बालरंगभूमि : खास बालकांसाठी बालनाट्य सादर करणारी रंगभूमी. बालरंगभूमी ही बालांची रंगभूमी नसून बालांसाठी असलेली रंगभूमी आहे. बालरंगभूमीवरील नाटकात कथानकाच्या आवश्यकतेनुसार बालकलाकार असू शकतात परंतु अशा नाटकातील सर्वच प्रौढ आणि बाल व्यक्तिरेखा बालांनी साकार करणे, म्हणजेच बालरंगभूमी असे मानणे मात्र गैर ठरते. बालप्रेक्षकांत सामान्यपणे किशोरावस्थेपर्यंतच्या मुलामुलींचा अंतर्भाव होतो. असा बालप्रेक्षक, बालनाट्य व त्याचा रंगभूमीवरील प्रयोग हे बालरंगभूमीचे महत्त्वाचे घटक होत. मनोरंजनातून उद्बोधन हे बालरंगभूमीचे उद्दिष्ट असते.

बालनाट्याचे स्वरुप : बालरंगभूमीवर सादर होणारे बालनाट्य हा वरवर सोपा भासणारा परंतु प्रत्यक्षात अतिशय कठीण असा स्वतंत्र लेखनप्रकार आहे. मुलांच्या कल्पनाविश्वातील विषय, त्यांना रुचतील अशा रीतीने सूत्रबद्ध आणि घटनाप्रधान कथानकात मांडल्यास उत्तम बालनाट्य आकाराला येते. कथानक देशी की परदेशी परिचित की अपरिचित सामाजिक, काल्पनिक, ऐतिहासिक की पौराणिक हे मुद्दे गौण ठरतात. अद्भुतरम्यता, वास्तवता, नवीन गोष्टींची माहिती यांचे स्वागत मुले सारख्याच तीव्रतेने करतात. प्रौढांच्या नाटकांना विषयाचे बंधन नसते परंतु हसतखेळत सुसंस्कार करणे हे बालनाट्याचे ध्येय असल्यामुळे त्याच्या विषयांना मर्यादा पडतात. शोकात्मिकेसारखे नाट्यप्रकार बालरंगभूमीवर सहसा सादर करण्याची प्रथा नाही.मुलांना विनोद व साहस यांची आवड असते. त्याचप्रमाणे सर्वसाधारण बालप्रेक्षक संवेदनक्षम आणि अनुकरणप्रिय असतो. बालनाट्यातील अतिरंजितता, भडकपणा तो सहजपणे ओळखतो. अयोग्य प्रसंगांकडे तो तटस्थतेने पाहू शकत नाही. म्हणूनच बालनाट्य काटेकोरपणे हातळावे लागते. उदा., बालनाट्यात नायकनायिकेचे प्रेम असल्यास ते निरागस मैत्रीतूनच दाखवावे लागते. रहस्यमय बालनाट्यात उत्कंठापूर्ण भीती आवश्यक असते परंतु अनावश्यक भयानकता बालमनावर विपरीत परिणाम करते. प्रौढांना उदात्त वाटणारे विषय मुलांच्या दृष्टीतून गंभीर, मानसिक तणाव उत्पन्न करणारे असतात. तसेच ‘आदर्श’ उभे करण्याच्या प्रयत्नात एखादे पात्र सर्व गुणसंपन्न दाखविल्यास बालप्रेक्षकांना ते रुचत नाही. बालनाट्यात भाषाणातून आदर्श दाखविण्याऐवजी तो कृतीतून दिसावा लागतो. तसेच वास्तवतेच्या नावावर अयोग्य प्रसंग बालप्रेक्षकांसमोर उभे करणे हेही अनुचितच. एकूण बालरंगभूमी बालांसाठी असली, तरी तिची प्रगती व विकास प्रौढांच्या हातूनच होणे योग्य होय.

