शार, रने : (१४ जून १९०७ – १९ फेब्रुवारी १९८८). फ्रेंच कवी. जन्म व शिक्षण प्रॉव्हांस येथे. १९२० नंतर पॅरिसमध्ये वास्तव्य. तेथे अतिवास्तववादी साहित्यिकांच्या वर्तुळात तो त्या प्रणालीने प्रभावित झाला. ‘द हॅमर विदाउट अ मास्टर’ (१९३४, इं. शी.) हा त्याचा आरंभीचा महत्त्वाचा काव्यसंग्रह. त्यातील कवितांवर अतिवास्तववादी शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनांना प्रतिकार करणाऱ्या प्रॉव्हांसमधील गटाचे नेतृत्व त्याने केले.युद्धसमाप्तीनंतर त्याच्या काही उत्कृष्ट कविता सल्‌ दमेर (१९४५) आणि फय्ये दिप्नॉस (१९४६, इं. शी. लीव्ह्‌ज ऑफ हिप्नॉस) ह्या काव्यसंग्रहांतून प्रसिद्ध झाल्या. ह्या कवितांतून जर्मनांना प्रतिकार करण्याच्या काळातील अनुभव व्यक्त झाले आहेत. मानवतावादासारख्या काही चिरंतन मूल्यांचे दर्शनही ह्या कवितांतून घडते. युद्धातील मानवी क्रौर्याविरुद्धची तीव्र प्रतिक्रियाही त्यातून व्यक्त झाली आहे. ‘द अर्ली रायझर्स’ (१९५०, इं. शी.), ‘सर्च फॉर द बेस अँड द समिट’ (१९५५ इं. शी.), ‘कॉमन प्रेझेन्स’ (१९६४, इं. शी.) हे त्याचे अन्य काही कवितासंग्रह. त्याची संपूर्ण कविता ‘कंप्लिट वर्क्स’ (इं.शी., १९८३)मध्ये प्रसिद्ध झाली. अत्यंत मितभाषी, सूत्रसदृश आणि गद्याशी निकटचे नाते जोडणारी अभिव्यक्ती हा त्याच्या युद्धोत्तरकालीन कवितेचा लक्षणीय विशेष होय. तथापि त्यामुळे त्याची कविता काहीशी दुर्बोधही झालेली आहे.

पॅरिस येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.