शिंगान : (खिंगन). ईशान्य चीनमधील दोन पर्वतरांगा. ग्रेटर शिंगान (ताशिंगान लिंग) व लेसर शिंगान (शाऊ शिंगान लिंग) अशी त्यांची नावे आहेत. ताशिंगान ही पर्वतरांग चीनच्या इनर मंगोलिया या स्वायत्त प्रदेशात उत्तर-दक्षिण दिशेत पसरली आहे. पूर्वेकडील मँचुरियन मैदान व पश्चिमेकडील मंगोलियन पठार यांच्या दरम्यान ती आहे. उत्तरेस अमूर नदीपासून दक्षिणेस लीआऊ नदीपर्यंत तिचा विस्तार आढळतो. लांबी १,१२० किमी., तर सरासरी उंची १,२०० ते १,३०० मी. आहे. शवे (उंची १,७२८ मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. जुरासिक पर्वतनिर्मिती काळात या रांगेची निर्मिती झाली असून ती ग्रॅनाइट व बेसाल्ट खडकांची आहे. शिखरे गोलाकार, सपाट माथ्याची व मंद उताराची आहेत. पूर्व उतार तीव्र तर पश्चिम उतार बराच मंद स्वरूपाचा आहे. पर्वतरांगेत अनेक ठिकाणी ज्वालामुखी क्रियांच्या खुणा आढळतात. अखेरचा ज्वालामुखी उद्रेक १७२०-२१ मध्ये झाला होता. महामार्ग व लोहमार्ग या रांगेला पार करून गेलेले आहेत. लीआऊ, सुंगारी, नन आणि अमूर या नदीप्रणालींचे शीर्षप्रवाह व त्यांच्या उपनद्या यांचा हा प्रमुख जलविभाजक आहे. पर्वताचा उत्तरेकडील भाग हा पूर्व चीनमधील सर्वांत थंड भाग आहे. तेथील हिवाळ्यातील तापमान– २८° से. किंवा त्यापेक्षाही खाली गेलेले आढळते. लार्च, बर्च, ॲस्पेन व पाइन वृक्षांची दाट वने तेथे आहेत. हरीण, एल्क, मार्टेन, ससे व इतर फरयुक्त प्राणी तेथे आढळतात.

शाऊ शिंगान लिंग पर्वतश्रेणी ईशान्य चीनमधील हेलंगजीआंग प्रांतात वायव्य–आग्नेय दिशेत पसरली आहे. लांबी सु. ६०० किमी. व सरासरी उंची ५०० ते १,००० मी. दरम्यान असली, तरी बरीचशी श्रेणी ६०० मी. पेक्षा कमी उंचीची आहे. सर्वोच्च शिखर १,०९७ मी. उंचीचे आहे. अमूर नदीच्या नैर्ऋत्येस ही श्रेणी असून तिचा विस्तार दक्षिणेस सुंगारी नदीपर्यंत आहे. उत्तरेस ई-लो-हू-ली पर्वतश्रेणीने या दोन्ही पर्वतश्रेण्या एकमेकींना जोडल्या गेल्या आहेत. उत्तरेस अमूर नदीच्या पलीकडे रशियात असणारी बरेवा श्रेणी म्हणजे या श्रेणीचाच विस्तारित भाग मानला जातो. शाऊ शिंगान लिंग श्रेणीची निर्मिती तुलनेने अर्वाचीन भूशास्त्रीय कालखंडात, नवीन स्तरित खडकरचना असलेल्या प्रदेशाचे उत्थापन होऊन झालेली आहे. अमूर, सुंगारी व नन नदीप्रणालींचा हा जलविभाजक आहे. या पर्वतश्रेणीतील हवामान काहीसे समशीतोष्ण, परंतु अधिक आर्द्र स्वरूपाचे असते. हिवाळे दीर्घ व अधिक थंड असतात. पर्वताच्या उत्तर भागात लार्च व भूर्ज प्रकारचे वृक्ष, तर दक्षिण भागात सीडार, स्प्रूस, भूर्ज, एल्म व लार्च हे मिश्र रुंदपर्णी व सूचिपर्णी वृक्ष आढळतात. दक्षिण भागात लाकडाच्या वाहतुकीसाठी काही लोहमार्ग काढले आहेत.

चौधरी, वसंत