बालरंगभूमीचे तंत्र : बालप्रेक्षकांच्या नाट्यप्रयोगविषयक कल्पनांमध्ये प्रौढ रंगभूमीप्रमाणेच नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत इ. गोष्टींचा समावेश असतो. म्हणूनच कथानकाला उठाव देणारी व नाट्यप्रयोगाच्या परिणामकारकतेत भर घालणारी तांत्रिक अंगे बालरंगभूमीवर आवश्यक ठरतात. नेपथ्याच्या बाबतीत दोन मतप्रवाह दिसून येतात. एक म्हणजे, कलात्मक आनंद व चांगल्या दर्जाचा खराखुरा नाट्यानुभव घेण्यासाठी बालप्रेक्षकांनी सुसज्ज अशा प्रेक्षागृहात बसून बालनाट्य पहावे कारण तेथे त्यांचे कल्पनाविश्व नेपथ्य वा प्रकाशयोजना आदींसह जास्तीत जास्त यथार्थपणे मांडण्याचा प्रयत्न होतो. या दृष्टिकोनानुसार बालरंगभूमी व शालेय रंगभूमी या वेगळ्या आहेत, हे सूचित करण्यात येते आणि दुसरी भूमिका अशी की, बालनाट्यातील नेपथ्य डोळ्याना सुखविणारे असले, तरी बोजड नसावे नाहीतर ते नाटकच नष्ट करते. बालरंगभूमी ही शालेय रंगभूमीच्या जास्तीत जास्त जवळ जावी, हा या भूमिकेमागील हेतू होय. याभूमिकेनुसार एखादा खांब दाखवून राजवाडा सूचित करणारे नेपथ्य मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे ठरते परंतु यामुळे शाळेच्या सभागृहाच्या मर्यादा लक्षात घेऊनच बालनाट्यनिर्मितीचा विचार करावा लागतो. 

मराठी बालरंगभूमी बऱ्याच अंशी तांत्रिक दृष्ट्या समृद्ध आहे. पाश्चात्त्य बालरंगभूमीवर ‘सिंड्रेलाला घेऊन येणारा रथ’ रंगमंचावर प्रकटतो तर आपल्याकडे अल्लादीनचा उडता महाल, ‘तिळा तिळा दार उघड’ म्हणताच उघडणारी अलीबाबाची गुहा वा यमुनेच्या डोहातील कालियामर्दन यांसारख्या तांत्रिक करामती नेपथ्य व प्रकाशयोजनेद्वारा बालरंगभूमीवर यशस्वी ठरल्या आहेत.

बालनाट्यातील पात्रे मोकळा अभिनय, बोलक्या हालचाली, प्रंसगी विशिष्ट लकबी यांद्वारा बालप्रेक्षकांपुढे उभी करावी लागतात परंतु मोकळेपणाच्या नावाखाली येणारी कृत्रिमता बालप्रेक्षकांना रुचत नाही. एक वेळ प्रौढ प्रेक्षक कृत्रिम अभिनय सहन करू शकतो परंतु अभिनयातील कृत्रिमता जाणताच बालप्रेक्षक नाटकापासून अलिप्त होतो. म्हणूनच बालनाट्यातील अभिनय प्रत्ययकारी असावा लागतो. बालप्रेक्षकांना ‘बजरबट्टूचे’ किंवा ‘अल्लादीनचे’ काम करणारा कलाकार कोण आहे, याचे मुळीच महत्त्व नसते. त्यांच्या दृष्टीने ‘बजरबट्टू’ हा ‘बजरबट्टू’ किंवा ‘अल्लादीन’ हा ‘अल्लादीन’ च असतो.

बालनाट्यातील प्रसंग-घटना खुलविण्यासाठी गाण्यांचा उपयोग केला जातो बालनाट्यात रंगमंचावर काहीतरी घडणे आवश्यक असते, म्हणून गाताना तालासुरांवर हालचाली झाल्यास बालप्रेक्षकांना त्या फार आवडतात. बालनाट्यातील गाणी नुसतीच गाणी न राहता अभिनयगीते असावी लागतात. मुलांना आवडणारा ‘ठेका’ आणि घटनांचा वेग लक्षात घेऊन गीत-संगीत रचना करावी लागते.


