गोल्डिंग, विल्यम : (१९ सप्टेंबर १९११—   ). इंग्रज कादंबरीकार. जन्म न्यूक्वे, कॉर्नवॉल येथे. शिक्षण विल्टशर व ऑक्सफर्ड येथे. दुसऱ्या महायुद्धात त्याने नौदलात काम केले.

लॉर्ड ऑफ द फ्लाइज (१९५४) ही त्याची पहिली कादंबरी. तीन शाळकरी मुले निर्जन बेटावर फेकली जातात व तेथे त्यांच्यातील सुप्त, रक्तपिपासू वृत्ती जाग्या होऊन कशा वाढीला लागतात, हे ह्या कादंबरीत दाखविले आहे. माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्ती बंधमुक्त झाल्या, तर त्यांतून नाझी राजवटीसारख्या अरिष्टांचाच उगम कसा अट्ळ आहे, हे ह्या कादंबरीच्या आशयातून प्रत्ययास येते. पशुतुल्य मानवाचे संस्कारसंपन्न मानवात स्थित्यंतर, हा द इन्‌हेरिटर्स  ह्या कादंबरीचा विषय. मानवाचा दुष्टावा त्याच्या ज्ञानाशी निगडित असतो, अशी भूमिका ह्या कादंबरीत आढळते. आदिमानवास अनुरूप अशी भाषा लिहिण्यात गोल्डिंगने फार कौशल्य दाखविले आहे. पिंचर मार्टिनमध्ये (१९५६) मृत्युशय्येवरील एका भामट्या खलाशाच्या लोभी गतायुष्याची कहाणी येते. तीतून उभा केलेला पापाचा साक्षात्कार मध्ययुगीन नीतिकथेइतका प्रभावी वाटतो. फ्री फॉलमध्ये (१९५९) एका यशस्वी चित्रकाराच्या सुखलोलुप जीवनाचे दर्शन घडते. द स्पायरचा (१९६१) नायक एका चर्चवर कळस उभारण्याची कामगिरी स्वीकारतो. कळस हे मानवी संस्कृतीचे प्रतीक. ह्या संस्कृतीचा डोलारा कितीही भक्कम पायावर उभा केला तरी तो कोसळणारच, अशी कल्पना . दुखावलेल्या पाठीच्या कण्यानिशी पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत राहणाऱ्या एका हतबल प्राण्याच्या प्रतिमेतून आधुनिक मानवाच्या विकलावस्थेचे परिणामकारक दर्शन गोल्डिंग घडवितो.

गोल्डिंगच्या कादंबऱ्या रूपकात्मक आहेत. मानवाच्या (आदम आणि ईव्हकडून घडलेल्या) आद्य पापाची कल्पना त्यांच्या बुडाशी आहे. एका वैशिष्ट्यपूर्ण तत्त्वदृष्टीने संस्कारित झालेल्या भूमिकेवरून गोल्डिंगने निष्ठापूर्वक कादंबरीलेखन केले आहे. त्याच्या कादंबऱ्यांना फारशी लोकप्रियता लाभलेली नसली, तरी कादंबरीकार म्हणून त्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान समीक्षकांनी मान्य केले आहे.

हातकणंगलेकर, म. द.