वेझेल : जर्मनीच्या नॉर्थ ऱ्हाईन वेस्टफेलिया प्रांतातील एक प्रमुख औद्योगिक व व्यापारी शहर आणि नदीबंदर. लोकसंख्या ५७,९८६ (१९८९). जर्मनीच्या वायव्य भागात डयूसेलडॉर्फपासून वायव्येस ५६ किमी अंतरावर, ऱ्हाईन व लिप या नद्यांच्या संगमावर हे वसले आहे. शहराचा जुना उल्लेख इ. स. ८०० च्या सुमारास आढळतो. मध्ययुगातही हे नदीबंदर व व्यापारी ठिकाण म्हणून महत्त्वाचे होते. १२४१ मध्ये याला शहराचा दर्जा मिळाला. इ. स. १३५० च्या सुमारास हे हॅन्सिॲटिक लीगचे सभासद शहर बनले. त्या काळात हे शहर बुद्धिमान व कारागीर लोकांचे प्रमुख केंद्र होते. १६०४ मध्ये हे प्रशियाचा एक भाग बनले. त्यानंतर डच, स्पॅनिश व फ्रेंच यांनी या शहरावर क्रमाक्रमाने आपला लष्करी अंमल प्रस्थापित केला. १६६७ मध्ये ते ब्रांडेनबुर्कच्या ताब्यात गेले. १९१८ पर्यंत ब्रांडेनबुर्क-प्रशियन सैनिकी तळ येथे होता. दुसऱ्या महायुद्धात शहरावर झालेल्या प्रचंड बाँबहल्ल्यात शहराचा पूर्ण विध्वंस झाला. महायुद्धानंतर वेझेलचा समावेश तत्कालीन पश्चिम जर्मनीत झाला. यानंतर आधुनिक पद्धतीने शहराची उभारणी करण्यात आली.
शहरात खाणकामाची साधनसामग्री, नळ, काच, यंत्रे, लहान बोटी, दूरचित्रवाणी संच, मातीची कलाकुसरीची भांडी, साबण, सिमेंट, धातूच्या वस्तू, बंदुका यांची निर्मिती व अन्नप्रक्रिया इ. उद्योगधंदे चालतात. परिसरातील पीठगिरण्या व दुग्धव्यवसाय महत्त्वाचे आहेत. लोहमार्ग प्रस्थानक व सांस्कृतिक केंद्र म्हणूनही वेझेलला महत्त्व आहे. शहरात अद्याप काही मध्ययुगीन वास्तू अवशेषरुपाने टिकून आहेत. शहरातील सुंदर ऐतिहासिक वास्तूंपैकी सेंट विल्ब्रॉर्ड चर्च ही एक होय.
सतराव्या शतकातील बालेकिल्ला, अठराव्या शतकाच्या आरंभीच्या काळात बांधण्यात आलेली प्रशियन तटबंदी व बर्लिन गेट यांचे अवशेष येथे आढळतात. न्यू नेदर्लंड्स (न्यूयॉर्क) येथील डच वसाहतीचा पहिला गव्हर्नर पीटर मिन्यवत याचे वेझेल हे जन्मठिकाण आहे.
चौधरी, वसंत