चंद बरदाई : (बारावे ते सोळावे शतक या दरम्यान). पृथ्वीराज रासो  या बृहत्काव्याचा कवी म्हणून चंद बरदाई (चंद वरदाई) प्रसिद्ध आहे. पृथ्वीराज रासोच्या साठांवर हस्तलिखित प्रती आढळल्या आहेत आणि या सर्व सोळाव्या शतकानंतरच्या असाव्यात असा तर्क आहे. सु. ५० वर्षे या ग्रंथाच्या ऐतिहासिकतेसंबंधी हिंदी विद्वानांत चर्चा व वादविवाद झालेले आहेत. उपलब्ध प्रतींत कोणती अधिकृत असावी, हाही वादाचा प्रश्न आहे. या ग्रंथात वर्णिलेल्या पुष्कळशा घटना ऐतिहासिक नाहीत, हे जवळजवळ मान्य झाले आहे. अर्थातच पृथ्वीराज रासो  नावाचा काव्यग्रंथ सोळाव्या शतकापूर्वीच लिहिला गेला असावा आणि त्यावरून अनेक प्रती निर्माण झाल्या असाव्यात, असे मानायला हरकत नाही. त्याचप्रमाणे ज्या अर्थी या सर्व प्रतींत कवी म्हणून ‘चंद’ चा उल्लेख आहे, त्या अर्थी मूळ ग्रंथ चंद बरदाईनेच लिहिला असावा, असे मानायलाही हरकत नाही.

हा चंद बरदाई पृथ्वीराज चौहानाचा समकालीन होता किंवा काय, याबद्दल हिंदी विद्वानांत मतभेद. अशा स्थितीत चंद बरदाईबद्दलची बरीचशी माहिती दंतकथांच्या रूपातच सापडते. असे सांगतात, की चंद बरदाई पृथ्वीराजाच्या दरबारात आश्रित कवी होता आणि पृथ्वीराजाचा तो भाट असला, तरी त्याचा जिवलग मित्रही होता. पृथ्वीराजाचा व चंद कवीचा जन्म एकाच दिवशी झाला आणि मृत्यूही एकाच समयी झाला, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. गझनी येथे शहाबुद्दीन घोरीच्या कैदेत असताना अंध झालेल्या पृथ्वीराजाने चंद कवीच्या सूचनेवरून शब्दभेदी बाणाने शहाबुद्दीन घोरीला ठार मारले आणि नंतर पृथ्वीराज व चंद या दोघांनी आत्महत्या केली, अशी दंतकथा आहे. चंद कवीला ज्वाला किंवा जालंधरी देवीचा वर लाभला होता, म्हणून ‘वरदायी’ असे त्याचे नाव पडले, असा समज आहे.

चंद बरदाईचा मूळ ग्रंथ पृथ्वीराज रासो  काव्यदृष्ट्या उत्तम ग्रंथ असावा व म्हणूनच त्याच्या उत्तरोत्तर अनेक प्रती झाला असाव्यात. चंद बरदाई हा स्पष्टवक्ता, निर्भीड, गंभीर स्वभावाचा होता. त्याच्या वाणीत ओजस्विता, प्रवाहीपणा आणि रसाळपणा आहे. वीर व शृंगार रसांची उत्तम अभिव्यक्ती त्याच्या काव्यात आढळते.

संदर्भ : १. गुप्त, माताप्रसाद, संपा. पृथ्वीराज रासउ, चिरगांव (झांशी), १९६३.

            २. द्विवेदी, हजारीप्रसाद सिंह, नामवर, संपा. पृथ्वीराजरासो (संक्षिप्त), अलाहाबाद, १९६१.

                            बांदिवडेकर, चंद्रकांत