वेरावळ : पूर्वीचे वेलावण किंवा वेरोल. गुजरात राज्याच्या जुनागढ जिल्ह्यातील वेरावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण व बंदर. लोकसंख्या ९३,९७६ (१९९१). हे सौराष्ट्रातील काठेवाड द्वीपकल्पावर, अरबी समुद्र किनाऱ्यावर वसलेले असून जुनागढच्या दक्षिणेस ८३ किमी. वर आहे. देवका किंवा देविका नदी वेरावळच्या उत्तरेकडून तसेच पश्चिमेकडून वाहते आणि जटेश्वर महादेव मंदिराजवळ ती अरबी समुद्राला मिळते. ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या वेरावळ महत्त्वाचे आहे. या गावाची स्थापना तलल येथील वेरावळजी याने केली. मुसलमानी अमदानीत येथील बंदराचा विकास झाला व अठराव्या शतकात ते प्रसिद्ध बंदर बनले. १७६२ नंतर मांगरोळ व पोरबंदर येथील सत्ताधाऱ्यांचा काही काळ वगळता ते जुनागढ संस्थानाच्या ताब्यात होते. वेरावळ शहराच्या जवळच प्राचीन शहराचे अवशेष व सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिर आहे. ⇨प्रभास–पाटण हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वेरावळपासून अवघ्या चार किमी. अंतरावर आहे.