व्हॉल्तेअरव्हॉल्तेअर : (२१ नोव्हेंबर १६९४-३० मे १७७८). थोर फ्रेंच साहित्यिक आणि विचारवंत. मूळ नाव फ्रांस्वा मारी आरवे. जन्म पॅरिसचा. पॅरिसच्या लुई-ल-ग्रांद ह्या जेझुइट कॉलेजात शिकत असताना साहित्य तथा रंगभूमीकडे त्याचा ओढा निर्माण झाला. तेथील धार्मिक शिक्षणाबाबत मात्र तो साशंक होता. तरुणपणीच तो लेखन करू लागला. उपरोधप्रचुर कविता लिहून फ्रान्सच्या राजघराण्याशी संबंधित अशा एका बड्या व्यक्तीला दुखावल्यामुळे जवळपास एक वर्ष त्याला बॅस्तीलच्या तुरुंगात काढावे लागले (१७१७-१८). ह्याच तुरुंगात लिहिलेली त्याची पहिली नाट्यकृती अदीप रंगभूमीवर अतिशय गाजली(१७१८). त्यानंतर ‘व्हॉल्तेअर’ ह्या नावाने तो वावरू लागला. १७२६ साली एका प्रतिष्ठित फ्रेंच कुटुंबातील व्यक्तीबरोबर झालेल्या भांडणातून त्याची पुन्हा एकदा बॅस्तीलाच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली परंतु फ्रान्स सोडून जाण्याच्या अटीवर त्याची सुटका झाली. नंतर व्हॉल्तेअर इंग्लंडमध्ये राहिला (१७२६-२९). तेथील वास्तव्यात साहित्यिकांचा आणि विचारवंतांचा सहवास त्याला लाभला. इंग्रजी भाषेवर त्याने प्रभुत्व संपादन केले व शेक्सपिअरच्या नाटकांचा अभ्यास केला. इंग्लंडमधील राजकीय संस्थांचे निरीक्षणही त्याला करता आले. धार्मिक युद्धांचा अंत घडवून आणणारा इंग्लंडचा राजा चौथा हेन्री ह्याला नायक करून लिहिलेले आपले आंरियाद हे महाकाव्य (दुसरी आवृ. १७२८ पहिली आवृ. ला लीग ह्या नावाने १७२३ मध्ये गुप्तपणे प्रकाशित) त्याने इंग्लंडची राणी कॅरोलिन (राजा दुसरा जॉर्ज ह्याची पत्नी) हिला अर्पण केले. फ्रान्सला परतल्यानंतर त्याची दोन महत्त्वाची पुस्तके प्रसिद्ध झाली. एक, इस्त्वार द् शार्ल द् झ (१७३१) हे स्वीडंचा राजा बारावा चार्ल्स ह्याचे चरित्र आणि लॅत्र फिलोझोफीक (१७३४) हा त्याने लिहिलेल्या २५ पत्रांचा संग्रह. पहिल्या पुस्तकात बाराव्या चार्ल्सच्या युद्धखोरीची रशियाच्या पीटर द ग्रेटच्या कर्तृत्वाशी तुलना करून, थोर माणसे लढाया करण्यापेक्षा संस्कृती संपन्न करण्याकडे लक्ष देतात, असे त्याने दाखवून दिले. दुसऱ्या पुस्तकात इंग्रजांची राज्यव्यवस्था, व्यापार, साहित्य इत्यादींचे विवेचन आहे. तसेच विख्यात तत्त्वज्ञ ⇨ फ्रान्सिस बेकन, ⇨ जॉन लॉक, वैज्ञानिक ⇨ आयझॅक न्यूटन