शक्तिप्रेषण, विद्युत् : एका ठिकाणी निर्माण केलेली वीज दूरवर असलेल्या एका वा अधिक ठिकाणी पोहोचविण्याच्या प्रक्रियेला ‘विद्युत् शक्तिप्रेषण’ म्हणतात. यासाठी तारा, केबली यांसारख्या विद्युत संवाहकांची सुयोग्य पद्धत वापरतात व या पद्धतीला ‘प्रेषण मार्ग’ म्हणतात. विजेचा पुरवठा उघड्या विद्युत् संवाहक तारांमार्फत किंवा भूमिगत बंदिस्त तारा किंवा केबली यांच्यामार्फत करतात. प्रेषण मार्ग हा दोन ते चार स्वतंत्र वा वेगवेगळ्या संवाहक तारांचा संच असतो. वीज दीर्घ अंतरावर कार्यक्षम रीतीने पाठविण्यासाठी विद्युत् प्रवाहाचा दाब योग्य असावा लागतो. विद्युत् दाबाची पातळी आवश्यक तेवढी वाढविण्यासाठी ⇨ रोहित्रे वापरतात. विजेचा दाब वाढविल्याने प्रेषण मार्गातील प्रत्येक तार कमी आकारमानाची -जाडीची-वापरणे शक्य होते. यामुळे मूळ भांडवली खर्च कमी होतो. म्हणून शक्य तेवढ्या जास्त विद्युत् दाबावर चालविण्याच्या दृष्टीने प्रेषण मार्गाचा आराखडा तयार करतात. अशा प्रकारे सु. २० किमी. पर्यंतचे कमी लांबीचे प्रेषण मार्ग ३३ किलोव्होल्ट सु. २० ते १०० किमी. पर्यंतचे मध्यम लांबीचे प्रेषण मार्ग ३३ ते ६६ किलोव्होल्ट आणि त्याहून अधिक लांबीचे (दीर्घ) प्रेषण मार्ग ५०० किलोव्होल्टपर्यंतच्या विद्युत् दाबावर चालतील, अशा रीतीने त्यांचे आराखडे तयार करतात.

नीकोला टेस्ला या ऑस्ट्रियन –अमेरिकन विद्युत् अभियंत्यांनी विजेचा पुरवठा प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशांत वाहणाऱ्या) प्रवाहाच्या स्वरूपात करण्याची कल्पना सर्वप्रथम १८८१ मध्ये सुचविली आणि तिच्यामुळे विद्युत प्रेषण पद्धतीत क्रांतिकारक बदल घडून आले. प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचा विद्युत दाब रोहित्राच्या मदतीने जरुरीप्रमाणे कमी-अधिक करता येतो. प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाद्वारे विजेचा पुरवठा करताना प्रेषण मार्गातील संवाहक तारांमधील विद्युत् दाब आवश्यक त्या प्रमाणात वाढवून त्यांच्यामधील विद्युत् प्रवाह त्या प्रमाणात कमी करता येतो. परिणामी त्या तापून होणारी विजेची हानी कमी होते. हल्ली बहुतेक सर्व ठिकाणी प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाच्या त्रिकला पद्धतीचे तीन संवाहकांचे प्रेषण मार्ग वापरतात. यांतील प्रत्येक कला तिच्या स्वतःच्या आवेष्टनात अलग केलेली असते. कधीकधी प्रेषण मार्गाच्या धातवीय आवेष्टनात सल्फर हेक्झॅफ्ल्युओराइड (SF6)  हा विद्युत निरोधक वायू दाबाखाली भरलेला असतो. एकदिश विद्युत् प्रवाह पद्धतीचे प्रेषण हे अतिउच्च दाबाने ५०० – ६०० मेवॉ. अथवा त्याहून जास्त शक्तीने कित्येक दशलक्ष युनिट (एम. यू.) ऊर्जा लांब अंतरावर प्रेषण करण्यासाठी वापरात आणले जाते. त्या संप्रणालीला एचव्हीडीसी (HVDC) म्हणतात.