बालनाट्यांमधील रंगभूषा वा वेशभूषा प्रौढांच्या नाटकांप्रमाणेच कथानकातील काळाशी सुसंगत असाव्याच लागतात. भरजरी, भपकेबाज वेशभूषा व अधिक उठावदार रंगभूषा हे बालरंगभूमीचे वैशिष्ट्य आहे. बालरंगभूमीवर मुख्यत्वेकरून सादर होणाऱ्या अद्भुतरम्य बालनाट्यांची ती गरज असते. बालनाट्यनिर्मिती ही अतिशय खर्चाची बाब समजली जाते. बालनाट्याच्या प्रसिद्धीसाठी बराच खर्च करावा लागतो. बहुतांशी बालनाट्ये अद्भुतरम्य असल्याने त्यांच्या निर्मितीत गुंतलेली रक्कम व दर प्रयोगास होणारा खर्च यांचा मेळ दर प्रयोगाला होणाऱ्या उत्पन्नाशी बसणे कठीण असते. बालनाट्याच्या तिकिटांचे दरही प्रौढांच्या नाटकांच्या दरांच्या मानाने कमी ठेवावे लागतात. बालरंगभूमीचा प्रसार समाजाच्या सर्व स्तरांवर व्हावा, हा त्यामागील उद्देश असतो. बालनाट्यप्रयोग फक्त सुट्ट्यांमध्येच करावे लागत असल्यामुळे त्यांची प्रयोगसंख्याही मर्यादितच असते. 

बालरंगभूमी व शालेय रंगभूमीची तुलना : बालरंगभूमी व शालेय रंगभूमी या वरवर एकसारख्याच भासत असल्या, तरी त्यांची प्रकृती पूर्णत: भिन्न आहे. बालरंगभूमीचा प्रेक्षक हा पालकांबरोबर येणारा बालकवर्ग असतो. तर शालेय रंगभूमीचा प्रेक्षक हा विद्यार्थिवर्ग असतो. स्पष्ट शब्दोच्चार, आपले विचार दुसऱ्या व्यक्तीपुढे प्रभावी रीतीने मांडणे, आपल्या बोलण्याचा इतरांवर पडणारा प्रभाव जाणून घेणे, आत्मविश्वास दृढ करणे यांसारख्या अनेक गोष्टी विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वविकासात अंतर्भूत होतात. त्यामुळे शालेय रंगभूमीवरील कलाकार मोठेपणी ‘नट’ च होईल असे नाही, पण त्यातून एक प्रभावी व्यक्तिमत्त्व निर्माण होऊ शकते. मुलांचे विविध वयोगट एकत्र मिळण्याचे ठिकाण म्हणजे शाळा. वेगवेगळ्या वयोगटांतील मुलांच्या मानसिक गरजा आवडीनिवडी यांचा अभ्यास करून त्याद्वारे नाट्यलेखनात वेगवेगळे व नवनवे प्रयोग करणे हे शालेय रंगभूमीस शक्य आहे. कारण तिला बालरंगभूमीसारखा आर्थिक बोजाचा विचार करावा लागत नाही. तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष झाल्यास चालू शकते. याउलट बालरंगभूमीवरील नाट्यप्रयोग पाहताना सर्वप्रथम त्याची तंत्रशुद्धता पाहिली जाते. शालेय रंगभूमीवर तिच्या मर्यादेत शालेय वातावरणाशी सुसंबद्ध व संस्कारक्षम विषय उभे करावे लागतात. उदा., ३०-३५ मिनिटांची नाटिका वा नाटुकली परंतु बालरंगभूमीवर नाटिकांप्रमाणेच दोन अडीच तासांचे पूर्ण लांबीचे नाटक सादर करणे योग्य ठरते. म्हणूनच शालेय रंगभूमी ही बालरंगभूमीची प्रायोगिक रंगभूमी आहे, असे म्हणता येईल. शालेय रंगभूमीवर ‘विद्यार्थिवर्गाने’ दाद दिलेल्या कल्पनांचा बालरंगभूमीवर ‘बालप्रेक्षकांच्या’ मनोरंजनासाठी उपयोग करून घेता येतो.

