शारी : उत्तर – मध्य आफ्रिकेतून वाहणारी व चॅड सरोवराला मिळणारी एक नदी. लांबी सुमारे १,४०० किमी. जलवाहन क्षेत्र ६,५०,००० चौ.किमी. मध्य आफ्रिका प्रजासत्ताकातील उच्च भूमीच्या प्रदेशात उगम पावणाऱ्या अनेक लहानलहान शीर्षप्रवाहांपासून शारी नदीची निर्मिती होते. त्यांपैकी बामिंग्गी, ग्रीबिंग्गी व ऊहाम हे प्रमुख शीर्षप्रवाह आहेत. आफ्रिकेतील अंतर्गत नदीप्रणालीमधील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. फॉर आर्शंबोजवळ शारी नदीला उजवीकडून सालामात, आऊक व केइटा या नद्या, एकमेकींना साधारणपणे समांतर दिशेने वाहत येऊन मिळतात. या नद्यांनी आपापल्या खोऱ्यांत पूरमैदानांची निर्मिती केलेली आहे. सालामात ही शारीची उपनदी सुदानमधील डारफुर प्रदेशात उगम पावते. या नदीला तिच्या मधल्या टप्प्यात इरो सरोवराकडून पाणीपुरवठा होतो. त्यानंतर ही नदी अनेक शाखांनी शारी नदीला मिळते. आऊक ही शारीची दुसरी उपनदी डारफुर प्रदेशात उगम पावते. चॅड व मध्य आफ्रिका प्रजासत्ताक यांच्या सरहद्दीवरून वाहत येऊन ती शारी नदीला मिळते. फॉर आर्शंबोच्या पुढे नियलिमजवळील उंचवट्याच्या भागात असणाऱ्याते द्रुतवाह प्रदेशातून वाहताना शारी नदीचे पात्र ५ ते ६·५ कि.मी. पर्यंत विस्तारते. चॅडची राजधानी अन्जामेना (फॉर्लामी) जवळ शारीला पश्चिमेच्या बाजूने लोगोन नदी मिळते. लोगोन व शारी बरेच अंतर एकमेकींना समांतर वाहत येतात. खालच्या टप्प्यात शारी नदी अनेक शाखांनी चॅड सरोवराला मिळते. त्यामुळे तिच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. चॅड देशातून शारी साधारणपणे वायव्य दिशेने वाहते. पावसाळ्यात शारीच्या ८४८ कि.मी. लांबीच्या प्रवाहातून जलवाहतूक चालते. ब्रिटिश समन्वेषक डिक्सन डेनम, ह्यू क्लॅपरटन व वॉल्टर ऑडने यांनी १८२३ मध्ये चॅड सरोवराचा शोध लावल्यानंतर शारी नदी माहीत झाली.                   

चौधरी, वसंत