हिपार्कस : (इ. स. पू. दुसरे शतक) . ग्रीक ज्योतिर्विद व गणिती. त्यांनी ⇨ संपातचलना चा शोध लावला त्यांनी वर्षाचा कालावधी शोधून काढला व त्यात ६.५ मिनिटांचा फरक होता त्यांनी ताऱ्यांची पहिली यादी तयार केली आणि ⇨ त्रिकोणमिती सूत्रबद्ध करण्याचे सुरुवातीचे काम केले. क्रांतिवृत्ताच्या तिर्यक्तेची निश्चिती हेही त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यांचे चरित्र व कार्य यांविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. त्यांचे चाहते व शिष्य ⇨ टॉलेमी यांच्या Megale Syntaxis Tes Astronomias या ग्रंथात हिपार्कस यांच्या कार्याची माहिती मिळते. 

 

हिपार्कस यांचा जन्म नायसीआ (ग्रीस) येथे झाला. र्‍होड्स बेटावरत्यांनी स्वतःची वेधशाळा उभारली व तेथे वेध घेतले. ॲलेक्झांड्रिया येथील विद्वानांशी ते सतत संपर्क साधीत. र्‍होड्स येथे ते ३५ वर्षे राहिले. त्यांनी १४ ग्रंथ लिहिले परंतु ‘टेबल ऑफ कॉर्ड्स ऑफ अँगल्स’ याइंग्रजी शीर्षकार्थाच्या ग्रंथाखेरीज इतर काही उपलब्ध नाही. ताऱ्यांसंबंधी त्यांच्या पूर्वीच्या ज्योतिर्विदांनी जुनी टिपणे जमविली होती, ती हिपार्कस यांनी स्वतःच्या टिपणांबरोबर पडताळून पाहिली. यावरून त्यांना संपात बिंदूला चलन असते, हा शोध लागला. त्यांच्या गणिताने आलेला चलनाचा वार्षिक ४५-४६ सेकंद (विकला) हा आकडा सध्याच्या ५०.२६° से. आकड्यापासून फार दूर नाही. यावरून सांपातिक वर्ष हे नाक्षत्रवर्षाहून ६.२५ मिनिटांनी लहान आहे, असे त्यांना आढळले. त्यांनी नाक्षत्रमास, पातमास व उपमास यांचा कालावधी ठरविला होता. त्यांनी चंद्राची कक्षा व क्रांतिवृत्त यांमध्ये ५° चा कोन ठरविला होता. त्यांनी शर, भोग व ⇨ प्रत यांसह ८५० ताऱ्यांची यादी बनविली. पुढे १,५०० वर्षे ही यादी प्रमाणभूत मानली जात होती. पृथ्वीच्या अक्षांश-रेखांशांची कल्पना शर-भोग यांवरूनच आली. [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. 

 

हिपार्कस यांना चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे चंद्राच्या स्थितीत अनियमितपणा आढळला. अपोलोनियस यांची ⇨ अधिवृत्त ही कल्पना व विमध्यता यांच्या आधारे हिपार्कस यांनी या अनियमितपणाची उपपत्ती मांडली. त्यांनी सूर्यकेंद्रित विश्वाची कल्पना स्वीकारलेली नव्हती. सांवासिक व पातमास यांचे त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केले, त्यांवरून ते आगामी ग्रहणे वर्तवीत असत. त्यांनी सूर्य व चंद्र यांची आकारमाने व अंतरे अजमावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्रिकोणमिती व गोलीय त्रिकोणमिती ज्योतिषशास्त्रात प्रथमच आणली. 

 

प्राचीन काळातील सर्वांत मोठे थोर ज्योतिर्विद, आधुनिक ज्योतिष-शास्त्राचे जनक किंवा पद्धतशीर वेधप्रधान ज्योतिषशास्त्रांचे आद्यप्रणेते असे हिपार्कस यांच्याविषयी सार्थपणे म्हटले जाते. 

 

हिपार्कस यांचे साधारणतः इ. स. पू. १२७ नंतर र्‍होड्स येथे निधन झाले. 

काजरेकर, स. ग.