व्हिल्निअस : व्हिल्ना. लिथ्युएनिया प्रजासत्ताकाची राजधानी व देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ५,७८,००० (२०००). लिथ्युएनियाच्या आग्नेय भागात व्हिलिया आणि व्हिलिन (व्हिलेइका) नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असून याच्या भोवतालचा परिसर वनाच्छादित, निसर्गरम्य आहे.

बाल्टिक प्रदेशातील सर्वांत जुन्या शहरांपैकी हे एक असून इ. स. दहाव्या शतकात त्याची स्थापना झालेली असावी. १३२० मध्ये येथे बांधण्यात आलेल्या किल्ल्यामुळे याचे महत्त्व वाढले. पूर्वमध्य युरोप व रशिया यांदरम्यानच्या मोक्याच्या स्थानामुळे चौदाव्या शतकापासून लढल्या गेलेल्या अनेक युद्धांची ही रणभूमी बनली. व्हिल्निअसवर ताबा मिळविण्यासाठी ट्यूटॉनिक सरदार, तातार, रशियन, लिथ्युएनियन, स्वीडिश, पोलिश व कोसॅक्स यांनी येथे युद्धे केली. १३७७ मध्ये ट्यूटॉनिक सरदरांनी हे शहर बळकावून त्याचा विध्वंस केला. पुढे येथे रोमन कॅथलिक बिशपचीही स्थापना करण्यात आली. १५२५ मध्ये छापखाना सुरू झाला. १५७९ मध्ये जेझुइट अकादमीची येथे स्थापना करण्यात आली. १७०२ व १७०६मध्ये स्वीडन व रशिया यांच्यात झालेल्या ग्रेट नॉर्दन वॉर या युद्धात स्वीडिश सैन्याने हे शहर काबीज केले, परंतु १७८८ मध्ये पुन्हा ते रशियन लष्कराने बळकावले. १७९५ मध्ये ते रशियन साम्राज्याला जोडण्यात आले. पुढे १८१२ मध्ये त्याचा ताबा फ्रेंचांनी घेतला. याच काळात प्लेग व आगीसारख्या अति भयंकर संकटांनी, तसेच सततच्या राजकीय सत्तांतरांमुळे तेथील जनता हैराण झाली होती. १८३१ व १८६३ मध्ये रशियन राजवटीविरुद्ध झालेल्या अयशस्वी पोलिश क्रांतीमध्ये हे शहर सहभागी होते.

पहिल्या महायुद्धाच्या काळात हे जर्मनांच्या ताब्यात होते (१९१५-१८). १९१९-२० मध्ये बोल्शेव्हिक व पोलिश यांची सत्तांतरे झाली. युद्धाच्या अखेरीस पुनर्निर्मित मुक्त लिथ्युएनियाची ही राजधानी होती. १९२०-३९ या काळात ते पोलंडमध्ये समाविष्ट होते. १९३९मध्ये ते रशियन सैन्याने काबीज केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे शहर पुन्हा जर्मन सत्तेखाली आले (१९४१-४४). त्यानंतर पुन्हा रशियाने जिंकून आपल्या राज्याला जोडले. या युद्धकाळात शहरातील चाळीस टक्के इमारतींचा विध्वंस झाला. १९९१ मध्ये लिथ्युएनिया सोव्हिएट युनियनमधून फुटून बाहेर पडला व पुन्हा एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. व्हिल्निअस ही त्याची राजधानी बनली.   

दुसऱ्या महायुद्धापूर्वी येथे ज्यू लोकांचा प्रभाव अधिक होता. या ज्यू प्रभावाला सु. दीडशे वर्षांची पूर्वपरंपरा आहे. अठराव्या शतकात ज्यूंना रबी एलिजाह बेन सॉलोमन याचे नेतृत्व लाभले. एकोणिसाव्या शतकात हॅस्कला चळवळीचे (इनलाइटनमेंट मूव्हमेंट) व रशियातील ज्यू समाजाचे हे प्रमुख केंद्र बनले. १९२४ मध्ये स्थापन झालेली व्हिव्हो इन्स्टिट्यूट ही ज्यूंची संशोधन संस्था येथीलच. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने व्हिल्निअसचा ताबा घेतला. परिणामत: १९४१ मध्ये ज्यूंची येथील संख्या ८०,००० होती, ती १९४५मध्ये फक्त ६,००० उरली. १९४० च्या दशकातच सोव्हिएट रशियाने येथे हद्दपारीचा कायदा लागू करून रोमन कॅथॅलिक पंथीयांना तो लागू केला. याचा परिणाम म्हणून बरेचसे नागरिक शहर सोडून गेले. सध्या व्हिल्निअसमध्ये लिथ्युएनियन, पोलिश, रशियन, बेलोरशियन व ज्यू लोकांचे संख्याधिक्य आहे.    

चौदाव्या ते अठराव्या शतकांतील अनेक जुन्या चर्चवास्तू या शहरात आहेत. अभिजात ग्रीक व रोमन तसेच गॉथिक, बरोक वास्तुशिल्पांचे नमुने येथे पाहावयास मिळतात. जुन्या शहरभागात गेडामिनास किल्ल्याचे अवशेष आढळतात. सेंट स्टॅनिसलॉ हे येथील जुने रोमन कॅथलिक कॅथीड्रल (स्था. १३८७), ऑस्ट्रा ब्रामा चॅपेल, कॅथीड्रल ऑफ सेट निकोलस (निर्मिती १५९६ ते १६०४), ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च (१८३२), अँटोकोल उपनगरातील सेंट पीटर व सेंट पॉल ही बरोक चर्च (सतरावे शतक) इ. उल्लेखनीय चर्चवास्तू येथे आहेत. पूर्वीच्या जुन्या शहराभोवतीच नव्या शहराची वाढ झाली आहे.

अलीकडच्या काळात व्हिल्निअसची औद्योगिक व व्यापारीदृष्ट्या बरीच प्रगती झालेली आहे. कमी अवजारे, औद्योगिक यंत्रे, अन्नप्रक्रिया व डबाबंदीकरण, रसायने, इलेक्ट्रॉनीय गणकयंत्रे व संगणक, इतर इलेक्ट्रॉनीय व विद्युत् उपकरणे, वस्त्रोद्योग, लाकूडकाम, कातडी कमावणॆ इ. उद्योगधंदे येथे आढळतात. व्हिल्निअस हे एक प्रमुख लोहमार्ग स्थानक असून येथून लॅटव्हिया, बेलोरशिया, पोलंड यांकडे लोहमार्ग फाटे गेलेले आहेत. शहराच्या जवळच विमानतळ आहे.    

लिथ्युएनियातील सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र म्हणून व्हिल्निअस प्रसिद्ध आहे. १५७९ मध्ये स्थापन झालेल्या जेझुइट अकादमीचेच पुढे व्ही. काप्सुकास स्टेट युनव्हर्सिटीमध्ये रूपांतर करण्यात आले. हे युरोपातील सर्वांत जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. याशिवाय इतरही शैक्षणिक, ललितकलाविषयक व सांस्कृतिक संस्था येथे आहेत.                       

                          चौधरी, वसंत