व्हॅनेडिनाइट : शिशाचे खनिज. व्हॅनेडियम या मूलद्रव्यावरून त्यास हे नाव पडले आहे. स्फटिक षट्कोनी समूहाचे, द्विप्रसूच्चाकार, तसेच केसासारखे, किंवा पिंपासारखे प्रचिनाकार [→ स्फटिकविज्ञान] गोलाकार राशींच्या वा लेपांच्या रूपातही आढळते. रंग माणकासारखा लाल, पिवळा, नारिंगी वा तपकिरी कस पांढरा, पिवळसर कठीणता ३ वि. गु. ६·७ ते ७·१ भंजन खडबडीत ते शंखाभ. चमक काहीशी राळेसारखी ते काहीशी हिऱ्यासारखी, पारदर्शक ते दुधी काचेसारखी पारभासी [→ खनिजविज्ञान]. रा.सं. Pb5(VO4)3CL (शिसे व व्हॅनेडियम ऑक्साइड यांचे संयुक्त क्लोराइड).

व्हॅनेडिनाइट हे नंतरच्या क्रियांनी बनलेले म्हणजे द्वितीयक खनिज असून विरळाच आढळते. शिशाच्या धातुकांच्या (कच्च्या रूपातील धातूच्या शिरांच्या ऑक्सिडीभूत भागात शिशाच्या इतर खनिजांबरोबर, तसेच काही गाळात व्हेनेडियमयुक्त इतर खनिजांबरोबर हे आढळते. मोरोक्को, नामिबिया, ॲरिझोना व न्यू मेक्सिको येथे याचे चांगले स्फटिक आढळतात. उरल पर्वत, दक्षिण आफ्रिका तसेच बिहार राज्यात दालभूम व मयूरभंज जिल्हे येथेही हे आढळते. व्हॅनेडियमाचे धातुक व शिशाचे गौण धातुक म्हणून याचा उपयोग होतो.

ठाकूर, अ. ना.