वैष्णव संप्रदाय : विष्णू व त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची साराधना करणारा संप्रादाय. वैष्णव संप्रादायाचे मुख्य दैवत नायारण-विष्णू व त्याचे विविध अवतार होत. नारायण या अवैदिक देवाचा उल्लेख प्रथम शतपथ ब्राह्यणात आढळतो. ⇨विष्णू या देवाचा उल्लेख ऋग्वेदात फक्त पाच सूक्तांत आढळतो. यावरून आर्य देवताकुलात तो प्रथम प्रतीचा देव नसावा, असा अंदाज आहे. महाभारत व पुराणे यांत नारायण व विष्णू या दोन नावांनी एकाच देवतेचा उल्लेख केला गेला आहे. या देवाच्या उपासकांना भागवत, पंचरात्र, एकांतिक, सात्वत आणि वैष्णव अशी विविध नावे दिलेली आढळतात. महाभारताच्या बऱ्याच नंतरच्या भागात वैष्णवांचा उल्लेख क्वचित आढळतो. यावरून वैष्णव पंथाला वैष्णव हे सामान्य नाव बऱ्याच नंतर, म्हणजे विष्णू या देवाला महत्त्व मिळाल्यानंतर प्राप्त झाले असावे. मृणाल दासगुप्ता यांच्या मते भागवत हे नाव मूळ वृष्णिकुलाचे दैवत वासुदेव-कृष्ण याच्या उपासकांनी धारण केले असून ते नारायण-विष्णूच्या उपासकांपेक्षा वेगळे होते. श्रीमती जयस्वाल यांच्या मते भागवत हा शब्द ‘भज’ (= वाटणी करणे) या धातूवरून (‘भग’ म्हणजे संपत्ती, वाटा अशा अर्थाचा शब्द ऋग्वेदात आहे) आला आहे. व कृषिप्रधान भारतीय संस्कृतीत धान्य (मुख्यत्वे भात) आपापसांत वाटून घेऊन समूहाने राहणाऱ्या समाजाला भागवत हे नाव मिळाले असावे. कौटिलीय अर्थशास्त्राय वृष्णिकुलातील संकर्षण-बलदेव ह्याच्या आलेल्या उल्लेखावरून इ. स. पू. चौथ्या शतकात त्याची उपासना होत असावी परंतु पुढे हा देव पांचरात्र संप्रदायाने मान्य केल्यानंतर वैष्णव पंथात याच वृष्णिकुलातील वासुदेव-कृष्ण याची उपासना सुरू झाली असावी. कुशाणकालीन स्थापत्यकलेतील वासुदेवाच्या मूर्तीवरून तत्कालीन गोपालकांचे हे दैवत असावे, असे वाटते. गोविंदाचार्य स्वामिन यांच्या मते ⇨भागवत धर्माला प्रथम केवळ वासुदेव हाच देव मान्य होता आणि कृष्ण हा देव या वासुदेवापेक्षा वेगळा होता. कृष्ण हा आभीर या भटक्या गोपालक जमातीचा देव होता. या कृष्णाचे व वासुदेवाचे एकीकरण होऊन कालांतराने वासुदेव-कृष्ण हे भागवतांचे व साऱ्या वैष्णव पंथीयांचे मुख्य दैवत बनले.

वैदिक धर्मात प्राचीन काळातील यज्ञयागांनी देवांना पुजण्याचा मार्ग अशोकाच्या नंतरच्या काळात मागे पडला आणि देवांना पुजण्यासाठी मंदिरे बांधली जाऊन गंधफुलांनी पूजा करण्याचा नवा मार्ग सुरू झाला. त्या वेळी एका नव्या धर्मकल्पनेची सुरूवात झाली असे मानले जाते. या नव्या धर्मात भक्तीला मध्यवर्ती स्थान मिळाले. या मन्वंतराला जी मुख्य घटना कारणीभूत झाली, ती म्हणजे वैष्णव धर्माची उभारणी असे इतिहासकारांचे मत आहे. भक्तीमार्गाचे तत्त्वज्ञान व त्याची सारी विधिरचना वैष्णव पंथाने आपल्या भागवत धर्माद्वारे शिकविली आहे. कृष्ण हा परमेश्वर असून त्याला भक्तीने शरण जाण्याचे मानवाचा उद्धार होतो, ही भागवत धर्माची शिकवण केवळ गीतेतच नव्हे तर भागवतादी पुराणांत अमर करण्यात आली. त्यासाठी कृष्णाचे जीवनचरित्र, त्याला लीला यांना काव्य, कथा, कला यांच्याद्वारा जितके रंगविण्यात आले, तितके वैदिक धर्मातील इतर कोणत्याही दैवताला रंगविण्यात आले नाही. यज्ञयागादिकांचे मंत्र मागे पडून कृष्णभक्तीची गाणी गाण्यात संतकवी तल्लीन झाले आणि देवदेवतांची आवाहने बंद पडून कृष्णावरील प्रेम व्यक्त करण्याला व मुक्ती मिळविण्याला केवळ गोपींची आर्तता पुरे, हा भक्तीमार्गाचा कानमंत्र ठरला. [→ कृष्ण].

