व्यास : परंपरागत उल्लेखांनुसार अनेक ग्रंथांचे कर्ते म्हणून व्यास प्रसिद्ध आहेत. त्यांनी वेदांचे विभाजन व वर्गीकरण केले म्हणून त्यांना ‘वेदव्यास’ म्हणतात. याशिवाय व्यासशिक्षा, ⇨ ब्रह्मसूत्रे, ⇨ महाभारत, पुराणे, व्यासभाष्य इ. ग्रंथांचे कर्ते तेच समजले जातात. व्यासांच्या नावावर वेदव्यासस्मृती नावाचा एक स्मृतिग्रंथही आहे. परंतु ह्या समजुतीतील परंपरागत भाविकपणा सोडल्यास आणि मागील ग्रंथांचे भिन्नभिन्न रचनाकाल विचारात घेतल्यास, त्यांचे कर्ते एकच व्यास असतील असे वाटत नाही. ‘व्यास’ शब्दाचा संस्कृतातील सामान्य अर्थ विस्तार, विभाजन असा आहे. पुढे त्या-त्या ज्ञानशाखेतील ज्ञानसंग्रहाचा व्यास म्हणजे त्या ज्ञानसंग्रहाचे तपशीलवार विभाजन व वर्गीकरण करून दाखविणाऱ्या ग्रंथकारालाही व्यास (महाभारत १·५७·७३) म्हणू लागले असावेत. वेळोवेळी असे अठ्ठावीस व्यास होऊन गेल्याचा उल्लेख पुराणांत सापडतो (विष्णुपुराण ३·३·८-१९ इत्यादी). अशा तर्हेसच्या व्यासग्रंथकारांमध्ये भागवतात (११·१६·२८) म्हटल्याप्रमाणे महाभारताचे कर्ते कृष्णद्वैपायन व्यास अग्रगण्य समजले जातात (‘द्वैपायनोऽस्मि व्यासानाम्’).

महाभारताधारे (१·५७·५६-७१) कळून येणारी कृष्णद्वैपायन व्यासांची जन्मकथा आणि चरित्र वैशिष्ट्यपूर्ण व असामान्य आहे. एकदा यमुना नदी पार करण्याकरिता तरीत बसलेले ⇨ पराशरमुनी तरी चालवणाऱ्या धीवरकृतककन्या सत्यवतीच्या लावण्यावर मोहीत झाले. ‘माझा कन्याभाव दूषित न व्हावा’, अशी अट सत्यवतीने घातली आणि ती पराशरांनी मान्य करून आपल्या तप:सामर्थ्याने तिच्या शरीराचा मत्स्यगंध दूर करून तिला योजनसुगंधा केले व तरी भोवती दाट धुके उत्पन्न केले. येथील त्यांच्या समागमातून पुढे कृष्णद्वैपायन व्यासांचा जन्म झाला. यमुनेतील द्वीपावर जन्म म्हणून द्वैपायन व वर्णाने काळेसावळे म्हणून कृष्ण असे त्यांचे नाव पडले. पुढे सत्यवतीचा विवाह शंतनूशी झाला, पण चित्रांगद व विचित्रवीर्य ही त्यांची दोन्हीही मुले अकाली कालवश झाली. वंश चालू राहून वंशातच राज्य राहावे म्हणून सत्यवतीने व्यासांना अंबिका व अंबालिका ह्या सुनांच्या ठिकाणी नियोगविधीने संतती उत्पन्न करण्यास सांगितले. त्याप्रमाणे व्यासांपासून त्या सुनांना धृतराष्ट्र आणि पंडू तसेच अंबिकेने पाठविलेल्या दासीपासून विदुर असे तीन पुत्र झाले. पुढे कौरव-पांडवांच्या कलहात, अनेक प्रसंगी कृष्णद्वैपायन वेळोवेळी सल्ला देत असत. नंतर पंडू, धृतराष्ट्र व विदुर हे व्यासांचे तीनही मुलगे मरण पावल्यावर त्यांनी भारत रचले असा महाभारतात (१·१·५६) उल्लेख आहे. याशिवाय महाभारतात (१२·३११·१ ते २७) त्यांच्या शुक या पुत्राचा उल्लेख आहे. स्वत:चा एक पुत्र असावा अशी इच्छा एकदा कृष्णद्वैपायनांना झाली आणि त्यासाठी त्यांनी घोर तपश्चर्या केली. प्रसन्न झालेल्या शंकराने त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला (१२·३१०·१२-१३, २१, २६-२७). पुढे अग्नी निर्माण करण्यासाठी अरणिमंथन करीत असता घृताची नावाच्या अप्सरेला पाहून त्यांचा काम अनावर झाला. तेव्हा शुकीचे रूप घेऊन घृताची व्यासांजवळ आली. तिने असे रूपांतर केल्यानंतरही व्यासांचा काम अनावरच राहिला. त्यांनी तो आवरण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांचे शुक्र ते मंथन करीत असलेल्या अरणीवर पडले. व्यासांचे अरणिमंथन चालूच होते. त्या मंथनातून शुक्राचा जन्म झाला. तेव्हा तो अरणिसंभव आहे (महाभारत १२·३११·१ – ९). पुढे शुक विरक्त होऊन कृष्णद्वैपायनांना सोडून गेला.