विद्युत् प्रेषणात वापरली जाणारी जनित्रे, रोहित्रे व संवाहक तारा ही सामग्री स्विचांनी विद्युत् मंडल खंडकांनी परस्परांशी जोडलेली असते. यामुळे दुरुस्तीसाठी व बदलण्यासाठी ही सामग्री वेगळी करता येते आणि मंडल संक्षेपापासून (शॉर्ट सर्किटपासून) तिचे रक्षण होऊ शकते. मंडल संक्षेप टाळण्याचे काम विद्युत मंडल खंडकांमार्फत आपोआप होते. तैलयुक्त विद्युत् मंडल खंडकांत मंडल संक्षेपातून निर्माण होणारी विजेची ठिणगी तेलामध्ये विझविली जाते. हवायुक्त विद्युत् मंडल खंडकात अशी ठिणगी हवेच्या स्फोटाद्वारे अथवा चुंबकीय क्षेत्राने ती बाहेर हवेत खेचली जाऊन विझते. सर्वात नवीन प्रकारच्या विद्युत मंडल खंडकात ठिणगी विझविण्यासाठी उत्कृष्ट विद्युत् निरोधक सल्फर हेक्झॅफ्ल्युओराइड वायूचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रतिक्रियाकारकांत जाड संवाहकांचे (तारांचे) वेढे असतात. त्यांच्यामुळे मंडल संक्षेप प्रवाहांचा ओघ कमी होतो व ते विद्युत् मंडल खंडकाने अटकाव होण्याएवढ्या पातळीवर येतात .[⟶ विद्युत् मंडल खंडक].

उघड्या संवाहक तारांचा प्रेषण मार्ग : वीज पुरवठा केंद्रापासून खांबांवरून व मनोऱ्यावरून नेलेल्या उघड्या संवाहक तारांच्या या प्रेषण मार्गाचा आराखडा तयार करताना पुढील प्रमुख मुद्दांचा विचार करतात : संवाहकांतील विजेचा दाब, त्यांची लांबी व त्यांच्यामार्फत पाठविण्यात येणाऱ्या विजेची राशी, सुट्या संवाहक तारा, दोन खांबांदरम्यान किंवा मनोऱ्यादरम्यान संवाहक तारांना द्यावयाचा झोल, तसेच खांब, मनोरा, निरोधक आधार वगैरे.

दिलेल्या ठरावीक लांबीच्या प्रेषण मार्गाने विशिष्ट विद्युत् दाबाने विजेची जास्तीत जास्त ठरावीक राशी पाठविता येते. त्याहून अधिक वीज पाठविण्यासाठी प्रेषण मार्गावरील विद्युत् दाब रोहित्राने वाढवावा लागतो. प्रेषण मार्गाची लांबी व त्याच्यामार्फत पाठवावयाची विजेची राशी निश्चित केल्यावर त्या मार्गाचा विद्युत् दाब ठरविता येतो. तो ठरविल्यावर संवाहक तारांचे योग्य आकारमान ठरवितात.

प्रेषण मार्गातील सुटे विद्युत् संवाहक अनेक तारा एकत्र वळून बनविलेल्या दोरासारखे असतात. अर्थात कमी लांबीचे प्रेषण मार्ग याला अपवाद आहेत. हे संवाहक तांब्याच्या, अँल्युमिनिअमाच्या किंवा पोलादी गाभा असलेल्या अँल्युमिनिअमच्या तारांचे बनविलेले असतात. तांब्याची विद्युत् संवाहकता व ताण सहन करण्याची क्षमता जास्त असल्याने प्रेषण तारांसाठी तांबे आदर्श आहे मात्र ते महाग असल्याने मूळ भांडवली खर्च वाढतो. अँल्युमिनिअम हे तांब्यापेक्षा स्वस्त व वजनाला हलकेही आहे. मात्र अँल्युमिनिअमाची विद्युत संवाहकता तांब्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे दिलेला विद्युत् प्रवाह वाहून नेण्यासाठी अँल्युमिनिअम संवाहकाचे आकारमान मोठे ठेवावे लागते. प्रेषण मार्गाच्या एकूण खर्चातील विद्युत् संवाहकांवरील खर्चाचा वाटा मोठा असल्यास अँल्युमिनिअमाचे संवाहक वापरणे गरजेचे असते. पोलादी गाभा असलेल्या अँल्युमिनिअमाच्या तारांचे वजन तेवढ्याच आकारमानाच्या तांब्याच्या तारांपेक्षा कमी असते. त्यांची ताण सहन करण्याची शक्ती जास्त असून किंमतही कमी असते. विद्युत् संवाहकता कमी असल्याने त्यांचे आकारमान तांब्याच्या तारांपेक्षा मोठे ठेवावे लागते. यामुळे त्यांच्याभोवती उत्पन्न होऊ शकणाऱ्या निळसर प्रकाशवलयाच्या म्हणजे कोरोनाच्या संदर्भात या प्रेषण तारांमधील कमाल विद्युत् दाबाची मऱ्यादा ३० ते ५० टक्क्यांनी वाढविता येते. भारतात असेच संवाहक सर्वत्र वापरले जातात.

