्रसाद यांसाठी सर्व धर्मीय भाविकांची गर्दी असते. चैत्र शुद्ध पंधरवड्यात येथे मोठी यात्रा भरते. रामनवमीचा उत्सव व त्यातील पालखी-सोहळा, मूर्तीचे गंगास्नान यांसारखे विधी भाविकांची आकर्षणे आहेत. गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी, बाबांची पुण्यतिथी (आश्विन शुद्ध दशमी) हे उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.
शहरात १९९९ मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाली. पर्यटकांसाठी देवस्थानातर्फे धर्मशाळा, पाकशाळा, तसेच आरोग्यसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.श्री साईबाबांची संगमरवरी मूर्ती, शिर्डी देवस्थानाशी तसेच पूजाविधीशी निगडीत अशा वस्तूंचा व्यवसाय येथे विकसित झालेला आहे. महाराष्ट्रातील हे एक श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते. विश्वस्त मंडळातर्फे देवस्थानाचा कारभार चालतो. देवस्थानाच्या विकासासाठी शासनानेही मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.
चौंडे, मा. ल.