शॅस्टा : (१) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी कॅलिफोर्निया राज्यातील कस्केड पर्वताचे एक शिखर. उंची ४,३१७मी. या भागात एकसारखी दिसणारी दोन शिखरे असून मैंट शॅस्टा या मुख्य शिखरापासून २·४किमी. अंतरावर, मुख्य पर्वताच्या पश्चिम उतारावर शॅस्टिना (उंची ३,७९० मी.) हे दुसरे शिखर आहे. हे शिखर व्हिटने, बोलान, व्हिंटन, हॉटलम व कोनवाकिटॉन या पाच हिमनद्यांचे उगमस्थान आहे. यांपैकी व्हिटने या सर्वांत मोठ्या हिमनदीची लांबी चार किमी. आहे. या हिमनद्यांपासून मॅक्क्लाउड, सॅक्रेमेंटो व शॅस्टा या नद्यांना पाणीपुरवठा होतो. नद्या व हिमनद्यांनी मौंट शॅस्टाची बरीच झीज केली आहे.
ब्रिटिश समन्वेषक व फरचा व्यापारी पीटर स्कीन ऑग्डन याने १८२७मध्ये या शिखराचा शोध लावला. स्थानिक शॅस्टा इंडियन लोकांवरून त्याने याला ‘शॅस्टा’ नाव दिले. कॅप्टन इ. डी. पर्स याने १८५४ मध्ये पहिल्यांदा हे शिखर सर केले.
शॅस्टाच्या लाव्हाशंकूच्या उतारावरील काही छिद्रांमधून वाफेचे लोट बाहेर येताना दिसतात तर काही ठिकाणी गरम पाण्याचे फवारे उसळत असतात. या पाण्याचे तापमान ८०० से. पर्यंत आढळते. मात्र शेकडो वर्षांपासून येथील ज्वालामुखी निद्रिस्त आहे. व्हिस्कीटाउन-शॅस्टा-ट्रिनिटी या राष्ट्रीय वन व मनोरंजन क्षेत्रामध्ये (क्षेत्र १६,९७२ हेक्टर) हा पर्वत असल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने याला विशेष महत्त्व आहे. पर्वतशिखरे व दऱ्या, मेडिसन सरोवर, शॅस्टा सरोवर, सॅक्रेमेंटो, शॅस्टा व मॅक्क्लाउड या नद्यांचे शीर्षप्रवाह तसेच त्यांच्या उपनद्या व सरोवरे ही या वनक्षेत्रातील प्रमुख निसर्गरम्य स्थळे आहेत. स्केटिंग करणाऱ्याची तसेच गिर्यारोहकांची ह्या पर्वतीय प्रदेशात बरीच वर्दळ असते. पर्वताच्या उतारावर २,४०० मी. उंचीपर्यंत रस्ता बांधण्यात आला आहे. पर्वताच्या नैर्ऋत्य पायथ्याजवळ मौंट शॅस्टा हे नगर असून, शॅस्टा राष्ट्रीय वनक्षेत्राचे ते मुख्यालय आहे.
(२) कॅलिफोर्निया राज्याच्या उत्तर भागातील सॅक्रेमेंटो नदीवरील एक धरण. जगातील सर्वांत मोठ्या काँक्रीटच्या धरणांमध्ये याची गणना होते. १९३८ – ४५ या काळात ते बांधण्यात आले. धरणाची लांबी १,०५५ मी., उंची १८४ मी. व पाण्याची साठवणक्षमता ५६,१०० लक्ष घ. मी. आहे. या धरणामुळे निर्माण झालेल्या शॅस्टा जलाशयाचे क्षेत्रफळ ११९ चौ.किमी. आहे. या धरणामुळे सॅक्रेमेंटो, पीट व मॅक्क्लाउड या नद्यांचे पाणी अडविले गेले आहे. देशाच्या मध्यवर्ती खोरे प्रकल्पांपैकी हे एक महत्त्वाचे धरण असून हा एक बहुउद्देशीय प्रकल्प असून, त्यामुळे सॅक्रेमेंटो नदीतून जलवाहतुकीसाठी आवश्यक ती पाण्याची पातळी कायम राखली जाते. जलसिंचन आणि जलविद्युतनिर्मिती (३,७९,००० किवॉ.), पूरनियंत्रण व ओसाड जमिनी लागवडीखाली आणण्याच्या दृष्टीने या धरणाचा उपयोग झाला आहे.
चौधरी, वसंत