उच्च विद्युत् दाबाच्या तारेमुळे तीव्र विद्युत् क्षेत्र निर्माण होते. त्यामुळे सभोवतालच्या हवेचे आयनिभवन होते म्हणजे तिच्यातील अणू, रेणू, व अणुगट विद्युत भारित होतात. यामुळे फिकट निळसर विद्युत् विसर्जनाच्या रूपातील प्रकाशवलय निर्माण होते. हे प्रकाशवलय विजेच्या हानीचे निदर्शक असून त्याच्यामुळे श्राव्य गोंगाट निर्माण होऊ शकतो. आणि पऱ्यायाने रेडिओ व दूरचित्रवाणी प्रेषणात व्यत्यय येऊ शकतो. गुळगुळीत पृष्ठभागाचे विद्युत संवाहक व अधिक प्रभावी पृष्ठफळ असणारी तार वापरून हा दोष कमी करता येतो, तसेच अधिक मोठा विद्युत् संवाहक वापरून हे साध्य होते. मात्र अतिशय उच्च विद्युत दाब असताना प्रत्येक कलेसाठी दोन ते चार सुटे विद्युत् संवाहक वापरून हे साध्य होते.

प्रेषण मार्गातील संवाहकांवर त्यांचे स्वतःचे वजन, वारा आणि तारांवर बर्फ गोठणे शक्य असलेल्या ठिकाणी बर्फाचे वजन यांचे दाब पडतात. हे दाब विचारात घेऊन दोन खांबांमधील तारेला किती झोळ येईल ते काढता येते.

कोणत्याही परिस्थितीत दोन तारांचा एकमेकींना स्पर्श होऊन मंडलसंक्षेप होऊ नये म्हणून दोन तारांमधील अंतर ११ किलोव्होल्ट विद्युत् दाबापर्यंत ८० सेंमी. पेक्षा जास्त ठेवतात. यापेक्षा जास्त विद्युत् दाबांसाठी हे अंतर किती ठेवावे हे समजण्यासाठी सेमी. मधील किमान अंतर = २० + ०· ००३२ x व्होल्टमधील विद्युत् दाब, हे सूत्र वापरतात. त्यानुसार २० किलोव्होल्ट विद्युत् दाबासाठी दोन तारांमधील किमान अंतर ८४ सेंमी. (२० + ०·००३२ x २०,००० = २० + ६४) येते.

लाकडी, क्रॉंक्रीटच्या किंवा पोलादी खांबांवरून किंवा पोलादी मनोऱ्यावरून संवाहक तारा नेतात. विद्युत् दाब २२ किलोव्होल्टपर्यंत व खांबांमधील अंतर ६० मी. पर्यंत असल्यास लाकडी वा काँक्रीटचे खांब वापरतात. लाकडी खांब इंग्रजी कॅपिटल ए (A) वा कॅपिटल एच (H) या आकारांचे असतात. लाकूड उपलब्ध नसल्यास ३३ किलोव्होल्ट विद्युत् दाबापर्यंत पोलादी खांब वापरतात. ६६ किलोव्होल्टपेक्षा जास्त विद्युत् दाबाच्या तारांसाठी पोलादी खांब वापरतात. त्यांच्यावरून एकेरी वा दुहेरी प्रेषण मार्ग नेता येतात. दोन मनोऱ्यातील अंतर ३०० मी. किंवा अधिकही असते. दोन मनोऱ्यामधील कमाल झोळ असलेला बिंदू जमिनीपासून किमान ६ मी. उंचीवर राहील अशा प्रकारे मनोऱ्याची उंची ठरवितात. यामुळे तारा व जमीन यांत पुरेसे अंतर राहते.

