शब्बाथ : शब्बात. ज्यू धर्मीयांच्या आचारधर्मानुसार आठवड्यातील शनिवार हा ईश्वराची आराधना करण्याचा, विश्रांतीचा (सुटीचा) दिवस. विश्रांती घेणे, कामापासून दूर राहणे ह्या अर्थाचा `शब्बात’ हा हिब्रू शब्द आहे. ⇨ मोझेसला ईश्वराने सांगितलेल्या डेकलॉग किंवा दशाज्ञांमध्ये (टेन कमांड्मेंट्स) शब्बाथ हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आज्ञा अंतर्भूत आहे. (एक्सोडस २०:८–११). सहा दिवसांत परमेश्वराने स्वर्ग, पृथ्वी आणि समुद्र निर्माण केला आणि सातव्या दिवशी त्याने विश्रांती घेतली त्यामुळे परमेश्वराने शब्बाथच्या ह्या सातव्या दिवसाला पावित्र्य बहाल केले, असा निर्देश एक्सोडसमध्ये आढळतो. ड्यूटेरोनॉमी वा पेंटाट्यूकच्या (‘जुन्या करारा’चे पहिले पाच भाग) पाचव्या भागात शब्बाथच्या दिवशी गुलामांनाही विश्रांती घेऊ द्यावी, असे म्हटले आहे. [→ बायबल़].
शब्बाथच्या दिवशी कोणती कामे बंद ठेवावयाची, ह्याबाबत ज्यूंच्या इतिहासात वेगवेगळे अर्थ लावण्यात आले आहेत. अन्न शिजवणे, भाजणे, अग्नी पेटविणे, लाकडे गोळा करणे यांसारखी ३९ प्रकारची कामे निषिद्ध ठरविण्यात आली होती. सनातनी ज्यू लोक परंपरेने घालून दिलेले आचारनियम काटेकोरपणे पाळतात.
सामान्यतः शब्बाथचा आनंद ज्यू लोक विशेष पोषाख करून, घरात दिवे उजळून, जेवणाचा खास बेत योजून व्यक्त करतात. शुक्रवारच्या सायंकाळी ज्यू गृहिणी आपल्या कुटुंबाच्या सुखासमाधानासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करते. ती दोन मेणबत्त्या उजळते. भोजणाच्या वेळी किददूश ही प्रार्थना परमेश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणतात. शुक्रवारच्या रात्री ⇨ सिनॅगॉगमध्ये ज्यू धर्मीय प्राथनेसाठी (सर्व्हिस) जमतात. शब्बाथच्या प्रत्येक दिवशी तोराचा थोडाथोडा भाग सिनॅगॉगमध्ये वाचतात. अशा प्रकारे एका वर्षात संपूर्ण तोरा वाचून पूर्ण करतात.
दर आठवड्यात एकदा येणाऱ्या शब्बाथखेरीज काही खास शब्बाथही असतात. उदा., शब्बाथ शेकालिन, शब्बाथ झारोख, शब्बाथ पाराह, शब्बाथ हा-गाडोल (इं. अर्थ ग्रेटशब्बाथ).
पाहा : ज्यू धर्म.
संदर्भ : 1. Goldman, Soloman, A Guide to the Sabbath, London, 1961.
2. Heschel, Abraham y3wuohua, The Sabbath : Its Meaning for Modern Man, New York, 1951.
3. Millgram, Abraham, Sabbath : The Day of Delight, Philadephia, 1944.
कुलकर्णी, अ. र.