आ. १. वेलदोडा (इलेटॅरिया कार्‌डॅमोमम) : (1) एक पान व कमानीच्या आकाराचे फुलोरे दर्शविणारी वनस्पतीची आकृती, (2) फूल, (3) फळ, (4) तडकून फुटलेले फळ व दाणे (बीजे), (5) बीज (विस्तारित), (6) बीजाचा उभा छेद (गर्भ मध्यभागी असून त्याभोवती पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) व त्याबाहेर परिपुष्क दाखविले आहे. काळा व त्याबाहेरील पांढरा भाग बीजावरणाचा आहे), (7) श्रीलंकेतील वेलदोडा, (8) म्हैसुरी वेलदोडा, (9) मलबारी वेलदोडा.वेलदोडा : (म. वेलची हिं. छोटी इलाची गु. इलाची क. येलक्की सं. बहुला, एला, चंद्रबला इं. लेसर अथवा मलबार कार्‌डॅमम लॅ. इलेटॅरिया कार्‌डॅमोमम कुल-सिटॅमिनी, उपकुल-झिंझिबरेसी). वेलदोड्याला इंग्रजीत मसाल्याची राणी (क्वीन ऑफ स्पायसीस) असे नाव आहे व भारताला परकीय चलन मिळवून देणारे हे दुसऱ्या क्रमांकाचे मसाल्याचे पीक आहे. ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) औषधीय वनस्पती असून हिचे मूलस्थान व मोठ्या प्रमाणावर लागवड दक्षिण भारतातील सदापर्णी जंगलात आहे. भारताखेरीज हिची लागवड श्रीलंका, थायलंड, ग्वातेमाला व जमेका येथे काही प्रमाणात केली जाते. या वनस्पतीचे मूलक्षोड [→ खोड] जमिनीत वाढणारे असून त्यावर सु. २·२ ते ४ मी. उंचीचे उभे सपर्ण प्ररोह (वनस्पतीचे जमिनीवरील भाग) फुटून येतात. त्यांच्या तळभागावर मऊ वेष्टने (आवरके) असतात व पाने एकाआड एक, लहान देठाची, लांबट भाल्यासारखी मोठी (३० ते ९० X ७·५ सेंमी.) असून त्यांना जाड मध्यशीर असते. हिची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨हळद,कोष्ट कोळिंजन,आले इत्यादींच्या ⇨सिटॅमिनी  कुलातील झिंझिबरेसी अथवा शुंडी उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. फुले द्विलिंगी व स्वयंवंध्य असून सपर्ण प्ररोहाच्या तळाशी फुटून येणाऱ्या ३०–६० सेंमी. लांब फुलोऱ्यांवर [परिमंजरीवर → पुष्पबंध] येतात. फुले ३·५ सेंमी. लांब, पांढरी किंवा फिकट हिरवी असून मोठ्या मध्यवर्ती पाकळ्यांवर निळसर रेषा असतात [→ फूल]. बोंडे (फळे) फिकट हिरव्यापासून ते पिवळ्यापर्यंतच्या रंगांची, सर्वसाधारणपणे १·२५ ते २ सेंमी. लांब, तीन कप्प्यांची, लांबट व दोन्ही टोकांकडे निमुळती अथवा अंडाकृती असून त्यांवर उभ्या बारीक रेषा असतात. ही बोंडे `वेलदोडे’ या नावाने ओळखली जातात. प्रत्येक बोंडात १५–२० तपकिरी – काळ्या, कोनाकार व सुरकुतलेल्या बिया (दाणे) असतात. त्यात भिन्न प्रकारांप्रमाणे २ ते ८ टक्के फिकट पिवळ्या रंगाचे अथवा रंगहीन सुवासिक बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते. बिया शीत असून हृदयास शक्तिदायक, भूक वाढविणाऱ्या, सारक, मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या), वेदना कमी करणाऱ्या आणि दात, कान व डोकेदुखी इत्यादींवर गुणकारी असतात. सर्दी व वांती थांबविण्याकरिता वेलदोड्यांचा उपयोग होतो. तेल सुगंधी द्रव्यात व औषधांत वापरतात. वेलदोड्याचे मूळ सारक व पौष्टिक असते. पक्वान्ने, मसाला व तांबूल यांत वेलदोडे वापरतात. वेलदोडे, सुंठ, लवंगा व शहाजिरे यांचे एकत्रित केलेले चूर्ण अपचनावर गुणकारी असते.

