शंकरदेव : (१४४९ – १५६९). आसाममधील श्रेष्ठ संतकवी व ‘महापुरुषिया’ या वैष्णव पंथाचे संस्थापक. बार्डोवा (जि. नौगाँग) येथे भौमिक (जमीनदार) घराण्यात जन्म. ते लहान असतानाच त्यांचे वडील (कुसुंबर) व आई (सत्यसंधा) वारली. नंतर आजीने (खेरसुती) त्यांचा प्रतिपाळ केला. तत्कालीन रीतीनुसार अध्ययन करून पुढे संस्कृतचे गाढे पंडित म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर, १४८१ पासून सु. बारा वर्षे त्यांनी उत्तर भारताची तीर्थयात्रा केली. यातूनच महापुरुषिया किंवा एकशरणिया या वैष्णव पंथाची स्थापना करण्यास त्यांना प्रेरणा मिळाली. आसाममध्ये महापुरुष म्हणून ते संबोधले जात असल्याने त्यांच्या पंथाला हे नाव पडले. भगवान श्रीकृष्ण हे या पंथाचे आराध्य दैवत व भागवतपुराण हा अधिकृत धर्मग्रंथ होय. सत्संग, नामस्मरण व एकशरणता ही पंथाची प्रमुख आचारतत्त्वे होत. त्यांत एक खास प्रकारची सामुदायिक प्रार्थना व शास्त्रग्रंथाच्या पठणाची नवी रीत समाविष्ट आहे. अनेक गावी या पंथाचे सत्र म्हणजे मठही स्थापन झाले.

शंकरदेवांनी संस्कृतातील भागवतपुराणाचे १ ते ३, ७ ते १० व १२ हे स्कंध सोप्या असमिया भाषेत आणले व उर्वरित स्कंधांचा शिष्यांकडून अनुवाद करून घेतला. याशिवाय हरिश्चंद्र-उपाख्यान, रुक्मिणीहरण, भक्तिप्रदीप, बलिचलन, कुरुक्षेत्र, निमि-नव-सिद्धी-संवाद इ.त्यांची काव्ये प्रसिद्ध आहेत. गुणमाला हे त्यांचे विष्णुस्तोत्र पंथीयांच्या नित्यपाठात आहे. वाल्मीकि-रामायणचे उत्तरकांडही त्यांनी असमियात भाषांतरित केले. त्यांच्या कीर्तनघोषा या भागवतकथांवरील सव्वीस गीतांच्या रचनेची मोहिनी असमिया जनतेच्या मनावर अद्यापही टिकून आहे. कीर्तनघोषाची प्रत बहुधा सर्व वैष्णव पंथीय कुटुंबांत असते. शंकरदेवांनी अनेक बरगीते (भक्तिगीते) रचली व स्वत: गाऊन ती लोकप्रिय केली. ही बरगीते ब्रजबुली म्हणजे मैथिली-असमिया मिश्र भाषेत रचलेली आहेत.

शंकरदेवांनी पंथप्रसारार्थ ‘अंकयानाट’ (गद्यपद्यमिश्रित एकांकी नाटक) वा ‘भावना’ हा प्रवाही नाट्यप्रकार निर्माण केला. त्यांच्या अनेक अंकियानाटांपैकी फक्त सहाच पत्नीप्रसाद, कालिय-दमन, केलिगोपाल, रुक्मिणीहरण, पारिजातहरण, व रामविजय   – उपलब्ध आहेत. चिन्हयात्रा हे शंकरदेव यांचे पहिलेच नाटक अत्यंत लोकप्रिय ठरले. त्यातील नेपथ्याची रंगीत चित्रे त्यांनी स्वत:च काढली तसेच त्यातील संगीत, नृत्ये, सूत्रसंचालन, भगवान विष्णूची भूमिका ही सर्व कामगिरी त्यांनी एकट्याने पार पाडली. आपल्या उत्तर आयुष्यात शंकरदेवांनी वृंदावनी वस्त्र म्हणजे वृंदावनातील कृष्णलीलांचे चित्रण करणारा एक कापडी चित्रपट्ट साकार केला.

शंकरदेव हे श्रेष्ठ संगीतकारही होते. २४० स्वरचित बरगीतांना रागदारीत बसवून त्यांनी सुरेल चाली दिल्या. त्यांपैकी फक्त सु. पन्नास गीतेच उपलब्ध आहेत.

आयुष्याच्या निरनिराळ्या कालखंडांत शंकरदेव आसामच्या निरनिराळ्या भागांत वास्तव्य करून राहिले. पहिल्या तीर्थयात्रेला जाईपर्यंतचा काळ ते बार्डोवा येथे होते. तीर्थयात्रेनंतर ते पूर्व आसामात पंधरा वर्ष राहिले. आयुष्याचे अखेरचे दिवस ते नरनारायण महाराजांच्या दरबारात, कुचबिहार येथे होते. अगदी वृद्धावस्थेतदेखील त्यांनी १२० शिष्यांसह दुसरी तीर्थयात्रा पूर्ण केली. पाटबौसी येथे वयाच्या एकशेविसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले, असे मानले जाते. त्यांच्या पश्चात त्यांचे शिष्योत्तम ⇨माधवदेव, ⇨अनंत कंदली आदींनी पंथप्रसाराचे त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले.

संदर्भ : 1. Bezbaroa, Lakshminath, sir sankaradeva, Calcutta, 1936.

            2. Neog, Maheswar, Sankaradeva and His Times, Gauhati, 1966.

 सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) शिरोडकर, द.स. (म.)