ऐतिहासिक आढावा : पाश्चात्त्य देशांत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बालरंगभूमीचे कार्य सुरू झाल्याचे दिसते. सतराव्या-अठराव्या शतकात अशा प्रकारचे प्रयत्न अत्यल्प प्रमाणावर झाल्याचे उल्लेख आढळतात. भारतीय बालरंगभूमीची सुरुवात पाश्चात्त्य बालरंगभूमीच्या तुलनेने उशिरा झाली. अजूनही ती ‘चळवळीच्या’ स्वरुपातच आहे. भारतात मराठी, गुजराती, बंगाली, हिंदी या भाषांतून बालरंगभूमीची विशेष जोपासना करण्यात येत आहे. बंगाली रंगभूमीवर नृत्यनाट्य हा प्रकार विशेषत्वाने दिसून येतो.

  

मुलांच्या मनोरंजनासाठी ‘खास’, ‘वेगळी’ रंगभूमी भारतात विसाव्या शतकातच उदयास आली. शिक्षकांनी वा मुलांसाठी लेखन करणाऱ्यांनी लिहिलेले संवाद ही भारतीय बालरंगभूमीची पहिली पायरी. वा. गो. आपटे (मराठी), गिजूभाई बधेका (गुजराती), यशवंत पंड्या (गुजराती) आदींनी अशा प्रकारचे लेखन केले आहे. विविध भारतीय भाषांमधून झालेली बालरंगभूमीची वाटचाल ही सामान्यत: सारख्याच रीतीने झाली व होत आहे हे प्रथमच नमूद करणे इष्ट ठरते.

प्रथितयश लेखकांकडूनही बालप्रेक्षकांसाठी जाणीवपूर्वक काही लिहिले गेले नव्हते, अशा काळात राम गणेश गडकरींनी सकाळचा अभ्यास हे अप्रतिम बालनाट्य लिहिले. त्यानंतरचे प्रल्हाद केशव अत्रे यांचे गुरूदक्षिणा हे नाटक उल्लेखनीय ठरते. फक्त बालकलाकारच असलेल्या ‘बालमोहन’ नाटक मंडळीतर्फे या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. यापूर्वी गावोगावी नाट्यप्रयोग करणाऱ्या नाटकमंडळ्यांमधील बालनटांच्या अभिनयाचा उपयोग प्रामुख्याने प्रौढांच्या मनोरंजनाकरिताच करून घेतला जाई. सर्व कलाकार ‘बाल’ असलेल्या नाटकमंडळ्यांची नाटके बहुतांशी पौराणिक विषयांवर असल्यामुळे ती घरातील सर्व व्यक्तींनी एकत्र बसून पाहण्यासारखी असत, ती ‘बालप्रेक्षकांसाठीच’ असत, असे नाही. १९३५ च्या सुमारास मराठी रंगभूमीचा पडता काळ सुरू झाला त्या काळात ‘मुलांसाठी’ नाटके निर्माण होणे अशक्यच होते. त्या काळातील शालेय स्नेहसंमेलनातून सादर होणारी नाटुकली वा नाटिका यांतही काही वैशिष्ट्य आढळत नाही. याच काळात प्रौढांच्या नाटकांतील स्वगते मुलांकडून करून घेण्याच्या प्रवृत्तीचा प्रारंभ झालेला दिसतो.

बालरंगभूमीचे खरे कार्य दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातच सुरू झाले. पुरुषोत्तम दारव्हेकरांनी गणेशोत्सव, शारदोत्सवातील मेळे वा शाळांसंमेलनांतून बालनाट्ये सादर केली, तर अमेरिकेतून बालनाट्यशिक्षण घेऊन आलेल्या सुधा करमरकरांनी १९५७ साली मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्योत्सवात बालनाटिका सादर केल्या. याच सुमारास पुण्यात सई परांजपे यांनीही नाटिकांद्वारा बालरंगभूमीविषयक कार्य सुरू केले. १९५९ साली मुंबई मराठी साहित्य संघाचा बालनाट्यविभाग बंद झाल्यावर सुधा करमरकरांनी लिट्ल थिएटर (बालरंगभूमी) या संस्थेची स्थापना केली. फक्त मुलांसाठीच नाट्यनिर्मिती करणारी मराठीतील ही पहिलीच संस्था होय, असे म्हणता येईल.

