शर्ली, जेम्स : ( ? सप्टेंबर १५९६– २९ ऑक्टोबर १६६६). इंग्रज नाटककार. जन्म लंडन शहरी. शिक्षण मर्चंट टेलर्स स्कूल, तसेच सेंट जॉंन्स कॉलेज ऑक्सफर्ड आणि सेंट कॅथरिन्स कॉलेज, केंब्रिज येथे. सेंट कॅथरिन्स कॉलेजमधून बी. ए. (सु. १६१७). त्याने धर्मोपदेशकाची दीक्षा घेतली होती, असे दिसते. त्यानंतर हर्टफर्डशर येथील ‘सेंट’ अँल्बन्स ग्रामर स्कूल’ मध्ये तो अध्यापन करू लागला. पुढे ही नोकरी सोडून तो लंडनला आला. तेथेच स्कूल ऑफ कॉंप्लिमेंट ही त्याची पहिली नाट्यकृती (प्रयोग १६२५ प्रकाशित १६३१) रंगभूमीवर आली. लवकरच त्याला राजदरबाराचा अनुग्रह आणि आश्रय लाभला. लंडनमध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमुळे तेथील नाट्यगृहे बंद पडल्यावर (१६३६) तो डब्लिनला आला आणि तेथील ‘जॉन ओगीलबाय. थिएटर’साठी नाट्यलेखन करू लागला. १६४० मध्ये तो लंडनला परतला आणि ‘किंग्ज मेन’ ह्या ख्यातनाम नाटक मंडळीसाठी त्याने पाचसहा नाटके लिहिली. पुढे इंग्लंडमध्ये यादवी युद्ध सुरू झाल्यानंतर शर्लीचे नाट्यलेखन थांबले. त्याने युद्धात राज्याच्या बाजूने भाग घेतला होता. १६४४ नंतर लंडनला येऊन तो पुन्हा आपला अध्यापनाचा व्यवसाय करू लागला. १६६६ साली लंडनमध्ये लागलेल्या प्रचंड आगीत शर्लीचे घर भस्मसात झाले. त्या आगीत तो स्वतःही भाजला. त्यातच त्याचे निधन झाले. सुखात्मिका, शोकसुखत्मिका, शोकात्मिक आणि ‘मास्क’ असे विविध प्रकारचे नाट्यलेखन त्याने केले. त्याच्या ३५ नाट्यकृती उपलब्ध आहेत. द विटी फेअर वन (प्रयोग १६२८ प्रकाशित १६३३) आणि द लेडी ऑफ प्लेझर (प्रयोग १६३५प्रकाशित १६३७) ह्या त्याच्या उल्लेखनीय सुखात्मिका. द विटी फेअर वनमध्ये धीट, स्पष्ट, पुरुषाच्या सहवासाची आवड असलेली पण हुशारीने वागणारी अशी एक आनंदी मुलगी त्याने रंगविली आहे. द लेडी ऑफ प्लेझर आणि नाटककार ⇨ रिचर्ड शेरिडन ह्याच्या द स्कूल फॉर स्कँडल (१७७७) ह्या दोन नाट्यकृतींत काही समान घटक आढळतात. आपले शहराबाहेरचे जीवन सोडून आपल्या नवऱ्याला शहरातले खर्चिक जीवन स्वीकारायला भाग पाडणाऱ्या एका स्त्रीला तिचा नवरा कसा ताळ्यावर आणतो हे द लेडी ऑफ प्लेझरमध्ये दाखविले आहे. त्याच्या शोकसुखात्मिकांत द ड्यूक्स मिस्ट्रेस (प्रयोग १६३६ प्रकाशित १६३८) आणि द डाउटफुल एअर (The Doubutful Heir, प्रयोग सु. १६३८) ह्या विशेष उल्लेखनीय होत. इंग्रज नाटककार ⇨ जॉन फ्लेचर ह्याची काही नाट्यलेखनतंत्रे त्याने कौशल्याने वापरली आहेत. द ट्रेटर (प्रयोग १६३१ प्रकाशित १६३५) व द कार्डिनल (प्रयोग १६४१ प्रकाशित १६५२) ह्या त्याच्या सर्वोत्कृष्ट शोकात्मिका. त्यांपैकी द कार्डिनल ही शोकात्मिका इंग्रज नाटककार जॉन वेब्स्टर ह्याच्या द डचेस ऑफ माल्फी (सु. १६४१) ह्या नाट्यकृतीचे स्मरण करून देते. द ट्रायंफ ऑफ पीस (प्रयोग आणि प्रकाशन १६३४) हा त्याचा सर्वोत्कृष्ट मास्क (गीत, नृत्य, नाट्य, संगीत, वेषांतरे इत्यादींनी युक्त असा मनोरंजक खेळ) होय. प्रख्यात ब्रिटिश वास्तुशिल्पज्ञ ⇨ इनिगो जोन्स ह्याने ह्या मास्कमधील देखाव्यांची निर्मिती केली होती.
भागवत, अ. के.