ॲमोमम सुबुलेटम (इं. लार्ज कार्‌डॅमोमम, ग्रेटर ऑर नेपाळ कार्‌डॅमोमम बंगाली – बहा इलाची कुल-सिटॅमिनी, उपकुल – झिंझिबरेसी), ॲ. ॲरोमॅटिक (इं. बेंगॉल कार्‌डॅमोमम हिं. बंगाली – मोरांग इलायची), ॲ. झॅंथायडीस व इतर वनस्पतींची फळेही वेलदोड्यासारखी असतात परंतु ती खऱ्या वेलदोड्यापेक्षा पुष्कळ कमी प्रतीची असतता. बाजारात ती वेलदोडे या नावाखाली विकली जातात व खऱ्या वेलदोड्यात त्यांची भेसळ केली जाते.

मोठा वेलदोडा किंवा मसाल्याचा वेलदोडा (ॲमोमम सुबुलेटम) या जातीची लागवड नेपाळ, बंगाल, सिक्कीम व आसाममध्ये पर्वतातील प्रवाहांच्या कडेने दलदलीच्या जागी करतात.

मोठ्या वेलदोड्याची फळे गर्द लाल-तपकिरी, गोलसर, २·५ सेंमी. लांब असून प्रत्येकात पुष्कळ बिया असतात, त्या साखरेसारख्या गोड दाट गराने एकत्र धरून ठेवलेल्या असतात. याच्या बियांचे वेलदोड्यासारखेच गुणधर्म असतात. त्यांचा मेवामिठाईत उपयोग करतात. उत्तेजक, कडू व रेचक औषधांना स्वाद आणण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. बियांपासून काढलेले तेल पाकणीच्या शोथावर (दाहयुक्त सुजेवर) लावतात.

आ. २. मोठा वेलदोडा (ॲमोमम सुबुलेटम) : फळे.ॲमोमम ॲरोमॅटिकम या ६०–९० सेंमी. उंच ओषधींचे मूलस्थान पूर्व बंगाल व आसाम हे असून त्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशांत तिचा प्रसार झालेला आहे. बंगालचे आर्द्र हवामानाचे जिल्हे, आसाम व हिमालयाचा पायथा येथे तिची लागवड केली जाते. लोंबत्या कणिशावर फळे येतात.ती अरुंद, व्यस्त अंडाकृती सु. ४ सेंमी. लांब व तीन कप्प्यांची असतात. प्रत्येक कप्प्यात पुष्कळ बिया असतात. त्यांचा उपयोग मसाल्यात व औषधांत होतो. त्यांत १–१·२ टक्के तेल असून त्यात सिनीओलचे प्रमाण भरपूर असते. या तेलाला वेलदोड्याच्या तेलासारखा लाक्षणिख वास नसतो.

भारतात फार पूर्वीपासून एला नावाने वेलदोड्याचा वापर केलेला आढळतो. भ्रम उत्पन्न करण्यास वापरलेल्या काढ्यात वेलदोड्याचा उपयोग कौटिलीय अर्थशास्त्रात नमूद केला आहे. संस्कृत काव्यग्रंथांत वेलदोड्याचे उल्लेख आढळतात.

जमदाडे, ज.वि. परांडेकर, शं. आ.

लागवडीचे प्रदेश, क्षेत्र व उत्पादन : कर्नाटक राज्यातील उत्तर कारवार, शिमोगा, हसन हे जिल्हे आणि कडूर तालुका व कूर्ग टेकड्या तमिळनाडूमधील निलगिरीचा पायथा व कोडईकानल टेकड्या आणि केरळ राज्यातील वेलदोड्याच्या टेकड्या या भागांत वेलदोड्याची लागवड होते. त्यांपैकी उ. कारवार व शिमोगा जिल्ह्यांत हे पीक सुपारीच्या अथवा मिरीच्या बागांतून मिश्र पीक म्हणून घेतात. [→ मिश्र पीक पद्धत].

भारतापेक्षा ग्वातेमालात वेलदोड्याचे उत्पादन अधिक होते. यांशिवाय श्रीलंका, म्यानमार (ब्रह्मदेश), कोचीन – चीन व मलेशिया येथेही वेलदोडा जंगली अवस्थेत आढळतो.