बालरंगभूमीच्या सुरुवातीस नाटिका सादर होत. दोन ते अडीच तासांचे बालनाटक मुख्यत्वेकरून मुंबईतच उभे राहिले. नाटिकांमधून सामाजिक विषय हाताळल्याचे या काळात दिसते परंतु या बालनाट्यांमधून अद्भुतरम्यतेवर भर दिल्याचे आढळते. तसेच भारतीय वातावरणात चपखल बसवलेली पाश्चात्त्य परीकथांची नाट्यरुपेही या काळात आढळतात. त्यानंतर १९६१ ते १९७० या दशकात देशाभिमान जागृत करणारी, ऐतिहासिक तसेच वैज्ञानिक पार्श्वभूमीवरील मोजकीच बालनाट्ये अद्भुतरम्य नाटकांच्या बरोबरीने आली परंतु चिनी बदाम, मंगळावर स्वारी, अदृश्य माणूस यांचा अपवाद वगळता इतर बालनाट्यांना यश मिळाल्याचे दिसत नाही. परीक्षेपूर्वीच्या सात रात्री हा शैक्षणिक नाट्याचा प्रयत्न याच सुमारास झाला तथापि वैज्ञानिक, शैक्षणिक किंवा विशिष्ट पार्श्वभूमीवर वा प्रचलित घडामोडींवर लिहिलेल्या नाटकांचे महत्त्व तात्कालिक असते. ही नाटके कालसापेक्ष नाट्यकृती म्हणून ओळखली जातात. सामाजिक ऐतिहासिक वा वैज्ञानिक विषयांवरील बालनाट्य कुमारगटातील मुलांचे मनोरंजन चांगल्या प्रकारे करतात.


बालरंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग चालू असताना अद्भुतरम्य नाटकेही येतच होती, त्यांमधील काही पाश्चात्त्य परीकथांवर आधारलेली होती. ५ ते १० वर्षे या वयोगटांतील प्रेक्षक अधिक प्रमाणावर बालनाट्ये पाहतो, म्हणून अद्भुतरम्य नाटकांची निर्मिती अजूनही जास्त प्रमाणावर होते, हे त्याचेच निदर्शक आहे. याच काळातील काही बालनाट्ये ब्रेक्टच्या तंत्राचा वापर करून सादर करण्यात आली. रंगमंचावरील पात्रांनी प्रेक्षकांशी संवाद करण्याचा प्रयोग त्यातूनच झाला. उदा., निम्माशिम्मा राक्षस.

अद्भुतरम्य बालनाट्ये १९७१-८० या दशकाच्या सुरुवातीस पुन्हा एकदा उदयास आली, अगदीच मोजके अपवाद वगळता १९७५ नंतर सामान्यत: सर्वच वयोगटांतील मुलांना रुचतील अशी सामाजिक बालनाट्ये बालरंगभूमीवरील जुन्या संस्थांनी सादर करायला सुरुवात केली. १९७९ या आंतरराष्ट्रीय बालकवर्षात बालनाट्यनिर्मितीस चालना मिळाली. फक्त मुंबईतच ७ नवीन आणि ३ पुनरुज्जीवित बालनाट्ये सादर करण्यात आली. बालकवर्षांतील व त्यानंतर आलेली बालनाट्ये पाहता एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे, बालरंगभूमीवरील जुने व अनुभवी तज्ञ बालरंगभूमीला अद्भुतरम्यतेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर या क्षेत्रात नव्याने उतरणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती बालरंगभूमीला पुन्हा त्याच जाळ्यात ओढू पाहत आहेत.

मराठी बालरंगभूमी साधारणपणे ३० वर्षांची होऊनही तिची चळवळ जेथे सुरू झाली त्या मुंबई, पुणे व नागपूर या तीन शहरांव्यतिरिक्त तिचा फारसा प्रसार झालेला आढळत नाही. नासिक, औरंगाबाद, सांगली येथे अधूनमधून बालरंगभूमीचे कार्य चालू असल्याचे दिसते. बालरंगभूमीच्या कार्यास, आर्थिक पाठबळ आवश्यक आहे व त्याच्या अभावीच तिचा पूर्णपणे विकास झालेला दिसत नाही. 

