वेलिंग्टन, ड्यूक ऑफ : (१ मे १७६९–१४ सप्टेंबर १८५२). ग्रेट ब्रिटनचा पंतप्रधान व सरसेनापती. त्याचे मूळ नाव आर्थर वेलस्ली. डब्लिन येथे जन्म. त्याने ईटन महाविद्यालय (ऑक्सफर्ड) व ॲन्जर्स (फ्रान्स) येथील सैनिकी अकादमीत शिक्षण घेतले. प्रथम त्याची कनिष्ठ अधिकारी म्हणून भूदलात नियुक्ती झाली (१७८७). तो लेफ्टनंट कर्नल झाला. फ्लॅंडर्सच्या लष्करी मोहिमेत (१९९४-९५) त्याचे युद्धकौशल्य दिसून आले. त्यामुळे त्याच्याकडे हिंदुस्थानातील ⇨टिपू सुलतानविरुद्धची मोहिम सोपविण्यात आली (१७९६). त्याचा वडीलभाऊ ⇨लॉर्ड रिचर्ड वेलस्ली हिंदुस्थानात गव्हर्नर जनरल (कार. १७९७–१८०५) म्हणून रुजू झाला होता. वेलिंग्टनने टिपूचा पराभव करून तो म्हैसूरचा गव्हर्नर झाला. मद्रास इलाख्याचा प्रशासन व सेनाप्रमुख म्हणूनही त्याने काम केले. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांबरोबर वसईचा तह करून (१८०२) तैनाती फौज स्वीकारली. वेलिंग्टनने असई व आरगाव येथील लढायांत शिंदे-होळकरांचा पराभव केला (१८०३) व त्यांना अंकित केले.
वेलिंग्टनने फ्रान्सबरोबरची तूलूझची लढाई (एप्रिल १८१४) जेव्हा जिंकली, तेव्हा नेपोलियन राज्यत्याग करून एल्बाला गेला होता. या विजयानंतर वेलिंग्टनला `फील्ड मार्शल’ व `ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ या पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. पॅरिस शांतता तहानंतर त्याची राजदूत म्हणून पॅरिसला नेमणूक झाली (जुलै १८१४). तेथून तो व्हिएन्ना कॉंग्रेसमध्ये इंग्लंडचा प्रतिनिधी म्हणून गेला. त्या सुमारासच नेपोलियन स्वगृही परतला होता. तेव्हा मित्रराष्ट्रांनी त्याविरुद्ध फील्ड मार्शल वेलिंग्टन आणि फील्ड मार्शल ब्ल्यूखर या उभयतांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मोहीम आखली. ⇨वॉटर्लूच्या लढाईत (१८ जून १८१५) नेपोलियनचा दारूण पराभव झाला. पुढे तीन वर्षे पॅरिस येथे फौजेची देखभाल करण्यासाठी वेलिंग्टनची नेमणूक झाली.
2. Longford, Elizabeth, Wellington : Pillar of State, Chicago, 1982.
3. Strachan, H. W. Wellingtion’s Legacy : The Reform of the British Army 1830-1854, Longwood, 1984.
“