हवामान व जमीन : समुद्रसपाटीपासून ७०० ते १,६०० मी. उंचीपर्यंतच्या १५० पासून ५७५ सेंमी. वार्षिक पर्जन्यमानाच्या व १०० ते ३६० से. तापमान असलेल्या प्रदेशात वेलदोड्याची लागवड मर्यादित आहे परंतु ९०० ते १,३७० मी. पर्यंत उंचीच्या व २५० ते ३८० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशांत हे पीक चांगले येते. पुरेशी ओल धरून ठेवणाऱ्या परंतु चांगल्या निचऱ्याच्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वेलदोड्याचे पीक वाढते. तसेच सौम्य व नैसर्गिक छायेत वेलदोड्याची झाडे चांगली वाढतात. झाडाच्या बुंध्यापाशी पालापाचोळा अथवा गवताचा थर आणि सेंद्रिय खताचा मुबलक पुरवठा या गोष्टी वेलदोड्याच्या लागवडीत फार महत्त्वाच्या आहेत.

वेलदोड्याच्या निरनिराळ्या क्षेत्रांत माले अथवा कूर्ग पद्धत, उत्तर कारवारी पद्धत व म्हैसूर पद्धत अशा लागवडीच्या तीन प्रमुख पद्धती आढळतात.

अभिवृद्धी : वेलदोड्याची लागवड बियांपासून तयार केलेली रोपे लावून अथवा जुन्या पिकाच्या गड्‌डयातील ठोंब लावून करतात. रोपे लावून लागवडीची पद्धत सर्वसामान्यपणे वापरात आहे. परंतु वेलदोड्याचे फळ निसर्गात परपरागण [→ परागण] पद्धतीपासूनच तयार होत असल्यामुळे या पद्धतीत एकसारख्या गुणधर्मांची फळे मिळत नाहीत. दुसऱ्या म्हणजे शाकीय पद्धतीत चांगली जोमदार झाडे निवडून त्यांची ठोंबे लावल्यास चांगले उत्पन्न येते आणि रोपे लावून पीक मिळण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यापेक्षा पुष्कळच कमी काळात पीक मिळते. ही पद्धत कमी खर्चाचीही आहे परंतु मोठ्या क्षेत्रावर लावण्यासाठी पुरेशी ठोंबे मिळणे कठीण जाते. शिवाय रोगट ठोंबांतून व्हायरसजन्य रोग पसरण्याची शक्यता असते. शारीरिक अभिवृद्धीच्या पद्धतीने सतत लागवड केल्यास पिकाचा ऱ्हास होण्याचीही शक्यता असते.

रोपे तयार करणे : वेलदोड्याच्या बियांची उगवणशक्ती फळे (बोंडे) पिकल्यावर जलदपणे कमी होते. म्हणून बी ताजे असतानाच पेरावे लागते. १५ दिवसांत उगवणशक्ती निम्म्याने कमी होते (परंतु नैसर्गिक अवस्थेत बिया जमिनीत दीर्घकालपर्यंत सुप्तावस्थेत राहतात). जोमदार वाढीच्या रोगमुक्त व चांगले उत्पन्न देणाऱ्यां झाडांची पिकलेली बोंडे गोळा करून त्यातील बी पाण्यात धुवून ताबडतोब अथवा सावलीत २ ते ९ दिवस राखेत वाळवून गादी वाफ्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यांत पेरतात. साधारणपणे ६ ते ७ आठवड्यांत बी उगवून येते, परंतु काही बी त्यानंतर हलके हलके १ वर्षापर्यंतही उगवते. बी उगवून आल्यावर मांडव घालून सावली करतात. रोपे ३ ते ४ महिन्यांची झाल्यावर दुसऱ्या एका वाफ्यात १५ ते ४५ सेंमी. अंतरावर ती लावतात. या वाफ्यात रोपे कमीत कमी १ वर्ष परंतु सर्वसाधारणपणे दोन वर्षे ठेवतात. या मुदतीत रोपांवर बोर्डो मिश्रणाचे फवारे देतात.

रोपांचे स्थलांतर : रोपांचे कायम जागी स्थलांतर पावसाळ्याअगोदर जून-जुलै महिन्यांत करतात. जंगलातील गवत व लहान झुडपे काढून साफ केलेल्या जागेत ६० X ६० X ३५ सेंबी. आकाराचे खड्डे खणून रोपे लावतात. दोन खड्ड्यांमधील अंतर वेलदोड्याचा प्रकार, जमिनीची सुपीकता व पिकाची मुदत यांवर अवलंबून असते. म्हैसूर प्रकारात ते दोन्ही बाजूंना ३ मी. व मलबार प्रकारात २ मी. असते.