प्रेषण मार्गाची प्रवर्तकता (इंडक्टन्स) कमी करण्यासाठी त्यातील तिन्ही संवाहकांच्या जागा अंतराअंतराने उलटपालट अशा बदलून ठेवतात. एका किंवा लगतच्या दोन विद्युत् मंडलांमध्ये खुद्द त्याच्यातील किंवा दुसऱ्यातील विद्युत् प्रवाह बदल्यास विद्युत् चुंबकीय प्रवर्तनाने त्याच्यात किंवा दुसऱ्या विद्युत् मंडलात विद्युत् प्रवाह वाहण्यास कारणीभूत असणारी विद्युत् चालक प्रेरणा निर्माण होणे म्हणजे प्रवर्तन व या गुणधर्माला ‘प्रवर्तकता’ म्हणतात विद्युत् चालक प्रेरणा व विद्युत् बदलण्याची त्वरा यांचे गुणोत्तर म्हणजे ‘प्रवर्तन’ होय. ३५० किलोव्होल्टपेक्षा जास्त विद्युत दाबामुळे रेडिओत निर्माण होणारा व्यत्यय कमी करण्यासाठी व त्याचे रोधन कमी करण्यासाठी प्रत्येक कलेसाठी संवाहक संच वापरतात. प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह मंडलाच्या संरोधाचा परिकल्पित (गृहीत) भाग म्हणजे रोधन असून विद्युत् प्रवाहाला मंडलाकडून होणाऱ्या एकूण विरोधकाला संरोध म्हणतात. ६०० किलोव्होल्टपर्यंत २ ते ३ तारांचा व त्याहून जास्त विद्युत् दाबासाठी ३ ते ४ तारांचा संवाहक संच प्रत्येक कलेसाठी वापरतात.


चिनी मातीच्या किंवा बहुवारिकाच्या विद्युत् निरोधक आधारांच्या साहाय्याने संवाहक तारा खांबांवर वा मनोऱ्यावर टांगलेला असतात. हे आधार खिळींवर (पिनांवर) बसविलेले किंवा लोंबकळणारे अथवा ताणधारक (ताण दिलेल्या) प्रकारचे असतात. सामान्यपणे ५० किलोव्होल्टपर्यंत खिळींवर बसविलेले विद्युत् निरोधक वापरता येतात. दोन किंवा अधिक विद्युत् निरोधक एकमेकांना एकसरीत जोडून लोंबकळणारे विद्युत् निरोधक बनविलेले असतात आणि त्यांतील प्रत्येक निरोधक साधारणपणे ११ किलोव्होल्ट विद्युत् दाबासाठी बनविलेला असतो. तारांमधील विद्युत् दाबानुसार त्यांची संख्या ठरवून त्यांची साखळी किंवा माळ केलेली असते. यामुळे ते कितीही मोठ्या विद्युत् दाबांसाठी वापरता येतात. ही माळ संवाहक व आधार देणारी रचना यांच्या दरम्यानच्या ‘गळती’ला अटकाव होण्यासाठी पुरेशी लांब असावी लागते. ताणधारक विद्युत् विरोधक तारेच्या शेवटच्या टोकाला अथवा जेथे तारेची दिशा बदलते, तेथे तारेमधील ताण घेण्यासाठी वापरतात. विद्युत् निरोधक आधार व संवाहक तारा यांच्यामुळे येणारा एकूण ताण समजल्यावर मनोऱ्याचा अभिकल्प तयार करता येतो.