बालनाट्योत्सव : बालरंगभूमीच्या प्रसारासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी बालनाट्य शिक्षणशिबीर आणि बालनाट्योत्सव आयोजित केला जातो. मुंबई-पुण्यातील काही मान्यवर संस्था अशा प्रकारची शिबिरे चालवितात आणि नाटिकास्पर्धा व नाट्यलेखनस्पर्धा आयोजित करतात. भारताच्या अन्य राज्यांमध्येही महाराष्ट्र शासनातर्फे बालनाट्यसंस्थांचे नाट्यप्रयोग आयोजित केले जातात. या क्षेत्रातील जाणीवपूर्वक कार्य करणाऱ्या संस्थांना केंद्र शासन, राज्य शासन, महानगरपालिका व संगीत नाटक अकादेमी इत्यादींकडून विशिष्ट उपक्रमांसाठी अनुदानही दिले जाते.

दिल्लीमध्ये १९६५ साली १ ते ४ नोव्हेंबर या काळात ‘चिल्ड्रन्स लिट्ल थिएटर’ व ‘भारतीय नाट्यसंघ’ यांच्यातर्फे बालरंगभूमी परिषद आयोजित करण्यात आली होती. 

बालरंगभूमीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती : लिट्ल थिएटर (बालरंगभूमी), मुंबई : संचालिका, सुधा करमरकर. १९७२ मध्ये बालनाट्यशिबीर कला अकादेमीची स्थापना. १९७७ पासून कला अकादेमीतर्फे शालेय रंगभूमीच्या विकासार्थ नाट्यशिक्षण शिबीर भरविणे, शैक्षणिकनाट्य, शालेय रंगभूमीचा विकास व नवलेखकांना उत्तेजन यांसाठी शालेय नाटिका-लेखनस्पर्धा (१९७९ पासून) व मुंबई उपनगरातील शाळांसाठी आंतरशालेय नाटिकास्पर्धा आयोजित करणे तसेच शिबिरातील गुणी विद्यार्थ्यांना संस्थेच्या बालनाट्यात संधी देणे इ. कामे ही संस्था करते. अपंग, गरीब मुलांसाठी दर प्रयोगास राखीव जागा ठेवण्याची या संस्थेची खास पद्धत आहे. महाराष्ट्रात तसेच भारताच्या अन्य प्रांतांतही या संस्थेचे नाट्यप्रयोग होतात. 

बालनाट्य, मुंबई : संचालक, रत्नाकर मतकरी. स्वलिखित बालनाट्यांची दिग्दर्शनासह निर्मिती, बालनाट्यलेखनात नवनवे प्रयोग, बालनाट्यचळवळ झोपडपट्टीपर्यंत नेण्याचे प्रयत्न. महाराष्ट्रासह भारतात सर्वत्र प्रयोग.

  

आविष्कार (चंद्रशाला), मुंबई: संचालिका, सुलभा देशपांडे. संस्थेतर्फे नाटिका, बालनाट्ये यांचे दिग्दर्शन गुरू पावर्तीकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली १०५ कलाकार असलेल्या नृत्यनाट्याची निर्मिती. 

किशोर कलाकेंद्र मुंबई : सूत्रधार, कुमार शाहू. लेखन, दिग्दर्शन व नेपथ्यरचना.

  

नवलरंगभूमी, मुंबई : सूत्रधार, नरेंद्र बल्लाळ. संस्थेतर्फे बालनाट्यनिर्मिती व लेखन.

  

इंडियन नॅशनल थिएटर (आय्. एन्.टी.),मुंबई : मराठी-गुजराती बालरंगभूमीवर बालनाट्यनिर्मिती. 


बाल्कन-जी-बारी,मुंबई : बालरंगभूमीपेक्षा शालेय रंगभूमीच्या उत्तेजनार्थ विविध स्पर्धा.

