व्हर्सायचा तह : पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रे व जर्मनी ह्यांमध्ये २८ जून १९१९ रोजी व्हर्साय (विद्यमान पॅरिस शहराचे निवासी उपनगर) येथे झालेला तह. ‘पॅरिसचा तह’ म्हणूनही तो ओळखला जातो. या तहाचा आराखडा व उद्ध्वस्त युरोपचे पुनर्वसन करण्यासाठी १८ जानेवारी १९१९ रोजी दोस्त राष्ट्रे व त्यांच्याशी संबंधित इतर राष्ट्रांच्या प्रतिनिधींची शांतता परिषद पॅरिस येथे भरली. बत्तीस राष्ट्रांचे प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित होते तथापि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन (१८५६-१९२४), ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड लॉइड-जॉर्ज (१८६३-१९४५), फ्रान्सचे पंतप्रधान झॉर्झ क्लेमांसो (१८४१-१९२९) व इटलीचे पंतप्रधान व्हीत्तॉर्यो ओर्लांदो (१८६०-१९५२) हेच या परिषदेचे मुख्य सूत्रधार होते.

युद्धतहकुबीच्या वेळी वुड्रो विल्सन यांच्या शांतताविषयक चौदा तत्त्वांचा आधार घेण्यात आला मात्र प्रत्यक्षात तहाचा करारनामा तयार करताना ती तत्त्वे पाळण्यात आली नाहीत. त्यामुळे जर्मनीने दोस्त राष्ट्रांच्या या विश्वासघातकी वृत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली आणि तहाच्या करारनाम्यास एक विस्तृत टीकात्मक टिपणी जोडून तो दोस्त राष्ट्रांकडे विचारार्थ पाठविला. दोस्त राष्ट्रांनी जर्मनीच्या सूचनांनुसार त्यात काही फेरफार केले आणि तो जर्मन प्रतिनिधींच्या पुढे ठेवला. त्याचबरोबर तह पाच दिवसांच्या आत मान्य करावा, अन्यथा हल्ल्यासाठी तयार राहावे, असा इशाराही त्यांनी जर्मनीस दिला. तेव्हा वायमार येथे ‘जर्मन राष्ट्रीय सभे’ ने हा तह पूर्णपणे मान्य असल्याचे मित्र राष्ट्रांना कळविले. २८ जून १९१९ रोजी व्हर्सायच्या राजवाड्यातील इतिहासप्रसिद्ध आरसे महालात या तहावर उभयराष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या. १० जानेवारी १९२० पासून तहाची अंमलबजावणी सुरू झाली.

व्हर्सायच्या तहाची विभागणी एकूण पंधरा प्रकरणांत केली असून त्यांत ४४० अनुच्छेद आहेत. या तहान्वये जर्मन साम्राज्याची वाटणी करण्यात येऊन युरोपचा नकाशाच बदलण्यात आला. पहिल्या महायुद्धानंतर जागतिक शांतता, सुव्यवस्था व सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली (१८ एप्रिल १९१९). जर्मनीकडून ऍल्सेस-लॉरेनचा प्रदेश फ्रान्सला अपेन व मॅलमेडी बेल्जियमला उत्तर श्लेस्विग डेन्मार्कला पॉझनान प्रांत, पश्चिम प्रशिया व उत्तर सायलीशियाचा काही भाग पोलंडला आणि मेमल लिथ्युएनियाला या प्रकारे प्रदेश वाटण्यात आले. जर्मनीच्या ताब्यातील डॅन्झिग शहर राष्ट्रसंघाच्या ताब्यात ठेवून त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आणि र्हावईन प्रदेशाचे निर्लष्करीकरण करण्यात आले. जर्मनीच्या लष्करात कपातही करण्यात आली. ऱ्हाईन नदीच्या पश्चिमेकडे, तसेच सु. ४८ किमी. पूर्वेकडे जर्मनीने आपले लष्कर ठेवू नये, तेथे अस्तित्वात असलेली तटबंदी उद्ध्वस्त करावी, असा निर्णय घेण्यात आला आणि जर्मनी तहाच्या अटी पूर्ण करेपर्यंत ऱ्हाईनच्या पश्चिमेकडील प्रदेशात दोस्त राष्ट्रांचे सैन्य ठेवावे, असे ठरले. या तहानंतर जर्मनीने आपल्या वर्चस्वाखालील सर्व वसाहतींवरील अधिकार सोडले व त्यावर मित्र राष्ट्रांची मालकी प्रस्थापित झाली. यांपैकी बरेच प्रदेश मित्र राष्ट्रांनी आपल्या साम्राज्यास न जोडता राष्ट्रसंघाचे विश्वस्त या नात्याने त्यांची देखभाल केली. याशिवाय जर्मनीने युद्धकाळात मित्र राष्ट्रांचे जे नुकसान केले होते, – उदा., कोळशाच्या खाणी इ.- त्यांची नुकसानभरपाई घेण्यात आली. ती लक्षावधी डॉलर होती.

पहिल्या महायुद्धानंतर युरोपात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने केलेल्या या तहाने प्रत्यक्षात मात्र दुसऱ्या महायुद्धाचे बीजारोपण केले. वुड्रो विल्सनच्या शांततेच्या चौदा तत्त्वांना या तहात महत्त्वाचे स्थान न देता विजेत्या राष्ट्रांनी स्वत:चा स्वार्थ व आपापसांतील करारच डोळ्यांसमोर ठेवले आणि जर्मनीचे पूर्णपणे खच्चीकरण केले. महायुद्धाची सर्व जबाबदारी जर्मनीवर टाकून तिला युद्धदंड भरण्यास भाग पाडले. तिची खनिज संपत्ती, कारखाने व वसाहती यांचा मित्र राष्ट्रांनी ताबा घेतला. त्यामुळे जर्मनीच्या मनात मित्र राष्ट्रांबद्दल द्वेष व तिरस्काराची भावना निर्माण झाली. याचा ⇨डॉल्फ हिटलरने (१८८९-१९४५) योग्य तो उपयोग करून, जर्मन लोकांच्या भावना भडकविल्या. दुसऱ्या महायुद्धाची जणू नांदीच या तहाने केली. राष्ट्रसंघातून अमेरिकेने प्रथमपासूनच अंग काढून घेतल्यामुळे व राष्ट्रसंघाकडे कोणत्याच प्रकारचे सैन्य नसल्याने ही आंतरराष्ट्रीय संस्था दुबळी ठरली आणि दुसऱ्या महायुद्धास ती पायबंद घालू शकली नाही.

पहा : महायुद्ध, दुसरे महायुद्ध, पहिले राष्ट्रसंघ.

संदर्भ : 1. Gathorne-Hardy, G. M. The Fourteen Points and the Treaty of Versailles, New York, 1939.

            2. House, Edward M. Seymour Charles, Ed. What Really Happened at Paris, New York, 1921.

            3. Marston, Frank S. The Peace Conference of 1919, New York, 1944.

            4. Riddell, Lord and others, The Treaty of Versailles and After, Oxford, 1935.

भिडे, ग. ल.