यज्ञयागात पशूंची हत्या होते म्हणून त्याविरूद्ध बौद्ध व जैन धर्मीयांनी जे अहिंसेचे नवे नैतिक तत्त्व उभारले, त्याला वैष्णव पंथाकडून पूर्ण मान्यता मिळाली. कदाचित या तीन धर्मांनी स्वतंत्रपणे अहिंसेचा पुरस्कार केला असावा. वैदिक विधीप्रमाणे यज्ञयाग करण्यात गोपलांना उपयुक्त अशा अनेक पशूंचा नाश होत असावा, म्हणून वैष्णव पंथाने त्याविरूद्ध प्रचार केला असावा असे अलीकडील इतिहासकारांचे मत आहे. रामाच्या अयोध्येत अशा प्रकारचा कायदा होता, असा रामायणात उल्लेख आहे.    

वैष्णव पंथातील आणखी एक महत्त्वाचे नवे तत्त्व म्हणजे त्यातील अवतारवाद. देव निरनिराळी रूपे धारण करून फिरतात असा ऋग्वेदात उल्लेख असला, तरी वैष्णव धर्मातील अवताराची कल्पना त्याहून वेगळी आहे. दृष्टांचा नाश करण्यासाठी व भक्तांच्या रक्षणासाठी देव अवतार घेतो, हे उद्दिष्ट वैदिक कल्पनेत आढळत नाही. वैष्णव पंथाने अवतारवादाची ही कल्पना बौद्ध धर्मावरून घेतली असावी असे विद्वानांचे मत आहे. बुद्धाच्या पूर्वीच्या अवताराप्रमाणेच विष्णूच्या अवतारांवर पुराणे रचली गेली. हे विष्णूचे अवतार किती होते, याबद्दल मात्र निरनिराळे उल्लेख आढळतात. महाभारतातील नारायणीय या भागात या अवतारांच्या दोन याद्या आहेत. पहिल्या यादीत सहा अवतारांचा उल्लेख आहे व दुसऱ्या यादीत चारच अवतारांचा उल्लेख आहे. यावरून दहा अवतारांची (पहा : मराठी विश्वकोश, खंड १, चित्रपत्र ७९) कल्पना बरीच नंतरची (इ. स. आठवे शतक) असावी असे दिसते. [→ अवतार दशावतार].    

अवतारांच्या य कल्पनेला साकार करण्याकरता की काय वैष्णव पंथात पूर्वीपासून मंदिरे व देवांच्या विविध अवतारांच्या मूर्ती आणि पूजा यांचा उल्लेख आढळतो वैष्णव पंथाची ही प्रथा वैदिक धर्मीयांना मान्य नसावी. मनुस्मृतीत मनूने देवलक (म्हणजे देवळातील मूर्तीची पूजा करणारे) यांना यज्ञासाठी आमंत्रण देऊ नये, असा नियम दिला आहे, परंतु कालांतराने मंदिरे व मूर्तीपूजा इतर धर्मीयांनी स्वीकारून त्यात आपल्या सोयीप्रमाणे फेरफार केले असावेत.

