व्हुपरटाल : जर्मनीच्या नॉर्थ–ऱ्हाईन–वेस्टफेलिया राज्यातील एक शहर. लोकसंख्या ३,७४,५०० (१९९८). ड्युसेलडॉर्फपासून पूर्वेस २४ किमी. अंतरावर हे शहर आहे. ऱ्हाईनची उजव्या तीरावरील उपनदी व्हुपर हिच्या दोन्ही काठांवरील तीव्र उताराच्या प्रदेशात १६ किमी. लांबीच्या पट्ट्यात ह्या शहराचा विस्तार आहे. व्हुपरटालच्या परिसरातील बार्मन शहराचा उल्लेख अकराव्या शतकातील, तर एल्बरफेल्टचा उल्लेख बाराव्या शतकातील आढळतो. कठीण खडकाच्या प्रदेशातून वाहणाऱ्या नदीच्या स्वच्छ पाण्यामुळे विणकर लोक या प्रदेशाकडे आकर्षिले गेले. बेर्गिश लँडकडे पाठविण्यात येणाऱ्या सूत – विरंजनकामात बार्मन व एल्बरफेल्ट या दोन्ही नगरांची मक्तेदारी निर्माण झाली होती (१५२७). १९२९ मध्ये बार्मन, एल्बरफेल्ट, रॉन्सडॉर्फ, बेयेनबर्ग, क्रॉनेनबर्ग व व्हॉहविंकेल या नगरांचे बार्मन-एल्बरफेल्ट या नावाने एकत्रिकरण करण्यात आले. १९३०मध्ये त्याचे व्हुपरटाल (व्हुपर खोरे) असे नामांतर झाले.

व्हुपरटाल हे वस्त्रोद्योग केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. सोळाव्या शतकात येथे कापडी पट्ट्या व तागाच्या कापड-निर्मितीस सुरुवात झाली. १७५०मध्ये लेस निर्मिती, १७७५मध्ये रेशीम विणकाम तर १७८५मध्ये सूत व कापडाच्या रंजनप्रक्रियेस सुरुवात झाली. येथील रेशीम, मखमल, तागाचे कापड, कृत्रिम धागे, टोप्या, पडदे, गालिचे इ. उत्पादने महत्त्वाची आहेत. याशिवाय धातूच्या वस्तू, रसायने, रबर, यंत्रे, औषधे, रंग, बंदुका, गोलक धारवा, बाजा (ऑर्गन), पियानो, छपाईची यंत्रे, कागद, कातडी, मद्ये यांची निर्मिती व खाद्यपदार्थ-प्रक्रिया, छपाईकाम, प्रकाशन इ. उद्योगधंदे शहरात चालतात. दुसऱ्या महायुद्धात शहरावर मोठे बाँबहल्ले झाले होते. महायुद्धोत्तर काळात हे पश्चिम जर्मनीत समाविष्ट होते. व्हुपर नदीमार्गावरील १६किमी. लांबीची मॉनारेल सस्पेन्शन (एकरुळी लोंबती) रेल्वे (स्था. १९०१) सुविधा वैशिष्ट्यपूर्ण आहे. घड्याळांचा इतिहास दाखविणारे संग्रहालय (क्लॉक म्यूझीयम) व व्हॉन दर हेद म्यूझीयम तसेच नगरदालन (१९१२ – २२) व संगीत–नाटकगृह (१९५६) या येथील उल्लेखनीय वास्तू होत.

गोरगरिबांच्या मदतीसाठी प्रसिद्ध एल्बरफेल्ट पद्धती १८५३ मध्ये येथे सुरू झाली. या पद्धतीचा स्वीकार पुढे जर्मनीत व इतरत्रही करण्यात आला. या पद्धतीत सुस्थितीतील नागरिकांना शहरातील दरिद्री, निराधार, बेकार लोकांच्या गरजा कोणत्या आहेत, याचा शोध घेऊन त्या गरजा पुरवाव्या लागतात. तसेच गरजू लोकांच्या क्षमतेनुसार योग्य त्या कामात त्यांना सहभागी करून घेण्याचे त्यांवर बंधन असते.                                             

चौधरी, वसंत