विद्युत् वाहक तारांचे तडिताघातापासून रक्षण करण्यासाठी मनोऱ्याच्या माथ्यावर कला संवाहकांच्या वर परिरक्षक तारा बसविलेल्या असतात [⟶ तडित संरक्षण]. ताडिताघातामुळे परिरक्षक तारांमध्ये निर्माण होणारा उच्च विद्युत् प्रवाह व विद्युत् दाब तडित निवारकामार्फत जमिनीकडे वाहून नेले जातात. यामुळे रोहित्रासारख्या मूल्यवान सामग्रीचे नुकसान होत नाही. नेहमीचे विद्युत प्रवाह व दाब यांच्या बाबतीत तडित निवारक उघड्या फटीप्रमाणे कार्य करतात. मात्र तडिताघाताशी निगडित विद्युत् प्रवाह व दाब असताना तडित निवारक अतिशय संवाहक बनतात. स्विचिंग करताना किंवा सामग्री निष्फळ ठरल्यावरही ( काम करीनाशी झाल्यावरही ) जादा विद्युत् दाबाचा असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

संवाहक तारांची कार्यक्षमता ठरविण्यासाठी त्यांच्यातून होणारी विजेची हानी (ऱ्हास) विचारात घेतात. विद्युत् रोधाने विजेचे उष्णतेत रूपांतर होऊन हानी होते. प्रकाशवलय निर्मितीनेही हानी होते. अशी हानी अल्प असल्याने ती विचारात घेत नाहीत. संवाहक तारांची कार्यक्षमता काढण्यासाठी त्यांच्यामधून पाठविलेल्या किलोवॉट विजेतून विजेची एकूण हानी वजा करून येणाऱ्या वजाबाकीला पाठविलेल्या एकूण किलोवॉट विजेने भागतात. जास्त लांबीच्या व जास्त विद्युत् दाबाच्या तारांमध्ये धारकतेमुळे मुख्य विद्युत् प्रवाहाशिवाय भारक प्रवाह वाहतो व तारांमधील एकूण विद्युत् प्रवाह वाढतो. म्हणून या बाबतीत विजेच्या हानीचे वरील सूत्र लागू पडत नाही. उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या प्रेषण तारांमधून विजेची एकूण हानी कमी होते व त्यांची कार्यक्षमता जास्त असते. तारांमधून विद्युत् प्रवाह वाहताना रोध व प्रवर्तकता यांच्यामुळे विजेच्या दाबात होणाऱ्या घटीला ‘नियमन’ म्हणतात.

प्रेषण मार्गाची नियमितपणे तपासणी करतात. यामुळे सेवेत खंड पडू शकणारी परिस्थिती लक्षात येते. अशा तपासणीसाठी हेलिकॉप्टर व सर्व प्रकारच्या भूप्रदेशांत वपरता येणारी वाहनेही वापरतात.

सर्वसाधारणपणे प्रेषण मार्गाच्या दुरुस्तीचे काम विद्युत् प्रवाह बंद करून करतात. बहुधा सेवेत खंड पडू न देता अशी दुरूस्ती करतात. त्यासाठी सदोष भाग लगेचच सेवेतून अलग केला जातो व उरलेली सेवा प्रणाली नेहमीसारखी चालू राहते. अशा वेळी दुरूस्ती करणारे कर्मचारी उंच विद्युत् निरोधक स्तंभाच्या टोकावर दुरूस्तीचे काम करतात. याकरिता लागणारी हत्यारे कर्मचाऱ्याना जलप्रेरित रीतीने वर उचलून धरलेल्या विद्युत् निरोधक बादल्यांमधून किंवा मुख्य रचनेला बांधलेल्या विद्युत् निरोधित फलाटांवरून घेता येतात.

प्रेषण मार्गाच्या देखभालीचे एक नवीन तंत्र पुढे आले असून त्याला ‘उघड्या हाता’चे तंत्र म्हणतात. कारण यात कर्मचारी विद्युत् वाहक तारांची दुरूस्ती विद्युत् निरोधक हातमोजे न घालता उघड्या हातांनी करतो. जमीन किंवा मुख्य रचना यांच्यापासून कर्मचारी विद्युत् निरोधक केलेला असतो म्हणजे त्यांच्यात विद्युतीय संपर्क उरत नाही. शिवाय तो आपला विद्युत् संवाहक पोषाख विद्युत् वाहक तारांना जोडून विद्युत् मंडलाचाच एक भाग बनतो. म्हणून तो उघड्या हातांनी काम करू शकतो आणि विद्युत् वाहक तारेवर बसणाऱ्या पक्ष्याएवढाच तो सुरक्षित असतो.