मंदिरे आणि मूर्ती यांच्याबरोबरच पूजाविधी हे वैष्णव पंथाचे वैशिष्ट्य होते. या पूजाविधींचे विष्णुस्मृतीतले वर्णन हे सर्वात प्राचीन समजले जाते. त्यात देवाला धूप, अलंकार, वस्त्रे, फुले इ. अर्पण करण्यात येतात, असे वर्णन आहे. पूजा करतेवेळी वाद्ये वाजविण्याची प्रथाही या पंथाने रूढ केली असावी. मंदिराची उभारणी व मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासंबंधी अनेक नियम रचण्यात आले. धार्मिक अधिकार-निदर्शक वैदिक ⇨उपनयन या विधीऐवजी ⇨दीक्षा दिली जाते, त्यांच्या अंगावर विष्णूची शंख, चक्र इ. पवित्र चिन्हे काढण्यात येत असत. यावरून कित्येक वैष्णवांना चक्रधर अशी संज्ञा देण्यात आली. ⇨अश्वघोषाच्या बुद्धचरितात या चक्रधरांचा उल्लेख आढळतो. या चिन्हांबरोबर पूजेआधी कपाळावर व शरीराच्या विशिष्ट भागांवर गंधाचे पट्टे, टिळे इ. काढण्याची प्रथाही वैष्णव धर्मीयांनी सुरू केली. यातही जी विविधता आढळते, ती त्या त्या उपपंथाचे वेगळे तत्त्वज्ञान दर्शविते.

वैदिक धर्मीयांनी यज्ञांसाठी विधींवर भर दिला होता. उलट वैष्णव धर्मीयांनी पूजेसाठी ⇨जपावर भर दिलेला आढळतो. विधियज्ञापेक्षा जपयज्ञ दसपट महत्त्वाचा आहे. असे विष्णुस्मृतीत म्हटले आहे. जप हा मूकपणे म्हणायचा असतो. यातूनच ⇨मंत्रांची व मंत्रशक्तीची कल्पना निर्माण झाली. मंत्रांनी देवाचे ध्यान करण्याची प्रथा वैदिक धर्मीयांच्या देवांच्या आवाहनापेक्षा वेगळी होती. देवाचे अनेकदा नाव घेण्याने, म्हणजे जप करण्याने तो देव मानत साकार होतो या कल्पनेतूनच, शब्दशक्तीची व मंत्रशक्तीची महत्ता वाढविण्यात आली.

वैष्णव पंथात जसे मंदिर व पूजाविधींना महत्त्व होते, तसे चातुर्मास्य या वर्षकालाला फार महत्त्व होते. गुप्तकाळात आढळणाऱ्या चातुर्मास्याच्या वर्णनावरून त्याचे महत्त्व ऊस व भात यांच्या रोपणी व कापणी या शेतकी व्यवसायातील क्रियांशी निगडित केले गेले असावे. कार्तिकात शकट व उळूखल यांची ऊसाने पूजा केली जात असे व हाच प्राचीन पूजाविधी पुढे ⇨चातुर्मास्याच्या विधीत समाविष्ट करण्यात आला. चातुर्मासाच्या या महत्त्वाच्या व्रताबरोबर इतर लहानलहान व्रतांची व उपवासांची रचना झाली. वैष्णव धर्माने मानवाच्या लहानसहान क्रियांचे आचारात व व्रतात जे रूपांतर केले, त्याला इतर धर्मांत क्वचितच तोड मिळेल. अशा रीतीने भगवच्चिंतनाला केव्हाही विराम नाही, अशी ग्वाही या पंथातल्या संतकवींनी दिली आहे.