लागणीनंतरची मशागत, खते व निगा : रोपांच्या लागणीनंतर वरचेवर तण काढणे, वाळलेले प्ररोह काढणे, झाडाच्या बुंध्याशी पालापाचोळ्याचा थर घालणे व सावली योग्य प्रमाणात राहण्यासाठी मोठ्या झाडांच्या फांद्या छाटणे अगर मोकळ्या जागेत नवीन झाडे लावणे आणि खत देणे ही महत्त्वाची कामे असतात. शेणखत, कंपोस्ट यांसारख्या सेंद्रिय खतांमुळे झाडांची वाढ चांगली होते. मोठ्या मळ्यातून शेणखताखेरीज एरंडीची पेंड, हाडांची पूड व पोटॅशियम क्लोराइडाचे मिश्रण घालतात. मिश्र पिकात सुपारीच्या मुख्य पिकाला दिलेल्या खताचा फायदा वेलदोड्याच्या पिकाला मिळतो. मोठ्या प्रमाणातील लागवडीच्या पिकाला दर हेक्टरी ३०–४० किग्रॅ. नायट्रोजन, ३० किग्रॅ. फॉस्फरस व ५०–६० किग्रॅ. पोटॅशियम ही खते देतात. डोलोमाइटामुळे जमिनीचा सामू (पीएच मूल्य) सुधारतो.


रोग व किडी : या पिकावरील मुख्यतः दोन रोग विशेष नुकसानकारक आहेत. कवकजन्य रोगामुळे रोपाची पाने कुजतात. पावसाळी हवामानात पुष्कळ वेळा या रोगामुळे सर्व रोपे नष्ट होतात. बोर्डो मिश्रणाचे फवारे मारून हा रोग नियंत्रणाखाली ठेवता येतो. दुसरा महत्त्वाचा रोग मार्बल अथवा कट्टे हा होय. हा व्हायरसजन्य रोग असून कीटकामार्फत त्याचा प्रसार होतो. रोगामुळे झाडाची पाने वळतात व झाडाची वाढ योग्य तऱ्हेने होत नाही व उत्पन्नावर परिणाम होतो. हा रोग उत्तर कारवार जिल्ह्यात विशेष प्रमाणात आढळून येतो. इतरत्रही तो काही भागांत आढळून येतो. रोगट झाडे उपटून त्या जागी विशेष काळजी घेऊन तयार केलेली रोगमुक्त रोपे लावणे एवढाच उपाय यावर आहे.

किडीमध्ये फुलकिडे विशेष नुकसानकारक आहेत. एंडोसल्फान अथवा तंबाखूचे पाणी फवारणे हे या किडीवर उपाय आहेत.

फलधारणा आणि फळांची तोडणी : लागणीपासून वेलदोड्याच्या झाडाला तिसऱ्या वर्षी फलधारणा होते. चौथ्या वर्षापासून आर्थिक दृष्ट्या फायद्याचे पीक मिळते. वेलदोड्याच्या झाडाला अधूनमधून वर्षभर फुले येत राहतात परंतु मे-जून महिन्यांत सर्वांत जास्त फुले येतात. फुले उमलल्यापासून सर्वसाधारणपणे मलबार प्रकारात सु. तीन महिन्यांनी व म्हैसूर प्रकारात ३-४ महिन्यांची फळे पक्व होतात.

फळे वाळविणे व विरंजन करणे : तोडलेली फळे उन्हात अथवा कृत्रिम तऱ्हेने उष्णता देऊन वाळवितात. कृत्रिम तऱ्हेने वाळविण्यासाठी निरनिराळी साधने वापरतात. मातीचा पोकळ ओटा करून त्यावर वेलदोडे पसरतात. ओट्याच्या एका टोकाला जाळ करतात व त्याची आच आरपार पोहोचते. तापलेल्या ओट्यावर वेलदोडे ४८ तासांत वाळतात. कृत्रिम तऱ्हेने वाळविण्याच्या क्रियेमध्ये वेलदोड्यांचा हिरवा रंग कायम राहतो व अशा प्रकारच्या हिरव्या वेलदोड्यांना मध्यपूर्वेतील आशियाई देशांत फार मागणी असते. मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तऱ्हेने वेलदोडे वाळविण्यासाठी खास घरे बांधून त्यांत नळ्यांतून उष्णता खेळविण्याची सोय केलेली असते. उन्हात वाळविलेल्या वेलदोड्यांचे थोड्या प्रमाणात विरंजन होते. कृत्रिम उपायांपेक्षा उन्हात वाळविण्यास जास्त वेळ (३ ते ५ दिवस) लागत असला, तरी या पद्धतीत बियांवरील श्लेष्मल आवरण वाळण्याच्या क्रियेमध्ये कायम राहते व बियांना गोडसर सुगंध प्राप्त होतो. वाळविण्याच्या क्रियेमध्ये वेलदोड्यांच्या वजनात ७२ ते ८० टक्के घट येते.

