व्हीटेप्स्क : बेलारूस प्रजासत्ताकातील (पूर्वीचे बेलोरशिया प्रजासत्ताक) व्हीटेप्स्क प्रांताची (ओब्लास्टची) राजधानी. लोकसंख्या ३,५६,४०० (१९९६). बेलारूसच्या ईशान्य भागात पश्चिम द्वीना व लुचेसा नद्यांच्या संगमावर व्हीटेप्स्क शहर वसले आहे. हे मिन्स्कच्या (बेलारूसची राजधानी) ईशान्येस २२५ किमी. अंतरावर असून पश्चिम द्वीनाच्या दोन्ही काठांवर विस्तारले आहे.
इ. स. १०२१ मध्ये हे तटबंदीयुक्त नगर पहिल्यांदा उजेडात आले. काही काळ हे एका लहान परगण्याचे प्रमुख ठिकाण होते. इ. स. १३२० मध्ये हे लिथ्युएनियन साम्राज्यात व सोळाव्या शतकात पोलंडच्या सत्तेखाली आले. पुढील काळात येथे पोलंड, रशिया, फ्रान्स या देशांचा अंमल आलटून-पालटून राहिला. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने ते काबीज केले (१९४१ – ४४). महायुद्धात शहराची फार मोठी नासधूस झाली. बाराव्या शतकातील ब्लॅगोवेश्चेनस्काय चर्चची उल्लेखनीय वास्तू मात्र यातून वाचली.
आधुनिक व्हीटेप्स्क शहर औद्योगिक केंद्र आहे. वस्त्रोद्योग हा येथील महत्त्वाचा उद्योग असून तागाच्या कापड-उत्पादनात हे शहर बेलारूसमधील सर्वांत मोठे केंद्र आहे. त्याशिवाय यंत्रसामग्री, फर्निचर, काच, रेडिओ, विद्युत्-उपकरणे, तयार कपडे, मातीच्या वस्तू, बांधकामाचे साहित्य, अल्कोहॉल, पादत्राणे, अन्नप्रक्रिया, कृषियंत्रे, लाकूडकाम, उपभोग्य वस्तुनिर्मिती इ. उद्योगधंदे शहरात चालतात. शिक्षण-प्रशिक्षण, तंत्रनिकेतन, तसेच पशुवैद्यकीय, वैद्यकीय शिक्षण संस्था येथे आहेत.
चौधरी, वसंत
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..