वैष्णव पंथाचा उदय व प्रसार साधारणपणॆ इ. स. पू. २०० ते इ. स. ५०० या काळात झाला असवा. या काळात आर्येतर जमातींचे भारतातील महत्त्व वाढले होते, इतकेच नाही, तर बऱ्याच परकीय जमातींनी भारतात प्रवेश केला होता. या सर्वांना आर्यांच्या कर्मकांडांनी व्यापलेल्या यज्ञयागांपेक्षा आर्येतरांच्या कलाकुसरींनी नटलेल्या मंदिरांविषयी व देवतांविषयी आकर्षण वाटणे साहजिक होते. ग्रीकांचा राजदूत हीलिओडोरस हा भागवत पंथाचा अनुयायी होता असा बेसनगर येथील शिलालेखात उल्लेख आहे. कुशाण राजे हे जरी बौद्ध धर्मीय होते, तरी त्यांनी वासुदेवाच्या उपासनेला प्रोत्साहन दिलेले आढळते. यावरून वैष्णव पंथाने परकीयांना व आर्येतरांना आर्य धर्माची दीक्षा देण्याचे महान कार्य केले, असे मानण्याला हरकत नाही. या पंथाचे मूळ कार्यक्षेत्र मध्यदेशच्या दक्षिणेस, गुजरात व राजस्थानच्या उत्तरेस होते असे ग्रीअर्सनचे मत आहे. रायचौधरींच्या मते यमुनेचा प्रदेश हा या पंथाचा मुख्य प्रदेश होता. येथूनच या पंथाला प्रसार सर्व भारतातच नव्हे, तर भारताच्या बाहेर बाली, जावा इ. प्रदेशांत गुप्तकाळात झाल्याचे पुरावे आढळून आले आहेत.

इ. स. आठव्या शतकापर्यंत वैष्णव पंथाचा जो प्रसार झाला, तो सामान्यतः स्थलव्याप्तीने विशाल होता यात शंका नाही परंतु त्यानंतर ⇨ शंकराचार्यांच्या मायावादाचे खंडन करण्यासाठी जे वैष्णव आचार्य पुढे सरसावले, त्यांनी वैष्णव पंथाच्या तत्त्वज्ञानाची मुळे भारतीय जीवनात अधिक खोलवर रुजविली. इ. स. नवव्या शतकापासून ते बाराव्या शतकाअखेरपर्यंत वैष्णव पंथाच्या ज्या चार मुख्य शाखा बनल्या त्या श्रीसंप्रदाय, ब्रह्यसंप्रदाय, सनकसंप्रदाय व रुद्रसंप्रदाय या होत. या चार शाखांचे प्रणेते अनुक्रमे ⇨रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क व ⇨वल्लभाचार्य हे होत. शंकराचार्याच्या अद्वैताविरुद्ध या चार आचार्यांनी अनुक्रमे विशिष्टाद्वैत, द्वैत, द्वैताद्वैत व शुद्धाद्वैत या तत्त्वप्रणालींची रचना केली. या चारही तत्त्वप्रणाली एकमेकींपासून विभिन्न असल्या तरी त्यांच्यात सामान्यतः जे ऐक्य आढळते ते शंकराचार्यांच्या मायावादाशी विरोध व केवलाद्वैताची अशक्यता मांडण्याच्या बाबतीत आढळते. विश्वाची सत्यता सिद्ध करण्याने या वैष्णव पंथीय आचार्यांनी मानवाला संसारप्रवृत्त केले व द्वैत सिद्ध करण्याने ईश्वर व जीवात्मा यांच्यात खरेखुरे भक्तीचे नाते जोडले. अर्थातच या आचार्यांच्या तात्विक चर्चेला तत्कालीन संतकवींच्या रसाळ भक्तीकाव्याचा मोठा आधार मिळाला. ईश्वर कुठल्याही स्वरूपात असला, तरी खरे महत्त्व आहे ते मानवाच्या भक्तीचे, हे सांगण्यात या संतकवींनी वैष्णव पंथाला व्यापक धर्माचे स्वरूप दिले. कृष्ण आणि त्याच्या बाललीलांनी या संतकवींच्या काव्यात जसे बाल्य हे एक अमर कथारूपक दाखल झाले, तसे कृष्ण व त्याच्या गोपींशी केलेल्या क्रीडांनी भारतीय काव्यकलांना प्रेमरूपक पुरविले. जोपावेतो धर्माला सामान्य मानवात आढळणाऱ्या सामान्य भावनांचे उन्नतीकरण साधत नाही, तोपर्यंत धर्म हा एक पुस्तकी वाद यापलीकडे कधीही जाऊ शकत नाही. वैष्णव धर्माने वैदिक धर्मापलीकडे जे काही प्राप्त केले, ते या मार्गाने, याबद्दल दुमत नाही. बाराव्या शतकाच्या अखेरीस लिहिले गेलेले जयदेवाचे गीतगोविंद ही या दृष्टीने वैष्णव पंथाची सर्वश्रेष्ठ कलाकृती मानावयास हवी.