प्रत्येक प्रेषण तारेच्या दोन टोकांशी उभारलेल्या संरक्षक प्रणालींद्वारेही दोष काढून टाकण्याचे काम केले जाते. या प्रणालीत विद्युत् मंडल खंडक, अभिचलित्रे आणि विद्युत् प्रवाह व विद्युत् दाब रोहित्रे (ऊर्जापरिवर्तक) असतात. दोष निर्माण झाल्यावर बदलत्या परिस्थितीनुसार अभिचालित्रांचे कार्य घडते. परिणामी विद्युत् प्रवाह व विद्युत दाब रोहित्रांच्या प्रदानांत बदल घडून येतो आणि संरक्षण प्रणाली ज्या भागासाठी आहे, त्या भागात दोष आहे की नाही ते निश्चित होते. दोष या भागात असल्यास अभिचलित्रे व पऱ्यायाने विद्युत् मंडल खंडक यांच्यामार्फत प्रेषण तारेचा हा एक भाग उर्वरित विद्युत् जाळ्यांपासून त्याच्या टोकांपाशी अलग होतो. सर्वोच्च कार्यकारी विद्युत् दाब असताना ही संरक्षणाची संपूर्ण क्रिया दोष निर्माण झाल्यापासून सु. ३० ते ५० मिलि सेकंदांमध्ये पूर्ण होऊ शकते. प्रेषण तारांमधील बहुतेक दोष तात्पुरत्या स्वरूपाचे असतात आणि दोष नाहीसा झाल्याची चाचणी घेण्यासाठी संरक्षण प्रणालीकडून त्या प्रेषण तारेत परत ऊर्जा पाठविण्याचा प्रयत्न आपोआप केला जातो. सुमारे ८० टक्के दोष यशस्वी रीतीने दूर होतात आणि प्रत्यक्ष वीज वापरणाऱ्याच्या ते कधीही अक्षात येत नाहीत.

भूमिगत प्रेषण तारा : उघड्यावरील प्रेषण तारा जेथे जोखमीच्या वा धोकादयक ठरू शकतील अशा गर्दीच्या शहरी भागांत भूमिगत प्रेषण तारा टाकणे सोयीचे असते. भूमिगत प्रेषण तारांचा वातावरणीय आविष्कारांशी संबंध येत नाही. पुरामुळेही सर्वसाधारणपणे भूमिगत तारा विस्कळीत होत नाहीत. मात्र भूमिगत तारांसाठी चर खोदणे, तपासकुंड्या बांधणे, निचऱ्याची सोय करणे आणि विद्युत् निरोधक केबल वापरणे यांची आवश्यक असते. यामुळॆ भूमिगत प्रेषण तारा टाकण्यास उघड्या प्रेषण तारा टाकण्यापेक्षा अधिक खर्च येतो. जमिनीखालील पाण्याचे नळ, इंधन वायूचे नळ, दूरध्वनीच्या केबली व सांडपाण्याचे नळ यांच्यामधून भूमिगत प्रेषण तारा टाकायला अधिक खर्च येतो.

भूमिगत केबल घालताना जमीन पुरेशी थंड राहील, याची दक्षता घेतात. अशा जमिनीतून केबलमधून होणारी विजेची गळती दूरवर वाहून नेली जाते. कारण केबल जादा तापल्यास तिची वीज वाहून नेण्याची क्षमता कमी होते. याकरिता खास भरण द्रव्य वापरतात. तापमानातील बदलाने एकेकटी केबल प्रसरण वा आकुंचन पावते. केबलींच्या लांबीमधील असे बदल सामावून घेण्यासाठी तापसकुंड्या पुरेशा लांब असाव्या लागतात. तपासकुंड्या बहुधा ३·६ ते ६·५ मी. लांब असतात.

