विषुवत दूरदर्शक : स्वस्थ पदार्थांचे वेध घेण्यासाठी व अशा मंद तेजाच्या पदार्थांचे स्पष्ट प्रकाशचित्रण करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने उभारलेला विषुवत दूरदर्शक वापरतात. संपूर्ण आकाशातील कोणत्याही पदार्थाकडे रोखता येईल असा दूरदर्शक परस्परांशी काटकोनात असलेल्या दोन अक्षांभोवती फिरविता यावा लागतो. उभ्या व त्याला काटकोनात असणाऱ्या आडव्या अक्षाभोवती फिरविता येणाऱ्या दूरदर्शकाने दोन स्वस्थ पदार्थांतील कोनीय अंतरे मोजणे शक्य असते, पण एखादा खस्य पदार्थ दीर्घकाळ दूरदर्शकाच्या बिंबिकेच्या (वस्तुभिंगाच्या) क्षेत्रात ठेवणे आवश्यक वाटल्यास अशा दूरदर्शकाची हालचाल नियंत्रित करणारे दोनही अक्ष एकसारखे कार्यान्वित करावे लागतात. या अडचणीचे निवारण करण्यासाठी एका सोप्या तत्त्वाचा उपयोग करून विषुवत दूरदर्शकाचे आरोपण केलेले असते.

तारे, ग्रह व इतर खस्थ पदार्थांचे आकाशातील कोणत्याही वेळचे स्थान विषुवांश (होरा) व क्रांती या विषुववृत्तीय सहनिर्देशकांच्या [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] साहाय्याने निश्चितपणे सांगता येते. विषुवत दूरदर्शकांमध्ये दोन अक्षांपैकी एक अक्ष पृथ्वीच्या आसाला समांतर अशा कललेल्या अवस्थेत पक्का केलेला असतो. याला ध्रुवीय अक्ष असे म्हणतात. कोणताही तारा दीर्घकाळ दूरदर्शकाच्या दृष्टिक्षेत्रात रहावा म्हणून ध्रुवीय अक्ष पृथ्वीच्या गतीच्या विरूद्ध दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे एका नाक्षत्र दिवसात एक वलन (फेरी) पूर्ण करील अशी योजना केलेली असते. ही गती घड्याळासारख्या यांत्रिक यंत्रणेने किंवा विद्युत् प्रेरकाने देता येते. या कललेल्या अक्षाला काटकोनात असणाऱ्या अक्षावर दूरदर्शक बसविलेला असून पाहिजे असलेल्या क्रांतीइतका कोन करून दूरदर्शक पक्का केला जातो. या अक्षाला क्रांति-अक्ष असे म्हणतात. एखादा तारा अशा तऱ्हेने एकदा दूरदर्शकाच्या दृष्टिक्षेत्रात आणल्यावर तो दीर्घकाल विनासायास या दृष्टिक्षेत्रात दिसतो. त्यामुळे त्याचे प्रकाशचित्रण करणे किंवा अधिक बारकाईने वेध घेणे शक्य होते.

पहा : दूरदर्शक.

ठाकूर, अ. ना.