विषुवांश : वैपुव पद्धतीमधील एक खगोलीय सहनिर्देशक. खगोलीय विषुववृत्तावर वसंतसंपात बिंदूपासून पूर्वेकडे असलेले खस्थ पदार्थाच्या (उदा., ताऱ्याच्या) होरावृत्तापर्यंतचे कोनीय अंतर म्हणजे विषुवांश होय. अशा तऱ्हेने खगोलीय विषुववृत्तावरील हा चाप म्हणजे वसंतसंपात बिंदु व खस्थ पदार्थ यांच्या होरावृत्तांमधील खगोलीय ध्रुवापाशी केलेला कोन असतो.

ज्याप्रमाणे पृथ्वीवरील ठिकाणाचे निश्चित भौगोलिक स्थान दर्शविण्यासाठी अक्षांश व रेखांश हे सहनिर्देशक वापरतात त्याचप्रमाणे खस्थ पदार्थांचे खगोलावरील (इतर ताऱ्यांच्या संदर्भातील) स्थान अथवा दिशा दर्शविण्यासाठी विषुवांश किंवा होरा आणि क्रांती हे दोन खगोलीय निर्देशक वैषुव पद्धतीत वापरतात. यांपैकी विषुवांश रेखांशाशी व क्रांती अक्षांशाशी समतुल्य आहे. ही ⇨ तिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धती खगोलीय मार्गनिर्देशनात उपयुक्त आहे.

विषुवांशाच्या मापनासाठी खगोलाच्या काही घटकांची माहिती आवश्यक असते. उदा., पृथ्वीचे विषुववृत्तीय प्रतल सर्व बाजूंनी वाढविल्यास ते खगोलास ज्या वर्तुळात छेदते त्याला खगोलीय विषुववृत्त म्हणतात. पृथ्वीचा भ्रमण अक्ष दोन्ही बाजूंस वाढविल्यास खगोलास ज्या बिंदूंत छेदतो, त्यांना खगोलीय उत्तर व दक्षिण ध्रुवबिंदू म्हणतात खगोलीय विषुववृत्त व क्रांतिवृत्त (सूर्याचा वार्षिक भासमान गतीचा मार्ग) ही एकमेकांना वसंतसंपात व शरदसंपात या बिंदूंमध्ये छेदतात खगोलीय उत्तर व दक्षिण ध्रुवबिंदूंमधून जाणारी वर्तुळे म्हणजे होरावृत्ते ही विषुववृत्ताला लंब असतात. अशा प्रकारे एखाद्या स्वस्थ पदार्थाचे होरावृत्त खगोलीय विषुववृत्ताला ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे वसंतसंपात या आदिबिंदूपासून (संदर्भबिंदूपासून) पूर्वेकडे असलेले कोनीय अंतर म्हणजे विषुवांश होय. म्हणजे वसंतसंपात व खस्थ पदार्थ यांच्यातून जाणाऱ्या दोन होरावृत्तांमधील कोनीय अंतर विषुवांशाने मोजले जाते. विषुवांश बहुधा अंशांऐवजी तास, मिनिटे व सेकंद या एककात देतात व त्याला होरा म्हणतात. हे अंतर ० ते २४ होरा (तास) एवढे असू शकते. याचा अर्थ ० ते ३६० अंशांचे २४ भाग (वा एकके) करून त्यांना तास म्हणतात. अशा तऱ्हेने १ तासात १५ अंश येतात व १ अंशाची ४ मिनिटे होतात. पृथ्वीचे एक अक्षीय भ्रमण पूर्ण होताना २४ तासांत तारे एक फेरी पूर्ण करताना दिसतात. म्हणून अंशांऐवजी तास हे एकक निवडण्यात आले आहे. विषुवांश व क्रांती हे सहनिर्देशक बव्हंशी स्थलनिरपेक्ष व कालनिरपेक्ष आहेत. म्हणजे ते निरीक्षकाचे स्थान आणि पृथ्वीचे स्थान (दिवसातील वेळ) यांवर अवलंबून नसतात. अर्थात संपात बिंदूंच्या विलोम (उलट्या) गतीमुळे कालांतराने विषुवांशात किंचित फरक पडत जातो[⟶ संपातचलन]. म्हणून विषुवांश देताना त्यासाठी कोणत्या वर्षाचा संपात बिंदू हा आधार (संदर्भबिंदू) मानला होता, ते नमूद करावे लागते.

विषुवांश काढण्यासाठी स्थानिक नाक्षत्र वेळ [⟶ नाक्षत्र काल] अचूकपणे दाखविणारे घड्याळ वापरतात. वसंतसंपाताचे याम्योत्तर वृत्तावरून (दोन्ही खगोलीय ध्रुवबिंदू आणि निरीक्षकाचे खस्वस्तिक म्हणजे थेट डोक्यावरचा बिंदू यांच्यातून जाणाऱ्या मोठ्या वर्तुळावरून) संक्रमण होताना या घड्याळात शून्य वाजतात. त्यामुळे कोणत्याही खस्थ पदार्थांच्या याम्योत्तर वृत्ताच्या संक्रमणाचा क्षण या घड्याळाने टिपला म्हणजे त्या खस्थ पदार्थांचा विषुवांश समजतो [⟶ याम्योत्तर चक्र]. याकरिता याम्योत्तर संक्रमणमापक हे उपकरण वापरतात. याच्या साहाय्याने कोणत्याही खस्थ पदार्थांच्या याम्योत्तर वृत्ताच्या संक्रमणाचा नाक्षत्र काल अचूकपणे नोंदल्यास त्या पदार्थांचा विषुवांश मिळतो. तसेच ज्या ताऱ्यांचे विषुवांश निश्चितपणे माहीत आहेत, अशा ताऱ्यांचा संक्रमण कालांवरून कालमापकातील चूक लक्षात येऊ शकते आणि ताऱ्यांचे ज्ञात विषुवांश पडताळून पाहता येतात. [⟶ याम्योत्तर संक्रमणमापक].

अगस्त्य ताऱ्याचा विषुवांश ६ ता.२०मि. आहे. याचा अर्थ या ताऱ्यांतून जाणारे होरावृत्त हे खगोलीय विषुववृत्ताला वसंतसंपाताच्या पूर्वेस ६ तास २० मि. (म्हणजे ९५ अंश) अंतरावर असलेल्या बिंदूमध्ये छेदते.

वसंतसंपाताऐवजी निरीक्षकाचे याम्योत्तर वृत्त व क्षितिजाच्या वरचा खगोलीय विषुववृत्तार्ध यांच्या छेदनबिंदूपासून पश्चिमेस मोजलेल्या कोनीय अंतराला गतांश म्हणतात आणि त्याचा विषुवांशाऐवजी वापर करतात. मात्र गतांश स्थलसापेक्ष व कालसापेक्ष असतो.

पहा : क्रांति-१ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति.

ठाकूर, अ.ना.