व्हीस्बाडेन : पश्चिम जर्मनीतील हेस राज्याची राजधानी. एक औद्योगिक शहर व आरोग्यधाम. लोकसंख्या २,६७,१०० (१९९६). वनाच्छादित टॅऊनस पर्वतश्रेणी व ऱ्हाईन नदी यांच्या दरम्यान निसर्गसुंदर प्रदेशात हे वसले असून ते शहर फ्रँकफुर्टपासून पश्चिमेस ४० किमी.वर आहे. इ. स. पू. तिसऱ्या शतकात येथे केल्टिक वसाहत होती. इ. स. ८३ मध्ये नगराभोवती दगडी तटबंदी बांधण्यात आली. इ.स. ३७०च्या सुमारास बांधलेल्या भिंतींचे अवशेष येथे आढळतात. इ.स. ८२९ मध्ये येथे व्हीस्बाडा राजवाडा बांधण्यात आला. मध्ययुगात नॅसॉयुसिंगेन राज्याची ही राजधानी होती. तेराव्या शतकात यास शहराची सनद मिळाली. तीस वर्षांच्या युद्धात हे नगर उद्ध्वस्त झाले (१६४४). पुढे नॅसॉच्या ड्युकची राजधानी म्हणून त्याची पुनर्रचना करण्यात आली (१८०६ –६६). त्यानंतर ते प्रशियाच्या ताब्यात गेले. पहिल्या महायुद्धानंतर ते प्रथम फ्रेंचांच्या व नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यानंतर हे हेस–नॅसॉ प्रांतातील व्हीस्बाडेन जिल्ह्याच्या राजधानीचे ठिकाण बनले. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात (१९१८ – २९) दोस्त राष्ट्रांच्या ‘ऱ्हाईनलँड मंडळा’चे ते मुख्य ठिकाण होते. दुसऱ्या महायुद्धातील बाँबवर्षावात शहराची बरीच हानी झाली. महायुद्धानंतर युरोप, आफ्रिका व मध्य आशियातील अमेरिकन हवाई दलाचे हे एक मुख्यालय होते. १९४६मध्ये पश्चिम जर्मनीच्या हेस राज्याची ही राजधानी बनली.
कारखानदारी, प्रकाशन, चित्रपट-निर्मिती, सभासंमेलनाचे स्थळ, जर्मन शँपेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सेक्त’ मद्याची निर्मिती व व्यापार यांसाठी हे विशेष प्रसिद्ध आहे. यांशिवाय लोखंड ओतशाळा, काँक्रीट व धातुकाम, जहाजबांधणी, यंत्रसामग्री, प्लॅस्टिके, कापड – निर्मिती, अन्नप्रक्रिया, औषधे, रंग, रसायने, घड्याळे, सिमेंट व मृत्पात्री इ. उद्योगधंदे शहरात चालतात. तसेच आसमंतातील भाजीपाला, फळे, लाकूड इ. उत्पादनांच्या व्यापाराचे केंद्र म्हणूनही व्हीस्बाडेन प्रसिद्ध आहे. हे एक रेल्वे प्रस्थानक आहे.
खनिजजल व क्षारयुक्त गरम पाण्याचे २७ झरे (स्पा) येथे असून रोमन काळापासून ते युरोपभर प्रसिद्ध आहेत. खनिजजल उपचार केंद्र म्हणून हे शहर ओळखले जाते. आल्हाददायक व आरोग्यवर्धक हवामान, विलोभनीय सृष्टिसौंदर्य व उत्तम पर्यटन-सुविधा यांमुळे हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. व्हिक्टोरियन कालखंडात जर्मन महाकवी गटे व रशियन कादंबरीकार डॉस्टोव्हस्की यांसारखे थोर लेखक, तसेच राजघणाण्यातील व्यक्ती येथे येऊन राहत. येथील व्हिक्टोरियन काळातील किल्ला (१८४०), नगरभवन (१८८७), ग्रीक चॅपेल (१८५५), कैसर–फ्रीड्रिख स्नानगृह (१९१३) इ. वास्तू उल्लेखनीय आहेत. येथील किल्ल्यात हेस राज्याचे विधानमंडळ आणि इतर शासकीय काऱ्यालये आहेत. येथील शासकीय रंगमंदिरात (स्था. १८९४) संगीत, बॅले व नाटके सादर केली जातात. येथील कलावीथी अप्रतिम आहे. व्हीस्बाडेन शहर जुगारगृहांसाठी (कॅसिनो) प्रसिद्ध आहे.
चौधरी, वसंत
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..