शर्मा, पद्मसिंह : (? १८७६– ७ एप्रिल १९३२). एक प्रसिद्ध हिंदी साहित्य -समीक्षक आणि संपादक. साहित्य, भारतोदय, समालोचक, अनाथ रक्षक, परोपकारी इ. पत्रांचे संपादन त्यांनी केले. हिंदी समीक्षेला गुणदोषदर्शनाच्या पातळीवरून अधिक उंची देण्याचे कार्य करणाऱ्या आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी, मिश्रबंधू यांच्या बरोबरीने पद्यसिंह शर्मा यांचे नाव घेतले जाते. विशेषतः हिंदीमध्ये तौलनिक समीक्षेचा प्रारंभ करणाऱ्यांमध्ये पद्मसिंह शर्मा यांचे नाव गौरावाने घेतले जाते. १९०७ च्या सरस्वती पत्रिकेत बिहारी आणि फार्सी कवी सादी यांची तौलनिक समीक्षा त्यांनी केली. त्यांचा ‘भिन्न भाषाओंके समानार्थी पद्य’ नावाचा एक प्रदीर्घ लेख सरस्वतीच्या अनेक अंकांतून प्रकाशित झाला. त्याचबरोबर ‘भिन्न भाषाओंकी कविताका बिंब-प्रतिबंब भाव’ या शीर्षकाखालीही एक लेख त्यांनी लिहिला. यात भिन्न कवींच्या कवितेतील साम्यस्थळॆ स्पष्ट केली आहेत. बिहारीकी सतसई : तुलनात्मक अध्ययन या दर्जेदार ग्रंथात गाहा सत्तसई, आर्यासप्तशती, अमरुशतक यांचा तौलनिक अभ्यास आहे. मात्र बिहारीला झुकते माप देऊन त्याचे भावापहरण करण्याचा आरोप पद्यसिंह शर्मा यांच्यावर झाला. महाकवित्वाचे श्रेय घ्यायला महाकाव्य लिहायला हवे असे नाही तर स्फुट काव्यातूनही महाकाव्यत्व निर्माण होते, हा विचार उपयोगी झाला. त्यांनी आपल्या समीक्षेला मधूनमधून काव्यशास्त्राचा आधार दिला असला, तरी त्यांची एकूण समीक्षादृष्टी ही प्रभाववादीच होती. त्यांच्या आस्वादक वृत्तीमुळे आवश्यक ती तटस्थता त्यांना पाळता आली नाही. द्विवेदीयुगीन (१९०३–२०) साहित्यिकांत पद्यसिंह शर्मा शैलीकार निबंधलेखक मानले जात. नेहमीच्या व्यवहारातील, बोलण्याचालण्यातील ठसकेबाज भाषा आणि त्यात उर्दूची खुमारी यांमुळे त्यांच्या भाषेला डौलदारपणा आला आहे.   

  

बांदिवडेकर, चंद्रकांत