महाभारतातील उल्लेखावरून (१·१·६१) स्वत: कृष्ण द्वैपायन व्यासांनी २४,००० श्लोकांचे उपाख्यानविरहित भारत रचिले व त्यांचा शिष्य वैशंपायन याने त्यात आख्यानोपाख्यानादिकांची भर घालून त्याला सु. एक लाख श्लोकसंख्या असलेल्या सध्याच्या महाभारताचे रूप दिले, असे आढळून येते. [(नीलकण्ठी प्रत १·१·१०९ १·१·१०७ १८·५·५५ भांडारकर संस्थेच्या संशोधित प्रतीत हे श्लोक प्रक्षिप्त मानले आहेत. तिथले संदर्भ अनुक्रमे : १ (पृष्ठ १२), ३०*. ३ १. (पृष्ठ १२), २९*. ४ १८. (पृष्ठ २९), ५०*.४ खेरीज १८. (पृष्ठ २९), ५१*२ (हा शेवटचा श्लोक नीकलण्ठी पाठात नाही पण इतर थोड्या हस्तलिखितांत आहे.)] या उल्लेखावरून मूळ भारत-कथा आटोपशीर असावी व ती रचणारी व्यक्ती एकच असावी आणि ती व्यक्ती कृष्णद्वैपायन व्यासच असावी, असा निष्कर्ष निघू शकतो. महाभारतातील भीष्म, धृतराष्ट्र, विदुर, दुर्योधन, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, द्रौपदी, कुंती, गांधारी ह्या व्यक्तिरेखा मानवी स्वभावाच्या विविधरंगी छटांनी इतक्या भेदक व नाट्यपूर्ण वाटतात, की त्या निर्माण करणारे कृष्णद्वैपायन प्रतिभासंपन्न व असामान्य कर्तृत्वशाली असले पाहिजेत, याबद्दल शंका वाटत नाही. कृष्णद्वैपायनांचे भिन्नवर्णीय आईबाप, लग्नबाह्य संबंधातून त्यांचा झालेला जन्म, त्यांचा कृष्णवर्ण, त्यांनी भारतातील कथानकांतून रेखिलेले बहुजिनसी समाजाचे व त्यातील विविध मानवी स्वभावांचे संमिश्र चित्र यांवरून ते आर्य व आर्येतर, वैदिक व पौराणिक अशा दोन भिन्न संस्कृतींच्या संगमाचे एक महान प्रवर्तक व उद्गाते होते असे जे डॉ. ⇨ सुनीतिकुमार चतर्जी यांनी म्हटले आहे, ते अर्थपूर्ण वाटते.

महाभारतकथेत खुद्द व्यासांची उपस्थिती अधूनमधून दिसते. उदा., (१) युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञासाठी व्यासांनी ऋत्विज गोळा केले व स्वत: ब्रह्मा ऋत्विज झाले (२·३०·३३ –३४). (२) कौरव-पांडवांचे युद्ध उभे राहिल्यानंतर धृतराष्ट्राला ते पाहता यावे, म्हणून व्यासांनी धृतराष्ट्राला दिव्यदृष्टी देऊ केली होती. त्याने ‘नको’ म्हटल्यानंतर त्यांनी ती संजयाला दिली (६·२·६ –११). महाभारताची रचना झाल्यावर व्यासांनी चार श्लोकांची ‘भारत सावित्री’ रचली (१८·५·४६ – ५१). त्यांतील पुढील श्लोक प्रसिद्ध असून तो व्यासांच्या जीवनाच्या दृष्टीनेही फार अर्थपूर्ण आहे :

ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चिच्छृणोति मे |

धर्मादर्थश्च कामश्च स धर्म: किं न सेव्यते ॥

महाभारतात व्यासांच्या दोन आश्रमांचा उल्लेख आहे. एक हिमालयावर. तेथे व्यासांनी त्यांच्या चार शिष्यांना आधि शुकाला महाभारत शिकविले (१२.३१४.२३ –२५, ३०१२.३३७. ९ – १३). व्यासांचा दुसरा आश्रम इंद्रप्रस्थाहून हस्तिनापुरास जातानाच्या वाटेवर. इथे अर्जुनाने व्यासांची भेट घेतली (१६.८.७४ १६.९). परंपरेनुसार व्यासांचा सात चिरंजीवांत अंतर्भाव केला जातो.

संदर्भ : 1. Sukthankar, V. S. Belwalkar, S. K. Vaidya, P. L. and Others, The Mahabharat (Critical Edition), Vols. 19 Books 22, Poona, 1933-1968.

            २. वैद्य, चिं. वि. महाभारत, पुणे, १९२२.

बेडेकर, वि. म.