हावेरीसारख्या वेलदोड्याच्या बाजारपेठेत पांढऱ्या वेलदोड्यांना मागणी असते. वाळलेल्या वेलदोड्यांना पांढरा रंग आणण्यासाठी गंधकाची धुरी देतात अथवा काही विहिरीतील गंधकमिश्रित पाण्याने वेलदोडे धुतात. विरंजनामुळे (रंग घालविण्याच्या क्रियेमुळे) वेलदोड्यांच्या सालीचा रंग पांढरा होतो परंतु बियांना एक प्रकारचा अप्रिय असा वास येतो. विरंजित वेलदोड्यांमध्ये हिरव्या वेलदोड्यापेक्षा बाष्पनशील तेलाचे प्रमाण कमी असते. मात्र विरंजन केलेले वेलदोडे साठवणीमध्ये जास्त काळ टिकतात.

उत्पादन : चांगली मशागत केलेल्या बागांचे हेक्टरी उत्पादन १२५ ते १७५ किग्रॅं. (वाळलेले वेलदोडे) असते परंतु बहुसंख्य बागांतून मशागतीवर विशेष लक्ष दिले जात नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे हेक्टरी उत्पादन ५० किग्रॅ. इतकेच असते.

म्हैसूर प्रकारात वेलदोड्यांच्या मळ्यांची फायदेशीर कालमऱ्यादा १०–१५ वर्षे असते. मलबार प्रकारात ती ७-१० वर्षे असते.

उपयोग : वेलदोड्याचा उपयोग मसाल्यांत, औषधांत, मेवामिठाईत, खाद्यपेयांत आणि मुखशुद्धीसाठी केला जातो. मद्याला स्वाद आणण्यासाठी आणि मध्यपूर्वेतील देशांत कॉफीला स्वाद आणण्यासाठी त्याचा उपयोग करतात.

वेलदोड्यांच्या फळांपासून ऊर्ध्वपातनाने तेल काढतात. ते `वेलदोड्याचे तेल’ या नावाने बाजारात ओळखतात. ते रंगहीन अथवा फिकट पिवळ्या रंगाचे असून त्याला कापरासारखा उग्र वास असतो आणि ते अतिशय तिखट असते. पेयांना स्वाद आणण्यासाठी त्याचा उयोग करतात.

निर्यात व्यापार : १९८१-८२ पर्यंत भारत हा जगातील वेलदोड्याचे उत्पादन व निर्यात करणारा पहिल्या क्रमांकाचा देश होता. आता ग्वातेमालाने ही जागा घेतली आहे. १९९३-९४ साली भारताने ३४२ टन (१३·८६ कोटी रुपये) लहान वेलदोड्याची व १,७४५ टन (११·५७ कोटी रुपये) मोठ्या वेलदोड्याची निर्यात केली होती. १९९४-९५ साली भारतातील वेलदोड्याचे उत्पादन ७,००० टन होते व त्यांपैकी २५५ (३%) टन वेलदोड्याची निर्यात झाली. याच काळातील ग्वातेमालाचे उत्पादन १४,००० टन झाले व त्या देशाने १३,५०० टन वेलदोड्याची निर्यात केली होती. उच्च प्रतीचा हिरवा वेलदोडा इराणच्या आखाताच्या देशांत निर्यात केला जातो व त्याचा कॉफीमध्ये प्रामुख्याने उपयोग केला जातो. भारतातील वेलदोड्याचा खप त्या देशांत सर्वांत जास्त होतो. त्याखोलाखाल यूरोपातील देशांत वेलदोड्याची निर्यात होते.

भारतीय वेलदोड्याचा स्वाद व सुवास उत्तम दर्जाचा असतो. रंग व एकसमानता (सारखेपणा) याबाबतीत ग्वातेमालाचा वेलदोडा सरस असल्यामुळे भारतीय वेलदोड्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.

पाटील, ह.चिं. गोखले, वा. पु.

संदर्भ : 1. Aiyer, Y. N. Field Crops of India, Bangalore, 1958.  

            2. C. S. IR. The Wealth of India, Raw Materials, Vol. I and III, New Delhi, 1948, 1950. 

            ३. काशीकर,चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.