वेझर : (प्राचीन नाव वायसरजस). जर्मनीमधून (पश्चिम) वाहणारी एक नदी. लांबी ४४० किमी. फुल्डा आणि व्हेरा या दोन नद्यांच्या म्यूंदन येथील संगमापासूनचा संयुक्त प्रवाह वेझर या नावाने ओळखला जातो. ही नदी सामान्यपणे उत्तरेस व वायव्येस वाहत जाते. हामल्न व ओयीनऐझेन यांदरम्यानचा प्रवाह मात्र वेझर पर्वतामुळे पश्चिमवाही बनलेला आहे. म्यूंदनपासूनचा पुढचा नदीचा प्रवाह पोर्ता वेस्टफेलिया भागातून व उत्तर जर्मन मैदानातून वाहत जातो. ब्रेमेनच्या उत्तरेस १६ किमी. लांबीच्या नदीमुखखाडीतून ही नदी उत्तर समुद्राला जाऊन मिळते.    

आलर, लेसूम व गीस्ते ह्या उजव्या तीरावरील, तर डीमल, ऑख्‌टम व हुंट या डाव्या तीरावरील वेझरच्या मुख्य उपनद्या आहेत. फुल्डा नदीवरील कासेलपर्यंत ही नदी जलवाहतुकीस उपयुक्त आहे. मिडलँड कालवा संहतीद्वारे ही नदी ऱ्हाईन, एम्स व एल्ब या नद्यांशी जोडलेली आहे. डीमल नदीवरील हेल्मिंगहाउझन येथे, तर एडर नदीवरील हेम्‌फुर्ट येथे मोठी धरणे बांधली आहेत. मिंडन व ब्रेमेन यांदरम्यान नदीवर आठ जलविद्युत्‌निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. ब्रेमरहेवेन, ब्रेमेन, मिंडन व कासेल ही नदीतीरावरील प्रमुख शहरे व बंदरे आहेत. एकोणिसाव्या शतकापासून या नदीतील पाण्याचे खूपच प्रदूषण झालेले असून एकेकाळी या नदीत विपुल असलेले सामन मासे हळूहळू कमी होत गेले आहेत.                                        

 चौधरी, वसंत