ह्यांच्या विचारपद्धतींकडे लक्ष वेधले आणि सर्व बौद्धिक शक्ती सामाजिक प्रगतीकडे लावावी, असा संदेश दिला. ‘जुन्या व्यवस्थेवर टाकलेला पहिला बाँब’ असे ह्या ग्रंथाचे वर्णन करण्यात येते. पंचविसाव्या पत्रात व्हॉल्तेअरने फ्रेंच गणितज्ञ, भौतिकीविज्ञ आणि धार्मिक तत्त्ववेत्ते ⇨ ब्लेझ पास्काल ह्यांच्यावर टीका केली होती. ह्या पुस्तकावर फ्रान्समध्ये ताबडतोब बंदी घालण्यात आली आणि व्होल्तेअरच्या अटकेसाठी पकडवॉरंट काढण्यात आले तेव्हा व्होल्तेअरने सिरे येथील मादाम द्यू शाटले ह्या अत्यंत बुद्धिमान स्त्रीच्या वाड्यात आश्रय घेतला (१७३४). तिच्या मृत्यूपर्यंत (१७४९) व्हॉल्तेअर तिच्यासह राहात होता. पंधरा वर्षांचे हे सहजीवन वैचारिक आदानप्रदान आणि व्यासंग ह्यांनी समृद्ध होत गेले. यॅलेमां द् ला फिलोझोफी द् न्यूतॉन (१७३८) हा त्याचा ग्रंथ ह्या काळात प्रसिद्ध झाला. ह्याच काळात प्रशियाचा युवराज फ्रीड्रिख (पुढे फ्रीड्रिख द ग्रेट ) ह्याच्याशी त्याचा पत्रव्यवहार सुरू झालेला होता. फ्रीड्रिखला व्हॉल्तेअरबद्दल आदर होता त्याच्या विचारांचा प्रभावही फ्रीड्रिखवर होता. फ्रीड्रिख राजा झाल्यानंतर त्याच्या निमंत्रणावरून व्होल्तेअर त्याचा पाहुणा म्हणून पॉट्सडॅम येथे राहिला. तेथील वास्तव्यात त्याने ल् सियॅक्ल द् लूई कातोर्झ (१७५१) हा आपला महत्त्वाचा ऐतिहासिक ग्रंथ पूर्ण केला. यासाठी नाना प्रकारे सखोल संशोधन करून हा इतिहासग्रंथ जास्तीतजास्त निर्दोष करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्या काळातील गंभीर राजकीय समस्यांचे तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचे चित्रण त्यात केले आहे. इतिहासाच्या आधुनिक तत्त्वज्ञानाची पायाभरणी करण्यात व्हॉल्तेअरचा मोलाचा वाटा होता. राजेरजवाडे आणि युद्धे यांमध्ये इतिहासाला सीमित करण्यापेक्षा समाज, मानवी मन, संस्कृती यांच्या अभ्यासाला त्याने महत्त्व दिले. त्याच्या मते, इतिहास ही रानटी अवस्थेकडून संस्कृतीकडे झालेल्या वाटचालीची कहाणी होय. इतिहासाच्या विकासप्रक्रियेबाबतचे गूढ अलौकिक स्पष्टीकरण अमान्य करून नैसर्गिक कारणपरंपरेवर व्हॉल्तेअरने भर दिला. राजेरजवाड्यांना ‘इतिहासा’तून हद्दपार करण्याची कृती पाश्चिमात्य समाजात राजेशाहीच्या साक्षात अंताकडे घेऊन जाणारी ठरली.