  

वंदना थिएटर्स, मुंबई : संचालिका, वंदना विटणकर.बालनाट्यनिर्मिती व लेखन.

दीपालिका चिल्ड्रन्स थिएटर, अहमदाबाद : नाट्यशिक्षणाबरोबर अन्य कलांचे शिक्षण देण्याची सोय.

चिल्ड्रन्स लिट्ल थिएटर, कलकत्ता : स्थापना १९५२. संस्थापक, समर चतर्जी ‘अबन महल’ ही स्वत:ची नाट्यगृहासहित वास्तू. मुलांना विविध कलांचे शिक्षण मुलांच्या संस्था व शाळांमध्ये कार्याचा प्रसार संगीत नृत्याचे संशोधन-प्रशिक्षण नाटके, नाटिका, गीते (स्वरलिपीसह) ध्वनिमुद्रित करून त्यांचा शाळांमध्ये प्रसार भारताप्रमाणेच परदेशात कार्यक्रम. 

यांखेरीज लिट्ल थिएटर ग्रूप, कलकत्ता व नवी दिल्ली तसेच पुण्याची शिशुरंजन, भरत नाट्य संशोधन मंदिर, फुलराणी बालरंगभूमी, कलाश्रय व सानुली रंगभूमी आणि नागपूरची रसिक रंजन व देवबाप्पा रंगभूमी या संस्थाही या क्षेत्रात कार्यरत आहेत.

सई परांजपे, पुणे : बालनाट्याचे लेखन-दिग्दर्शन. नंतर बालचित्रपटांच्या दिग्दर्शनाचाही कार्यभाग सांभाळू लागल्या. 

पुरुषोत्तम दारव्हेकर, नागपूर : १९५० ते १९६० या दशकात स्वलिखित व स्वदिग्दर्शित बालनाट्यांचे प्रयोग मेळे, संमेलने व रंजन कलामंदिर या संस्थेतर्फे आयोजित करीत असत. 

प्रागजी डोसा, मुंबई : गुजरातीतून बालनाट्यांचे विपुल लेखन. विद्यार्थ्यांना शाळेत शिकविण्याच्या दृष्टीने नाट्यविषयक अभ्यासक्रम. परदेशी रंगभूमीचा सखोल अभ्यास. 

वनलता महेता,मुंबई : विविध बालनाट्यसंस्थांमध्ये बालनाट्य दिग्दर्शन. प्रागजी डोसांबरोबर नाट्यविषयक अभ्यासक्रमाची योजना. आय्. एन्. टी. च्या बालनाट्यशाळेच्या तत्कालीन संचालिका. 

चंद्रवदन मेहता, सुरत : लेखक, दिग्दर्शक, अभिनेते.

  

शांता गांधी, दिल्ली : दिल्ली बालभवनच्या संचालिका. 

नामदेव लहुटे, मुंबई : अनेकगुजराती बालनाट्यांचे लेखक. बऱ्याच एकांकिकांचे दिग्दर्शक.

 

पर्ल पदमसी, मुंबई : इंग्रजी बालनाट्याचे दिग्दर्शन तसेच बालनाट्य प्रयोगातून अभिनय. ‘लिट्ल थिएटर अकादमी’ या संस्थेतर्फे गुजरातीतून नाट्यशिक्षण वर्गाचे संचालन. मराठीतील बालनाट्यांचे गुजरातीत रुपांतर.

यांखेरीज भालबा केळकर, श्रीधर राजगुरू, वासुदेव पाळंदे, माधव वझे, दत्ता टोळ, माधव चिरमुले, जयंत तारे व दिनकर देशपांडे या व्यक्तींचे या क्षेत्रातील कार्यही उल्लेखनीय आहे. लखनौ येथून बालरंगमंच या नावाचे बालरंगभूमीविषयक नियतकालिक प्रसिद्ध करण्यात येते. 

संदर्भ :   1. Chorpenning, Charlotte B. Twenty One Years with Children’s Theatre, Kentucky, 1954.                

             2. Goodridge, Janet, Drama in the Primary School, London.1973.

             3. Lightwood, Donald, Creative Drama for Primary School, London, 1970.

चिरमुले, माधव