इ. स. तेराव्या शतकापासून वैष्णव संप्रादायाच्या अधिकाधिक शाखा भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांत निर्माण झाल्या. त्यांत पुढील प्रसिद्ध आहेत : (१) गौडीय संप्रदाय (प्रवर्तक-चैतन्य, बंगाल), (२) महापुरुषिया संप्रदाय प्रवर्तक -⇨शंकरदेव, आसाम), (३) ⇨रामदासी पंथ (प्रवर्तक – रामदास, महाराष्ट्र), (४) उद्धवी स्वामीनारायण संप्रदाय (प्रवर्तक – सहजानंद, गुजरात), (५) रामावत संप्रादाय (प्रवर्तक-रामानंद, उत्तर प्रदेश). यांशिवाय राधावल्लभी संप्रदाय, हरिव्यासी संप्रदाय, गोकुलेश संप्रदाय, सखीभावक संप्रदाय, मार्गी संप्रदाय, हरिदासी संप्रदाय, गोकुलेश संप्रदाय, सखीभावक संप्रदाय, मार्गी संप्रदाय, हरिदासी (अथवा हट्टी) संप्रदाय इ. अनेक लहान संप्रदाय आढळून येतात. महाराष्ट्रातील ⇨महानुभाव पंथ व ⇨वारकरी संप्रदाय, बंगालमधील बाउल पंथ व उत्तरेतील तुलसीदास, कबीर, मीरा वगैरे संतकवींची मूळ स्फूर्तिगंगा वैष्णव पंथाच्या भक्तिमार्गातूनच निघालेली आहे.

वैष्णव पंथाचे मुख्य प्राचीन साहित्य महाभारतातील नारायणीय पर्व, भागवतपुराण व भगवदगीता हे होय. दक्षिण भारतात ⇨आळवार संतांच्या गीतांच्या प्रबंधम या संग्रहाला फार मान्यता आहे, वैष्णव पंथाची अधिक पद्धतशीर तत्त्वप्रणाली पांचरात्र संहितांत आढळते. या संहिता इ. स. १०० च्या सुमारास शांडिल्य (उपनिषदांचा ऋषी नव्हे) याने रचल्या असे मानले जाते. साधारणतः यांची संख्या १०८ आहे असे म्हणतात परंतु पांचरात्र संहितांच्या ज्या सूची तयार केल्या आहेत, त्यांत त्यांची संख्या यापेक्षा अधिक असल्याचे आढळते. या संहिता एकाच काळात लिहिल्या गेलेल्या नाहीत. एफ. ओटो श्रडर या पाश्चात्य पंडितांच्या मते पौष्कर, वराह, ब्राह्य, सात्त्वत, जप, अहिर्बुध्न्य, पारमेश्वर, सनत्कुमार, परम, पद्योदभव, माहेन्द्र, काण्व, पाद्य आणि ईश्वर एवढ्या संहिता प्राचीन म्हणजे इ. स. ८००च्या पूर्वीच्या आहेत.

शैवांच्या आगमाप्रमाणेच वैष्णवांच्या या संहिता चार भागांत (पाद) विभागलेल्या आढळतात. हे भाग म्हणजे ज्ञान, योग, क्रिया आणि चर्या हे होत. चारही भाग फारच थोड्या संहितांमध्ये आढळतात. जिथे चारही भाग आढळतात तिथे लेखकाने एखाद्या भागावर विशेष भर दिलेला आढळतो. उदा., पाद्य संहितेत ज्ञानपादाला ४५ पाने, योगपादाला ११ पाने, क्रिडापादाला २१५ पाने व चर्या-पादाला ३७६ पाने वाहिली आहेत. श्रडर यांच्या मते सर्व संहितांमधल्या मुख्य विषयांची यादी केली तर ती पुढीलप्रमाणे होईल : (१) तत्त्वज्ञान, (२) मंत्रशास्त्र, (३) मंत्रशास्त्राला उपयोगी अशा आकृत्यांचे शास्त्र किंवा यंत्रशास्त्र, (४) प्रायोगिक योग किंवा मायायोग, (५) योगाचे तत्त्वज्ञान, (६) मंदिरनिर्माण, (७) मूर्तिप्रतिष्ठाविधी, (८) गृहजीवनातले विधी, (९) वर्णाश्रमधर्म, (१०) उत्सव.