फ्रीड्रिखचा पाहुणा म्हणून व्हॉल्तेअरचा आरंभीचा काही काळ आनंददायक गेला. तरी पुढे त्या दोघांत स्वाभाविकपणे कटुता निर्माण झाली. १७५३ मध्ये व्हॉल्तेअरने प्रशियातून प्रयाण केले. फ्रान्समध्ये त्याचे स्वागत होण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे तो जिनिव्हाला आला परंतु तिथेही निरनिराळ्या कारणांमुळे विरोध झाल्याने तो सर्व दृष्टींनी सुरक्षित अशा फेरने ह्या फ्रान्समधील गावी जाऊन राहिला (१७५८).

त्याची कांदीद ही तात्विक कथा (काँत) १७५९ मध्ये प्रसिद्ध झाली. १७५५ मध्ये लिस्बनमध्ये झालेल्या भयंकर भूकंपाने आलेल्या नैराश्यातून ही कथा त्याने लिहिली. फ्रेंच विचारवंत ⇨ रूसो आणि तत्त्वज्ञ ⇨ लायप्निट्स ह्यांच्या आशावादी विचारांवर ह्या कथेतून उपरोधप्रचुर टीका केलेली आहे. ह्या दुःखमय संकटग्रस्त जगात माणसाने आपापल्या छोट्याशा जगात काम करीत राहण्यातूनच त्याला दिलासा लाभतो, असे व्हॉल्तेअरने ह्या कथेत दाखवून दिले आहे. व्हॉल्तेअरने लिहिलेल्या अशा काही तात्त्विक कथांतून त्याच्या प्रतिभेचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार झालेला आहे. माइक्रोमेगाज् (१७५२), मॅम्नाँ, झादिग (१७४७) ह्या अशा काही कथा होत.

फेरने येथील वास्तव्यात त्याचा दिक्सियॉनॅर फिलोझोफीक पॉर्तातीफ (१७६४) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. ह्यात वर्णानुक्रमाने छोटेछोटे लेख असून ते मुख्यतः धार्मिक मतांवर हल्ले करण्यासाठी लिहिलेले आहेत. असत्य, जुलूमशाही, दडपशाही ह्यांच्या विरुद्ध त्याने ह्या लेखांतून उपरोधप्रचुर टीका केली.

फेरने येथील आयुष्याची अखेरीची वीस वर्षे त्याने एखाद्या राजासारखी घालवली. धार्मिक सहिष्णुता, भौतिक प्रगती, मानवी हक्क ह्यांच्या प्रस्थापनेसाठी तो झगडला. अनेकांच्या अन्यायनिवारणार्थ त्याने लढा दिला.

व्हॉल्तेअरची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्याच्या नाटकांची संख्या पन्नासांवर भरते. त्यांखेरीज तात्त्विक कथा, इतिहासग्रंथ, तात्त्विक ग्रंथ आहेतच. त्याच्या कथांना आजही वाचकांचा प्रतिसाद मिळतो. त्याने लिहिलेली पत्रे फ्रेंच साहित्यातील मोलाचा ठेवा होय.

ज्या विचारांच्या प्रस्थापनेसाठी तो लढला, त्या विचारांनी युरोपीय संस्कृतीला एक दिशा दिली. व्हॉल्तेअर आणि रूसो म्हणजे सरंजामी उमरावशाहीकडून मध्यमवर्गीय लोकशाहीकडे घडून आलेल्या आर्थिक-राजकीय स्थित्यंतराचे दोन महान प्रवक्ते होते. व्हॉल्तेअर हा बुद्धिनिष्ठ विज्ञानवादी होता, तर रूसो हा भावनाशील निसर्गवादी होता. व्हॉल्तेअर रूसोइतका लोकसत्तावादी नसला, तरी व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य त्यालाही मोलाचे वाटत होते. तो नास्तिक नव्हता पण डोळस धर्मश्रद्धेवर त्याचा भर होता. ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या कारभारातील भ्रष्टतेवर त्याने जे कठोर, उपरोधिक व बुद्धिवादी हल्ले चढविले, त्यामुळे जागृतीचे एक नवे पर्व सुरू झाले. फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणण्यास त्याचे विचार कारणीभूत झाले. थोर साहित्यिक, इतिहासाचा तत्त्वज्ञ, धर्मसंस्थेचा प्रभावी टीकाकार आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा एक प्रेरणास्रोत अशा विविध नात्यांनी व्हॉल्तेअरने ऐतिहासिक कामगिरी बजावली.

संदर्भ : 1. Ayer, A. J. Volteaire, New York 1986.

            2. Bestman, Theodore, Voltaire, New York, 1969.

            3. Bottiglia, W. F. Ed. Voltaire : A Collection of Critical Essays, Englewood Cliffs. (N.J.), 1968.

            4. Brumfiltt, J. H. Voltaire : Historain, Oxford, 1958.

            5. Durant, Will, The Age of Voltaire, New York, 1965.

            6. Topazio, V. W. Voltaire : A Critical study of His Major Works, New York 1967.

कुलकर्णी अ. र.