उच्च विद्युत् दाबासाठी वापरण्यात येणाऱ्या केबलींमध्ये विद्युत् निरोधनासाठी कृत्रिम रबरे किंवा बहुवारिके, पॉलिएथिलीन व तैलपूरित कागद वापरतात. विद्युतीत गुणधर्मांमुळे रबरे ७० किलोव्होल्टपर्यंतच्या कमी विद्युत दाबाच्या मऱ्यादेत वापरता येतात. पॉलिएथिलीन २३० किलोव्होल्ट विद्युत् दाबापर्यंत वापरता येतात. संवाहकांवर पॉलिएथिलिनाचे बहिःसारण (दाबसारण) करतात व जोड वा सांधे पूर्वरचित असतात. यामुळे केबल प्रणाली साधी व बळकट होते. ११५ किलोव्होल्ट व अधिक अशा उच्चतर विद्युत् दाबासाठी कागद हे सर्वात चांगले निरोधक द्रव्य आहे. संवाहक (तारा) तांब्याचा/अँल्युमिनियमाच्या असून त्यांच्याभोवती कागदाच्या पट्ट्या सर्पिल रीतीने गुंडळतात. नंतर संवाहक तापवितात व सुकवितात. त्यानंतर विद्युत् निरोधक तेल त्यात घुसविण्यात वा मुरविण्यात येते. ७० किलोव्होल्टपर्यंत वापरावयाची एकटी संवाहक तार किंवा तीन तारांचा जुडगा बहिःसारित शिशाने आवेष्टित करून ‘भरीव केबल’ तयार करतात.

अधिक उच्च विद्युत् दाबाखाली भरीव केबल पुरेशी योग्य नसते. कारण तिच्यात निरोधक द्रव्याच्या आत सूक्ष्म पोकळ्या तयार होतात. या पोकळ्यांच्या आत आयनीभवन होते. त्याच्या निरोधकावर परिणाम होऊन अखेरीस निरोधक द्रव्य भंग पावते. ‘स्वयंपूर्ण केबली’त पोकळ सर्पिल नलिकेतून किंवा मुख्य पोकळ संवाहकातून तिच्या संपूर्ण लांबीभर विद्युत् निरोधक तेल पसरविले जाते. या तेलावर दाब दिलेला असल्याने निरोधक द्रव्यातील प्रत्येक पोकळी या तेलाने भरली जाऊन आयनीभवनास प्रतिबंध होतो. काही वेळा केबलीत तेलाऐवजी दाब दिलेला नायट्रोजन वायू वापरतात. शिशाचे आवेष्टन अंतर्गत दाबाला टिकून राहण्यासाठी ते धातूच्या फितीने प्रबलित करतात.

‘नलिकासदृश’ केबलरचनेत कागदाने निरोधित केलेल्या संवाहकांवर प्रथम धातूची फीत गुंडाळतात व नंतर सर्पिल रीतीने विशिष्ट तार गुंडाळतात. असे तीन संवाहक पोलादी नळात एकत्र आणून त्या नळात दाबाखाली तेल भरतात. सामान्यपणे हे तेल नळाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरत असते. तेलाच्या अशा अभिसरणाने संवाहक थंड राहतो व वाढीव विद्युत् भार वाहून नेऊ शकतो.

कागदाने निरोधित केलेल्या केबलीचे जोडण्याचे काम अत्यंत कुशलतेने करावे लागते. तपासकुंडीत संवाहक परस्परांना जोडल्यावर सांध्याच्या आतील विद्युतीय ताणाच्या नियंत्रणासाठी त्याच्यावर तैलपूरित क्रेप (चुणीदार) कागदाची फीत लावतात.

पाहा : अभिचलित्र केबल निरोधन, विद्युत् प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह प्रेषण मार्ग रोहित्र विद्युत् संवाहक.

संदर्भ : 1. Liboff, R. L Dalman, G.C. Transmission Lines, Waveguides, and Smith Charts, 1985.

           2. Stevenson, (Jr.), W. D. Elements of Power System Analysis, 1982.

वीरकर, द. वि.