पांचरात्र तत्त्वज्ञानाप्रमाणे परब्रह्य हे अनादी, अनंत व सर्वव्यापी असते. यालाच परमात्मा, भगवान, वासुदेव ही नावे आहेत. सर्व सृष्टीला करणरूप बनवणारे हे ब्रह्यज्ञान, शक्ती, ऐश्वर्य, बल, वीर्य व तेज या सहा गुणांनी युक्त असले, तरी त्याचा खरा गुण ज्ञान हाच आहे. हे षड्गुणी ब्रह्य ‘बहु स्याम’ असा संकल्प करते, त्या संकल्पाचे नाव सुदर्शन. ही त्याची संकल्पनशक्ती म्हणजेच लक्ष्मी. तिच्या योगे ते ब्रह्य शुद्धाशुद्ध भोग्यभोक्ता अशी विभागमय सृष्टी उत्पन्न करते. या सृष्टीत वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध हे व्यूह निर्माण होतात. या चार व्यूहांतून आणखी बारा उपव्यूह (व्यूहांतरे) निर्माण होतात. व्यूह म्हणजे रूप. विष्णूच्या या विविध रूपांच्या मूर्ती, आयुधे, भूषणे वगैरे गोष्टी निश्चित केल्या गेल्या होत्या असे उत्खनात सापडलेल्या मूर्तीवरून दिसते. वर वर्णन केलेली व्यूहसृष्टी ही शुद्धीसृष्टी झाली. अशुद्ध सृष्टी तीन प्रकारची आहे : पुरूष, काल आणि गुण. पुरूषसृष्टीत प्रद्युम्नातून चार वर्ण उत्पन्न झाले. काल या शक्तीतून काळ व नियती निर्माण झाले आणि गुणातून सत्त्व, रज व तम हे तीन गुण, पंचमहाभूते व अकरा इंद्रिये निर्माण होतात. सृष्टी उत्पन्न होते त्याच्या उलट क्रमाने तिचा विलय होतो. अशुद्ध सृष्टीतले जीवात्मे ज्ञान-आनंद-भक्ती यांच्या साहाय्याने शुद्ध सृष्टीतल्या भगवानाशी एकरूप होऊ शकतात. या प्रकारचे तत्त्वज्ञान या संहितांत सांगितलेले आहे. [→ पांचरात्र].

वैष्णव पंथ ब्राह्यणविरोधी होता व ईश्वराच्या भक्तीसाठी ब्राह्मणांच्या मध्यस्थीची जरूर नाही, असे त्याचे प्रथमपासून सांगणे होते. याचप्रमाणे वैष्णव धर्मीयांनी आपल्या लेखनासाठी संस्कृत ऐवजी मुख्यत्त्वे तत्कालीन प्राकृतांचा उपयोग केलेला आढळतो. शैव संप्रदायाइतके विकृत उपपंथ त्यात निर्माण झाले नसले, तरी सहजीया-पंथातील राधाकृष्णांच्या प्रेमाची विपरीतता, किशोरीभाज पंथातील धार्मिक लैंगिकता आणि सखीभाव पंथातील समानलिंगी-संभोगता या पंथाच्या नंतरच्या काळातील काही विकृती होत.

पहा : भागवत धर्म.

संदर्भ : १. Bhandarkar, R. G. Vaisnavism, Saivism and Minor Religious Systems, Varanasi, १९६५.

           २. De, S. K. Early History of the Vaisnava : Faith and Movenent in Bengal, Calcutta १९६१.  

           ३. Jaiswal, Suvira, The Origin and Develoment of Vaisnavism from २०० B. C. to A. D. ५००, Delhi, १९६७.

           ४. Mallik, Girindra Narayan, The Philosophy of Vaisnava Religion, Lahore, १९२७. 

           ५. Raichodhary, Early History of the Vaisnava Sect, १९३६.

           ६. Rao, Gopinath, Histroy of Srvaisnavas, १९२३.

           ७. Schrader, F. O. Introduction to the Pancaratra and the Athirbudhnya Samhita, Adyar, १९१६.

  माहुलकर, दि. द.